Thursday, February 11, 2021

ग्यानबाचं विज्ञान

#पुस्तक_परीक्षण

📖 ग्यानबाचं विज्ञान
✍️ डॉ. बाळ फोंडके
📚 मेहता पब्लिशिंग हाऊस

ग्यानबा हा गावाकडे राहणारा परंतु उपजत कुतूहल दाबून शकणारा तल्लख बुद्धीचा मुलगा होय. त्याचे शिक्षण फारसे झाले नसले तरीही आपला परिसर न्याहाळताना त्याला पडणारे प्रश्न खरं तर कोणालाही विचार करायला लावणारे आहेत. असे अनेक प्रश्न आपल्याही मनात येतात. त्याचा आपण विचार करू लागतो. पण त्यांची उकल होत नाही. असेच काही चे प्रश्न ग्यानबा गावात नव्याने आलेल्या दादासाहेब पंडित यांना विचारतो व त्या प्रश्नांची उत्तर शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. या संकल्पनेवर विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी लिहिलेलं ग्यानबाच "ग्यानबाचं विज्ञान" हे पुस्तक आधारलेले आहे. विज्ञान समजून सांगण्यासाठी डॉ. फडके यांनी एका वेगळ्या शैलीचा आधार घेतल्याचे दिसते.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विज्ञान सर्वत्र भरलेलं आहे. फक्त त्याचा विचार आपण करत नाही. किंबहुना ग्यानबा सारखा किडा आपल्या डोक्यात वळवळत नाही! म्हणून वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होतानाही दिसत नाही. मनातील जिज्ञासा हीच वैज्ञानिक दृष्टिकोनाला कारणीभूत ठरत असते, हे ग्यानबाच्या रूपाने या पुस्तकातून सिद्ध होते. ग्यानबाला मध्यवर्ती भूमिकेत ठेवून त्याच्या प्रश्नांची उकल दादासाहेब पंडित करतात. त्याचे प्रश्न फारसे कठीण नाहीत. परंतु शास्त्रशुद्ध उत्तर देणं मात्र बऱ्याचदा कठीण असतं. यातील अनेक प्रश्नांचा आपणही अजून शास्त्रशुद्ध विचार केलेला नाही. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या पुस्तकातून मनोरंजकरित्या व सोप्या भाषेत दिलेली आहेत. उदाहरणार्थ उकिरड्यावर एका समान प्रकारची दुर्गंधी का येते? आपल्या डोळ्यात अश्रू का येतात? कांदा कापल्यावर डोळ्यातून पाणी का येते? पहिला पाऊस पडल्यावर एका विशिष्ट प्रकारचा सुगंध का येतो? शिंकताना आपल्याला डोळे उघडे का ठेवता येत नाहीत? शरीरात ताप का येतो? शरीरावर केसांची वाढ निरनिराळ्या पद्धतीने का होते? झोप का येते? पक्षी कसे झोपतात? झाडांच्या मध्ये पाण्याचा शिरकाव कसा होतो? मिरची इतकी तिखट का लागते? इंद्रधनुष्य आपण पकडू का शकत नाही? डोंगरांचे माथे थंड का असतात? पोटात कावळे काव का करतात? इस्त्री कशी केली जाते? कीटक पाण्यावर का तरंगतात? आरशामध्ये प्रतिमा उलटी का दिसते? वीज जमिनीवर का कोसळते? तसेच आपल्याला जांभई का येते? अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उकल ग्यानबाच्या जिज्ञासा आधारित लघुकथांद्वारे या पुस्तकातून होते. शालेय विद्यार्थ्यांना विज्ञान समजून सांगण्यासाठी अशा प्रकारच्या पुस्तकांचा निश्चितच उपयोग होईल. याद्वारे त्यांच्यामध्ये जिज्ञासावृत्ती जागृत करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम देखील सहज होऊ शकते.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com