Friday, January 22, 2021

इंटरटेन्मेन्टचा मराठी संघर्ष

मागच्या वीस वर्षांमध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रात अनेक वाहिन्यांचा प्रवेश झाला. झी मराठी, कलर्स मराठी (पूर्वीचे ई टीव्ही मराठी), स्टार प्रवाह, सोनी मराठी सह चित्रपट, संगीत आणि वृत्त या विषयाला वाहिलेल्या अनेक वाहिन्या मराठीमध्ये आहेत. मागच्या तीन-चार वर्षांपासून मुख्य मनोरंजक वाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालल्याचे दिसते. प्रेक्षकांना काय दाखवावं? यापेक्षा प्रेक्षकांना काय हवं? याकडे सर्वच वाहिन्या लक्ष देताना दिसत आहेत. अर्थात यामध्ये टीआरपी नावाच्या गोंडस नावाचा मोठा वाटा आहे. प्रत्येकालाच टीआरपी मिळवायचा आहे. ज्यामुळे जाहिराती वाढतील आणि त्यांचे उत्पन्नही वाढू शकेल. आपण दाखवत असलेल्या मालिकांमधून नक्की कोणता संदेश जातो, याची वाहिन्यांना काहीही पडलेली नाही. असेच अनेक मालिकांमधून दिसून येते.
अनेक वर्षांपासून चालू असलेल्या सासू-सुनेच्या संघर्षाच्या मालिका आजही प्रेक्षकांची पाठ सोडायला तयार नाहीत. याचे कारण एकच आहे की, प्रेक्षकांनाही तेच हवे आहे. अनेक मालिका नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिल्या जातात. तरीही त्यांचा टीआरपी अधिक असल्याने सदर वाहिनी अजून नाटकीयरित्या मालिकेला सादर करते. मागील २० वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलेल्या झी मराठी चे साम्राज्य नुकतेच खालसा झाले. आज स्टार प्रवाह ही वाहिनी पहिल्या क्रमांकावर आहे. एकेकाळी विविध नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन मालिका तयार करणारी झी मराठी आज नावीन्याच्या शोधात आहे. याचा अर्थ असा नाही की स्टार प्रवाह वरील मालिका या उत्कृष्ट आहेत. वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांना जे हवे ते ही वाहिनी सुद्धा देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व वाहिन्यांच्या सर्वाधिक प्रेक्षक या महिला आहेत. त्यामुळे महिलाकेंद्रित मालिका आणि महिलांच्या संघर्षावर आधारित मालिका सर्वात जास्त चालतात. स्टार प्रवाह चा विचार केला तर त्यांच्या प्रत्येक मालिकेमध्ये अभिनेत्री केंद्रित पटकथा आढळून येते. लग्नाच्या २५ वर्षानंतर नवऱ्याकडून फसवली गेलेली स्त्री, काळ्या रंगामुळे सासूचा द्वेष पत्करणारी स्त्री, आपल्या अधिक शिक्षणामुळे सासू कडून त्रास होणारी स्त्री, एकेकाळी मोलकरीण असणारी आणि आता मोठ्या घराची सून झालेली स्त्री, तसेच काहीही न बोलता येणारी स्त्री, अशा विविध स्त्रिया स्टार प्रवाहच्या मालिकांत मुख्य भूमिकेत आहेत. त्यामुळेच स्त्रियांचा असा वेगवेगळा संघर्ष नाटकीयरित्या या मालिकांमधून सादर केला जातोय आणि त्यास टीआरपीच्या रुपाने मोठा प्रतिसादही मिळत आहे.
मागच्याच महिन्यामध्ये सोनी मराठी वरील "सावित्रीज्योती" ही सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील मालिका टीआरपीच्या अभावी बंद पडली. याचा अर्थ असा की प्रेक्षकांना खऱ्या सावित्रीचा संघर्ष बघायचा नाहीये. त्यांना आधुनिक स्त्री किती पिडलेली आहे, यात अधिक रस आहे असे दिसते. तसं पाहिलं तर सोनी मराठी वाहिनीवर बऱ्याच चांगल्या मालिका प्रदर्शित होतात. पण इतरांच्या तुलनेत ही वाहिनी नवी असल्यामुळे त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. हलकीफुलकी कथा असणाऱ्या मालिका तर आज काल कोणत्याच वाहिनीवर पाहायला मिळत नाही. ही शोकांतिका आहे. याउलट अंधश्रद्दा पसरविणाऱ्या, जादू करणाऱ्या बाबा-बुवांच्या मालिकांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. यावरूनच प्रेक्षकांचाही रस आता नक्की कशात आहे, हे स्पष्ट होतंय आणि ते निश्चितच दुर्दैवी आहे.




 

Tuesday, January 19, 2021

ज्ञानार्थी विरुद्ध घोकंपट्टीवाले

पुणे विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करत असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याची वेळ आली. बाहेरच्या महाविद्यालयातून परीक्षा घेण्यासाठी एखादा शिक्षक आला की त्याचा दरारा वेगळाच असायचा. याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. प्रत्यक्ष तोंडी परीक्षा चालू झाली की, परीक्षा खोलीच्या बाहेर घोळक्या घोळक्याने मुलं अभ्यास करत बसलेली दिसायची. आपल्याला नक्की कोणता प्रश्न विचारला जाईल, या प्रश्नांचे काहूर जवळपास सर्वांच्याच मनात माजलेले असायचे. यात एक गोष्ट निरीक्षणाने मला निश्चितच समजली. काहीसा भेदरलेला चेहरा आणि थोडा आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुले आपल्या मातृभाषेतून शिकलेली असावी तर चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवणारी मुले बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेली असायची. जेव्हा प्रत्यक्ष तोंडी परीक्षेला सुरुवात होत असे त्यावेळेस मुलांच्या चेहऱ्यावरुनच त्यांची ओळख होत होती. पण आत्मविश्वासात फरक असला तसाच त्यांच्या ज्ञानामध्ये ही त्याच प्रमाणात फरक दिसून यायचा. मराठी माध्यमातून किंवा स्वतःच्या मातृभाषेतून शिकणारी मुले इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हती. पण त्यांचे प्रात्यक्षिकाचे ज्ञान मात्र खूप उत्तम असायचे. दुसरीकडे इंग्रजी फाडफाड बोलणारी मुले फक्त आम्हा परीक्षकांना इंग्रजीतले मोठमोठाले शब्द टाकून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करायची. समोरचा बसलेला व्यक्ती हा कोणी तरी मूर्ख आहे, ज्याला आपण अस्खलितपणे इंग्रजीत काहीही बोललो तरी तो लगेच प्रभावित होईल, अशा अशा प्रयत्नात ही मुले असायची. अक्कलशून्य पद्धतीने इंग्रजीमध्ये बडबड करत समोरच्याला वेड्यात काढायची कामे ही मुले व्यवस्थित करत होती. परंतु त्यांच्यापेक्षा कित्येक पावसाळे अधिक बघितलेले आम्ही परीक्षेत मात्र त्यांचा डाव व्यवस्थित ओळखून होतो. तेव्हाच मातृभाषेतली ज्ञानार्थी शिक्षण पद्धती व इंग्रजीतली घोकंपट्टीतून आलेली शिक्षण पद्धती यांच्यातला खराखुरा फरक लक्षात आला. मातृभाषेतील शिक्षण घेतलेल्या मुलांना विषय व्यवस्थित समजलेला असायचा, परंतु त्यांना इतरांसारखा तो अस्खलितपणे इंग्रजीमध्ये मांडता येत नव्हता. हाच काय तो फरक. यातून एक गोष्ट मात्र खूप खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता आली की, मातृभाषेतून शिकलेले मुले उत्तम प्रकारे ज्ञानप्राप्ती करतात किंबहुना त्यांना ती पहिल्यापासूनच सवय झालेली असते. एकदा सवय लागल्यावर मग भाषा बदलली तरी काही फरक पडत नाही. याउलट परभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती असते. पहिल्यापासूनच अनेक गोष्टी न समजल्याने त्यांना रट्टा मारायची अर्थात घोकंपट्टी करण्याची सवय झालेली असते. हेच शिक्षण आहे, असं कदाचित त्यांना वाटत असतं. पण जसं फाडफाड इंग्रजी बोलणं प्रतिष्ठा मिळवून देतं त्याहीपेक्षा तुमचं ज्ञान तुम्हाला अधिक प्रतिष्ठा मिळवून देतं असं अनुभवावरून मला वाटतं. 

आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर आलेले ज्ञान इंग्रजीत मांडायचे असल्यास त्यावर थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. माझ्यासारख्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी अशी मेहनत घेऊन इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त केले आहे. एक मात्र नक्की आहे कि, तुमचा तुमच्या भाषेचा पाया पक्का असेल तर तुम्ही कोणतीही भाषा सहजरित्या आत्मसात करू शकता. आपल्याला इंग्रजी भाषा शिकणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा एखाद्या इंग्रजाला मराठी भाषा शिकणे अवघड आहे, हेही तितकेच खरे! 


Monday, January 18, 2021

गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल

मागच्या शंभर वर्षांमध्ये झालेल्या प्रगतीमध्ये प्रथम पुरुषांना प्राधान्य दिले गेले व काही वर्षांनी त्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनीही ही प्रवेश केला. परंतु, हा प्रवेश काही साधा सोपा निश्चितच नव्हता. प्रत्येक स्त्रीला पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये प्रवेश करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे हवाई दल होय. आज भारताच्या स्थलसेना, नौसेना व वायुसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया कार्यरत आहेत. परंतु काही दशकांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ती हळूहळू बदलत गेली. पण, ज्या स्त्रियांनी सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात प्रवेश केला, त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातीलच एक क्षेत्र म्हणजे भारतीय हवाईदल होय. गुंजन सक्सेना या भारतीय हवाई दलातील पहिल्या पायलट होत्या, ज्यांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये सहभाग घेतला होता! मागील शतकाच्या अखेरीस झालेल्या भारत पाकिस्तान कारगिल युद्धामध्ये त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रत्यक्ष युद्धभूमीवर महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांचा जीवनपट दाखविणारा चित्रपट म्हणजे "गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल" होय.
लहानपणापासूनच विमानाच्या पायलट होण्याचे स्वप्न घेऊन मोठी झालेली गुंजन ही एक मध्यमवर्गीय मुलगी. दहावी झाल्यानंतर तिने लगेच पायलट होण्यासाठी तयारी चालू केली. परंतु तोवर या क्षेत्रामध्ये एकही महिला कार्यरत नव्हती. अर्थात याच कारणास्तव घरातील लोकांचा तिला विरोध होता. पण वडिलांच्या पाठिंब्यावर तिने पावले टाकायला सुरुवात केली. यातही बऱ्याच अडचणी आल्या. परंतु, त्यातून ती मार्ग काढत गेली. एक दिवस भारतीय हवाई दलामध्ये महिलांना प्रशिक्षण व प्रवेश देण्यासाठी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात आली होती. तिने यासाठी अर्ज केला व कठोर परिश्रम करून शेकडो महिलांमधून तीच एकमेव निवडली गेली. शेवटच्या वैद्यकिय परीक्षेमध्ये मात्र उंची कमी व वजन जास्त असल्याच्या कारणावरून तिला प्रवेश नाकारण्यात आला. यावरही तिने मात केली व भारतीय हवाई दलामध्ये तिचा प्रवेश झाला. पूर्णपणे पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात प्रवेश करताना एक स्त्री म्हणून विविध अडचणी समोर येत होत्या. त्यावर ती मार्ग काढत गेली. प्रत्येक अडचणीला तिने यशाची पायरी बनवली. अनेकांची साथ तिला मिळत होती. तसेच तिचे पाय मागे खेचणारे देखील या प्रवासात तिला भेटले. अखेर पुरुषांच्या बरोबरीने स्त्री देखील पराक्रम गाजवू शकते हे तिने कारगिल युद्धामध्ये दाखवून दिले. अशा कथेचा प्रेरणादायी प्रवास दाखवणारा हा चित्रपट होय.
अनेक ठिकाणी पुन्हा सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार घेत दिग्दर्शकाने प्रसंग दाखवले आहेत. अर्थात ते कथानकापासून फारसे लांब जात नाहीत. त्यामुळे वेगळे वाटत नाहीत. कथेचा वेग आणि रोमांच राखण्यास दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे. सर्वसामान्य घरातील युवतींना प्रेरणादायी ठरेल, असाच हा चित्रपट आहे. परंतु गुंजन सक्सेना ही भूमिका करणारी जान्हवी कपूर मात्र अभिनयामध्ये अनेकदा मागे पडल्याचे दिसते. तिच्या ऐवजी आजच्या काळातील एखादी चांगली अभिनेत्री घेता आली असती. त्यामुळे चित्रपट आणखी प्रभावी बनू शकला असता. ही एक गोष्ट वगळता बाकी चित्रपट निश्चितच प्रेक्षणीय आहे. 



Sunday, January 17, 2021

संभव-असंभव, लेखक निरंजन घाटे, #समकालीन #प्रकाशन

#पुस्तक_परीक्षण
📖 संभव-असंभव
✍️ निरंजन घाटे
📚 समकालीन प्रकाशन

संभाव्यता व असंभाव्यता या पातळीवर विचार करता येणारे घटक म्हणजे देव, आत्मा, साक्षात्कार, ध्यान, आतला आवाज, परामानसिक अनुभव आणि पुनर्जन्म होय. अशा विविध अतिंद्रिय अनुभवांचा वैज्ञानिक वेध घेणारे पुस्तक म्हणजे "संभव-असंभव" होय. निरंजन घाटे हे खरे तर हाडाचे विज्ञान लेखक. त्यामुळे त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजवलेला आहे. परंतु अनेक गोष्टींना अजूनही विज्ञानाने १००% उत्तर दिलेले नाही. त्यातीलच एक म्हणजे अतींद्रिय अनुभव होय. असं का घडतं? किंवा असे घडण्यामागे नक्की प्रेरणा कोणती? या प्रश्नांची उत्तरे अनेकदा कोड्यामध्ये टाकतात. कधीकधी मानसशास्त्रामध्ये याचे उत्तर देखील सापडते किंवा अनेकदा सदसदविवेकबुद्धीचा वापर करूनदेखील या या प्रश्नांची उकल होते. असेच प्रश्न निरंजन घाटे यांनी या पुस्तकांमध्ये व्यवस्थितरीत्या हाताळण्याचे दिसतात. शिवाय अनेक ठिकाणी त्यांनी विविध उदाहरणे देऊन वैज्ञानिक रूपाने या विषयांची व्यवस्थित मांडणी केली आहे. यातील अनेक गोष्टी अंधश्रद्धा आहेत, हे निश्चित. परंतु हे सिद्ध कसे करायचे, याचे वैज्ञानिक प्रमाण देखील या पुस्तकामध्ये लेखकाने दिलेले आहे. कदाचित याचमुळे आपल्या वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक मजबूत होण्यासाठी ते निश्चितच मदत करू शकते. 



Wednesday, January 6, 2021

खुदा हाफिज

भारतातल्या एका छोट्या शहरामध्ये राहणारे जोडपं... समीर चौधरी आणि नर्गिस चौधरी. सन २००७-२००८ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमध्ये दोघांच्याही नोकऱ्या जातात. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारण्यासाठी त्यांची मानसिकता तयार झालेली असते. अशातच एका एजंटद्वारे त्यांना आखाती देशामध्ये नोकरीची ऑफर मिळते. नर्गिसला लगेचच जॉईन व्हायचे असते. त्यामुळे आलेली संधी ती सोडत नाही व दिलेल्या वेळेप्रमाणे सदर देशामध्ये नोकरीसाठी प्रस्थान करते. दुसऱ्याच दिवशी नर्गिसचा समीरला फोन येतो. तिच्या बोलण्यावरून समीरच्या ध्यानात येते की, आपण फसवले गेलो आहोत. ज्या क्रमांकावरून त्याला फोन आला होता, तो क्रमांकही नंतर बंद करण्यात येतो. एका सामान्य कुटुंबातील समीर मात्र या घटनेने पुरता हादरून जातो. काय करावे ते त्याला सुचत नाही. मग तो थेट 'त्या' देशामध्ये जायला निघतो. पहिल्यांदाच एका अनोळखी देशात त्याची वारी होते. नशिबाने त्याला उस्मान नावाचा एक टॅक्सी ड्रायव्हर भेटतो. त्यामुळे या नवीन देशामध्ये फिरण्यास व तिथल्या लोकांशी संवाद साधण्यास त्याला मदत होते. भारतीय दूतावासाद्वारे नर्गिसचा शोध सुरू होतो. पण हा शोध तसं पाहिलं तर निश्चितच सोपा नसतो. या वाटेत अनेक अडचणी, संकटे आणि अडथळे येतात. नर्गिसचे नक्की काय झाले असावे? या कल्पनेनेच तो हादरलेला असतो. आलेल्या संकटातून मार्ग काढण्याचा तो त्याच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो. अनेकदा फसवलाही जातो. तसेच काहींची साथही मिळते. अशी काहीशी या चित्रपटाची पटकथा आहे. 
 

ऑगस्ट २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या "खुदा हाफिज" या चित्रपटामध्ये विद्युत जमवाल याने समीर चौधरीची मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे. अनेक चित्रपटांमध्ये ॲक्शन हिरोचा रोल साकारलेल्या या विद्युतला एका सामान्य युवकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच पाहायला मिळते. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारीत आहे. ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये घडली होती. परंतु, चित्रपटामध्ये या देशाचे नाव नोमान असे देण्यात आले आहे! तर प्रत्यक्ष चित्रीकरण उज्बेकिस्तान मध्ये करण्यात आले होते.
चित्रपट पाहताना अनेकदा सिनेमॅटिक लिबर्टीचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून येत असले तरी फारुख कबीर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट निश्चितच खेळवून होणारा असाच आहे.