Saturday, October 31, 2020

ध्रुवांगल पथीनारू

पहाटे साडेचारची वेळ. तीन मित्र पार्टी करून भर पावसात आपल्या कारने घरी चालले आहेत. अचानक त्यांच्या कारसमोर एक व्यक्ती येते. अपघात घडतो. या अपघातात ती व्यक्ती मरण पावते. तिघेही त्या मृतदेहाला कुणाला शंका येऊ नये म्हणून गाडीच्या डिक्कीत टाकून घरी घेऊन येतात. दुसऱ्या दिवशी पोलिसांना रस्त्यावर स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केलेली एक व्यक्ती सापडते. या घटनेच्या तपासासाठी पोलिस वरील तीन युवकांच्या बंगल्यावर येतात. त्यांची झडती घेतली जाते. परंतु काल मरण पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह त्यांच्या गाडीच्या डिकीतुन गायब झालेला असतो. थोड्याच वेळात एका फ्लॅटमधून मधून एक मुलगी गायब झाली असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये येते. पोलिस स्टेशनमधील इन्स्पेक्टर हा थंड डोक्याने विचार करणारा आहे. तो शांतपणे या सर्व घटनांचा पाठपुरावा करतो व त्यातील संबंध शोधून काढतो. एक अपघात, एक आत्महत्या व एक हरवलेली व्यक्ती यांचा एकमेकांशी काय संबंध असेल? या प्रश्नाभोवती फिरणारा रहस्यपट म्हणजे "ध्रुवांगल पथीनारू" होय. तसा हा चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये दाखवला आहे. परंतु, शेवट मात्र वर्तमान काळातील आहे. तीन निरनिराळ्या घटनांमधील रहस्य क्षणोक्षणी उलगडत जातं. पण खरा गुन्हेगार कोण? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. शेवटच्या मिनिटाला या प्रश्नाचे उत्तर मिळतं व कथेचा अनपेक्षित शेवट होतो.
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला हा तमिळ चित्रपट कार्तिक नरेन यांनी लिहिला व दिग्दर्शित केलेला आहे. रहस्य पटाची एक वेगळी आवृत्ती यात पहायला मिळते.
 



Friday, October 30, 2020

सुवर्ण गरुड: लेखक मारुती चितमपल्ली

अरण्यऋषी म्हणून ओळख असलेले मराठी लेखक मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले हे पुस्तक होय. वनाधिकारी म्हणून काम करत असताना प्राण्यांसोबतच्या तसेच निसर्गाच्या सहवासातील अनेक अनुभवांवर लिहिलेल्या कथांचा व घटनांचा हा संग्रह होय. यातील पहिल्याच कथेच्या संदर्भाने पुस्तकाला "सुवर्ण गरुड" असे नाव देण्यात आलेले आहे. जंगलात वावरणाऱ्या विविध प्राण्यांसोबत त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. त्यातून विविध प्राण्यांची गुणवैशिष्ट्ये प्रामुख्याने समोर येतात. यातील अनेक वैशिष्ट्ये सर्वसामान्य वाचकाला कदाचित माहीत नसतीलही. त्यामुळे प्राणीजीवन नव्याने अनुभवण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळते. प्राण्यांचं वागणं-बोलणं व मनुष्यासोबत असलेला दृष्टिकोन हा पदोपदी विविध कथांमधून जाणवत राहतो. सुवर्ण गरुडासोबतच, मुकना मोर, खंड्या पक्षी, नाकेर पक्षी, शेकरू, कोल्हा, उंदीर, मुंगूस, सांभर, वाघीण, अजगर यासारख्या विविध प्राण्यांच्या कथा या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात. पांढरा भुजंग या कथेद्वारे पांढऱ्या नागाच्या शोधार्थ जीवन व्यतीत केलेल्या लेखकाच्या मामाची कहाणी समोर येते. तसेच सोलापूरच्या रखमजी चाचा यांची कहाणी देखील या पुस्तकांमध्ये वाचण्यास मिळते. पदोपदी जंगलातील अनुभव प्राण्यांसोबत जीवन आपण या कथांमधून अनुभवत फिरत असतो.



Wednesday, October 21, 2020

दांडेकरांची हरिश्चन्द्रवारी

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील घनदाट अरण्यात सर्वोच्च कोकणकड्यासह विराजमान असलेला दुर्गम दुर्ग म्हणजे हरिश्चन्द्रगड होय. ज्येष्ठ लेखक व दुर्गअभ्यासक गो. नि. दांडेकर जेव्हा या दुर्गावर पहिल्यांदा गेले होते तेव्हा तेही वाट चुकले होते. नगर जिल्ह्यातून ते थेट पुणे जिल्ह्यात पोहोचले होते! त्यांची ती अद्भुत सफर त्यांची 'दुर्गदर्शन' या पुस्तकात वर्णन केली आहे. त्यातलाच हा एक उतारा. 
 

 

गावकुसातील जित्राबं - भरत आंधळे

प्रत्येक गाव हे विविध प्रकारच्या लोकांनी भरलेलं असतं. त्यात निरनिराळ्या प्रवृत्तीचे, स्वभावाचे, शरीरयष्टीचे व व अतरंगी लोक भरलेले असतात. प्रत्येकाची मानसिकता वेगळी, दृष्टिकोन वेगळा आणि जीवन जगायची पद्धतही वेगळी असते. अशाच गावातील विविध व्यक्तींचे चित्रण लेखक भरत आंधळे यांनी त्यांच्या "गावकुसातील जित्राबं" या पुस्तकांमध्ये केलेले आहे. लेखकाचं नाशिक जिल्ह्यातील एक छोटस गाव. या गावात १९९० च्या दशकामध्ये होऊन गेलेल्या विविध व्यक्तींचे व्यक्तिचित्रण या पुस्तकांमध्ये केले गेलेले आहे. मी स्वतः १९९० च्या दशकामध्ये ग्रामीण भागात मोठा झालो असल्याने गावाकडची लोक कशा प्रकारची अवलिया असतात, हे जवळून पाहिलेले आहे. त्यामुळे हे लेखन लगेच भावले. वेगळ्या नावाची किंबहुना अशीच व्यक्तीचित्रण असणारी लोक आपल्या आजूबाजूला होती. किंबहुना ती सर्वच गावांमध्ये असतात. अनेक जण स्वार्थीपणाने कार्य करतात, काहीजण मनमौजी असतात, काहीजण मिळेल ते काम करतात, काहीजण नित्यनेमाने आयुष्यभर एकच काम करत असतात, काहींना पर्याय नसतो तर काहींना नवीन विचारसरणीचे व राहणीमानाचे आकर्षण असते. अशी अनेक माणसे या पुस्तकातून आपल्याला भेटून जातात. गावाकडच्या व्यक्तींसोबतच तिथल्या राहणीमानाचेही दर्शन होते.
आज बहुतांश लोक पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शिवाय गावाकडील राहणीमानही वेगाने बदलत चाललेले आहे. निश्चितच त्याचा परिणाम गावगाड्यावर होताना दिसतो आहे. परंतु मागील शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ग्रामीण जीवन आमच्यासारख्यांनी अनुभवले, कदाचित ते पुढच्या पिढ्यांना अनुभवयास मिळणार नाही.
या पुस्तकातील प्रत्येक पात्र वेगवेगळे आहे. ते आपल्याला काहीतरी गोष्ट शिकवून जाते. त्यात जगावे कसे किंवा कसे जगू नये? या प्रश्नाचेही बहुतांशी उत्तर मिळून जाते. पु. ल. देशपांडे यांच्या "व्यक्ती आणि वल्ली" मधील विनोदी पात्रे या पुस्तकामध्ये नसली तरी अत्यंत साध्या ग्रामीण व्यक्ती आपल्याला त्यातून भेटून जातात. विशेष म्हणजे लेखकाने प्रामाणिकपणे आपल्या वडिलांचे प्रतापही व्यक्तिचित्रणाद्वारे या पुस्तकातून मांडले आहेत. ग्रामीण व्यक्ती व जीवन शैली अनुभवलेल्या प्रत्येकालाच यातील प्रत्येक पात्र जाणून घेण्यात निश्चितच आनंद वाटेल.
 

 

Tuesday, October 20, 2020

ट्रॅप्ड

एखाद्या इमारतीच्या ३५ व्या मजल्यावरील सदनिकेत तुम्ही अडकला आहात. पूर्ण इमारतीत तुमच्या शिवाय कोणीही राहत नाही. घरातील पाणी आणि वीज पूर्ण बंद आहे. आजूबाजूच्या इमारती अतिशय खुजा आहेत. त्यामुळे तुमचा आवाज तीथवर पोहोचत नाही. अशा वेळी तुमची काय अवस्था होईल व तिथून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय काय कराल? या प्रश्नांची उत्तर देणारा वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे ट्रॅप्ड होय.
काही वर्षांपूर्वी दूर निर्जन बेटावर अडकलेल्या एका व्यक्तीची गोष्ट हॉलिवूडच्या "कास्ट अवे" या चित्रपटातून पाहिली होती. पण ट्रॅप्ड मात्र यापेक्षा वेगळा आहे. या चित्रपटात त्याला आजूबाजूची सर्व माणसं दिसतायेत. हजारो लोक त्याच्या दृष्टिक्षेपात आहेत. पण तरीही तो हतबल आहे. कारण त्यांना त्याचं अस्तित्व माहित नाहीये.
पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मनुष्यप्राणी हा सर्वात बुद्धिमान मानला जातो. त्याच्या मेंदूचा अतिशय हुशारीने उपयोग करून त्याने या जगावर हुकूमत मिळवली आहे. त्यामुळे तो कसेही करून आपल्या प्रयोगशील मेंदूचा वापर कसा करू शकेल? हे या चित्रपटातून दिसते. आपल्या आजूबाजूच्या वस्तूंचा वापर करून तो सुटका करण्याचा प्रयत्न करतो. घरातल्या उंदरांनाही तो घाबरतो. पण नंतर त्याच्यात धिटाई येते. अन्नावाचून तडफडत असताना शुद्ध शाकाहारी असणारा तो वेळप्रसंगी मांसाहारीही होतो. अतिशय संकटात असताना त्याच्या मदतीला योग्य वेळी निसर्गही धावून येतो. अनेक आठवडे संघर्ष केल्यानंतर तो स्वतः सहीसलामत स्वतःची सुटका करून घेतो. या कथानकाचा चित्रपट आहे...  ट्रॅप्ड.
सन २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला व सर्व काही राजकुमार राव असलेला हा चित्रपट होय.


 

Monday, October 19, 2020

गर्द: डॉ. अनिल अवचट

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण सुरू झाल्यापासून प्रसारमाध्यमांद्वारे संबंधित बातम्यांचा भडीमार होतो आहे. शिवाय या प्रकरणाने अमली पदार्थांच्या दिशेने नवीन वळण घेतले व बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणे समोर येऊ लागली. चर्चा झडू लागल्या. त्यामुळे ड्रग्ज नक्की काय असते व त्याचे व्यसन कशाप्रकारे जडले जाते? याची उत्सुकता होती. यात पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी "गर्द" या पुस्तकाची मोठी मदत झाली.

लोकांना सर्वसामान्यपणे दारूचे व्यसन असते. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक दारुडे, बेवडे पडलेले बघतो. त्यामुळे व्यसन म्हणजे काय? याची माहिती पहिल्यापासून होतीच. परंतु, गर्द अर्थात हेरोईन, ब्राउन शुगर सारख्या व्यसनांची व्याप्ती नक्की कशी आहे, याची माहिती अद्याप नव्हती. डॉ. अनिल अवचट लिखित गर्द या पुस्तकातून तपशीलवार सर्व माहिती पहिल्यांदाच समजली. डॉ. आनंद नाडकर्णी हे गर्द च्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर होय. त्यांच्या सहवासातून व अनुभवातून अनिल अवचट यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. ब्राऊन शुगरची नशा कशी असते, ती कशी जडते, त्याचे दुष्परिणाम कोणते व त्याची व्यसनाधीन व्यक्ती कशाप्रकारे वागते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सत्य घटनांद्वारे या पुस्तकांमध्ये लेखकाने मांडलेली आहेत. 



एक वेळ दारूचे व्यसन सोडता येईल, परंतु गर्दचे व्यसन सुटणे महाकठीण. तसं पाहिलं तर तो एक प्रकारचा रोगच आहे. म्हणून त्यावर पद्धतशीर उपचार करावे लागतात. केवळ शारीरिक नाही तर व्यसनाधीन व्यक्ती मानसिक आजारी होतो. स्वतःची इच्छा असेल तरीही त्याला बाहेर पडता येत नाही. व्यसन चालूच ठेवावे लागते व त्याकरिता पैसा लागत असतो. पैशासाठी खोटं बोललं जातं, चोऱ्या केल्या जातात व त्यातूनच गुन्हेगार जन्माला येतात. इतकी मोठी व्याप्ती या व्यसनाची आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हे व्यसन करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त आहे. परंतु, भारतीय संस्कृती वेगळी असल्यामुळे आपल्याकडे असं काही नाही. मध्यमवर्गीयांना हे व्यसन परवडणारे नाही. भारतीय उच्चभ्रू लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात लोक गर्दच्या व्यसनाधीन आहेत. याची सर्व माहिती या पुस्तकामधून आपल्याला मिळते. याशिवाय ब्राऊन शुगर, हेरॉईन, गांजा, अफू यांचा नक्की काय परस्परसंबंध आहे, याची माहितीही लेखकाने पुस्तकामध्ये दिलेली आहे. व्यसनाच्या या बाबतीत डोळ्यात अंजन घालणारे असे हे पुस्तक होय.
(डॉ. अनिल अवचट हे मुळचे जुन्नरमधील ओतूरचे. त्यांचा आमच्या गावातील मधुकर कुलकर्णी यांच्याशी स्नेह होता. त्यांच्या श्रीविद्या प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामुळे माझ्या गावाचा या पुस्तकातील उल्लेख सुखावणारा होता.)

Sunday, October 18, 2020

पावनखिंडीतून...

रणजित देसाई लिखित "पावनखिंड" या कादंबरीतील हा बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराज यांच्यातील एक संवाद. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची शिवाजी महाराजांची दृष्टी कशी होती? याची माहिती निश्चितच आपल्याला होते.

ते दृश्य पाहून राजे बाजींना म्हणाले,
'बाजी ! गनीम भारी पडला ! सिद्दी आता हलणार नाही. तो आपली वाट बघत राहणार !'
'कसली ?'
'शरणागतीची !' राजांनी सांगितले.
'वाट बघ, म्हणावं !' बाजी उसळले, 'वेळ आलीच, तर मारू किंवा मरू'
राजे हसले. ते म्हणाले,
'नाही, बाजी, असला अतिरेकी विचार आपल्याला परवडणार नाही. ते फक्त रजपूत करू जाणे ! मोठं संकट आलं की, वैतागानं प्राणाची बाजी लावायची आणि रणांगणी समर्पण करायचं. मागं बायका-मुलींनी जोहार करायचा. नावलौकिक फक्त मरणाचा. यश मात्र नेहमीच शत्रूच्या हाती !'

Saturday, October 17, 2020

रतशासन

दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नाविन्य ठासून भरलेले आहे. अनेक चित्रपटांमधून लेखकाची व दिग्दर्शकाची मेहनत पदोपदी जाणवते. यात प्रकारातला तमिळ रहस्यपट म्हणजे "रतशासन" होय. मागील काही महिन्यांपासून विविध भाषांमधील अनेक रहस्यपट पाहिले. परंतु, हा चित्रपट मात्र थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. शिवाय चित्रपटाची लांबी अडीच तासांची आहे. त्यामुळेच रहस्य आणि थरार दीर्घकाळापर्यंत ठासून भरल्याचे दिसते.
सन २०१८ मधील हा चित्रपट प्रेम कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेता विष्णू विशाल यात मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याची एक यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठी धडपड चालू असते. एका सिरीयल किलरच्या गोष्टीवर त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. परंतु कोणताही निर्माता त्याचा चित्रपट बनवण्यासाठी पुढे येत नाही. मग "दुर्दैवाने" तो पोलिसांची नोकरी स्वीकारतो. मागील काही वर्षांपासून आपल्या सीरियल किलरच्या स्टोरीवर काम केल्यामुळे त्याचा खूप मोठा अभ्यास यावर झालेला असतो. त्याचा फायदा शहरात घडत असलेल्या एका विचित्र खून शृंखलेचा माग काढण्यासाठी तो करतो. अशी या चित्रपटाची स्टोरी लाइन आहे. 

रहस्यपट म्हटलं की, त्यात अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. अनेक शक्यता तपासाव्या लागतात. या सर्वांचा लेखकाने अतिशय बारीक अभ्यास केल्याचे या चित्रपटातून दिसून येते. पदोपदी तयार होणारे प्रश्न आणि निर्माण होणारे रहस्य, पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोध घेण्यास भाग पाडते. छोट्यातील छोटे सुगावे लेखकाने खूप उत्तमरित्या जमवून आणलेले आहेत. खरं तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने गुन्ह्याचा तपास कसा व कोणत्या दिशेने करायचा असतो, यासाठी मार्गदर्शन करणारा असाच हा चित्रपट आहे. कथेतील चढ-उतार, दिशा, सातत्य आणि वेग याला तोडच नाही. त्यामुळे रहस्य पटाचा विचार करत असल्यास हा चित्रपट नक्की आणि नक्की पहा.