Monday, May 30, 2022

पॉलिक्लिक - सोनाली शिंदे

अनेक विषयांमध्ये रुची असली तरी राजकारण या विषयापासून मी नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्यक्ष पाहिले तर राजकारणाची जाण देशातल्या प्रत्येक नागरिकाला असायला हवी.
राजकारण या विषयाभोवती फिरणारी पुस्तके देखील मी वाचलेली नाहीत. परंतु साम टीव्हीच्या पत्रकार व वृत्तनिवेदिका सोनाली शिंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक वाचावं, असं वाटलं. शालेय शिक्षणामध्ये नागरिकशास्त्र या विषयाचा तसेच राज्यशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास केलेला असतो. बऱ्याच गोष्टी माहीत देखील असतात. परंतु राजकारण आणि निवडणुका म्हटल्या की, उदासीनता वाटते. राजकारण व राजकारणी यांच्याविषयी अभ्यास करावा, असं क्वचितच वाटतं. पण भारतीय राजकारण आणि निवडणूक या विषयावर एका पत्रकाराच्या दृष्टीतून लिहिलेलं 'पॉलिक्लिक' हे पुस्तक बऱ्याच गोष्टी सांगून जातं.
या पुस्तकामध्ये त्यांनी तीन विभाग केलेले आहेत. पहिल्या विभागामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताच्या निवडणुका व त्यांची पार्श्वभूमी वर्णन केली आहे. स्वातंत्र्यापासून भारतीय निवडणुका कशा पद्धतीने बदलत गेल्या, त्यांची पार्श्वभूमी कशी होती, सरकारे कोणती आली आणि त्याचा समाज मनावर काय परिणाम झाला? याचा उहापोह पहिल्या विभागामध्ये केलेला आहे. याशिवाय मागील पंधरा ते वीस वर्षांमध्ये वृत्तवाहिन्यांची तसेच समाज माध्यमांची क्रांती कशी झाली, याचा देखील आढावा घेतलेला दिसतो. दुसऱ्या विभागामध्ये दहा वर्षांपूर्वी भारतामध्ये झालेले जनलोकपाल आंदोलन, निर्भया आंदोलन आणि एक सर्वमान्य नेता म्हणून पुढे आलेले नरेंद्र मोदी या तीन घटनांचा मागोवा घेतला आहे. हा विभाग वाचत असताना भूतकाळात आपल्या समोरच घडलेल्या या घटनांचे पुन:स्मरण होते. शिवाय त्याचा भारतीय सामान्य नागरिकांच्या मनावर आज झालेला परिणाम देखील समजून येतो. पुस्तकाच्या तिसऱ्या विभागामध्ये या पुस्तकाला जी टॅगलाईन 'मत तुमचं मेंदू कुणाचा?' वापरली आहे, त्याची चर्चा झालेले दिसून येते. यात प्रामुख्याने सोशल मीडियाच्या सहभागातून झालेल्या अरब देशातील क्रांती आणि ओबामा ते डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडीच्या घटना विश्लेषणात्मक वर्णन केलेल्या आहेत. यामध्ये सोशल मीडियाचा कसा आणि किती सहभाग होता, हे देखील आपल्याला ध्यानात येते.
आज आपले मत सोशल मीडियाद्वारे नियंत्रित केले जात आहे. त्यामुळे सोशल मीडिया फारसा विश्वासार्ह नाही. ही बाब अजूनही सामान्य नागरिकांच्या ध्यानात आलेली नाही. पुढचं जग 'डिजिटलायझेशन'मुळे संगणकीकृत पद्धतीने चालणार आहे. यात समाज माध्यमांचा बराच मोठा वाटा असेल. परंतु सोशल मीडियावरील बाह्य नियंत्रण येणाऱ्या पिढीसाठी घातक ठरणार आहे, असा सारांश या पुस्तकातून सांगता येऊ शकेल.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com