दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये नाविन्य ठासून भरलेले आहे. अनेक चित्रपटांमधून लेखकाची व दिग्दर्शकाची मेहनत पदोपदी जाणवते. यात प्रकारातला तमिळ रहस्यपट म्हणजे "रतशासन" होय. मागील काही महिन्यांपासून विविध भाषांमधील अनेक रहस्यपट पाहिले. परंतु, हा चित्रपट मात्र थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. शिवाय चित्रपटाची लांबी अडीच तासांची आहे. त्यामुळेच रहस्य आणि थरार दीर्घकाळापर्यंत ठासून भरल्याचे दिसते.
सन २०१८ मधील हा चित्रपट प्रेम कुमार यांनी दिग्दर्शित केला होता. अभिनेता विष्णू विशाल यात मुख्य भूमिकेमध्ये आहे. त्याची एक यशस्वी दिग्दर्शक होण्यासाठी धडपड चालू असते. एका सिरीयल किलरच्या गोष्टीवर त्याचं काम पूर्ण झालेलं असतं. परंतु कोणताही निर्माता त्याचा चित्रपट बनवण्यासाठी पुढे येत नाही. मग "दुर्दैवाने" तो पोलिसांची नोकरी स्वीकारतो. मागील काही वर्षांपासून आपल्या सीरियल किलरच्या स्टोरीवर काम केल्यामुळे त्याचा खूप मोठा अभ्यास यावर झालेला असतो. त्याचा फायदा शहरात घडत असलेल्या एका विचित्र खून शृंखलेचा माग काढण्यासाठी तो करतो. अशी या चित्रपटाची स्टोरी लाइन आहे.
रहस्यपट म्हटलं की, त्यात अनेक गोष्टींचा बारकाईने विचार करावा लागतो. अनेक शक्यता तपासाव्या लागतात. या सर्वांचा लेखकाने अतिशय बारीक अभ्यास केल्याचे या चित्रपटातून दिसून येते. पदोपदी तयार होणारे प्रश्न आणि निर्माण होणारे रहस्य, पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोध घेण्यास भाग पाडते. छोट्यातील छोटे सुगावे लेखकाने खूप उत्तमरित्या जमवून आणलेले आहेत. खरं तर एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने गुन्ह्याचा तपास कसा व कोणत्या दिशेने करायचा असतो, यासाठी मार्गदर्शन करणारा असाच हा चित्रपट आहे. कथेतील चढ-उतार, दिशा, सातत्य आणि वेग याला तोडच नाही. त्यामुळे रहस्य पटाचा विचार करत असल्यास हा चित्रपट नक्की आणि नक्की पहा.
Saturday, October 17, 2020
रतशासन
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com