Saturday, July 17, 2021

एक अपूर्ण आणि अद्भुत पावसाळी ट्रेक

Quora मराठी च्या "आठवणीतला पाऊस" स्पर्धेतील या वर्षीची दुसऱ्या क्रमांकाची कथा.
मूळ लिंक

 
हटकेश्वरनंतर जुन्नर मधील सर्वात उंच शिखर म्हणजे ढाकोबा डोंगर होय. जुन्नर मधल्या सर्व शिखरांवरून आणि किल्ल्यांवरून ढाकोबाचे दर्शन होते. त्यामुळे हाडाचे ट्रेकर असणाऱ्या आम्हाला ढाकोबाने नेहमीच भुरळ घातली होती. साधारणतः तीन वर्षांपूर्वी ढाकोबाचा ट्रेक आम्ही पूर्ण केला.
आंबोली हे जुन्नर मधलं सर्वात शेवटचं गाव. इथून पुढे सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. निसर्गरम्य दाऱ्या घाट आहे. या घाटाच्या डाव्या बाजूने वर चढत गेलं की दूरवर ढाकोबा शिखर लागतं. हा अतिशय दुर्गम प्रदेश असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलांच्या अवघड पायवाटा आहेत. शिवाय गाव सोडल्यानंतर शिखरापर्यंत कुठेही मनुष्यवस्ती दिसून येत नाही. कोकणकड्यावरच ढाकोबाचे शिखर असल्याने त्याचे रौद्रपण अधिकच जाणवते. या ट्रेकचा मनमुराद आनंद आम्ही तीन वर्षांपूर्वी घेतला. इथली निसर्गराजी मनमोहक अशीच होती. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी या ठिकाणी यायचा आमचा मनोदय होता. त्याचप्रमाणे सन २०१९ च्या जुलै महिन्यामध्ये आमची पावसाळी ट्रेकची योजना तयार झाली. जुलैमध्ये पाऊस भरात आला होता. दिवसेंदिवस सूर्याचं दर्शनही दुर्लभ होत होतं. अशा वातावरणात पावसाळी ट्रेक आम्ही अनेकदा अनुभवला आहे. परंतु त्यादिवशीचा पावसाळ्यातील ढाकोबाच्या ट्रेक आम्हाला सदैव लक्षात राहील असाच ठरला.
एखाद्या ट्रेकसाठी जायचे असल्यास सहसा सुट्टीचे दिवस वगळूनच आम्ही जात असतो. त्या दिवशीही कोणतीही सुट्टी नव्हती. त्यामुळे कुठेही फारशी वर्दळ असण्याचा संभव नव्हता. जुन्नरवरून आंबोलीला जाण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागला. आंबोली गाव रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये न्हावून निघालेले होते. तसा थेंबांचा वेग जास्त नव्हता. असा पाऊस या ठिकाणी नेहमीच बसत असतो. शिवाय तिन्ही बाजूंना उंच उंच कडे असल्याने सातत्याने तो धुक्यामध्ये राहतानाही दिसतो. अगदी सकाळीच सातच्या सुमारास आम्ही आंबोलीला पोहोचलो. मी, रजत आणि अक्षय असे आमचे त्रिकुट होते. आजवर केलेल्या सर्व ट्रेकपैकी जवळपास ९० टक्के ट्रेकमध्ये आम्ही तिघेही एकत्रच फिरलेलो आहोत. त्यामुळे तिघांनाही एकमेकांबद्दल व्यवस्थित माहिती होती. आमच्यामध्ये रजत सर्वात उत्साही मनुष्य! वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेक करण्याचा त्याचा उत्साहच आम्हाला त्याच्या सोबत घेऊन जात असे. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती.
आंबोलीतुन दाऱ्याघाटाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यावेळेस पावसाच्या मंद सरी कोसळत होत्या. वातावरणामध्ये बर्‍यापैकी गारवा तयार झालेला होता. शिवाय कोकण कड्यावरून येणारे वारे शरीराला थंडीची जाणीव करून देत होते. सुरवातीचा रस्ता तसा चढता नव्हता. साधारणतः एक किलोमीटर चालत गेल्यानंतर उजव्या बाजूला जुन्नरमधील सर्वात उंच आंबोली धबधबा दिसून आला. विकेंडला आजकाल या धबधब्याखाली भली मोठी गर्दी दिसते. दोन ते तीन टप्प्यात कोसळणारा हा धबधबा ढाकोबाच्या शिखरावरून मार्गक्रमण करत खाली येत असतो. त्याच्या उजव्या बाजूने कडेकडेने एक पायवाट ढाकोबा शिखराच्या दिशेने जाते. मागील ट्रेकच्या वेळी आम्हाला ती माहीत झाली होती. त्यामुळे त्या झाडीतुन रस्ता शोधण्यास फारसा विलंब लागला नाही. पण आता पावसाळी हंगाम होता, त्यामुळे झाडी ही बर्‍यापैकी वाढलेली होती. डोंगरावरून येणारे पाण्याचे प्रवाह पायवाटेवरूनच खाली येत होते. म्हणूनच थोडं सावधगिरीने आम्ही पावले टाकत होतो. चढण सुरु झाल्यावर थोड्याच अंतरावर एक कोरकाई देवीचे उघडे मंदिर दिसून आले. चार लोखंडी खांब आणि त्यावर पत्रा, आतमध्ये ओबडधोबड दगडांनी सजवलेले ते मंदिर त्या दिवशी पावसाने न्हावून निघत असल्याचे दिसले. मंदिराच्या उजव्या बाजूने डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेने आम्ही चढाई सुरू केली. पावसाचा वेग हळूहळू वाढत चालला होता. त्यामुळे पायवाटेवरील पाण्याचा प्रवाह वेग धरू लागला. कडेलाच धबधबा कोसळत होता. पाण्याचे इतक्या उंचावरून कोसळणारे आवाज त्याच्या रौद्रपणाची जाणीव करून देत होते. आजूबाजूचा परिसर दिसेनासा होऊ लागला होता. केवळ पंधरा मिनिटांमध्ये आम्ही पूर्णतः भिजून गेलो होतो. पायातील बुटांमध्ये पाणी साचू लागले होते. अधून मधून बूट काढून त्या पाण्याला बाहेर काढत होतो. पण ते नेहमीपेक्षा अधिक जड झाले होते. म्हणूनच आमचा चालण्याचा वेगही मंदावला होता. अनेक ठिकाणचा रस्ता हा दाट झाडीतून जात होता. त्यातून येणारे पाण्याचे प्रवाह आता गुडघ्यापर्यंत लागायला लागले होते. पावसाचा वेग वाढत असल्याचे आम्हाला जाणवले देखील. पण पाऊस नंतर कमी होईल या आशेने आम्ही चढाई करत होतो. जवळपास एक तासानंतर पहिला डोंगर पार केला. पावसाची तीव्रता आहे तेवढीच होती. त्याचे टपोरे थेंब आता अंगाला बोचू लागले होते. इथून पुढे तीन ते चार जंगली वाटा पूर्ण केल्यानंतरच आम्ही ढाकोबा पर्यंत पोहोचणार होतो. धबधब्याखाली कोसळणारी पाण्याची धार पार करावी लागणार होती. आज तिचा वेग मात्र प्रचंड दिसून आला. पण तिघांनीही एकमेकांचे हात धरून तो प्रवाह पार केला. पुढे जंगलातून जाणारी एक अरुंद पायवाट होती. ती माहीत असल्यामुळे आम्ही मार्गक्रमण करू शकलो. एखाद्या नवख्या माणसाला कदाचित ती कधीच सापडू शकली नसती. पायवाटेने जातानादेखील पाण्याचा प्रवाह वेगाने पायांवर आदळत होता. कदाचित पुढे जाऊ नका, असा संदेशही तो यातून देत असावा. परंतु त्याचे आम्ही ऐकले नाही. दहा मिनिटानंतर जंगलातील झाडी काहीशी कमी झाली होती. पण पावसाचा वेग कमी होत नव्हता. पुढे रस्ता बंद झाल्यासारखा वाटला. रजतने आजूबाजूची झाडी बाजूला सारून कुठे वाट सापडते का? हे चाचपणी याचा प्रयत्न केला. अक्षय मात्र आता घाबरायला लागला होता. आजुबाजुला घनदाट जंगल आणि वरून धो धो कोसळणारा पाऊस. शिवाय चुकलेली पायवाट! यात आम्ही फसत चाललो होतो. किंबहुना फसलेलो होतो!
पायवाट ही मागील वेळेस गेलो होतो, त्याच वेळेसची होती. पण नक्की कुठे संपली, वा सुरू झाली, हे समजले नाही. पाण्याचे प्रवाह सगळ्याच बाजूंनी येत होते. त्यामुळे पुढचा रस्ता सापडत नव्हता. काय करावे ते सुचत नव्हते. बराच वेळ आम्ही तिथेच रस्ता शोधत कसेबसे चाचपडत होतो. पण तो सापडत नव्हता. रजतला देखील त्या दिवशी मी पहिल्यांदाच हताश झालेले बघितले. तो अनुभवी ट्रेकर होता. पण त्या दिवशी आम्ही सर्वच जण फसलो होतो. शेवटी पुन्हा मागे फिरायचे ठरवले. पाणी जाईल त्या दिशेने आम्ही खाली उतरू लागलो. आता पाण्याचा प्रवाह आम्हाला खाली खेचत होता. बराच वेळ झाला पण परतीचे ते जंगल संपत नव्हते. पाणी मात्र वेगाने खालच्या दिशेने वाहत होते. पाऊण ते एक तास झाला असेल. तरीही आम्ही पूर्वी पार केलेल्या धबधब्याच्या प्रवाहापर्यंत पोहोचलो नाही. कदाचित पुन्हा रस्ता चुकला होता! त्यामुळे आता हृदयाची धडधड वाढायला लागली होती. कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. ते पण पूर्णतः भिजून गेले होते. पाऊस वेगाने कोसळतच होता. आजूबाजूला अंधार पडला नव्हता, हीच आमच्यासाठी जमेची बाजू होती. अक्षय आता रडकुंडीला आला होता. काय करावे काहीच सुचेनासे झाले होते. पायवाटा पावसाच्या प्रवाहाने पूर्णतः विरून गेल्या होत्या. वेगाने कोसळणाऱ्या त्या धारांमध्ये आम्ही तिघेही एकमेकांचे हात पकडून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत होतो.
जंगलातील एका वरच्या धारेतून झाडे हलण्याचा आवाज आला. तिघांनीही चमकून त्या दिशेने पाहिले. झाडांची वरची पाने हलत होती. आत मध्ये कुणीतरी असावे व ते आपल्या दिशेने येत आहे, असे जाणवत होते. एखादं हिंस्त्र श्वापद तर नसेल ना? या विचारानेच आमची गाळण उडाली.
तिघांनीही एकमेकांचे हात घट्ट धरले होते. समोरच्या झाडाची एक फांदी बाजूला सारली गेली व त्यातून एक व्यक्ती आमच्या दिशेने येताना दिसली. हातात काठी घेऊन पाण्याच्या प्रवाहामध्ये पुढे सरकत सरकत एक वृद्ध महिला आमच्या दिशेने येत होती. डोक्यावर तिने पावसापासून संरक्षण होण्यासाठी रेनकोटसारखा एक प्लास्टिकचा झगा घातला होता. ती काठी टेकवत आमच्या समोर येऊन उभी राहिली.
"काय रे पोरांनो... काय करता हितं?" - तिचा प्रश्न.
तिच्या या काळजीवजा प्रश्नाने आम्हाला थोडेसे हायसे वाटले.
"आजी... ढाकोबाकडे जायचा रस्ता कुठय?", रजतने विचारले.
यावर तिने स्मितहास्य केले व बोलू लागली.
"ढाकुबा तिकडं पलीकडच्या डोंगराकडं राहिला. ह्यो डोंगररस्ता पार दुर्गा देवीच्या मंदिराकडे जातो. ते पण लय लांब हाय... पण एवढ्या पावसात तुम्हाला रस्ता गावल का?"
"आजी, आम्हाला खाली गावात जायचा रस्ता तरी सांगा. आम्ही परत जातो.", अक्षय बोलला.
"चला मग माझ्यासोबत.", असं म्हणत ती आजी पुढे चालू लागली.
पाण्याच्या त्या वेगवान प्रवाहामध्ये देखील अतिशय स्थिर पावले टाकत ती चालत होती. रस्ता तिच्या ओळखीचा होता. आम्हाला तिच्यावर विश्वास ठेवण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. आम्ही तिच्या मागे मागे सावध पावले टाकत चाललो. दोन-तीन वळणे घेत आम्ही धबधब्याच्या प्रवाहाशी पोहोचलो. अतिशय शिताफीने पावले टाकत तिने तो प्रवाह सहजपणे पार केला. आम्हाला मात्र एकमेकांचे हात धरल्याशिवाय पुढे जाता येत नव्हते. ती सपासप पावले टाकत चाललेली होती. आम्हीदेखील तिच्यामागे त्याच वेगाने चालू लागलो होतो.
"एवढ्या पावसाचं कशाला यायचं पोरांनो इकडं?", चालता चालताच तिने प्रश्न केला.
पण आमच्यापैकी कोणीही तिला उत्तर दिले नाही. कदाचित तितके बळही आमच्यामध्ये शिल्लक नसावे. अर्ध्या तासाच्या उतरणीनंतर आम्ही सकाळी भेटलेल्या त्या उघड्या मंदिरापाशी आलो. तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला.
"थँक्यू आजी!", असं म्हणत अक्षयने तिचे आभार मानले. ती काहीच बोलली नाही. फक्त स्मितहास्य केले व पाठमोरी होऊन पुन्हा वरच्या दिशेने चालु लागली. आम्हाला काय बोलावे, काही सुचत नव्हते. एका मोठ्या संकटातून तिने आमची सुटका केली होती. धो धो कोसळणाऱ्या पावसामध्ये ती तिची चालत जाणारी ती पाठमोरी आकृती काही सेकंदातच दिसेनाशी झाली. आम्ही तिघे जण ज्या वाटेने चाचपडत चाललो होतो, त्याच वाटेने ती झराझरा चालत निघूनही गेली.
आमचे चेहरे आता चिंतामुक्त झाले होते इतक्या वर्षात अपूर्ण राहिलेला हा आमचा पहिलाच ट्रेक! शिवाय पावसाच्या भीषणतेची जाणीव करून देणारा देखील पहिलाच ट्रेक होता. आम्ही भानावर आलो. तेव्हा अनेक प्रश्न आमच्या मनात पडत गेले. ढाकोबाच्या त्या परिसरामध्ये कोणीही मनुष्य राहत नाही. मग इतक्या पावसात ती आजी त्या ठिकाणी आली कशी? शिवाय ती आम्हाला रस्ता दाखवून पुन्हा त्याच मार्गाने निघून गेली. नंतर जेव्हा आम्हाला या घटना आठवायला लागल्या त्यावेळेस त्या आजी बद्दलचे कुतूहल नेहमीच जागृत व्हायला लागले. पुन्हा कधी ढाकोबाला गेलोच तर तिच्या घरी नक्की जाऊ, असे आम्ही ठरवले. तिचे मनापासून आभार मानायचे राहूनच गेले होते.
या घटनेनंतर साधारणतः चार महिन्यांनी आत्रामगडाच्या ट्रेकवर जाण्यापूर्वी पायथ्याशी कोरकाई देवीचे एक छोटेखानी बंदिस्त मंदिर दिसून आले. सहसा आम्ही मंदिरामध्ये जात नाही. पण या मंदिरात जाण्याची इच्छा मनात निर्माण झाली. मंदिराचे दार अतिशय छोटे होते. त्याच्या वरती अवाढव्य अक्षरांमध्ये 'श्री कोरकाई प्रसन्न' असे लिहिलेले होते. आम्ही त्या चिंचोळ्या दारातून आत प्रवेश केला. समोर एक शेंदूर फासलेला दगड ठेवलेला होता आणि भिंतीवर देवीचा चित्रकाराने काढलेला ओबडधोबड चेहरा दिसून आला. तो चेहरा पाहिला आणि काळजाचा एक ठोकाच चुकला! हा तोच चेहरा होता, ज्या आजीबाईने आम्हाला ढाकोबावर संकटातून मुक्तता केली होती!

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com