नांदेडला माझं नियमित येणे जाणं होत असतं. रात्री
पावणेआठ वाजता सुटणारी पनवेल-नांदेड एक्सप्रेस हीच सर्वात सोयीची ट्रेन
होती. सकाळी सव्वानऊ-साडेनऊच्या दरम्यान ही ट्रेन नांदेड स्थानकात दाखल
होते. अगदी कधीतरीच या ट्रेनचा उशीर आमच्या पदरात पडतो. हिवाळ्याचे दिवस
नुकतेच सुरू झाले होते. प्रथम सत्राच्या अगदी शेवटी-शेवटी माझे व्याख्यान
विद्यापीठात आयोजित केले होते. त्यामुळे वीस-पंचवीस दिवस आधीच ट्रेनचे
बुकिंग सहज मिळाले. ट्रेनचा प्रवास म्हणजे सर्वात सुखद प्रवास होय. रात्री
झोपायलाही शांतपणे भेटते व सकाळी गाडी परभणी जंक्शनला पोहोचली की,
सूर्यनारायण दर्शन देत आपल्याला उठवण्याचे काम करतो. मग इथून पुढचा प्रवास
फक्त नांदेड स्टेशनची वाट पाहण्यात व मराठवाड्याच्या धरतीचे दर्शन घेण्यातच
पार होतो.
त्यादिवशी ट्रेन अगदी तिच्या नेहमीच्या वेळेवर हुजूर साहेब
नांदेड स्टेशनला पोहोचली. सकाळी ११ वाजता माझं व्याख्यान विद्यापीठात
आयोजित केलं होतं. कार्यक्रम हा दोन दिवसांचा होता. त्यामुळे आजचा मुक्काम
विद्यापीठाच्या गेस्टहाऊसवर ठरलेला होता. सकाळी बरोबर साडे नऊ वाजता
विद्यापीठाच्या संगणक शास्त्र विभागातील एक विद्यार्थी मला घेण्यासाठी
स्टेशनला दाखल झाला. साधारणतः वीस ते पंचवीस मिनिटांनी नांदेड शहराची सफर
करत आम्ही शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. विद्यापीठाचे
मुख्य प्रवेशद्वार हे पुढच्या बाजूने आहे. परंतु शासकीय रुग्णालयाच्या
बाजूने गेस्ट हाउस जवळ पडते व शहरातून येताना हाच गेट सोयीचा पडतो. गेटमधून
आत आल्यावर साधारणतः अर्ध्या किलोमीटरवर विद्यापीठाचे फॅकल्टी गेस्ट हाउस
आहे. त्याच्यासमोर आमची गाडी येऊन थांबली. सामान घेऊन आम्ही गेस्ट हाऊसच्या
रिसेप्शनपाशी आलो. माझ्यासोबतच्या विद्यार्थ्याने माझी त्यांच्याशी ओळख
करून दिली. श्रीयुत साळुंखे हे विद्यापीठातील कर्मचारी होते व सध्या आणखी
एका कर्मचाऱ्यांसह गेस्ट हाउसची व्यवस्था पाहत होते. पुण्या-मुंबई कडून
कोणी इथे आलं की, कर्मचाऱ्यांना अप्रूप वाटतं त्यांच्या सेवेची ते चोख
व्यवस्था करतात. हेच येथील लोकांचे खरे वैशिष्ट्य आहे. साळुंके या प्रकारात
मोडणारे होते. जुजबी माहिती करून घेतल्यावर त्यांनी आधीच ठरवून दिलेली
खोलीची चावी माझ्या हातात दिली. एफ २४ हा माझ्या खोलीचा क्रमांक होता. तिथे
एफ व जी या दोन प्रकारच्या खोल्या होत्या. बाकीची अक्षरे कुठे गेली? हा
प्रश्न पडण्याच्या आधीच तो मनातल्या मनात सुटला. एका मजल्याच्या त्या
छोटेखानी गेस्ट हाऊसमध्ये खालच्या मजल्यावरील खोल्यांचे क्रमांक जी अर्थात
ग्राउंड फ्लोवर तर पहिल्या मजल्यावरील क्रमांक एफने अर्थात फर्स्ट फ्लोअरने
सुरू होते. प्रत्येक मजल्यावर २४ अशा एकूण ४८ खोल्यांचे ते वस्तीगृह होते.
माझी एफ २४ अर्थात पहिल्या मजल्यावरची सर्वात शेवटची खोली होती. तिथवर
जाईपर्यंत दिसलेल्या सर्व खोल्या बंद असलेल्या आढळल्या. शासकीय निवासस्थाने
ही ऐसपैस असतात असेच हेही निवासस्थान होते. चौरसाकार रचना असलेल्या या
इमारतीत मध्यभागी छोटीशी बाग बनवलेली होती. बाहेरील बाजूला तसा मोकळा परिसर
होता. खोलीच्या बाहेरील गॅलरीच्या समोर कुठल्याशा कर्मचाऱ्याचे छोटेखानी
घर बांधलेले दिसले. साधारणतः शंभर मीटर अंतरावर विद्यापीठाच्या आवारातील
मुख्य तलाव नजरेस पडला. यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पावसाने सदर तलाव ९०
टक्क्यांच्यावर भरलेला दिसत होता. गेस्ट हाऊस मधील एकंदरीत स्वच्छता
मात्र वाखाणण्याजोगी होती. मी माझ्या खोलीचे दार उघडले व आत गेलो. अर्ध्या
तासात आंघोळ वगैरे आटपून व्याख्यानासाठी सज्ज झालो. त्या दिवशीच्या
व्याख्यानाचा विषय आमचा नेहमीचाच असल्याने तयारीची आवश्यकता नव्हती. अगदी
झोपेत जरी विचारले तरी सांगता येईल इतपत तयारीही अनेक विषयांची माझ्या
अंगात मेंदूत भिनलेली आहे. त्याच सराईतपणे आजचा व्याख्यानाचा दिवस पार
पडला. जिल्ह्यातल्या विविध संगणकशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक या
कार्यशाळेला उपस्थित झाले होते. पाच वाजता पहिल्या दिवसाची सांगता झाली.
त्यामुळे थकलेल्या मुद्रेने मी परत गेस्टहाऊसवर दाखल झालो. सकाळच्या
विद्यार्थ्याने मला परत या ठिकाणी आणून सोडले होते. जाता जाता तो म्हणाला,
"सर काही प्रॉब्लेम असेल तर मला फोन करा."
"हो नक्कीच!", मी उत्तरलो.
"रात्रीच्या जेवणाची व्यवस्था मेडिकलच्या होस्टेलवर केलेली आहे. आठ वाजता जेवून घ्या."
निघताना मात्र मी त्याला सहज विचारले,
"इथं गेस्ट हाऊसवर अजून कोणी राहत नाही का?"
"सध्या तरी कोणी नाहीये. लातूरच्या सबसेंटर वरून काही लोक आले होते. पण ते सकाळी सिटीत राहायला गेलेत."
"का? काय झालं?", मी उत्सुकतेने विचारले.
"बऱ्याच
जणांना असं निर्मनुष्य आणि कमी वस्तीच्या ठिकाणी राहायला आवडत नसावं
म्हणून असेल कदाचित!", त्याने स्मित हास्य करुन उत्तर दिले व तो निघून
गेला. गेस्ट हाऊसचा हा परिसर तसा विस्तीर्ण असला तरी निर्मनुष्य होता.
शहराच्या गजबजाटापासून दूर असलेल्या या भागात मनःशांती तर लाभतेच, शिवाय
मनावरील ताणही हलका होत असतो. सकाळी साळुंखेंशी व्यवस्थित बोलले झाले
नव्हते. त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याकरता मी त्यांच्या रिसेप्शन मागील
खोलीत प्रवेशलो. वहीतून काहीतरी टिपणं काढत बसले होते. मला पाहतात ते उभे
राहिले व स्मितहास्य करून त्यांनी विचारलं,
"साहेब पहिल्यांदाच आलात वाटतं नांदेडला?"
"नाही नांदेडला तसं बऱ्याचदा आलोय. पण तुमच्या विद्यापीठात मात्र पहिल्यांदाच!"
"मग कसं वाटलं नांदेड?"
"छान आहे. आमच्या पुण्यासारखी रहदारी आणि गर्दी नाही इथं. त्यामुळे बरं वाटतं."
यावर
त्यांनी हसून प्रत्युत्तर दिले. संपूर्ण गेस्ट हाउस मध्ये त्यांच्याशिवाय
इतर कोणीच नव्हतं, असं दिसत होतं. त्यामुळे मी उत्सुकतेने प्रश्न केला,
"अजून कोणी नाही का राहायला इथे?"
"नाय, फार लोक नाही राहत आणि तसं पण इतक्या दूर मराठवाड्यात कोण येतो राहायला?"
त्यांच्या
बोलण्यात काहीशी खंत जाणवली. दिवसभरातील बोलण्याचा थकवा असल्याने मला आता
बोलणं जड वाटू लागलं होतं. तसाच साळुंखेंचा निरोप घेतला व आपल्या खोलीकडे
जायला निघालो. पहिल्या मजल्यावरच्या पायऱ्या चढल्यावर समोरच नितांत सुंदर व
स्तब्ध तळ्याचे पुनश्च दर्शन झाले. आजूबाजूच्या झाडीमध्ये मात्र एक
प्रकारचं गुढ पडल्याचे जाणवत होतं. त्या रम्य संध्याकाळी दूरवर मोरांच्या
ओरडण्याचे आवाज येत होते. मराठवाड्यात मोरांचे आवाज त्या दिवशी मी
पहिल्यांदाच ऐकले. साद व प्रतिसाद देत चाललेले मोरांचे ते संभाषण होते.
खोलीचा दरवाजा उघडला व विश्रमासाठी बेडवर अंग झोकून दिले. दहा-पंधरा मिनिटे
असाच डोळे बंद करुन पडुन होतो. इतकी शांतता पुण्यात कधीच अनुभवयास मिळाली
नाही. पण कधीकधी अशा शांततेचा आवाज आपल्या कानात जोरात घुमायला लागतो. तशीच
काहीशी परिस्थिती झाली. त्यामुळे तंद्रीतून जागे होऊन पुढील कामाला लागलो.
रात्री आठ वाजता मेडिकल कॉलेजच्या मेसवर जेवायला जाऊन आलो. पाच
मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या त्या रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते.
कदाचित याचमुळे गेस्टहाऊसवर रात्री कोणी थांबत नसावे, याची कल्पना आली.
जेवण झाल्यावर शतपावली घेऊन आलो. पुन्हा गेस्टहाऊसवर आलो तर तिथे साळुंखे
दिसले नाहीत. कदाचित तेही रात्रीच्या जेवणासाठी गेले असावेत. व्हरांड्यातील
सर्व लाईट चालू होत्या. फक्त खोऱ्यातील लाईट बंद होत्या. पहिल्या मजल्यावर
जाणार्या पायर्या चढताना समोर एक काळे-पांढरे मांजर वेगाने पायऱ्यांवरून
गेले. सर्वात शेवटची पायरी संपली व त्याने एकवार मागे वळुन पाहीले. त्याची
ती भेदक नजर एखाद्या शिकारी प्राण्यासारखी भासून गेली. त्या खोलीसमोरील
गॅलरीतून खाली येण्यासाठी पायऱ्यांचा हा एकमेव मार्ग होता. परंतु मी जेव्हा
पायर्या चढून वर गेलो, तेव्हा मांजराचा कुठेच पत्ता लागेना. दोन्ही
बाजूंना सर्व खोल्यांच्या समोर फक्त लोखंडी कठडे होते. इथून ते मांजर कुठे
गायब झालं? हा प्रश्न मला पडला. तोच त्याचा 'म्याऊ' असा आवाज आला आणि
पाहिले तर ती मांजर मी चढून आलेल्या पायरीच्या सर्वात खालच्या पायरीवर तीच
भेदक नजर रोखून उभे होते! त्याचक्षणी काळजाचा एक ठोका चुकला व भितीची एक
लहर अंगातून गेली. मांजराचा असा थरार चित्रपटाव्यतिरिक्त पहिल्यांदाच
अनुभवला होता. कुठेतरी 'खट्ट' असा आवाज झाला आणि त्याने तेथून तळमजल्याच्या
व्हरांड्यातून धूम ठोकली. मांजराचा तो विचित्र लपंडाव त्या गूढ रात्रीचा
आरंभ करणारा ठरणार होता, याची मला कल्पना नव्हती. खोलीत जाण्याआधी समोरचा
तो स्तब्ध तलाव व त्यात पडलेली चांदण्यांची प्रतिबिंबे पाहण्याचा मोह मलाही
आवरला नाही. भोवतालची दाट झाडी रात्रीच्या त्या अंधारात अजून गूढ भासू
लागली होती. त्या गूढतेचे वलय फार काळ वावरू न देता मी माझ्या खोलीत
प्रवेशता झालो. बॅगेतून पुस्तक काढले व वाचण्याचा प्रयत्न केला.
दहा-साडेदहा त्यानंतर मात्र डोळ्यांवर झोपेचा अंमल येऊ लागला होता.
त्यामुळे निद्रादेवतेच्या स्वाधीन होण्यापासून पर्याय राहिला नाही.
गाढ
झोपेत असताना रात्री एका आवाजाने मला जाग आली. दोन-तीन वेळा तो आवाज झाला.
अतिशय आवेगाने दोन मांजरे एकमेकांशी चित्र-विचित्र आवाजात करून भांडत
होती. 'म्याऊ' आवाजाव्यतिरिक्त मांजरे कोणकोणते आवाज काढू शकतात? असे सर्वच
आवाज कानावर पडू लागले होते. आवाजाची तीव्रता बदलत नव्हती. माझी झोप तर
केव्हाच पळून गेली. मी उठून बसलो व मोबाईलमध्ये वेळ पाहिली. तर रात्रीचे
बारा वाजून एक मिनिट झाला होता. उणीपुरी दीड तासांची झोप झाली होती.
मांजरांचे आवाज थांबण्याचे नाव घेत नव्हते. त्यांना एकदाचे हुसकून लावावे
म्हणून मी दार उघडले व खाली पाहू लागलो. भांडण करणारी दोन्ही मांजरे अजूनही
कुठे दिसत नव्हती. मग पायर्या उतरायला लागलो. तोच त्यांचा आवाज अचानक बंद
झाला. दोन्ही मांजरे एकाच वेळी कशी शांत झाली असावीत? काही समजेनासे होते.
खालच्या मजल्यावरील व्हरांड्याच्या सर्वच लाईट अजूनही चालूच होत्या. मी
चालत चालत रिसेप्शनपाशी आलो. साळुंखे अजूनही आलेले नव्हते. कदाचित ते
रात्री या ठिकाणी थांबत नसावेत. गेस्ट हाऊसच्या बाहेर आलो तेव्हा उजव्या
बाजूला एक मांजर दबक्या पावलांनी तळ्याभोवती असणाऱ्या तळ्याकडे चालत असलेले
दिसले. ती गूढ झाडी त्या मांजराप्रमाणेच मलाही त्याच्याकडे बोलावत
असल्याची वाटली. समोरचा शांत जलाशय रात्रीच्या चांदण्यांनी आणखीन उजळून
निघाला होता. दुरवर कोणाची तरी कुजबुज चालू असल्याचे जाणवले. या मांजरांचं
नक्की काय गूढ आहे? याची उकल करायची मनोमनी ठरवली. म्हणून हळूहळू झाडीच्या
दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. मांजर मात्र झाडीत गुडूप झाले होते.
दुसरे मांजर मात्र कुठेच दिसले नाही. जसजसं गाडीच्या दिशेने चालत होतो
तसतशी अंधाराची तीव्रता वाढत चालली होती. खिशातून मोबाईल काढला व त्याच्या
फ्लाशलाईट मध्ये रस्ता शोधत शोधत पुढे चालू लागलो. एका मळलेल्या पायवाटेने
पुढे गेल्यावर तलावाचा काठ दृष्टीस पडला. सगळीकडे शांतता होती. पण मघाशी
चालू झालेला कुजबुजण्याचा आवाज मात्र कमी होत नव्हता. थोडं आणखी पुढे
गेल्यावर कुजबूजणाऱ्या त्यात दोन आकृती नजरेस पडल्या. होय आकृतीच होत्या
त्या! पूर्णपणे पाठमोर्या... पण त्यातील उजव्या बाजूचा मनुष्य होता.
डाव्या बाजूला होती एक मोठी मांजर! हा मनुष्य मांजरीच्या डोक्यावर हात
फिरवून नक्की काय करतोय? अन, ती मांजर इतकी मोठी कशी? असे नाना प्रश्न मनात
येऊ लागले होते. दोन पावले आणखी पुढे टाकली तेव्हा लक्षात आले की, ती
मांजर नव्हती. मग कोण होती ती? तर तो होता एक बिबट्या... होय बिबट्याच...
त्याच्या मस्तकावरून तो मनुष्य कुरवाळत त्याच्याशी पाण्याकडे तोंड करून
गप्पा मारत होता. ते दृश्य पाहून भीतीची एक लहर अंगातून गेली. गूढतेचे ते
वलय आणखी दाट होत होते. त्या जलाशयासमोर बसलेल्या पाठमोर्या आकृत्या
डोळ्यात साठवून मी वेगाने तिथून काढता पाय घेतला. एक मनुष्य आणि बिबट्याची
जोडी या भयाण रात्री निर्मनुष्य जलाशयावर मध्यरात्री गप्पा मारत बसलीये! पण
का? प्रश्न भयंकर होता. पण उत्तर सापडणं मात्र महाकठीण!
मग मी पळतच
गेस्टहाऊसचा वरचा मजला गाठला व अंथरुणात पडून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो.
अशा प्रसंगी झोप येणे शक्यच नव्हतं. डोळ्यात घर करून राहिलेल्या त्या
मनुष्य आणि प्राण्याची पाठमोरी आकृती दृष्टीपटलावरून जातच नव्हती. अगदी
महत्प्रयासाने रात्री कधीतरी झोप लागली असावी. सकाळी मोबाईल मध्ये
लावलेल्या साडेसहाच्या गजराने जाग आली. तेव्हा एका मोठ्या भयान स्वप्नातुन
बाहेर आलो असल्याची जाणीव झाली. पण खरंच स्वप्न होतं का ते? निश्चितच नाही!
त्या आकृत्या पुन्हा दृष्टिपटलावर दिसायला लागल्या होत्या. प्रश्नाचे
उत्तर शोधणे मात्र गरजेचं होतं. पटापट आवराआवर केली व साडेसात वाजता
रिसेप्शनपाशी पोहोचलो. अजूनही साळुंखे आलेले नव्हते. एक सफाई कर्मचारी
व्हरांडा साफ करताना दिसला. कालपासून साळुंखे व्यतिरिक्त गेस्ट हाउस मध्ये
असलेला तो दुसरा मनुष्य होय! त्याच्या माहितीनुसार साळुंखे आठ वाजेपर्यंत
येणार होते. तोवर मात्र तिथेच बसून राहायचं मी ठरवलं. माझा प्रश्नार्थक
चेहरा बघून तो सफाई कर्मचारी जवळ आला व त्याने विचारले,
"काय झालं साहेब? काय प्रॉब्लेम आहे का?"
कदाचित हा माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो, असं मला वाटून गेलं व मी त्यालाच विचारलं,
"इथं नदीकाठच्या झाडांमध्ये बिबट्या आहे का?"
माझा हा प्रश्न ऐकून तो माझ्याजवळ येऊन बसला.
"होय साहेब बिबट्या आहे नाही तर बिबट्या होता." त्याचे हे उत्तर माझ्यासाठी आणखी एक धक्का देणारे होते. तो पुढे बोलू लागला.
"या
जंगलात बिबट्याचा वावर आहे, असे बरेच जण म्हणतात. पण इथे बिबट्या नाहीये.
मागच्या काही वर्षांपासून विद्यापीठात प्रभाकर साजरे नावाचे एक साहेब होते.
विद्यापीठाने जंगलांची व त्याच्या देखभालीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली
होती. त्यांच्याच काळात या जंगलात सगळ्यात पहिल्यांदा बिबट्या मुक्तसंचार
करत असल्याचं कळालं. साजरे साहेबांची काय जादू होती कोणास ठाऊक? काही
काळातच त्यांनी या बिबट्याला आपलंसं केलं जणूकाही तो त्यांच्या जिवाभावाचा
मित्र झाला होता. पुढे काही दिवसांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर
वनविभागाने या बिबट्याला पकडायचं ठरवलं. पण त्याने आजवर कुणालाच इजा केली
नसल्याने साजरे साहेबांचा त्याला पकडण्यात विरोध होता. वनविभागाने मात्र
त्यांचं ऐकलं नाही. जंगलात दहा-बारा वेळा पिंजऱ्याची जागा बदलूनही तो काही
पिंजऱ्यात सापडला नाही. साजरे साहेबांमुले तो त्या पिंजऱ्यात सापडला नाही
असंच सगळेजण म्हणतात. खरं-खोटं काही मला माहित नाही. एक वर्षांपूर्वी साजरे
साहेबांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. तेव्हा मुलीच्या गावचे तिच्या
जातीचे शे-दीडशे लोक शेजारच्या तालुक्यातून साहेबांना मारायला आले होते.
पार कुदळ कुर्हाडी घेऊन त्यांना चालुन येताना मी स्वतः पाहिले. साहेबांवर
हल्ला होताना त्यांच्या त्या जीवाभावाच्या मित्राने अर्थात बिबट्याने त्या
जमावावर हल्ला करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्या बिचाऱ्यालाच
आपल्या प्राणांना मुकावे लागले. लोकांनी ठेचून त्याची हत्या केली आणि साजरे
साहेबांना त्यांनी याच जवळच्या तलावात ढकलून दिलं होतं. एवढ्या मोठ्या
जमावावर मात्र कोणताच गुन्हा दाखल झाला नाही. पण महिनाभरातच त्या जमावातले
पाच जण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले व तो बिबट्या अजून सापडलेला
नाही. त्यानंतर आठवड्याभरातच जमावाने हल्ला करणारे पूर्ण गाव रिकामी झाले.
ते कुठे गेले? हे अजूनही कुणाला समजलेलं नाही."
एवढे बोलून तो शांत झाला. त्याने एक वर माझ्याकडे पाहिलं विचारलं,
"तुम्हाला दिसले का ते दोघेजण?"
"होय!"
इतकच
म्हणालो व तिथून मी निघून आलो. दहा वाजता मी आजच्या व्याख्यानासाठी
आवराआवर करून निघालो तेव्हा साळुंखे पुन्हा रिसेप्शनवर भेटले त्यांच्या
सोबत अजून एक जण होता. ते माझ्याशी बोलू लागले,
"साहेब तुमची रूम हा साफ करून घेईल."
"साळुंखे, तुमचा सफाई कर्मचारी सकाळीच करून वगैरे साफ करून गेला.", मी उत्तरलो.
यावर साळुंखे यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले व म्हणाले,
"साहेब आमच्याकडे हा एकच सफाई कामगार आहे. दुसरा कोणीच नाही. तुमची रूम कोणी साफ केली?"
त्यांच्या या प्रतिप्रश्नाने तयार झालेल्या नव्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा मिळाली.
© तुषार कुटे
(कथेतील पात्र व घटना पूर्ण काल्पनिक आहेत)
Nanded University व नांदेडच्या आठवणी जाग्या झाल्या. थँक्स. शब्द सामर्थ्य छान आहे कुटे सर.
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteमस्त
ReplyDeleteThanks Atul.
Deleteखूपच रहस्यमय. अंगावर काटा आणणारे लिखाण आहे सर आपले..
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteसर अप्रतिम लिखाण आहे आपले, खूपच छान
ReplyDeleteThank you!
Delete