Wednesday, February 10, 2021

आदिम विचार

चित्रपटातला शेवटचा प्रसंग चालू आहे. न्यायालयामध्ये एक वृद्ध व्यक्ती कटघऱ्यामध्ये उभी आहे. त्याच्याविरुद्ध त्याच्या मुलाने न्यायालयात केस दाखल केली आहे. तीन मुलांपैकी सर्वात मोठा असूनदेखील संपत्तीतला सर्वात कमी वाटा मिळाल्याने त्या मुलाने वडिलांविरुद्ध न्यायालयात खटला भरलेला आहे. न्यायाधीश त्या वृद्ध व्यक्तीला असे का केले? म्हणून विचारतात यावर समर्पक पद्धतीने तो वृद्ध व्यक्ती उत्तर देतो. त्याचे उत्तर ऐकून न्यायाधीशासहित न्यायालयातील सर्वजण चकित होतात. अगदी त्याचा मोठा मुलगा व सूनदेखील! त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळते. त्यांना आपल्या चुकीची जाणीव होते व चित्रपट संपतो.
सन २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला व ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ओडिया भाषेतील चित्रपट म्हणून पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट आहे, "आदिम विचार". सुक्रू माझी या ८४ वर्षीय आदिवासी व्यक्तीची ही कहाणी आहे. तो एका दुर्गम गावामध्ये आपल्या कुटुंबासह अतिशय आनंदाने राहत असतो. त्याच्या मोठ्या मुलाला दोन मुले असतात. त्याचे हे नातू त्याचे सर्वात जवळचे मित्र असतात. फाटक्या कपड्यांमध्ये राहत असला तरी तो गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती असतो. सुखासमाधानाने जीवन कसे जगायचे, हे त्याला व्यवस्थित माहीत असते. गावातील प्रत्येकाच्या समस्यांची उकल तो आपली समस्या समजूनच करत असतो. देवावर श्रद्धा असली तरी भारतीय संस्कृतीचे विचार मात्र तो खऱ्या अर्थाने रुजवत असतो. धाकट्या मुलाने आपल्याच जातीतील मुलगी पळवून आणल्यानंतर देखील तो सामंजस्याने हसत-खेळत त्यांचे लग्नही लावून देतो. परंतु गावातील उच्च जातीच्या लोकांना अनेकदा त्याचे वागणे खटकत असते. अशाच एका उच्च जातीतील स्त्रीला पांढऱ्या पायाची ठरवून गावातून हाकलून दिले जाते. तिला चेटकीण ठरवले जाते. मग सुक्रू माझी तिला आपल्या पाड्यावर घेऊन येतो. तिची योग्यरीत्या देखभालही करतो. ही गोष्ट मात्र पुन्हा उच्च जातीच्या लोकांना खटकत राहते. त्यातूनच सुक्रूच्या घरात ते कुटुंब कलह लावून देतात. तरीही तो चिडत नाही. सर्व गोष्टी हसत-खेळत व शांत डोक्याने हाताळतो. त्याच्या मनातील "आदिम विचार" त्याला तसे करायला भाग पाडत असतात. अखेरीस मोठा मुलगा त्याच्याविरुद्ध न्यायालयात केस दाखल करतो. असे कथानक असणारा संबळपूरी भाषेतील हा एक संवेदनशील चित्रपट आहे.
भारतीय संस्कृतीतील विचार प्रभावीपणे मांडण्याचे तो कार्य करतो. कुठेही विरोधाभास अथवा बटबटीतपणा दिसून येत नाही. अर्थात ही दिग्दर्शक सब्यासाची मोहापात्रा यांची किमया मानावी लागेल. तसेच सुक्रू माझीची भूमिका केलेले अटलबिहारी पांडा यांचाच पूर्ण चित्रपटावर प्रभाव दिसून येतो. एकंदरीतच आनंदी जीवनाची अनुभूती देणारा असा हा चित्रपट आहे. २६ व्या ओडिशा राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये तब्बल पाच पुरस्कार या चित्रपटाने पटकावले होते! 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com