६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिवस. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक
सुवर्ण दिवस होता. याच दिवशी मराठा राजा छत्रपती झाला! स्वराज्य आणि रयतेचे
राज्य शिवछत्रपतींनी स्थापन केले.
कृष्णधवल चित्रपटांच्या काळातील
भालजी पेंढारकरांपासून तर आजच्या हिरकणी चित्रपटापर्यत अनेकांनी पडद्यावर
शिवराज्याभिषेक सोहळा सादर केला. या सर्वांचे सादरीकरण निश्चितच उत्तम
दर्जाचे होते. सर्वच गाणी सातत्याने पहावी आणि ऐकावीशी वाटतात. प्रत्येक
मराठी माणसाला ती प्रेरणा देणारीच आहेत. स्टार प्रवाह वाहिनी चालू झाली
त्यावेळेस त्यांनी शिवरायांवर "राजा शिवछत्रपती" हि मालिका त्यांच्या
वाहिनीवरून प्रदर्शित केली होती. या मालिकेची सुरुवातच शिवराज्याभिषेकाने
दाखविण्यात आली होती. अन्य चित्रपट व मालिकांमध्ये दाखविण्यात आलेल्या
शिवराज्याभिषेकापेक्षा या मालिकेतील हा सोहळा काहीसा वेगळा व शिवाजी
महाराजांचे भाव खऱ्या अर्थाने प्रदर्शित करणारा होता. राज्याभिषेक सोहळा हा
राजासाठी व तेथील प्रजेसाठी निश्चितच आनंदाचा एक सर्वोच्च सोहळा असतो.
परंतु, या मालिकेत दाखविलेल्या या सोहळ्यामध्ये सिंहासनाकडे चालत जाताना
शिवाजी महाराजांच्या मनातील भावना अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आल्या
होत्या. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतल्यापासून राज्याभिषेकापर्यंत
स्वराज्यासाठी अनेक मराठा सरदारांनी प्राणांचे बलिदान दिले होते. त्यांची
आठवण शिवाजीमहाराजांना येते. बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, सूर्याजी
काकडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर यांचे बलिदान
शिवरायांना आठवते. त्यांच्या मनात हाही प्रश्न निर्माण होतो की, 'माझ्या
भावांनो... तुमच्या पायऱ्या करून मी सिंहासनाधीश्वर व्हायचं?' त्यांचा कंठ
दाटून येतो. त्यावर ते पुढे विचार करतात,
मज दिली आयोध्या
तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव,
तुम्ही लपला कोठे
मला घालुनी देवपणाचे घाव...
अतिशय
भावपूर्ण असा हा प्रसंग चित्रित करण्यात आलेला आहे. तो पाहताना कोणत्याही
मराठी माणसाचा कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही. एकदा तरी हा व्हिडीओ नक्की
पहा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!
व्हिडिओची हॉटस्टार लिंक: https://www.hotstar.com/in/tv/raja-shivchhatrapati/13021/shivaji-takes-an-oath/1000166210
मूळ गाणे:
जय राजा शिवछत्रपतींचा,
जय मंगलमय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
स्वराज्य सुखकर मुक्त धरेवर,
सुराज्य करिती शिवराजेश्वर
प्रतिरोधाचा लय हो,
सत्वर जन भाग्योदय हो
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
औक्षमान भव, दिगंत वैभव,
रामकीर्ति भव, कृष्णनीती भव
पुण्यप्रतापी सुखकर्ता शिव,
सुखमय संजय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
बंधनात लाभे सिंहासन,
शककर्त्याचे लोक प्रशासन
रामच राजन, राम प्रजाजन
शासन सविनय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
श्री शिवछत्रपती जय हो...
Sunday, June 6, 2021
पडद्यावरील शिवराज्याभिषेक
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com