Tuesday, March 16, 2021

गोष्ट लहानपणीच्या पुस्तकांची

९० च्या दशकामध्ये जुन्नरच्या ग्रामीण भागात आमचे प्राथमिक शिक्षण झाले. त्याकाळात अभ्यासात येणाऱ्या पुस्तकाव्यतिरिक्त अन्य पुस्तके कधी वाचायला मिळत नसत. त्यामुळे मराठीमध्ये अजूनही बरीच पुस्तके लिहिलेली आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. पण पुण्यामधल्या कुठल्याश्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली छोटी छोटी मनोरंजक गोष्टींची पुस्तके पहिल्यांदाच वाचायला मिळाली. माझा आतेभाऊ आणि बालमित्र सुशांत, दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुण्याहून गावी आला की अशी छोटी छोटी गोष्टींची पुस्तके घेऊन यायचा. तेव्हा मीही ती उत्सुकतेने वाचायचो. त्यातल्या जादूगाराच्या, राजा-राणीच्या, राजपुत्राच्या, परीच्या अशा अनेक गोष्टी मन भारावून टाकायच्या. गोष्टीमध्ये लिहिलेल्या सर्व घटना व पात्रे खरोखरच कुठेतरी अस्तित्वात असतील, असं वाटायचं. अनेक कथा आजही मला चांगल्या आठवतात. कदाचित लहानपणीच्या याच वाचनामुळे आज कथा लेखनाची आवड मनात जागृत आहे. त्याचे बरेचसे श्रेय लहानपणी वाचलेल्या या पुस्तकांना देता येईल. त्यावेळी दूरदर्शनवर बघितलेल्या "अलिफ लैला" सारख्या कल्पनारम्य कथाही मी वहीमध्ये लिहून ठेवायचो. त्यातूनच लिहिण्याची सवय व्हायला लागली. आपल्यालाही असे काही लिहिता येईल का? हा प्रश्न मनात यायचा. कसंबसं धडपडत लिहून ठेवायचो. परंतु, यात मधल्या काळामध्ये बराच खंड पडला. आज रहस्य व भयकथा लिहिताना या पुस्तकांची पुनश्च आठवण येते. ती वाचावीशी वाटतात. त्यातून लहानपणीची ती प्रेरणा पुन्हा जागृत होते. पुन्हा नव्या कथा सुचतात. कल्पनारम्य जगात रममाण व्हावेसे वाटते. सृजनशीलता अशीच जागृत ठेवावी व वाढवावी वाटते. त्याचे मूळ या पुस्तकांमध्ये दडलेले आहे. आजही लहान मुलांना भेट देण्यासाठी मी अनेक अशी पुस्तके जपून ठेवली आहेत.
 

 

Saturday, March 6, 2021

डी मोंन्टे कॉलनी

तमिळ चित्रपट सृष्टीमध्ये हॉरर या विषयाला विविध प्रकारे हाताळण्यात आलेले आहे. काही चित्रपटांमध्ये हॉररला देखिल अनेक पैलू पाहण्यात येतात. अशाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे डी मोंन्टे कॉलनी होय. नावावरून एखाद्या कॉलनीमधील भूतांसंदर्भात हा चित्रपट असावा, असे दिसते आणि ते खरे देखील आहे. परंतु पूर्ण चित्रपटभर हि कॉलनी दिसून येत नाही.
या चित्रपटामध्ये आहेत चार मुख्य कलाकार जीवनाशी संघर्ष देत जगत आहेत. भविष्यामध्ये काय वाढून ठेवले आहे, याची त्यांना कल्पना नाही. कदाचित तेच जाणून घेण्यासाठी ते ज्योतिषाकडे जातात. मग त्यांना स्वतःचे "खरेखुरे" भविष्य समजते. त्याच्या आदल्याच दिवशी सहज गंमत म्हणून ते चौघेही शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या डी मोंन्टे कॉलनी नावाच्या एका भुताटकी सदृश घरामध्ये गेलेले असतात. पंधरा-वीस मिनिटांनी मध्ये त्यांना तिथे काहीतरी भयावह आहे, याची जाणीव होते व ते तिथून निघून येतात. येताना चौघांपैकी एकाने तिथली "एक वस्तू" चोरून आणलेली असते. त्या वस्तूसोबतच घरातील पोर्तुगीज अधिकाऱ्यांचे एक भूत त्यांच्यासोबत येतं. आणि मग चित्रपटांमध्ये पुढील थरार सुरू होतो. डी मोंन्टे नावाच्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने त्याच्या पत्नीसह घरातील सर्व नोकर यांची हत्या केलेली असते. शिवाय त्याचाही होरपळून मृत्यू झालेला असतो. हाच पोर्तुगीज अधिकारी आजही डी मोंन्टे कॉलनीवर आत्मा रुपाने राज्य गाजवत असतो. त्याची "ती" वस्तू शेकडो वर्षांपासून या बंगल्याच्या बाहेर गेलेली नसते. जी चौघेही जण तेथून घेऊन जातात. आता ती वस्तू परत त्या बंगल्यामध्ये येते का? येते तर कशी? याची कहाणी सांगणारा हा थरारपट आहे....