#पुस्तक_परीक्षण
📖 आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
✍️ अच्युत गोडबोले
📚 मधुश्री प्रकाशन
तंत्रज्ञानाची अमर्याद क्षितिजे पार केलेले आधुनिक काळातील यंत्र म्हणजे संगणक होय. गेल्या शंभर वर्षांमध्ये अशक्य असलेल्या अनेक गोष्टी याच संगणकाने शक्य करून दाखवलेल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता होय!
मागच्या पाच-सहा वर्षांपासून या क्षेत्रात विकसन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य मी करत आहे. केवळ 'अमर्याद' याच एका शब्दाने या क्षेत्राची व्याप्ती वर्णन करता येईल. यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स संकल्पनेवर आधारलेले व ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले लिखित 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' हे पुस्तक म्हणजे खरोखरच एक जग हदरवणारे तंत्रज्ञान आहे, हेच ध्यानात येते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयाला वाहिलेले मराठीतील पहिलेच परिपूर्ण पुस्तक अच्युत गोडबोले यांनी लिहिले आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच 'जग हादरवणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख, इतिहास, उपयोग आणि भविष्य यांचा रंजक वेध' असं लिहिलेलं आहे. पुस्तकाचा पूर्ण सारांश या एका वाक्यात आपल्याला लगेच ध्यानात येईल.
तसं पाहिलं तर गोडबोले सरांचं अनेक वर्षानंतर संगणक तंत्रज्ञानाशी निगडित प्रकाशित झालेलं हे पुस्तक होतं. त्यामुळे त्याची उत्सुकताही तितकीच लागलेली होती. आपल्या सर्व अपेक्षांची पूर्ती करणारं हे पुस्तक होय.
संगणक माणसाची जवळपास सर्व कामे हळूहळू शिकू लागला आहे आणि करू लागला आहे. असं एकही क्षेत्र उरलेले नाही की जिथे संगणकाचा उपयोग होत नाही. संगणकाधारित स्वयंचलनामुळे आज लाखो नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. भविष्यातही ही व्याप्ती आणखी वेगाने वाढत जाणार आहे. कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारे संगणक मानवी बुद्धिमत्ता प्राप्त करू लागला आहे. शिवाय मानवापेक्षा अधिक अचूकतेने तसेच वेगाने आणि सातत्याने सर्वच कामे करू लागला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होणार आहे. ते कसे? याची इत्यंभूत माहिती अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकात वर्णिलेली आहे.
तसं पाहिलं तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना ७० ते ८० वर्षे जुनी आहे. त्या काळातील संगणक आणि गणितज्ञांनी या अद्भुत तंत्रज्ञानाची ओळख विश्वाला करून दिली. परंतु संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील मर्यादांमुळे हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष साकारायला अनेक दशके जावी लागली. आज संगणनाचा वेग प्रचंड गतीने वाढतो आहे. त्याच वेगाने संगणक मानवी कार्यक्षमता विकसित करू लागला आहे. मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग सारख्या तंत्रज्ञानाद्वारे बुद्धिमत्ता प्राप्त करू लागलेला आहे. याच कारणास्तव फायनान्स, मार्केट रिसर्च, रिटेल, जाहिराती, मार्केटिंग, सेल्स, शिक्षण आणि आरोग्यसेवेत देखील आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने शिरकाव केलेला दिसतो. याव्यतिरिक्त शेती, पर्यटन, कला, संगीत, लीडरशिप सारखी क्षेत्रे देखील लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अधिपत्याखाली येतील, असे दिसते. सर्व कामे वेगाने व अचूकतेने होत आहेत. परंतु जगदेखील त्याच वेगाने बदलू लागलेले दिसते. बेरोजगारी वाढलेली आहे. असं असलं तरी या तंत्रज्ञानाद्वारे नवनवे रोजगारही विकसित होताना दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना टिकायचं असेल त्यांना हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा प्रवाहाच्या बाहेर पडण्याची भीती देखील आहे. या सर्वांचा उहापोह अच्युत गोडबोले यांनी विस्तृतपणे या पुस्तकामध्ये घेतलेला दिसतो.
सेल्फ ड्रायव्हिंग कार्स अर्थात स्वयंचलित वाहने, चॅटबॉट सारख्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संकल्पना देखील त्यांनी विस्तृतपणे मांडलेल्या आहेत. ज्याद्वारे भविष्यामध्ये हे तंत्रज्ञान कितपत प्रगती करू शकेल, याचा आपल्याला अंदाज येतो. कधी कधी असंही जाणवतं की, जर संगणकच सर्व काम करत असेल तर मनुष्याचा या जगामध्ये नक्की काय उपयोग होईल? हा प्रश्न पडतो. एकंदरीत माणूस रोबोट बनत चाललेला आहे आणि संगणक नवनवे रोबोट विकसित करत आहे. याचा ताळमेळ भविष्यामध्ये कसा लागेल, हे सांगणं आता तरी अवघड दिसते इतकच!