गेल्या हजारो वर्षांमध्ये बोलीभाषांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. नव्या भाषा
उदयास आल्या. त्याच प्रमाणे अनेक भाषांचा अस्तही झाला. आज उत्खननामध्ये
तसेच विविध शोधांमध्ये अशा अनेक भाषा समोर आलेल्या आहेत की, ज्यांचा अर्थ
आजच्या मानवाला माहित नाही. किंबहुना अनेक भाषातज्ञ व इतिहासतज्ञ
यांनीदेखील या पुरातन भाषांचा व लिपींचा अभ्यास केला तरीही त्यांनाही वाचता
व समजून घेता आलेली नाही. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृतींमध्ये अशा
अनेक भाषा विस्मरणात गेलेल्या आहेत. काही भाषांमधील काही शब्दांचा अर्थ
लावता येतो परंतु पूर्ण भाषा अजूनही जाणून घेता आलेली नाही. भारतात देखील
सिंधू संस्कृतीमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही अतिशय किचकट व क्लिष्ट अशी
आहे. अनेकांनी दावे केले होते की, ही भाषा आम्हाला वाचता येते. परंतु ही
भाषा व लिपी आजवर कुणालाही वाचता आलेली नाही. अमेरिकेतील एमआयटीच्या
कम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स लॅबोरेटरीने अशा विस्मरणात
गेलेल्या भाषांवर संशोधन सुरू केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व मशीन
लर्निंग अर्थात संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे या भाषा पुनरुज्जीवित
करण्याचे कार्य अमेरिकेतील शास्त्रज्ञ सध्या करत आहेत. मागील काही
वर्षांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या क्षेत्रात मोठ्या वेगाने प्रगती
होताना दिसत आहे. विज्ञानाची अनेक कोडी या तंत्रज्ञानाने सोडविण्याचे कार्य
संगणकतज्ञ करत आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुरातन
भाषांचा अभ्यास व त्यांचा शास्त्रशुद्ध शोध घेणे होय. यावर आधारित अनेक
संगणकीय अल्गोरिदम सध्या संगणकतज्ञ तयार करत आहेत. जुन्या भाषांतील शब्द
आजच्या भाषेतील कोणत्या शब्दाशी मिळते जुळते आहेत व त्यांचा संबंध
कशाप्रकारे आहे? याचाही शोध घेणे सुरू आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक
संगणकतज्ञांनी भाषाशास्त्राचा देखील सखोल अभ्यास केला आहे. पुरातन काळातील
संस्कृती, विचारधारा, परिस्थिती, वातावरण यांचाही अभ्यास या भाषांचा उलगडा
करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच हा शोध घेण्यासाठी विविध
क्षेत्रातील तज्ञांचा उपयोग या प्रकल्पामध्ये एमआयटीद्वारे केला गेला जात
आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर आपण पुढील काही वर्षांमध्ये विस्मरणात
गेलेल्या अनेक भाषा पुन्हा वाचू शकू व तत्कालीन इतिहासाचा देखील अभ्यास करू
शकू.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com