Friday, November 6, 2020

पावनखिंड

वीर बाजीप्रभू देशपांडे यांची वीरगाथा महाराष्ट्रातील सर्वांनाच माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सिद्धी जोहरच्या पन्हाळ्यावरील वेढ्यातून सुटका करण्यासाठी बाजीप्रभूंनी आपले प्राण पणाला लावले होते. पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडल्यावर शिवाजी महाराज थेट खेळणा अर्थात विशाळगडाच्या दिशेने निघाले. परंतु सिद्धी जोहरच्या सैन्याला याची खबर लागताच त्यांनी वेगाने पाठलाग चालू केला. रस्त्यातील घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू व त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे थांबून राहिले व शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत त्यांनी सिद्धी जोहरच्या सैन्याचा अतिशय प्रखरपणे सामना केला. हजारो गनीम कापून काढले. हीच वीरगाथा रणजित देसाई यांनी "पावनखिंड" या त्यांच्या कादंबरीमध्ये चितारलेली आहे.
शिवरायांवरील प्रत्येक कादंबरीद्वारे त्यांच्या विविध गुणवैशिष्ट्यांचे दर्शन होते. शिवाय त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या शिलेदारांची गौरवगाथा ही नव्याने ध्यानात येते. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची पहिली भेट रोहीडा किल्ल्यावर झाली होती. तिथूनच त्यांचा स्नेह अधिक घट्ट होत गेला. बाजीप्रभूंना शिवरायांमधील खरा जाणता राजा दिसला. त्यामुळे लाख मेले तरी चालतील परंतु, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, या उक्तीप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांना सुखरूपपणे गनिमांच्या वेढ्यातून बाहेर काढले. त्यात त्यांना आपले प्राण गमवावे लागले. बाजीप्रभुंसोबतच शिवा काशिद यानेही आपल्या प्राणांची आहुती दिली होती. शिवाजी महाराजांसाठी जीव देणारी ही माणसं इतिहासात अजरामर होऊन गेली. त्यांच्यामुळेच शिवरायांना मराठी माणसांचं स्वराज्य स्थापन करता आले. 


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com