Sunday, May 29, 2022

प्रायमेट्स

प्रायमेट्स अर्थात माकड वंशीय प्राणी! या प्रायमेटसच्या तीन शाखांपासून विविध प्राणी उत्क्रांत होत गेले. त्यातीलच एका शाखेमध्ये मनुष्य प्राणी उत्क्रांत झाला. असा उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतो. अन्य शाखांमध्ये विविध प्रकारच्या प्रायमेटसचा समावेश होतो. आपल्या आजूबाजूला जंगलांमध्ये अनेक माकडे व वानरे आढळून येतात. ही त्यांची एकच शाखा आहे. परंतु जगभरातील जंगलांमध्ये माकडवंशीय प्राण्यांचे शेकडो प्रकार आढळून आलेले आहेत. शिवाय त्यातील अनेक प्राणी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
प्रायमेटच्या प्रत्येक शाखेची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत. सर्वांना आपण 'माकड' या एकाच नावांमध्ये संबोधतो. परंतु माकडांच्या इतक्या विविध प्रजाती असतील याचा आपण विचारही केलेला नसतो. 'सोनी लिव'वर उपलब्ध असलेल्या 'प्रायमेटस' या तीन भागांमधील वेब सिरीजमध्ये जगभरातल्या सर्व प्रकारच्या माकडवंशीय प्राण्यांचा आढावा घेतलेला आहे. विविध खंडांमध्ये विविध प्रकारच्या जंगलांमध्ये विविध प्रकारच्या वातावरणामध्ये प्रायमेट्स जगभर नांदत आहेत. त्यांचे उत्कृष्ट व्हिडीओ चित्रण करून ही वेब सिरीज बनविल्याचे दिसते. प्राण्यांच्या एका अद्भुत जगामध्ये आपण याद्वारे प्रवेश करतो. मानवी प्राण्याला समांतर असणारी प्राणीशाखा जगामध्ये कशा प्रकारे जगत आहे? याची सखोल माहिती या वेबसिरीजद्वारे आपल्याला होते. त्यांचे जगदेखील अद्भुत असंच आहे. परंतु आपल्यासारख्या अतिप्रगत प्रायमेट्समुळे त्यांचे जग लोप पावत चाललेले आहे. हेदेखील या वेब सिरीज मधून शिकायला मिळतं. आपण अनेक प्रायमेटसला गुलाम देखील बनवत आहोत. त्यामुळे त्यांचे जग संकुचित होत चालले आहे. मानवी प्राण्याच्या वर्चस्ववादी विचारसरणीमुळे प्रायमेट्सची संख्यादेखील कमी होताना दिसते आहे.
अशा विविध प्रकारच्या माकडवंशीय प्राण्यांची माहिती या वेबसिरिजद्वारे दिग्दर्शकांनी व फिल्ममेकर्सनी खूपच सुंदर रित्या चित्रीत केल्याचे या वेबसीरीजमध्ये दिसते.

Link: https://www.sonyliv.com/shows/primates-1700000639/secrets-of-survival-1000100208 


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com