अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालये कोवीड-१९ च्या प्रभावामुळे
प्रादुर्भावामुळे लवकर उघडणार नाहीत, हे ध्यानात घेऊन या एआयसीटीई अर्थात
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने त्यांचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन
पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली होती. एआयसीटीई च्या अटल अकॅडमी अर्थात
एआयसीटीई ट्रेनिंग अँड लर्निंग अकॅडमीने भारतभर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले. डिसेंबर
२०२० ते मार्च २०२१ या कालावधीतील पंधरा आठवड्यांमध्ये सदर कार्यक्रम
ऑनलाइन पद्धतीने विविध महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते. यातील
बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम हे कार्यशाळा पद्धतीने विशेषत: संगणक
अभियांत्रिकीशी निगडित होते. भारतातील कोणीही व्यक्ती या कार्यशाळांमध्ये
सहभाग घेऊ शकत होता. अगदी औद्योगिक क्षेत्रातील लोकांनाही एआयसीटीईने या
कार्यशाळांमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली होती. भारतातल्या विविध
राज्यांमधील महाविद्यालयात होणारे व झालेले हे प्रशिक्षण कार्यक्रम गुगल
मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि झूम सारख्या वेब कॉन्फरन्सिंग एप्लीकेशनद्वारे
पार पडले. एका कार्यशाळेत अधिकाधिक दोनशे जणांना सहभागी होण्याची परवानगी
देण्यात आली होती. शिवाय एका अकाऊंटद्वारे तुम्ही दोन ते जास्तीत जास्त चार
कार्यशाळांमध्ये सहभागी होऊ शकत होता. त्यासाठी एआयसीटीईच्या अधिकृत
संकेतस्थळावर नोंदणी गरजेची होती. ज्यात प्रामुख्याने ईमेल आयडी व
व्हाट्सअँप क्रमांक तपासला जात होता. या पंधरा आठवड्यांमध्ये भारतातील
विविध अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या बारा
कार्यशाळा मी पूर्ण केल्या. प्रत्येक कार्यशाळेसाठी कमीत कमी ८०% उपस्थिती व
अंतिम दिवशी ऑनलाइन घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये ६० टक्के गुण येणे
गरजेचे होते. या बाराही कार्यशाळा मी ८० टक्के उपस्थिती व ६० टक्के गुणांची
पूर्ती करून पूर्ण केल्या. खरतर एकाला केवळ चारच प्रशिक्षण कार्यक्रम
पूर्ण करता येऊ शकत होते. परंतु तीन वेगवेगळ्या ईमेल आयडी व व्हाट्सअप
क्रमांकाद्वारे मी त्यात माझा सहभाग नोंदवला. ज्यामुळे मला बारा कार्यशाळा
पूर्ण करता आल्या! अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित यातील अनेक कार्यशाळा
संपन्न झाल्या. डेटा सायन्स, मशीन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डीप
लर्निंग, वर्चुअल रियालिटी, थ्रीडी प्रिंटिंग सारखे नवनवीन विषय या
कार्यशाळांमध्ये हाताळण्यात आले होते. सदर विषयांवर मी यापूर्वीही सखोल
अभ्यास केला आहे. परंतु दर कार्यशाळेमध्ये नवनवीन माहिती वेगवेगळ्या
प्रकारे अभ्यासायला व शिकायला मिळाली. विशेष म्हणजे भारतातील विविध भागातील
अनेक तज्ञांशी बोलायला व त्यांची शिकवण्याची पद्धती अभ्यासायला मिळाली.
त्यातून एक वेगळ्या प्रकारचे शिक्षण प्राप्त झाले. अनुभवसंपन्नता आली.
लॉकडाऊनचा व ई-लर्निंगचा हा एक प्रकारे फायदाच झाला, असे म्हणता येईल.
एकंदरीत या अनुभवाचा पुढील वाटचालीसाठी निश्चितच उपयोग होईल, असे वाटते.
अखिल
भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या या कार्यक्रमांविषयी काही गोष्ट नमूद
कराव्याशा वाटतात. त्यांनी प्रत्येक कार्यशाळेसाठी २०० जणांसाठीच जागा
राखीव करून ठेवल्या होत्या. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक प्रवेशिका आल्या
असल्यास महाविद्यालये त्या सरळ रद्द करीत होते. परंतु वस्तुस्थिती अशी होती
की, एकाही कार्यक्रमाला नोंदणी केलेल्या सहभागींपैकी १०० पेक्षा अधिक
सहभागी प्रत्यक्ष उपस्थित राहत नव्हते. याचाच अर्थ असा की ज्यांना खरोखर
प्रशिक्षण कार्यक्रम करायचे होते, त्यांचे नाव रद्द केले गेले असावे. अनेक
महाविद्यालयांमध्ये ४०० ते ५०० जणांनी सहभाग नोंदवला होता. परंतु प्रत्यक्ष
८० ते १०० लोकांनीच या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावर तंत्रशिक्षण
परिषदेने काहीतरी उपाय शोधायला हवा. शिवाय प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रम
मोफत असल्यामुळे उपस्थितांचा निष्काळजीपणा अनेक ठिकाणी दिसून आला. अर्थात
तंत्रशिक्षण परिषदेने अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच राबविला असल्याने
त्यात कदाचित या त्रुटी राहिल्या असतील. परंतु भविष्यात असे ऑनलाईन
प्रशिक्षण कार्यक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील, याचा विचार
निश्चितच करायला हवा.
बाकी काय ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे
द्यायचे नसतील तर ते नक्कीच मिळवा. त्याने त्याचे मूल्य कधीच कमी होत नाही.
पुढील काही महिन्यांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेकडून पुन्हा असे कार्यक्रम
लवकरच राबविण्यात येणार आहेत. कदाचित यावेळी या कार्यक्रमांचे नियोजन अधिक
उत्तमरित्या असेल. शिवाय अधिकाधिक तंत्रज्ञ व प्राध्यापक त्याचा लाभ घेऊ
शकतील अशी आशा वाटते.
Tuesday, May 4, 2021
ऑनलाइन तंत्रशिक्षणाकडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com