नागपुरातील दीक्षाभूमीबद्दल अनेक वर्षांपासून केवळ वृत्तपत्रांमध्येच वाचत
होतो. दरवर्षी धम्मचक्र परिवर्तनदिनी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
महापरिनिर्वाणदिनी येथे लाखो आंबेडकरी अनुयायांची गर्दी होत असते. डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अगणित लोक या ठिकाणी येत असतात.
अशा पवित्र ठिकाणी जाण्याची माझी कित्येक वर्षे इच्छा होती. अखेर एका
कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपूरला दोन दिवसांसाठी जाणे झाले आणि माझ्या
सुदैवाने मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथून केवळ दीड किलोमीटरच्या अंतरावर
दीक्षाभूमी होती!
आदल्या दिवशीचा कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री लवकर
झोपी गेलो आणि सकाळी सात वाजताच तयार झालो होतो. गुगल मॅपवर दीक्षाभूमी
शोधून काढली आणि आजचा मॉर्निंग वॉक याच रस्त्याने करायचा असे ठरवले. कधी
मोठ्या रस्त्याने तर कधी छोट्याशा गल्लीमधून पायपीट करत पंधरा मिनिटांमध्ये
दीक्षाभूमीच्या एका दरवाजापाशी पोहोचलो. तो बंद होता. गुगल मॅपवर मात्र
सकाळी सात वाजल्याचीच उघडण्याची वेळ दाखवत होते. मला काहीतरी चुकल्याचे
जाणवले. नंतर लक्षात आले की हा मुख्य दरवाजा नव्हता. तीन ते चार
मिनिटांमध्ये पुढच्या सिग्नलला वळसा घालून मी मुख्य दरवाजातून आत प्रवेश
केला. आतमध्ये कोणीच नव्हतं. दूरवर एक सुरक्षारक्षक दिसून आला तेव्हा
जाणवले की आत प्रवेश करता येऊ शकतो. जसजसे चालत होतो तसतसे या भूमीचे
पावित्र्य मन शांत करत होते. पाठीवरची बॅग बाहेर काढून ठेवली व मुख्य
प्रार्थनास्थळामध्ये प्रवेश केला. आत कुणीही नव्हतं. अगदी टाचणी पडेल इतकी
शांतता या ठिकाणी अनुभवता येत होती!
या वास्तूची रचनाच अशी आहे की इथे
बाहेरचा देखील कुठलाच आवाज येत नव्हता. ध्यान करण्यासाठी ती एक सर्वोत्तम
जागा होती. अगदी मन भरून मी ती डोळ्यात साठवून ठेवली. तासनतास याच ठिकाणी
बसून राहावे, असे देखील वाटत होते. मध्यभागी असणारी बुद्धमूर्ती शांतता,
एकाग्रता आणि प्रसन्नता यांचे प्रतीक असल्याची मला खात्री झाली. एक क्षणी
असे देखील वाटून गेले की ही तीच जागा आहे का जिथे एकाच दिवशी लाखो लोक
दर्शनासाठी आणि प्रार्थनेसाठी येत असतात. अर्थात त्या दिवशी मी अतिशय
भाग्यवान ठरलो. कदाचित कुणालाही न अनुभवता येणारी प्रसन्नता, शांतता आणि
मनःशांती मला अनुभवता आली होती!
Tuesday, October 4, 2022
दीक्षाभूमीतील तो अर्धातास
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com