पुस्तक_परीक्षण
📖 चमचाभर जिंदगी, थोडी आंबट बरीचशी गोड
✍️ रवी वाळेकर
📚 शिवसमर्थ सेवा प्रकाशन
बऱ्याच दिवसांपासून काहीतरी हलकाफुलकं वाचावं म्हणून पुस्तके शोधत होतो. त्यातच हे पुस्तक हाती लागलं. रवी वाळेकर हे यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या कंबोडायन आणि इंडोनेशियायन या प्रवास वर्णनांनी मराठी साहित्य विश्वात प्रकाश झोतात आलेले, नव्या दमाचे आणि आगळ्या शैलीचे लेखक होय. त्यांच्या जीवनातील विविध घटनांचा मागोवा त्यांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. एकंदरीत या सर्व घटनांवरून त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतो आणि तो निश्चितच सकारात्मक दृष्टीचा आहे. त्यांच्या जीवनातील हे अनुभव केवळ आंबट आणि गोड नसून अन्य चवींचे देखील आहेत, असं ध्यानात येतं. अनेक घटनांमधून ते माणसाला ओळखू पाहतात. त्याच्या मनाचा ठाव घेऊ पाहतात. शिवाय साध्या आणि सरळ भाषेमध्ये त्याचं वर्णनही करतात. अन्य काही लेखकांप्रमाणे त्यांनी मराठीतले अवजड आणि बोजड शब्द न वापरता या पुस्तकाचे लेखन केले आहे. मुंबईतील त्यांचे अनेक अनुभव संवेदनशील मुंबईकरांनाही आले असतील. परंतु त्यांचा दृष्टिकोन कदाचित वेगळा असेल. वाळेकर म्हणतात की, हे जग सुंदर आहे फक्त आपला दृष्टिकोन तसा ठेवायला हवा. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग मनाला भावून जातात. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची देखील ओळख होते. रतन टाटांविषयी लिहिलेला त्यांचा अनुभव हा खूप सुंदर आहे. बहुतांश भारतीयांना ज्ञात असणारे रतन टाटा लेखकालाही तसेच जाणवतात. एखादा व्यक्ती महान किंवा होतो? या प्रश्नाचे उत्तरही आपल्याला सहज मिळून जाते. शेवटी काय... या पृथ्वीवर काही काळासाठी राहण्याकरता आलेले आपण सर्व पाहुणे आहोत. जीवनाचा आनंद ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने घ्यायचा असतो आणि जिंदगीतल्या आंबट आणि गोड प्रसंगांना सोबत घेऊन जायचं असतं, हाच या पुस्तकाचा सारांश!
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com