Thursday, April 22, 2021

दोन जगप्रसिद्ध साहसकथा: रॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रुसो

रॉबिन हूड हे नाव तसं लहानपणी मी पहिल्यांदा ऐकलं होतं. दूरदर्शनवर रॉबिन हूड चे कार्टून दाखवले जायचे त्यावेळेस त्याची कथा फारशी कळली नव्हती. मधल्या काळात हे नाव विस्मरणात गेले. परंतु या पुस्तकाने रॉबिन हूडची नव्याने पूर्ण ओळख करून दिली, असेच म्हणता येईल. जंगलात राहणारा हा एक वनवासी आहे. तो बंडखोर आहे. त्याच्याकडे बंडखोरांची भली मोठी फौज आहे. अन्याय करणाऱ्यांविरुद्ध तो थेट युद्ध पुकारतो आणि सामान्य माणसाला मात्र काहीच त्रास देत नाही. कदाचित याचमुळे अशा वृत्तीच्या लोकांना आजच्या काळातील रॉबिन हूड म्हटले जात असावे! या पुस्तकाचा अर्धा भाग रॉबिन हूडच्या कथांवर आधारित आहे; तर उरलेला रॉबिन्सन क्रुसो याच्या कथांवर. डॅनियल डफो यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद भा. म. गोरे यांनी केलेला आहे. रॉबिन्सन क्रुसो म्हणजे निर्जन बेटाचा राजा होय. साहसी सागरी प्रवासाची आवड असलेला हा एक युवक होता. पहिल्याच सागरी प्रवासात त्याची हौस फिटली होती. परंतु त्यातून तो बाहेर पडू शकला नाही. एका सागरी वादळामध्ये त्याचे जहाज निर्जन बेटावर अडकले. शिवाय पूर्ण जहाजातील वाचलेला तो एकमेव व्यक्ती होता! त्याच्या नशिबाने जहाजावरील बरीच साधनसामग्री त्याला वापरायला मिळाली. ज्या बेटावर तो आला होता, तिथे काहीच मानववस्ती नव्हती. अशा ठिकाणी तो कित्येक वर्षे एकटाच राहिला. अठरा वर्षानंतर त्याला नशिबाने एक मनुष्य सोबतीला मिळाला. त्याचा हा पूर्ण जीवनप्रवास या पुस्तकामध्ये कथारूपाने दिलेला आहे. एखाद्या निर्जन ठिकाणी मनुष्य कशा प्रकारे जीवन व्यतीत करू शकतो? त्याची ही मूर्तिमंत कहाणी होय. तब्बल २७ वर्षे रॉबिन्सन क्रुसो त्या निर्जन बेटावर राहिला. त्याचे अनेक अनुभव या पुस्तकात चितारलेले आहेत. लेखकाची शैली पाहता आपण क्रुसोच्या भूमिकेत त्या निर्जन बेटांवर वावरत राहतो. शालेय विद्यार्थ्यांना वाचण्याजोगे व भेट देण्याजोगे ही हे पुस्तक निश्चित आहे. 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com