थायलंडमधील या गुहेतील मुलांच्या सुटकेचा थरार जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट होत होता. ही गुहा पाच ते सहा किलोमीटर लांब आहे. शिवाय अनेक ठिकाणी जाण्यासाठी चिंचोळ्या वाटा आहेत. या वाटांमध्ये पाणी भरलं तर आत मध्ये जाणं केवळ अशक्य आहे. ही बातमी जगातील विविध देशांमध्ये पसरल्यानंतर गुहेमध्ये जाण्यासाठी जगातील सर्वोत्तम डायव्हर्स बोलविण्यात आले. युके, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया येथील सर्वोत्तम डायव्हर्स थायलंडमध्ये दाखल झाले व त्यांनी जवळपास अडीच आठवड्यांच्या प्रयासानंतर या मुलांची गुहेमधून सुटका केली.
ही मुले गुहेमध्ये अशा ठिकाणी अडकली होती जिथे केवळ जाण्यासाठीच तीन ते साडेतीन तास लागत होते! शिवाय ती पाण्याने भरलेली असल्यामुळे पूर्णपणे अंधारामध्ये होती. जसजसे दिवस जात होते तसतसे ही मुले जिवंत असतील का? हा प्रश्नही गडद होत होता. किंबहुना त्याची शक्यता देखील मावळत चालली होती. परंतु दहा दिवसानंतर पहिला डायवर या मुलांपर्यंत पोहोचला. ती सर्व मुले सुखरूप होती! विशेष म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची भीती अथवा काळजी दिसत नव्हती. दहा दिवस एका ठिकाणी ही मुले बसून होती. ही त्यांच्या धैर्याची व धाडसाची परीक्षाच म्हणावी लागेल. मुले या गुहेमध्ये सापडल्याची बातमी जगभरातील दूरचित्रवाहिन्यांवर उत्सवासारखी दाखविली गेली. परंतु त्यांना बाहेर कसे काढायचे? हादेखील प्रश्न होताच. यामध्ये दोन ते तीन दिवस गेले. तोपर्यंत मुलांना खाण्याचे पदार्थ व पाणी पुरविण्यात आले होते. त्यांना परत काढण्याच्या मोहिमेमध्ये अजूनही डायव्हर्स सहभागी झाले. दरम्यान थायलँड नौदलाचा एक अधिकारी या मोहिमेत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मृत्युमुखी पडला होता. विशेष म्हणजे मुले ज्या ठिकाणी अडकली होती, त्या ठिकाणी केवळ १५ टक्के ऑक्सिजन वातावरणात होता. वैज्ञानिकदृष्ट्या १८ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन असलेल्या ठिकाणी राहणे मानवासाठी अशक्य अशी गोष्ट आहे. परंतु ही सर्व मुले मात्र अशा वातावरणामध्ये पूर्ण अंधारात देखील जिवंत होती! त्यांना तिथून परत काढताना बेशुद्ध करूनच बाहेर काढले गेले. कारण, परतताना पूर्ण प्रवास पाण्यामधून करायचा होता. शिवाय सर्वत्र अंधारच होता. त्यामुळे तीन तासांच्या या प्रवासामध्ये ती मुले तग धरू शकतील की नाही, ही शंका होतीच. अखेर दोन दिवसांमध्ये सर्व मुलांना बाहेर काढून ही मोहीम यशस्वी झाली.
ही सर्व खरीखुरी रोमांचकारी कहाणी हॉटस्टार वर 'रेस्क्यु' या डॉक्युमेंटरीमध्ये चित्रित करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये वापरण्यात आलेले सर्व फुटेज हे मूळ व्हिडिओ मधूनच घेण्यात आलेले आहे. यात कोणतेही नाट्यरूपांतर वापरले गेलेले नाही. केवळ डॉक्युमेंटरी म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कहाणी तसेच रोमांचकारी कथा म्हणून देखील तिच्याकडे बघता येऊ शकेल.
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे