Monday, October 19, 2020

गर्द: डॉ. अनिल अवचट

सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण सुरू झाल्यापासून प्रसारमाध्यमांद्वारे संबंधित बातम्यांचा भडीमार होतो आहे. शिवाय या प्रकरणाने अमली पदार्थांच्या दिशेने नवीन वळण घेतले व बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणे समोर येऊ लागली. चर्चा झडू लागल्या. त्यामुळे ड्रग्ज नक्की काय असते व त्याचे व्यसन कशाप्रकारे जडले जाते? याची उत्सुकता होती. यात पडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी "गर्द" या पुस्तकाची मोठी मदत झाली.

लोकांना सर्वसामान्यपणे दारूचे व्यसन असते. आपल्या आजूबाजूला आपण असे अनेक दारुडे, बेवडे पडलेले बघतो. त्यामुळे व्यसन म्हणजे काय? याची माहिती पहिल्यापासून होतीच. परंतु, गर्द अर्थात हेरोईन, ब्राउन शुगर सारख्या व्यसनांची व्याप्ती नक्की कशी आहे, याची माहिती अद्याप नव्हती. डॉ. अनिल अवचट लिखित गर्द या पुस्तकातून तपशीलवार सर्व माहिती पहिल्यांदाच समजली. डॉ. आनंद नाडकर्णी हे गर्द च्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर होय. त्यांच्या सहवासातून व अनुभवातून अनिल अवचट यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. ब्राऊन शुगरची नशा कशी असते, ती कशी जडते, त्याचे दुष्परिणाम कोणते व त्याची व्यसनाधीन व्यक्ती कशाप्रकारे वागते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सत्य घटनांद्वारे या पुस्तकांमध्ये लेखकाने मांडलेली आहेत. 



एक वेळ दारूचे व्यसन सोडता येईल, परंतु गर्दचे व्यसन सुटणे महाकठीण. तसं पाहिलं तर तो एक प्रकारचा रोगच आहे. म्हणून त्यावर पद्धतशीर उपचार करावे लागतात. केवळ शारीरिक नाही तर व्यसनाधीन व्यक्ती मानसिक आजारी होतो. स्वतःची इच्छा असेल तरीही त्याला बाहेर पडता येत नाही. व्यसन चालूच ठेवावे लागते व त्याकरिता पैसा लागत असतो. पैशासाठी खोटं बोललं जातं, चोऱ्या केल्या जातात व त्यातूनच गुन्हेगार जन्माला येतात. इतकी मोठी व्याप्ती या व्यसनाची आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हे व्यसन करणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा प्राप्त आहे. परंतु, भारतीय संस्कृती वेगळी असल्यामुळे आपल्याकडे असं काही नाही. मध्यमवर्गीयांना हे व्यसन परवडणारे नाही. भारतीय उच्चभ्रू लोकांमध्येही मोठ्या प्रमाणात लोक गर्दच्या व्यसनाधीन आहेत. याची सर्व माहिती या पुस्तकामधून आपल्याला मिळते. याशिवाय ब्राऊन शुगर, हेरॉईन, गांजा, अफू यांचा नक्की काय परस्परसंबंध आहे, याची माहितीही लेखकाने पुस्तकामध्ये दिलेली आहे. व्यसनाच्या या बाबतीत डोळ्यात अंजन घालणारे असे हे पुस्तक होय.
(डॉ. अनिल अवचट हे मुळचे जुन्नरमधील ओतूरचे. त्यांचा आमच्या गावातील मधुकर कुलकर्णी यांच्याशी स्नेह होता. त्यांच्या श्रीविद्या प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यामुळे माझ्या गावाचा या पुस्तकातील उल्लेख सुखावणारा होता.)

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com