Tuesday, January 19, 2021

ज्ञानार्थी विरुद्ध घोकंपट्टीवाले

पुणे विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करत असताना अनेकदा विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा घेण्याची वेळ आली. बाहेरच्या महाविद्यालयातून परीक्षा घेण्यासाठी एखादा शिक्षक आला की त्याचा दरारा वेगळाच असायचा. याचा अनुभव मी बर्‍याचदा घेतला आहे. प्रत्यक्ष तोंडी परीक्षा चालू झाली की, परीक्षा खोलीच्या बाहेर घोळक्या घोळक्याने मुलं अभ्यास करत बसलेली दिसायची. आपल्याला नक्की कोणता प्रश्न विचारला जाईल, या प्रश्नांचे काहूर जवळपास सर्वांच्याच मनात माजलेले असायचे. यात एक गोष्ट निरीक्षणाने मला निश्चितच समजली. काहीसा भेदरलेला चेहरा आणि थोडा आत्मविश्वासाचा अभाव असलेली मुले आपल्या मातृभाषेतून शिकलेली असावी तर चेहऱ्यावर आत्मविश्वास दाखवणारी मुले बहुतांश इंग्रजी माध्यमातून शिकलेली असायची. जेव्हा प्रत्यक्ष तोंडी परीक्षेला सुरुवात होत असे त्यावेळेस मुलांच्या चेहऱ्यावरुनच त्यांची ओळख होत होती. पण आत्मविश्वासात फरक असला तसाच त्यांच्या ज्ञानामध्ये ही त्याच प्रमाणात फरक दिसून यायचा. मराठी माध्यमातून किंवा स्वतःच्या मातृभाषेतून शिकणारी मुले इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकत नव्हती. पण त्यांचे प्रात्यक्षिकाचे ज्ञान मात्र खूप उत्तम असायचे. दुसरीकडे इंग्रजी फाडफाड बोलणारी मुले फक्त आम्हा परीक्षकांना इंग्रजीतले मोठमोठाले शब्द टाकून गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करायची. समोरचा बसलेला व्यक्ती हा कोणी तरी मूर्ख आहे, ज्याला आपण अस्खलितपणे इंग्रजीत काहीही बोललो तरी तो लगेच प्रभावित होईल, अशा अशा प्रयत्नात ही मुले असायची. अक्कलशून्य पद्धतीने इंग्रजीमध्ये बडबड करत समोरच्याला वेड्यात काढायची कामे ही मुले व्यवस्थित करत होती. परंतु त्यांच्यापेक्षा कित्येक पावसाळे अधिक बघितलेले आम्ही परीक्षेत मात्र त्यांचा डाव व्यवस्थित ओळखून होतो. तेव्हाच मातृभाषेतली ज्ञानार्थी शिक्षण पद्धती व इंग्रजीतली घोकंपट्टीतून आलेली शिक्षण पद्धती यांच्यातला खराखुरा फरक लक्षात आला. मातृभाषेतील शिक्षण घेतलेल्या मुलांना विषय व्यवस्थित समजलेला असायचा, परंतु त्यांना इतरांसारखा तो अस्खलितपणे इंग्रजीमध्ये मांडता येत नव्हता. हाच काय तो फरक. यातून एक गोष्ट मात्र खूप खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता आली की, मातृभाषेतून शिकलेले मुले उत्तम प्रकारे ज्ञानप्राप्ती करतात किंबहुना त्यांना ती पहिल्यापासूनच सवय झालेली असते. एकदा सवय लागल्यावर मग भाषा बदलली तरी काही फरक पडत नाही. याउलट परभाषेतून शिकलेल्या विद्यार्थ्यांची स्थिती असते. पहिल्यापासूनच अनेक गोष्टी न समजल्याने त्यांना रट्टा मारायची अर्थात घोकंपट्टी करण्याची सवय झालेली असते. हेच शिक्षण आहे, असं कदाचित त्यांना वाटत असतं. पण जसं फाडफाड इंग्रजी बोलणं प्रतिष्ठा मिळवून देतं त्याहीपेक्षा तुमचं ज्ञान तुम्हाला अधिक प्रतिष्ठा मिळवून देतं असं अनुभवावरून मला वाटतं. 

आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेतल्यावर आलेले ज्ञान इंग्रजीत मांडायचे असल्यास त्यावर थोडी मेहनत घेण्याची गरज आहे. माझ्यासारख्या मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांनी अशी मेहनत घेऊन इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त केले आहे. एक मात्र नक्की आहे कि, तुमचा तुमच्या भाषेचा पाया पक्का असेल तर तुम्ही कोणतीही भाषा सहजरित्या आत्मसात करू शकता. आपल्याला इंग्रजी भाषा शिकणे जितके सोपे आहे, त्यापेक्षा एखाद्या इंग्रजाला मराठी भाषा शिकणे अवघड आहे, हेही तितकेच खरे! 


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com