Thursday, February 10, 2022

इंडिका

विश्वामध्ये असणारी एकमेव आणि सर्वोच्च ताकद म्हणजे निसर्ग होय. तो अद्भुत आहे, विशाल आहे, सर्वशक्तिमान आहे आणि त्याला हवे तसेच तो करतो. म्हणूनच निसर्ग विज्ञान या विषयासारखा अभ्यास करण्यासाठी दुसरा रंजक विषय नाही. याच विषयाला वाहिलेले प्रणय लाल लिखित 'इंडिका' हे पुस्तक होय. भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास, असे जरी या पुस्तकावर लिहिलेले असले तरी बहुतांशी पृथ्वीचा नैसर्गिक इतिहास या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. त्याचे विवेचन करण्यापूर्वी पुस्तकातील लेखकाने दिलेला सर्वात शेवटचा परिच्छेद आधी सांगतो...
"आपल्या ४६ वर्षी श्रीमती पृथ्वीच्या आयुष्यात सेपियन्स चारेक तासांपूर्वी उपजला. श्रीमती पृथ्वीचे आयुष्य आपल्याला सांगते की कोणत्याही जीवजातीचे अस्तित्व, फार कशाला, जीवाचेही अस्तित्व अनेक अशक्यप्राय घटनासंचांमुळे घडते; ज्यातून शेवटी आपण घडलो आहोत. उत्क्रांतीच्या इतिहासात कोणत्याही जीवप्रकाराच्या उत्क्रांतीला ना दिशा असते, ना कोणते लक्ष्य असते. जवळपास सर्व जीवजाती नष्ट होणे अपरिहार्य आहे. प्रभावी जीवजात म्हणून होमो सेपियन्स उत्क्रांतीच्या नाट्यातले शेवटी रंगमंचावर आलेले पात्र आहे. जर घटना घडल्या तशा घडल्या नसत्या, आपले स्पर्धक व भक्षक विशिष्ट वेळी नष्ट झाले नसते, तर आपण आज अस्तित्वातच नसतो, ना कपींचे पूर्वज, ना त्यांचे सरीसृप सस्तन पूर्वज, एका संध्याकाळी एका उथळ डबक्यात ३.५ अब्ज वर्षांपूर्वी जीव घडला ... जर कधी नसता, तर ही चित्रफीत पुन्हा 'वाजवून' आपण घडलो असतो याची कोणतीच खात्री देता येत नाही. जर असा प्रयोग करता आलाच तर आजच्या प्राण्यांच्या वनस्पतींच्या ऐवजी पूर्णपणे वेगळे जीव घडतील. आज अस्पर्श राहिलेली गरम झऱ्यांची तळी फक्त एक आशा पुरवतात, की जर जीवसृष्टी नष्ट झाली तर ती नव्याने घडेल. पण जीव नव्याने घडेल याची खात्री आहे. का? जास्त महत्त्वाचे म्हणजे, तसे होण्या-न-होण्यावर जुगार खेळायला आपण तयार आहोत का? आणि जिंकणारे कोणते जीव असतील?"
खरं तर याच परिच्छेदांमध्ये संपूर्ण पुस्तकाचा सारांश दिलेला आहे. ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हापासूनच घडलेल्या सर्व घडामोडी भूगर्भशास्त्राद्वारे, जीवशास्त्राद्वारे, भौतिकशास्त्राद्वारे आणि मानववंशशास्त्राद्वारे संशोधन रूपाने या पुस्तकात लेखकाने अतिशय विस्तृतरित्या मांडलेल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे पृथ्वीचा साडेचारशे कोटी वर्षांचा संक्षिप्त इतिहास होय. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घडलेल्या घटनांची शास्त्रशुद्ध माहिती लेखकाने अतिशय सुटसुटीतरित्या या पुस्तकात दिलेली आहे. ज्या निसर्गामध्ये आपण वावरतो तो आजच्या घडीला येण्यासाठी पृथ्वीची कोट्यावधी वर्षांची मेहनत आहे. यात आपले अर्थात मानवाचे योगदान काही लाख वर्षांचे देखील नाही. तरीही आपण विश्वाचे राजे म्हणून वावरताना दिसतो. पृथ्वीचे सर्वेसर्वा म्हणून घेताना दिसतो. पण प्रत्येकाला पृथ्वीचा हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर 'इंडिका' वाचायलाच हवे.
एकूण पंधरा प्रकरणांमध्ये या पुस्तकाची विभागणी करण्यात आलेली आहे. यातून पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या आजच्या प्रगती पर्यंतचा सखोल इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. आज भारतीय उपखंड ज्या ठिकाणी आहे तिथे तो कोट्यवधी वर्षांपूर्वी नव्हताच. इतक्या वर्षांमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपण इथवर पोहोचलेलो आहोत. भारत, मादागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया हे सर्व प्रदेश एकमेकांना जोडलेले होते ही कल्पनाच किती रोमांचकारी आहे! मागच्या चार पाच कोटी वर्षांमध्ये आपण हजारो किलोमीटरचा प्रवास करत आशिया खंडाला धडकले आहोत. या कालखंडामध्ये प्राण्यांच्या लाखो जाती तयार झाल्या आणि नष्टही झाल्या. अनेक प्राण्यांनी पृथ्वीवर राज्य केले. परंतु निसर्गाच्या पुढे कोणीही टिकू शकले नाही. पुस्तकाच्या पंधरा प्रकरणांपैकी फक्त तीन प्रकरणांमध्ये मानवी वाटचाल दिलेली आहे. यातूनच पृथ्वीच्या दृष्टीने मानवाचे अस्तित्व कितपत असावे, याचा अंदाज बांधता येईल. आपल्या पूर्वी पंधरा कोटी वर्षे डायनोसॉर नावाच्या प्राण्याने पृथ्वीवर अधिराज्य गाजवले. त्याचे अवशेष व जीवाश्म आजही विविध देशांमध्ये आढळून येतात. केवळ डायनासोरस नाही तर अनेक विविध प्रकारचे प्राणी पृथ्वीवर वावरत होते. परंतु विविध कारणांमुळे ते नष्ट झाले. डार्विनच्या थियरीनुसार जो तग धरून राहतो तोच टिकतो. हे आजवर सिद्ध झालेले आहे.
निसर्गामध्ये सजीव म्हणता येणारे करोडो प्राणी आणि वृक्ष आहेत. त्यांची उत्क्रांती नक्की कशी झाली, याचा देखील इतिहास या पुस्तकांमध्ये सखोलरीत्या लिहिलेला आहे. लेखकाने भूगर्भशास्त्राचा अतिशय विस्तृत अभ्यास केलेला दिसतो. शिवाय भारतीय उपखंडामध्ये त्यांचा प्रवास देखील प्रचंड झालेला आहे. पर्वतरांगांचा, डोंगरांचा, नद्यांचा, सरोवरांचा, खडकांचा, मातीचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक निष्कर्ष काढून पृथ्वीचा इतिहास लिहिल्याचे दिसते. एक ट्रेकर म्हणून मी देखील सह्याद्रीतल्या अनेक खडकांचा इतके बारकाईने निरीक्षण केले नव्हते. पण या पुस्तकाने मला देखील नवी दृष्टी निश्चितच प्राप्त करून दिली. विज्ञान हे अमर्याद आहे. कदाचित त्याचा अभ्यास करणे आपल्याला एका जन्मात देखील शक्य नाही, याची प्रचिती या पुस्तकातून निश्चितच येते.
पुस्तकाचे सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगायची म्हटलं तर यातील सर्वच चित्रे ही रंगीत आहेत! त्यामुळे इतिहास जिवंत उभा राहतो. शिवाय लेखकाने अनेक स्थळांचे निश्चित स्थान अक्षांश व रेखांशद्वारे दिलेले आहे. म्हणूनच ते गुगल मॅपमध्ये देखील शोधायला सोपे जाते. अनेक वैज्ञानिक बारकावे लेखकाच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेची साक्ष देतात. होमो सेपियन्स जगभर कसे पसरले याचा नकाशा आणि चाळीस लक्ष वर्षांचा फॅमिली फोटो ही या पुस्तकातील सर्वोत्तम चित्रे होत! पुस्तक वाचताना वाटत होते की हा इतिहास कधीच संपू नये. अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा अधिक तीव्र होत होती. हेच या पुस्तकाचे यश होय.
प्रणय लाल यांनी हे पुस्तक इंग्रजीत लिहिलेले असले तरी नंदा खरे यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. नंदा खरे यांच्या यापूर्वी वाचलेल्या स्वलिखित पुस्तकातील भाषा मला अधिक क्लिष्ट वाटली होती. परंतु या पुस्तकाचा अनुवाद मात्र उत्तमच केलेला दिसतो.
शेवटी काय विज्ञानाकडे बघण्याची किंबहुना निसर्गाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देऊन जाणारे हे पुस्तक होय. विज्ञानावर नितांत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवे. 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com