मानववंशशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला होमो सेपियन अस हे नाव नक्की कोणी दिले असावं? असा प्रश्न पडला होता. त्याचे उत्तर देखील मी शोधले होते. तो नामदाता होता, कार्ल लिनियस!
परंतु त्याच्याविषयी अगदीच जुजबी माहिती काही पुस्तकांमध्ये उपलब्ध होती. तीदेखील सारांश रूपामध्ये. अच्युत गोडबोले यांच्या 'किमयागार' या पुस्तकामध्ये लिनियसवर एक पूर्ण प्रकरण लिहिलेले सापडले. त्यातून बरीचशी माहिती मिळाली. शिवाय दीपा देशमुख लिखित 'जग बदलणारे ग्रंथ' या पुस्तकामध्ये जग बदलणाऱ्या पन्नास ग्रंथामध्ये कार्ल लिनियस लिखित 'सिस्टिमा नॅचुरी' या पुस्तकाचा समावेश केलेला आढळला. तेव्हा लिनियस नक्की कोण होता? याविषयी कुतूहल जागृत झाले. म्हणूनच डॉ. उमेश करंबेळकर लिखित 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' हे पुस्तक वाचायला घेतले आणि लिनियस नावाच्या वादळाची कहाणी समजून आली.
जगामध्ये पशु, पक्षी, कीटक, जलचर, फळझाडे, फुलझाडे, वृक्ष, वेली अशाच प्रकारचे सजीवांचे गट पाडले जातात. परंतु प्रत्यक्षात लाखो प्रकारचे सजीव या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. त्यातील अजूनही काही सजीवांशी मनुष्याचा संपर्क झालेला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सजीवांची वर्गवारी करणारा शास्त्रज्ञ म्हणजे कार्ल लिनियस होय! त्याने सजीवांचा हा पूर्ण पसारा एका सिस्टीममध्ये मांडला. शिवाय त्या प्रत्येकाला नाव दिलं. त्याचं वर्गीकरण केलं. त्यातूनच सजीवांच्या जातीची ओळख झाली. ही नामकरण पद्धत जीवशास्त्राने कायमची स्वीकारलेली आहे. म्हणूनच काल लिनियस याला 'सजीवांचा नामदाता' असे म्हटले जाते.
स्विडन म्हटलं की विज्ञानविश्वाला आठवतो तो 'अल्फ्रेड नोबेल'. याच स्वीडनमध्ये तीनशे वर्षांपूर्वी कार्ल लिनियसचा जन्म झाला. पहिल्यापासूनच तो निसर्ग वेडा होता. त्याने वनस्पती संशोधनासाठी केलेली लॅपलँड या स्वीडनमधील जंगलाची सफर मात्र अद्भुत आणि रोमहर्षक अशीच होती. आजही आपण कोणी भारतातल्या जंगलांमध्ये इतके दिवस एकट्याने सफर करू शकत नाही. त्यामुळे लिनियसची ही भटकंती धाडसी अशीच म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील अनेक दशके त्याने निरनिराळ्या सजीवांचा शोध घेतला व त्यांचे वर्गीकरण केले. त्यासाठी त्याने भटकंती देखील मोठ्या प्रमाणात केली. एका अर्थाने तो आपल्या जीवनातील ध्येयाने प्रेरित झालेला होता. शिवाय त्याला अनेक संशोधक शिष्यदेखील लाभले. याच शिष्यांनी जगभरामध्ये प्रवास करून विविध देशांतील जंगलांमधून वनस्पतींचे नमुने गोळा करून त्याला दिले. लिनियसचे शिष्य जगातील जवळपास प्रत्येक जंगलांमधून भटकले होते. याच कारणास्तव त्याचे 'सिस्टीमा नॅचुरी' हे परिपूर्ण पुस्तक तयार झाले. त्याची पहिली आवृत्ती १३ पानांची तर तेरावी आवृत्तीत तेवीसशे पानांची तयार झाली होती. अशा या ध्येयवेड्या वनस्पतीशास्त्रज्ञाचा प्रवास सांगणारं हे पुस्तक, 'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस'!
Sunday, June 19, 2022
'सजीवांचा नामदाता: कार्ल लिनियस' - उमेश करंबेळकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com