स्वातंत्र्यानंतर भाषा आधारित राज्य रचना पूर्ण झाल्यावर भारतीय भारतीय संघराज्यातील राज्यांनी शालेय शिक्षणासाठी त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला होता. किंबहुना केंद्र सरकारनेच स्थानिक भाषा, हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा या सूत्राचा राज्यांना अवलंब करण्यासाठी सांगितले. उत्तर भारतातील स्थानिक भाषा ही हिंदी असल्यामुळे त्या ठिकाणी केवळ द्विभाषा सूत्रच लागू होते. मात्र अन्य उर्वरित भारतामध्ये भारतीय संघराज्याची राजभाषा म्हणून हिंदी भाषा अभ्यासक्रमात टाकण्यात आलेली आहे. अर्थात तेव्हापासूनच केरळ आणि तमिळनाडू सारख्या राज्यांनी केंद्राला त्रिभाषा सूत्राच्या केराची टोपली दाखवली होती. आजतागायत या राज्यांमध्ये स्थानिक भाषा व इंग्रजी या दोनच भाषा शालेय शिक्षणात शिकवल्या जातात. अर्थात याचा त्यांना कधीही तोटा झालेला नाही!
उत्तर भारत वगळता अन्य भारतामध्ये शालेय शिक्षणात द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला जातो. मागील काही दशकांची स्थिती पाहता त्रिभाषा सूत्राचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. काही वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचे महत्त्व लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने पहिलीपासूनच इंग्रजी या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केला. तो यशस्वी देखील झाला आहे. परंतु आजची परिस्थिती पाहता पाचवीच्या अभ्यासक्रमापासून हिंदी भाषेचा अतिरिक्त बोजा विद्यार्थ्यांवर पडत असलेला दिसतो. काळाची पावले ओळखून जसा इंग्रजीचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला तसाच हिंदी या अनावश्यक विषयाऐवजी 'संगणकीय भाषा' हा सर्वोत्तम पर्याय निवडता येऊ शकतो.
एकविसावे शतक हे संगणकीय प्रगतीच्या पुढच्या टप्प्याने सुरू झाले. हळूहळू ते संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना संगणकीय प्रोग्रामिंग करता यावी ही येणाऱ्या काळाची गरज ठरणार आहे. शिवाय भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये देखील इयत्ता सहावी पासून संगणकीय प्रोग्रामिंग भाषा अभ्यासक्रमामध्ये असावी असे सुचवलेले आहे. अर्थात यामुळे विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण तयार होईल असे वाटते. तो कमी करायचा असल्यास मराठी, इंग्रजी आणि संगणकीय भाषा असे त्रिभाषा सूत्र ठरविता येऊ शकते.
बहुतांश मुलांना आज लहान वयातच मोबाईल तसेच संगणक यांची ओळख होत असते. परंतु त्याचा वापर ते केवळ गेम खेळणे किंवा व्हिडीओ बघणे यासाठीच करत असतात. या यंत्रांचा निश्चित उपयोग काय, हे संगणकीय प्रोग्रामिंगद्वारे विद्यार्थ्यांना समजू शकते. शिवाय त्यादृष्टीने त्यांचा मेंदू देखील विकसित होण्याकरता मदत होऊ शकेल.
आज संगणकाचा उपयोग प्रत्येक क्षेत्रातच केला जात आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने कोणतेही क्षेत्र निवडले तरी त्यांना संगणकीय प्रोग्रामिंग माहीत असणे आवश्यक बनले आहे. याच कारणास्तव सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये नव्या त्रिभाषीय सूत्राचा अवलंब राज्य सरकारने करावा. जेणेकरून विद्यार्थ्यांवरील अतिरिक्त ताण न वाढता त्यांचा शालेय जीवनातच कौशल्य विकास होण्यास मदत होईल.
Ⓒ तुषार भ. कुटे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com