पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या एकूण सजीवसृष्टी पैकी केवळ मनुष्य प्राणी सर्वांवर राज्य करतो आहे. त्याच्या अंगात असणाऱ्या अनेक गुणांमुळे तो या पृथ्वीचा राजा आहे, असे आपण म्हणू शकतो. प्रगल्भ बुद्धिमत्तेबरोबरच मानवाचा सर्वात मोठा गुण म्हणजे प्रखर इच्छाशक्ती! याच इच्छाशक्तीच्या बळावर त्याने आजवर अनेक असाध्य गोष्टी साध्य करून दाखवल्या. अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूवर विजय मिळवलेल्या माणसांची कहाणी सांगणारे हे पुस्तक म्हणजे, "मृत्यू पाहिलेली माणसं".
मानवी जीवनाचं 'मृत्यू' हे अंतिम सत्य आहे. ज्याला कोणीच टाळू शकत नाही. मृत्यू यायचा असतो तेव्हा तो येतोच. पण मानवी इतिहासात आजवर अशी अनेक माणसे होऊन गेली ज्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला देखील पळवून लावले होते. लेखिका गौरी कानेटकर यांनी या पुस्तकामध्ये मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या लेखणीबद्ध केलेल्या आहेत.
त्यांच्या या कहाण्यांमधून आपल्याला आजच्या युगातील खरे नायक आणि नायिका भेटतात. यामध्ये आहे अमेझॉनच्या जंगलात २१ दिवस भटकणारा युसी, युगांडामध्ये वंशच्छेदात तीन महिने बाथरूम मध्ये लपून काढणारी इमॅक्युली, जगातील सर्वात मोठी पर्वतरांग असणाऱ्या अँडीज पर्वताततून सुखरूप बाहेर येणारे नॅन्दो आणि रॉबर्ट, एका निर्मनुष्य जंगलात दाट धुक्यामध्ये हरवून देखील कष्टाने परतणारे बारा वर्षाचे पोर डॉन, विमान अपघातात जंगलात येऊन पडलेला जुलियन, १२७ तास दगडाखाली हात अडकलेला ऍरन, समुद्राच्या लाटांवर तब्बल १५ महिने जिवंत राहिलेला अलवरिंगा, निर्जन वाळवंटामध्ये हरविलेला रिकी आणि एका बर्फाळ बेटावर उणे ५७ तापमानात तग धरून राहिलेली अडा! यांच्या कहाण्या या कल्पनेच्या पलीकडील अशाच आहेत. हे नायक आणि नायिका ज्या परिस्थितीमध्ये जिवंत राहिले ती परिस्थिती निव्वळ मानवी जीवनासाठी अशक्य कोटीतीलच मानावी अशी आहे. पण त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जिवंत होती. त्याच इच्छाशक्तीच्या बळावर ते आलेल्या संकटाला तोंड देऊ शकले आणि त्यातून सुखरूप बाहेर देखील पडले. काहीजणांना नशिबाची साथ लाभली तरी देखील त्यांचा संघर्ष मात्र कमी नव्हता. यातील अनेकांनी काहीबाही खाऊन दिवस काढले व तग धरून राहिले.
मनुष्य प्राण्याखेरीज त्यांच्या ऐवजी जर इतर प्राणी असला असता तर कदाचित त्याचा मृत्यू झाला असता. पण मानवाचा कोणत्याही परिस्थितीत अंतिम क्षणापर्यंत तग धरून राहण्याचा गुणधर्म त्याला नेहमीच सहाय्य करत आला आहे. याची प्रचिती या पुस्तकातून आपल्याला येते. आपल्यातल्या प्रत्येकाला 'हरू नकोस हा शेवट नाही' हा संदेश हे सर्वजण देऊन जातात. खरोखर प्रेरणादायी अशा सत्य कहाण्या आपल्याला देखील ऊर्जा देऊन जातात!
Monday, November 7, 2022
मृत्यू पाहिलेली माणसं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com