आज जागतिक मराठी भाषा गौरव दिन. मागच्या काही वर्षांपासून आपण हा दिवस
मोठ्या प्रमाणात साजरा करायला लागलो आहोत. यामागचे निश्चित कारण माहिती
नाही परंतु आपल्या भाषेविषयी लोकांमध्ये जनजागृती होत आहे, ही निश्चितच
स्वागतार्ह बाब आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक आपल्या भाषेचा गौरव
करताना दिसतात. परंतु त्याच भाषेसाठी व तिच्या वृद्धीसाठी आपला कितपत
हातभार असतो? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळताना दिसत नाही. किंबहुना आपल्या
कृतीमधून देखील या प्रश्नाचे उत्तर मराठी माणसांना देता येत नाही, ही
खेदाची गोष्ट आहे. आपल्या भाषेची वृद्धी व्हावी यासाठी दैनंदिन जीवनातील
अनेक ठिकाणी तिचा वापर होणे तसेच तिचा प्रसार करणे महत्त्वाचे असते. परंतु
मराठी माणूस अश्याच बहुतांश विषयांत प्रमाणात नापास झालेला दिसतो.
सार्वजनिक ठिकाणची मराठी
महाराष्ट्राची
राज्यभाषा तसेच सर्वसामान्य वापरामध्ये येणारी भाषाही मराठी आहे. परंतु
मागच्या काही वर्षांपासून बाहेरच्या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची
संख्या वेगाने वाढताना दिसते आहे. महाराष्ट्र हे एक समृद्ध राज्य आहे. तसेच
सहिष्णू देखील आहे. 'अतिथी देवो भव' या उक्तीचा तंतोतंत आत्मसात करणारे
राज्य आहे. याचाच फायदा करून घेण्यासाठी परप्रांतीयांची महाराष्ट्रामध्ये
संख्या वाढते आहे. स्वतःला राष्ट्रभाषा म्हणून घेणाऱ्या भाषिकांची संख्या
एकेकाळी एक आकडी टक्क्यांमध्ये होती. ती आज दोन आकडी झालेली आहे. एका
अर्थाने हे मराठी भाषिकांवरील अतिक्रमण नाही का? हाही प्रश्न पडतो. खरंतर
आपणच 'अतिसहिष्णू' प्रकारांमध्ये गणले जायला लागलो आहोत. अगदी मुंबईचे
उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या या राजधानीमध्ये सार्वजनिक जीवनात चोरून
बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे! अगदी मराठी माणूस देखील छातीठोकपणे
सार्वजनिक ठिकाणी मराठीमध्ये बोलताना दिसत नाहीये. ही शोकांतिका केवळ
आपल्याच नाकर्तेपणामुळे आलेली आहे. हळूहळू हे लोण महाराष्ट्रातील अन्य
शहरात देखील पसरायला सुरुवात झालेली आहे. इथला मराठी माणूस मराठी बोलण्याचे
नाकारतो. समोरच्याच्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करतो. असं असेल तर
आपल्या भाषेची आपल्याच राज्यांमध्ये प्रगती कशी होणार? हा मोठा प्रश्न आहे.
अगदीच महाराष्ट्रामध्ये एखादी मुस्लीम अथवा शीख पेहराव केलेला व्यक्ती जरी
दिसली तरी मराठी माणूस त्याच्याशी थेट हिंदीमध्ये बोलायला सुरुवात करतो.
म्हणजे त्याने मनाशी ठरवलेच असते की, समोरच्याला मराठी समजणार नाही! याच
कारणामुळे परप्रांतीय लोक इथली भाषा शिकत नाहीत. मात्र आपल्याला त्यांच्या
भाषेत बोलायला लावतात. लोकसंख्येनुसार मराठी ही भारतातील तिसऱ्या
क्रमांकाची भाषा आहे. पण मराठी माणसाच्या अतिसहिष्णू वृत्तीमुळे ती लवकरच
अधोगतीकडे जाईल असे दिसते! ग्रामीण भागात देखील उत्तरेकडून आलेल्या लोकांची
संख्या वेगाने वाढते आहे. उत्तर भारतातील राजकीय नाकर्तेपणाचा त्रास
महाराष्ट्रीय जनतेला होतो आहे. शिवाय ग्रामीण लोक देखील या लोकांशी हिंदीतच
बोलण्याचा प्रयत्न करतात. जणू काही आपण कुठलीतरी आंतरराष्ट्रीय भाषा बोलत
आहोत आणि आपणच सर्वज्ञानी आहोत, असं अनेकांना सूचित करायचं असतं. यातून
परप्रांतीय भाषांचा उदोउदो केला जातो आणि आपोआपच आपली भाषा देखील मागे
पडते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. मागच्या अनेक दशकांपासून
महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोंढे येतच आहेत. परंतु तत्कालीन जनतेमुळे
त्यातील बहुतांश लोकांनी मराठी भाषा आत्मसात केल्याचे दिसते. सद्यस्थितीला मात्र असे जाणवत नाही. ही निश्चितच धोक्याची घंटा आहे. स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणून घेणारे अनेक पक्षही हिंदी भाषेला
राष्ट्रभाषा म्हणून पुढे आणतात. यामुळेच अन्य भारतीय भाषा अधोगतीकडे वाटचाल
करीत आहेत. पुढील काही वर्षांमध्ये महाराष्ट्र द्विभाषिक राज्य म्हणून उदयास आले
तर आश्चर्य वाटायला नको!
मराठी शाळा
आज महाराष्ट्रातील राष्ट्रीय सर्वोच्च स्थानी विराजमान असलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी मराठी भाषेतूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांच्यासाठी मातृभाषेतून प्रगतीची द्वारे उघडली गेली. परंतु मागच्या दशकभरापासून शालेय शिक्षणामध्ये इंग्रजीने अतिक्रमण केल्याचे दिसते. इंग्रजी म्हणजे प्रगती हे जरी खरे असले तरीही आपले मूल तीन वर्षाचे झाल्यापासूनच त्याच्यावर इंग्रजीचा भडीमार करणे मात्र पूर्णतः चुकीचे आहे. भाषा तज्ञांच्या म्हणण्यानुसार मातृभाषेतील शिक्षणाचे सर्वोत्तम असते. परंतु आजच्या नव्या पालकांना याच्याशी काही घेणेदेणे नसल्याचे दिसते. मराठीला डावलून मोठ्या प्रमाणात इंग्रजी शाळा तयार होत आहेत. त्यातून इंग्रजीतून रट्टा मारून बाहेर पडणाऱ्या पिढ्या तयार होत आहेत. त्यामुळे आपोआपच आपल्या भाषेचा देखील ऱ्हास होताना दिसतो. महाराष्ट्र सरकार एकीकडे दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये करण्याची सक्ती करते आहे. परंतु दुसरीकडे इंग्रजी शाळांना प्रोत्साहन देऊन मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत. सरकारमधील अति शिकलेले व 'हाय-फाय' इंग्रजीतून शिक्षण घेतलेले काही मंत्री सर्व शालेय शिक्षण इंग्रजीमध्ये करण्याच्या मागे लागलेले आहेत. एकीकडे राजकीय फायद्यासाठी मराठीचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे मराठी शाळांवर हातोडा चालवायचा, अशी दुटप्पी वृत्ती आज सरकारांमध्ये दिसून येते. मराठी शाळा टिकल्या नाहीत तर मराठी भाषेची वृद्धी होणार नाही. म्हणूनच मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा मजबूत व्हायला हव्यात.
मराठी साहित्य
भाषेला समृद्ध करणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेतील साहित्य होय. मराठीमध्ये गेल्या पन्नास वर्षांमध्ये अनेक अप्रतिम साहित्यिक कलाकृती तयार झाल्या. अनेक साहित्यिकांनी म्हणजेच लेखक आणि कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या अनेक कलाकृती यासाहित्यामध्ये मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जातात. परंतु मागील काही वर्षांमध्ये मराठी भाषेची साहित्यिक जडणघडण मंदावताना दिसत आहे. कदाचित साहित्यक्षेत्राला कमी दर्जा दिल्यामुळे तसेच वाचनसंस्कृती कमी झाल्यामुळे हे होत असावे, असे वाटते. म्हणजेच मराठी लोक मराठी वाचनाला प्राधान्य देत नाहीत. जर वाचकांची संख्या वाढलीच नाही तर दर्जेदार साहित्य कसे तयार होणार? साहित्याचा दर्जा वाढवायचा असल्यास वाचकांची संख्या वाढायला हवी. वाचनसंस्कृती भाषेमध्ये जोपासायला हवी. तरच उत्तमोत्तम लेखक भाषेमध्ये तयार होतील. शिवाय या क्षेत्राला हवे असणारे ग्लॅमर देखील तयार होईल. स्वतःला 'ग्लोबल' समजणाऱ्या मराठी भाषिकांना इंग्रजीतील नवे साहित्य माहित असते परंतु, मराठी साहित्याकडे मात्र हे सहज कानाडोळा करतात, ही शोकांतिका आहे.
एखाद्या पुरस्काराद्वारे साहित्याचा दर्जा ठरत नसला तरी एक विश्लेषण मांडावेसे वाटते. मराठी भाषेपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या बंगाली भाषेमध्ये आजपर्यंत सहा वेळा, कन्नड भाषेमध्ये आठ वेळा, मल्याळम भाषेमध्ये सहा वेळा तर उर्दू आणि गुजराती भाषेमध्ये तब्बल चार वेळा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर आतापर्यंत चार मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मराठीमध्ये अधिक दर्जेदार कलाकृती साहित्य कलाकृती निर्माण व्हायच्या असल्यास वाचकांची संख्या वाढायला हवी. नुसतच 'मी मराठी' म्हणून पोस्ट टाकून भागणाऱ्यातलं नाही!
मराठी चित्रपट
तीन ते चार दशकांपूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा जोरदार बोलबाला होता. एखादा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला की त्या वेळेस हिंदी चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत नव्हता. म्हणजेच मराठी चित्रपटांची महाराष्ट्रावर मक्तेदारी प्रस्थापित झालेली होती. परंतु हळूहळू मुंबईतील गोंडसवाण्या बॉलीवूडने अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीने महाराष्ट्रावर पकड घ्यायला सुरुवात केली. नव्वदच्या दशकामध्ये मराठी चित्रपट निर्मिती कमी होऊ लागली आणि हिंदी चित्रपट वाढू लागले. हिंदी चित्रपटामधलं ग्लॅमर अर्थात वैभव मराठी प्रेक्षकांना आकर्षित करू लागलं. याच कारणामुळे महाराष्ट्रात हिंदी चित्रपट सृष्टी भक्कम होऊ लागली. आणि मराठी चित्रपटांना दुय्यम दर्जा प्राप्त झाला. परंतु पंधरा ते वीस वर्षांपूर्वी हळूहळू मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ लागली. तसं पाहिलं तर हा वेग बेताचाच होता. नवनवे दिग्दर्शक, कलाकार, कथाकार आणि संगीतकार मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाले. त्याचा फायदा मराठी चित्रपटांना झाला. हळूहळू चित्रपटांचा दर्जा देखील वाढू लागला. उत्तमोत्तम चित्रकलाकृती मराठीत तयार झाल्या. प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील चांगला होता. परंतु आजही मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ आलेला नाही. मराठी प्रेक्षकांवर हिंदी चित्रसृष्टीचे गारुड अजूनही तसेच आहे. मराठीमध्ये उत्तम चित्रपट तयार होत आहेत. परंतु मराठी प्रेक्षकच मराठीला दुय्यम दर्जा देताना दिसतो. दक्षिणेकडे बघितले तर तिथे फक्त त्यांचे चित्रपट चालतात. अनेक चित्रपटांचा १०० कोटींचा गल्ला जमा होत असतो. पण महाराष्ट्रात मात्र असे होत नाही. नुसतं मराठी-मराठी म्हणून भागणार नाही. तर मराठी चित्रपटांना मराठी प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळायला हवा. हिंदी चित्रपट सृष्टीतला तोचतोचपणा, रिमेक आणि अन्य भाषातून केली जाणारी ढापाढापी वगळता नाविण्यपणा दिसत नाही. याउलट मराठीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. त्यासाठी मराठी प्रेक्षकांचा प्रतिसाद सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
भारतामध्ये पहिला चित्रपट ज्या दादासाहेब फाळके यांनी बनवला ते मराठी होते. शिवाय राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिला भारतीय चित्रपट 'श्यामची आई' हा देखील मराठी होता. परंतु मराठी प्रेक्षकांच्या अनास्थेमुळे चित्रपटसृष्टी देखील मागे पडलेली आहे. आमचं मनोरंजन म्हणजेच मराठी मनोरंजन असं ठामपणे मराठी प्रेक्षक म्हणत नाहीत. मग नुसतं मराठी आडनाव लावण्याचा काय उपयोग? हा प्रश्न देखील पडतो.
मागील काही वर्षांपासून भाषेमध्ये राजकारण आलेले आहे. राजकारणी आपल्या भाषेचा उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी करताना दिसत आहेत. यामुळेच मराठी लोकांमध्ये विभागणी झालेली दिसते. शेवटी फोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचा मंत्र आजही राजकीय लोक वापरताना दिसत आहेत.
एकंदरीतच मराठी माणूस आपल्या मराठीपण टिकविण्यासाठी कितपत योगदान देतो? या प्रश्नाचा त्याने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. क्षेत्र कोणतेही असो मराठी भाषा वाढली पाहिजे, टिकली पाहिजे तरच मराठी संस्कृती आणि महाराष्ट्र टिकेल. आपल्या भाषेची वृद्धी होईल आणि आपण खऱ्या अर्थाने 'मराठी' म्हणून ओळखले जाऊ. किमान आजच्या दिवशी इतके ज्ञान प्राप्त झाले व त्याची योग्य अंमलबजावणी केली तरी खूप होईल.
© तुषार भ. कुटे,
डेटा सायंटिस्ट,
मितू स्किलॉलॉजीस आणि रिसर्च, पुणे