अरण्यऋषी म्हणून ओळख असलेले मराठी लेखक मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेले हे पुस्तक होय. वनाधिकारी म्हणून काम करत असताना प्राण्यांसोबतच्या तसेच निसर्गाच्या सहवासातील अनेक अनुभवांवर लिहिलेल्या कथांचा व घटनांचा हा संग्रह होय. यातील पहिल्याच कथेच्या संदर्भाने पुस्तकाला "सुवर्ण गरुड" असे नाव देण्यात आलेले आहे. जंगलात वावरणाऱ्या विविध प्राण्यांसोबत त्यांना आलेले अनुभव या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आलेले आहेत. त्यातून विविध प्राण्यांची गुणवैशिष्ट्ये प्रामुख्याने समोर येतात. यातील अनेक वैशिष्ट्ये सर्वसामान्य वाचकाला कदाचित माहीत नसतीलही. त्यामुळे प्राणीजीवन नव्याने अनुभवण्याची संधी या पुस्तकाद्वारे मिळते. प्राण्यांचं वागणं-बोलणं व मनुष्यासोबत असलेला दृष्टिकोन हा पदोपदी विविध कथांमधून जाणवत राहतो. सुवर्ण गरुडासोबतच, मुकना मोर, खंड्या पक्षी, नाकेर पक्षी, शेकरू, कोल्हा, उंदीर, मुंगूस, सांभर, वाघीण, अजगर यासारख्या विविध प्राण्यांच्या कथा या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात. पांढरा भुजंग या कथेद्वारे पांढऱ्या नागाच्या शोधार्थ जीवन व्यतीत केलेल्या लेखकाच्या मामाची कहाणी समोर येते. तसेच सोलापूरच्या रखमजी चाचा यांची कहाणी देखील या पुस्तकांमध्ये वाचण्यास मिळते. पदोपदी जंगलातील अनुभव प्राण्यांसोबत जीवन आपण या कथांमधून अनुभवत फिरत असतो.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com