मराठी चित्रपट निर्मितीमध्ये बऱ्याच वर्षांनी एका उत्तम तमाशा पटाचा प्रवेश झाला. हा चित्रपट म्हणजे #चंद्रमुखी. #chandramukhi
वृत्तपत्रांमध्ये व सोशल मीडियावर येणार्या समीक्षांमधून 'चंद्रमुखी' मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसते. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले असल्यामुळे मराठी रसिकांसाठी ही एक गाण-मेजवानीच होती. श्रेया घोषाल यांनी गायलेली 'चंद्रा' ही लावणी मागच्या महिनाभरापासून इंस्टाग्रामवरील रिल्सच्या स्वरूपात गाजताना दिसत आहे. या लावणीचे संगीत व गीत उत्कृष्ट आहेच. परंतु श्रेया घोषालच्या आवाजामध्ये ते उत्कृष्टतेचा उत्तम नमुना आहे, असेच म्हणावे लागेल. हे गाणे ऐकत असताना ते कधीही एका अमराठी गायिकेने गायलेले आहे, असे जाणवत नाही. यातच तिचे यश सामावलेले दिसते.
काही वर्षांपूर्वी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या 'जोगवा' या चित्रपटात श्रेया घोषाल यांनी 'मन रानात गेलं गं' हे गीत गायलं होतं. एक अमराठी गायिकेसाठी त्यातील उच्चार पाहता हे गीत अतिशय अवघड असंच होतं. परंतु श्रेयाने अतिशय उत्तमरीत्या सदर गीत सादर केले होते. 'चंद्रा' ही त्याची पुढची पायरी आहे, असे वाटते. श्रेया घोषाल यांनी दक्षिणेतील चारही भाषांमध्ये तसेच मराठी आणि बंगालीमध्ये देखील शेकडो गाणी गायली आहेत. या कोणत्याच गाण्यांमध्ये चूक निघेल असं वाटत नाही. 'चंद्रा' मध्ये देखील येणारे मराठी शब्द व त्यातील अक्षरे जसे च, ज, झ यांचे दोन प्रकारचे उच्चार होतात. परंतु श्रेयाने मात्र ते अतिशय उत्तमरित्या उचलेले दिसतात. लावणी मध्ये कुठेच 'ण' चा उच्चार 'ण' असा होत नाही. ही बाब देखील उल्लेखनीय अशी आहे.
जुन्या काळामध्ये अमराठी गायकांकडून मराठी गाणी धावून घ्यायची असल्यास त्यांचे बरेच नखरे असायचे. एखादा अक्षर नको किंवा एखादा उच्चार असायला नको, अशी त्यांची मागणी असायची. परंतु, श्रेया घोषाल ही आजच्या काळातली खरीखुरी भारतीय गायिका आहे! हे तिने वारंवार सिद्ध केले आहे. तिने गायलेलं गाणं पुन्हा पुन्हा कितीतरी वेळा ऐकतच रहावसं वाटतं. 'चंद्रा' देखील याला अपवाद नाही.
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com