महाराष्ट्राच्या इतिहासाला धार चढते ती #छत्रपती #शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठेशाहीच्या उदयानंतरच. आज स्थापन झालेले मराठी राज्य शिवशाहीबरोबरच उदयास आले. परंतु इस्लामी राज्यकर्त्यांनी भारतावर कब्जा मिळवलेला असताना स्वकीयांचे राज्य निर्माण करणे, ही त्या काळातली अशक्यप्राय अशीच घटना होती. त्यातूनच शिवरायांनी सतराव्या शतकात रयतेचे राज्य स्थापन केले. तत्पूर्वी #मराठी प्रदेशांमध्ये तसेच पूर्ण दक्षिण भारतामध्ये बहमनी सुलतानाचे वर्चस्व होते. परंतु #बहमनी राज्याची शकले पडली आणि #निजामशाही, #इमादशाही, #बरीदशाही, #आदिलशाही व #कुत्बशाही राज्ये निर्माण झाली. यातील कुत्बशाही राज्य सर्वात शेवटचे राज्य होय. त्यांची राजधानी गोवळकोंड्याला होती.
शिवशाहीचा उदय झाला त्यावेळी या पाचही शाह्या दख्खनवर राज्य करत होत्या. त्यामुळे शिवशाहीचा सखोल अभ्यास करण्यासाठी तत्कालीन इस्लामिक राज्यकर्त्यांचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. याच दृष्टीकोणातून इतिहासाचे भिष्माचार्य वासुदेव सीताराम #बेंद्रे यांनी 'सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुत्बशाही' हा ग्रंथ संपादिला. शिवशाहीचा काळ चालू झाला त्यावेळी मराठी राज्य चोहोबाजूंनी इस्लामी राज्यकर्त्यांनी घेरलेले होते. त्यातच दक्षिणेतील #गोवळकोंड्याची कुत्बशाही देखील समाविष्ट होती. मराठी राज्य विस्तारत असताना अनेकदा अप्रत्यक्षपणे कुत्बशाहीचा आधार मिळाला.
हा ग्रंथ मराठी आणि #इंग्रजी अशा दोन भागांमध्ये तयार करण्यात आलेला आहे. याकरता वा. सी. बेंद्रे यांनी प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यांनी कुत्बशाहीची विश्वसनीय #सनावळ बनवलेली आहे. कुत्बशाहीच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये झालेल्या विविध राज्यकर्त्यांची विस्तृत माहिती तसेच तत्कालीन #उल्लेखनीय ऐतिहासिक घटना या सदर ग्रंथामध्ये विस्तृतपणे नोंदविलेल्या आहेत. या ग्रंथाचे संपादन बेंद्रे यांनी प्रा. भगवत दयाळ शर्मा यांच्या साहाय्याने सन १९३४ मध्ये केले होते. तसं पाहिलं तर त्या काळामध्ये इतिहासावर फारसे #संशोधन झाले नव्हते. परंतु त्यांनी अभ्यासलेल्या परकीय साधनांमधून कुत्बशाहीची बरीच माहिती जमा केली गेली. त्याचाच उपयोग मराठेशाहीचा #अभ्यास करण्यासाठी झालेला दिसतो. या ग्रंथामध्ये कुत्बशाहीच्या लेखनाचे सर्व प्रयत्न, हकीकत, तत्कालीन #लढाया, #युद्धपद्धती तसेच इतर पातशहांचे असणारे संबंध याविषयी सखोल माहिती पुरवलेली आहे. विशेष म्हणजे कुत्बशाहीचे शिवशाहीची संबंध व त्यावरील परिणाम याचा उपयोग मराठेशाहीच्या अभ्यासकांना निश्चित करता येण्याजोगा आहे.
इतिहास लेखन करत असत असताना तत्कालीन कालगणनेची भान ठेवणे गरजेचे असते. सदर ग्रंथामध्ये बहुतांश ठिकाणी #ऐतिहासिक साधनांमध्ये इस्लामी #हिजरी कालगणनेचा उल्लेख येतो. या कालगणनेचे आजच्या जागतिक कालगणनेमध्ये रूपांतर करून #दिनांक व वर्ष यांचा उल्लेख बेंद्रे यांनी या ग्रंथांमध्ये केलेला आहे.
या ग्रंथाच्या इंग्रजी भागामध्ये तत्कालीन इंग्रजीचा बेंद्रे यांनी वापर केलेला आहे. आजच्या काळात वापरण्यात येणारे स्पेलिंग तसेच व्याकरण हे काही प्रमाणात वेगळे आहे. पुस्तकामध्ये मात्र इंग्रजीतील तत्कालीन #व्याकरण व स्पेलिंगचा वापर करण्यात आलेला आहे.
ग्रंथाचे पुन:प्रकाशन करत असताना प्रकाशकांनी यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. इतिहास अभ्यासकांना तसेच भाषासंशोधकांना तत्कालीन #भाषा कशी होती, याचा अभ्यास करणे सुलभ होईल असे वाटते.