सन २०२३ हे वर्ष आणखी एका वेगळ्या अर्थाने माझ्यासाठी खास ठरलं! यावर्षी तब्बल १०१ मराठी चित्रपट पाहता आले. यापूर्वी कधीही इतके चित्रपट मी पाहिले नव्हते! दिवसभरातला वाया जाणारा थोडा थोडा वेळ सार्थकी लावून ही चित्रपटांची यादी तयार झालेली आहे. भारतीय चित्रसृष्टीमध्ये मराठी चित्रपट त्याच्या अर्थपूर्णता आणि संवेदनशीलतेमुळे ओळखला जातो. कथेतील इतकं वैविध्य कदाचित अन्य कोणत्याही भाषेमध्ये नसावे. खूप वेगवेगळे विषय आजकालच्या मराठी चित्रपटांमध्ये हाताळले जात आहेत. आमचे निर्माते आणि दिग्दर्शक कथानकाला अधिक महत्त्व देतात. म्हणूनच काहीतरी सवंग आणि पांचट आमच्या मराठी चित्रपटांमध्ये दिसून येत नाही. कोणीही भारतीय चित्रपट प्रेमी खरे चित्रपट पाहायचे असल्यास मराठी भाषेलाच निश्चित प्राधान्य देईल.
खाली दिलेल्या यादीमध्ये ज्या चित्रपटांच्या समोर * लिहिलेले आहे ते प्रत्येकाने किमान एकदा तरी पहावे, असे चित्रपट आहेत. काही चित्रपटांची परीक्षणे मी माझ्या ब्लॉगवर यापूर्वी लिहिलेली आहेत, परंतु वेळेअभावी बहुतांश चित्रपटांचे परीक्षण लिहिता आले नाही. ते लवकरच हळूहळू प्रकाशित केले जाईल.
चित्रपटगृहात पाहिलेले चित्रपट (सर्व मराठी):
1. वाळवी *
2. फुलराणी
3. महाराष्ट्र शाहीर *
4. बाईपण भारी देवा *
5. सुभेदार *
6. आत्मपॅम्प्लेट *
7. झिम्मा २ *
ओटीटीवर पाहिलेले चित्रपट (मराठी)
1. कॉफी
2. सोहळा *
3. वन वे तिकीट *
4. अजिंक्य *
5. श्यामचे वडील *
6. पैसा पैसा *
7. नीलकंठ मास्तर *
8. गुलमोहोर *
9. मात *
10. रणभूमी
11. बापमाणूस
12. वेल डन बेबी
13. गोविंदा
14. टेरिटरी *
15. बस्ता *
16. गैर *
17. ३१ दिवस *
18. हॉस्टेल डेज
19. दे धक्का २
20. एक कप चा *
21. वेडिंगचा सिनेमा
22. स्वीटी सातारकर
23. जीवनसंध्या *
24. ध्यानीमनी *
25. रौद्र *
26. शुगर सॉल्ट आणि प्रेम
27. खिचिक
28. एक जगावेगळी अंत्ययात्रा
29. आटापिटा
30. अप्पा आणि बाप्पा
31. निरोप
32. धर्मवीर *
33. ये रे ये रे पैसा २
34. फकाट
35. मी आणि यु
36. धिंगाणा
37. दगडी चाळ २ *
38. ३५% काठावर पास
39. तीन अडकून सीताराम
40. संदूक *
41. बॉईज-३
42. डार्लिंग
43. बसस्टॉप
44. बाई गो बाई
45. ते आठ दिवस *
46. आठवणी *
47. शटर *
48. डेट भेट
49. बॅलन्स होतोय ना?
50. रौंदळ *
51. रावरंभा *
52. आपडी थापडी
53. बाबू बँड बाजा *
54. वॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट
55. डीएनए
56. एक सांगायचंय *
57. लंगर *
58. रझाकार
59. आरोन
60. फोटो प्रेम *
61. रामचंद्र पुरुषोत्तम जोशी
62. बाबांची शाळा
63. फनरल *
64. रिंगण *
65. स्माईल प्लिझ *
66. ट्रिपल सीट
67. प्रवास *
68. माधुरी *
69. राजवाडे अँड सन्स *
70. सखी *
71. जीवन संध्या *
72. डॉट कॉम मॉम
73. एक निर्णय
74. बोनस *
75. मोगरा फुलला *
76. देवा एक अतरंगी
77. पिकासो
78. रंग पतंगा *
79. ड्रीम मॉल
80. पोस्टकार्ड *
81. पिंपळ *
82. भिरकीट
83. मुक्काम पोस्ट धानोरी
84. अनन्या *
85. बावरे प्रेम हे
86. मला काहीच प्रॉब्लेम नाही
87. शुगर सॉल्ट आणि प्रेम
88. मिडीयम स्पायसी
89. रेती *
90. हृदयात समथिंग समथिंग
91. जस्ट गंमत
92. दुनिया गेली तेल लावत
93. मेमरी कार्ड
94. धरलं तर चावतंय
ओटीटीवर पाहिलेले अन्य भाषेतील चित्रपट:
1. इंटरस्टेलर (इंग्रजी)
2. स्क्विड गेम (कोरियन- इंग्रजी भाषांतरित वेबसिरीज)
3. अलाईस इन वंडरलँड (जपानी- इंग्रजी भाषांतरित वेबसिरीज)
4. कांतारा (कन्नड- इंग्रजी सबटायटल्स)
5. मिसेस अंडरकव्हर (हिंदी)
6. एक ही बंदा काफी है (हिंदी)
7. चोर निकल के भागा (हिंदी)
8. भोला (हिंदी)
9. ओएमजी २ (हिंदी)
10. सूर्यवंशी (हिंदी)
11. सेक्शन ३७५ (हिंदी)
- तुषार भ. कुटे
Saturday, December 30, 2023
२०२३ मध्ये पाहिलेले चित्रपट
Friday, December 29, 2023
एका मॅरेथॉनची गोष्ट!
२७ नोव्हेंबर २०२२… एका वर्षापूर्वी बजाज एलियान्झ पुणे हाफ-मॅरेथॉनचे
आयोजन बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून करण्यात आले होते. मी
प्रत्यक्ष पाहिलेली ही पहिलीच मॅरेथॉन होती.
सकाळी सातच्या दरम्यान
आम्ही बालेवाडीच्या चौकात पोहोचलो. गाड्या पुढे नेण्यासाठी बंदी असल्यामुळे
बालेवाडी पीएमटी डेपोच्या समोरच एका ठिकाणी गाडी पार्क केली. मॅरेथॉन
संपायला बराच वेळ होता. म्हणून तिथेच बसून राहिलो. परंतु गाड्यांची गर्दी
वाढत गेल्याने पार्किंगमधून गाडी काढता येईल की नाही अशी शंका आल्याने मी
स्वतःच गाडी बाहेर काढून बायपासच्या पुढच्या चौकातून महाळुंगेच्या दिशेने
निघालो. एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली. तिथे गाडी लावून
बालेवाडीच्या मुख्य चौकाकडे चालत आलो.
एव्हाना प्रत्यक्ष मॅरेथॉन चालू
झालेली होती. खरंतर पाच किमी, दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन
केव्हाच सुरू झाल्या होत्या आणि संपल्या देखील होत्या. आता फक्त तीन
किलोमीटरची अर्थात हौशी लोकांची मॅरेथॉन चालू होती. बायपासपाशी असलेल्या
बालेवाडीच्या त्या चौकामध्ये मॅरेथॉनसाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून विशेष
रस्ता तयार केला होता. त्याच्या पलीकडून शेकडो लोक या मॅरेथॉनमध्ये धावताना
दिसले. कित्येक जण तर केवळ चालतच होते! आयोजकांनी दिलेले शर्ट घालून मस्त
मौजमजा करत फिरत चालले होते. अनेक जण कदाचित वर्षातून एकदाच अशा कुठल्यातरी
इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपली ‘हेल्थ’विषयी असणारी काळजी दाखवत ‘स्टेटस
मेंटेन’ करत असावेत, असे दिसले. शरीरात कदाचित मधुमेह, रक्तदाब, शर्करा
सारखे आजार असणारे देखील यामध्ये असावेत, असं एकंदरीत त्यांच्या रूपावरून
दिसून आलं. मॅरेथॉन अशी असते होय? असा प्रश्न मला पडला. हौशी लोकांना तीन
किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करायला कदाचित पाहून ते एक तास तरी लागला असावा.
मी मात्र शरीराने त्यांच्या मनाने बऱ्यापैकी किरकोळ होतो. जवळपास एक तास मी
त्या गर्दीचे निरीक्षण करत होतो. मनात विचार आला की, आपणही अशा
मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतो का? अर्ध-मॅरेथॉन असल्यामुळे सर्वाधिक अंतर २१
किलोमीटरचे होते. मी इतरांच्या तुलनेत मला बऱ्यापैकी फिट समजत होतो!
म्हणूनच याच मॅरेथॉन मध्ये पुढच्या वर्षी २१ किलोमीटर मध्ये भाग घेऊन ती
पूर्ण करून दाखवायची, असा चंग बांधला
आजवर सकाळी उठल्यानंतर मी फक्त
मॉर्निंग वॉक अर्थात केवळ चालण्यासाठीच जात होतो. अनेकदा हे अंतर चार ते
पाच किलोमीटरचे असायचे. चालणं हाही हा एक व्यायाम असला तरी तो केवळ वृद्ध
लोकांसाठीच पूरक असा आहे. खरंतर युवकांनी धावणे आणि सायकलिंग करायला हवी
असे म्हटले जाते.
मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी आता तयारी करायची होती.
म्हणून मी दुसऱ्याच दिवसापासून पहिल्यांदाच सकाळी धावायला सुरुवात केली.
सुमारे १०० मीटर अंतर गेल्यावर मला बऱ्यापैकी धाप लागली होती. मी हळूहळू
चालू लागलो. छातीतली धडधड वाढत होती. कालांतराने ती कमी झाली. पुन्हा
पळायला लागलो… परत तीच परिस्थिती! एका किलोमीटर नंतर मला ध्यानात आले की
माझी पळण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी झालेली आहे! त्यामुळे पहिल्याच दिवशी
मी मॅरेथॉन मधील अर्ध-मॅरेथॉन चे २१ किमीचे अंतर पूर्ण करू शकेल की नाही
याची मला शंका यायला लागली. तरीही दररोज थोडं थोडं धावणं चालू ठेवलं. १००
मीटर वरून थोड्याच दिवसांमध्ये मी सलग एक किलोमीटर धावायला लागलो! कधी कधी
पाय देखील दुखायचे, पण त्याकडे दुर्लक्ष करत माझा हा नित्यनियम चालू होता.
या कारणामुळे दिवसभर मला ताजतवानं देखील वाटायला लागलं. एक दिवस निश्चयाने
जोपर्यंत पूर्ण दम लागत नाही तोपर्यंत पळत राहायचं ठरवलं. जवळपास तीन
किलोमीटरची सलग धाव मी पूर्ण केली! त्या दिवशी एक महत्त्वाचा मैलाचा दगड
पार केलाय की काय, याची अनुभूती मला आली. आनंदाने मी ही गोष्ट घरी देखील
सांगितली होती. माझा हुरूप वाढायला लागला. हळूहळू मी दमनं विसरायला लागलो…
पाय मात्र नियमितपणे दुखायचे. कधीकधी पाय दुखायला लागल्यामुळेच धावायचे
थांबत होतो. काही दिवस तर कंबर आणि कधी पोट देखील दुखायचे. अशावेळी
धावण्याचा वेग कमी करायचो. पण धावणे थांबवले नाही. सोशल मीडियावरील एका
पोस्टमध्ये एका व्हर्चुअल मॅरेथॉन विषयी वाचले. त्यात सहभाग देखील घेतला.
त्यावेळी स्ट्राव्हा नावाच्या अँड्रॉइड एप्लीकेशन बद्दल समजले. आणि दररोजचे
धावणे रेकॉर्ड करण्यासाठी या अँड्रॉइड एप्लीकेशनचा वापर करायला लागलो.
त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. रोजची प्रगती कशी होत होती, याचा अंदाज यायला
लागला. दर दिवशी नवे ध्येय समोर ठेवायला लागलो. एव्हाना दररोजचे पाच
किलोमीटर धावणे ठरलेले होते. दररोजचा मार्ग देखील निश्चित होता. एकदा मनाशी
ठरवलं की, आज इतके किलोमीटर पळायचे आहे की आपोआपच जोश वाटायला लागायचा.
त्याच उर्जेने मी दररोज धावत होतो. गुगल फिट एप्लीकेशनमध्ये देखील सर्व
काही व्यवस्थित नोंदवले जात होते. एकेकाळी दिवसभरात केवळ ४० हार्ट पॉइंट्स
मिळवणारा मी दररोज शंभरी गाठायला लागलो! याच कारणास्तव वजन देखील कमी झाले
होते. शरीरातील स्थूलपणा जाऊन शरीर मध्यम पातळीवर स्थिर होऊ पाहत होते.
अशात भूक देखील वाढली होती. एका अर्थाने व्यायामाचे किंबहुना पळण्याचे
व्यसन लागायला लागले होते. अशातच आमच्या सौभाग्यवतींनी मला सायकल भेट दिली.
त्यामुळे सकाळच्या माझ्या या उद्योगामध्ये आणखी एका उद्योगाची भर पडली.
जेव्हा जेव्हा पाण्यामुळे पाय दुखायचे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सायकल
घेऊन फिरायला बाहेर पडत असू. आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी तीस ते पन्नास
किलोमीटरचे फेरफटके मी या काळात मारले. यात अतिशय क्वचित असा खंड पडत होता.
एक दिवस मी सलग दहा किलोमीटरची धाव पूर्ण केली! पाय बऱ्यापैकी दुखत होते
पण मैलाचा आणखी एक दगड पूर्ण केल्याचे समाधान मात्र मिळाले. तोपर्यंत चार
ते पाच महिने झाले होते. जसजसे नवनवे मैलाचे दगड पूर्ण होत होते तसतसे
ध्येय जवळ येत असल्याची जाणीव होत होती. स्ट्रावामध्ये निरनिराळी ध्येय
समोर ठेवत होतो. आणि पूर्ण देखील करत होतो. ध्येयपूर्तीचा तो आनंदच निराळा
होता. एव्हाना मला माझ्या शारीरिक क्षमतेचा अंदाज यायला लागला होता.
पुन्हा काही महिन्यांमध्ये मी पंधरा किलोमीटरची धाव देखील पूर्ण केली!
त्यामुळे आत्मविश्वासाने पुढची पायरी गाठली होती. यावेळी मी लवकरच २१
किलोमीटरची धाव पूर्ण करेल याची खात्री वाटायला लागली. सप्टेंबर २०२३
पर्यंत तीन वेळा १५ किलोमीटरची धाव पूर्ण केली. आणि प्रत्येक वेळी आधीच्या
पेक्षा कमी वेळ गाठली होती. दरम्यान सायकलिंगचा प्रवास चालूच होता.
सकाळच्या धावण्याच्या आणि सायकलिंगच्या स्वतःसोबत चाललेल्या स्पर्धेमुळे एक
निराळीच ऊर्जा शरीरामध्ये तयार झाली होती. ऑक्टोबरमध्ये आजवरची सर्वात
लांबची धाव अर्थात १७ किलोमीटरची धाव पूर्ण केली. पाय मात्र दुखत होते.
त्यावर उपाय म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने विटामिन बी१२ च्या गोळ्या सुरू
केल्या. शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असल्याने पाय दुखतात,
असे त्यांनी सांगितले. माझ्या या सर्व कार्यक्रमात मी बाहेरून शरीरात
घेतलेले हे एकमेव ‘सप्लीमेंट’ होय. या पूर्ण प्रवासात मी एकाही प्रत्यक्ष
मॅरेथॉन अथवा सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला नाही. ध्येय होते यावर्षीच्याच
पुणे हाफ-मॅरेथॉनमध्ये धावण्याचे. एका वर्षात स्वतःला ह्याच मॅरेथॉनसाठी
तयार करण्याचे होते. पण काही कारणास्तव मला यामध्ये सहभागच घेता आला नाही.
पण खात्री मात्र होती की मी २१ किलोमीटर नक्की पूर्ण करू शकलो असतो.
शंभर
मीटर वरून २१ किलोमीटरपर्यंतचा धावण्याचा हा प्रवास दहा महिन्यांमध्ये
झाला. ऊर्जेंची एक अद्वितीय अनुभूती २०२३ या वर्षांने मला दिली. एक अनोखी
वाट जोपासायची संधी देखील याच वर्षात मिळाली. कदाचित पुढील वर्षी नव
काहीतरी करता येईल, म्हणून हा प्रवास झाला असावा!
- तुषार भ. कुटे
Sunday, December 3, 2023
स्क्विड गेम: फक्त थरार आणि थरार!
लहानपणी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो. हे खेळ खेळण्याची मजाच काही और असते. असे खेळ आपल्याला मोठे झाल्यावर परत खेळण्याची संधी मिळाली तर? आणि त्यात जिंकल्यावर आपल्याला कितीतरी करोडो रुपये मिळणार असतील तर? खरंच काहीचे विचित्र असे प्रश्न आहेत. याच प्रश्नांवर व त्यांच्या उत्तरांवर कोरियन वेबसिरीज "स्क्विड गेम" आधारलेली आहे.
बऱ्याच दिवसांपासून या वेबसिरीज बद्दल समाज माध्यमांवरील विविध पोस्टमधून वाचले होते. त्यामुळे आपोआपच त्याबद्दलची उत्सुकता मनामध्ये तयार होत होती. एक दिवस सहजच म्हणून याचा पहिला भाग पाहायला सुरुवात केली. दक्षिण कोरियातल्या सिओन्गी हून या युवकाची ही कहाणी आहे. त्याच्या रक्तातच जुगार खेळणे आहे. म्हणूनच त्याच्याजवळ पैसे टिकत नाहीत आणि याच कारणास्तव त्याचा घटस्फोट देखील झालेला आहे. आपल्या दहा वर्षीय मुलीवर त्याचे खूप प्रेम आहे. परंतु ती तिच्या आईकडे राहत असल्याने त्याला तिचा दुरावा सहन करायला लागतो आहे. अशातच एक व्यक्ती त्याच्याशी लहानपणी खेळलेला एक खेळ खेळण्याचे आव्हान देते. त्यासाठी ती व्यक्ती त्याला पैसे देखील द्यायला तयार होते. तो खेळायला सुरुवात करतो. पण हरायला लागतो. त्यातून त्याची जिद्द आणखी उभारी घेते. आणि मग तो जिंकतो. त्याला त्यातून पैसे देखील मिळतात. नंतर त्याला ऑफर मिळते की याहून अधिक पैसे हवे असल्यास आम्हाला संपर्क करा. तो त्याला दिलेल्या क्रमांकावर संपर्क करतो. आणि अखेरीस त्याला खेळ खेळण्यासाठी त्याच्या शहरातून घेऊन जातात. त्याच्यासारख्या कर्जांनी पिडलेल्या अशा अनेक व्यक्ती त्याला एका जागी खेळ खेळण्यासाठी जमा झालेल्या दिसतात. या सर्वांनाच लहानपणी खेळलेले सहा वेगवेगळे खेळ खेळण्याची संधी मिळते. त्यातून जे खेळाडू जिंकतील त्यांना भली मोठी अर्थात करोडो रुपयांची रक्कम देण्यात येणार असते. सर्वजण अतिशय खुशीत असतात. ही स्पर्धा जिंकून नव्याने कर्जमुक्त आणि आनंदी जीवन जगण्याची ते स्वप्ने पाहू लागतात. पहिल्या फेरीमध्ये एकूण ४५६ स्पर्धक भाग घेतात. आणि अखेरीस पहिला खेळ सुरू होतो.
तसं पाहिलं तर हा खेळ अगदी साधाच. लहानपणी सर्वांनीच खेळलेला. यातून एक-एक खेळाडू बाद होणार असतो. आणि जे खेळाडू उरतील तेच पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार असतात. खेळ सुरू झाल्यानंतर पहिला खेळाडू बाद होतो. आणि या चित्रकथेचा पहिला थरार सुरू होतो. खेळाडू बाद होणे म्हणजे काय? हे जेव्हा समजते तेव्हा सर्वांचा थरकाप उडतो. अनेक जण माघार घ्यायला लागतात. परंतु ते देखील बाद होतात!
अशा पद्धतीने पुढील एकेक खेळ सरकू लागतात. खेळाडू बाद होत चालतात. खेळातील कोणतीच गोष्ट नियमबाह्य होत नाही. परंतु लहानपणी खेळले गेलेले हे खेळ खेळताना ज्या पद्धतीने खेळाडू बाद होत आहेत, ती मनाला हादरवून सोडणारी असते. खरंतर या वेबसिरीजचा फक्त पहिलाच भाग मी पाहणार होतो. पण पहिला भाग पाहिल्यानंतर लगेचच दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता मी अधिक ताणवू शकलो नाही. क्षणाक्षणाला वाढत जाणारा थरार, तणाव, भय आणि रहस्य याचमुळे यातील प्रत्येक दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. पहिला खेळ झाला आता पुढे काय? ही उत्सुकता काही संपत नाही. वेगवेगळ्या स्वभावाची, तर्हेची माणसे यामध्ये आपल्याला भेटतात. असह्यता, गांभीर्य, दुःख, भय, राग, चीड अशा विविध मानवी भावनांचा संगम आपल्याला या खेळांमध्ये पाहायला मिळतो. मनुष्य स्वभावाची विविध अंगे देखील अनुभवायला मिळतात. जीवनातील अंतिम सत्याचे दृश्यीकरण देखील यात दिसून येते. आणि अखेरीस एक खेळाडू अखेरचा खेळ अर्थात "स्क्विड गेम" जिंकतो. पण ही वेबसिरीज इथे संपत नाही. तिथे शेवट होतो एका वेगळ्या रहस्य भेदाने. तो शेवट कदाचित अतिशय कमी लोक ओळखू शकतील, असा आहे. म्हणूनच शेवटचा भाग अतिशय महत्त्वाचा वाटतो.
कोणतीही वेबसिरीज बघताना आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घोळत राहिले पाहिजे. अर्थात "स्क्विड गेम" मध्ये दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी झाल्याचे दिसते. शेवटचा भाग पाहिल्यानंतर पुन्हा पहिला भाग पहावासा वाटतो, हे विशेष. विविध प्रकारच्या लोकांच्या कथा यात आपल्याला अनुभवायला मिळतात. आपल्या मुलीच्या प्रेमाला पारखा झालेला सिओन्गी हून, उच्चशिक्षित असूनही आपल्या आईला फसविणारा चो सांगवू, एक चांगले जीवन जगण्यासाठी उत्तर कोरिया सोडून दक्षिण कोरियामध्ये आपल्या भावासह आलेली आणि वडिलांना गमावलेली कांग सैब्योक, पैशासाठी अनेकांना फसविणारा जॅग द्योकसू, पाकिस्तानी विस्थापित कामगार अली अब्दुल अशा अनेकांच्या कथा पाहायला मिळतात. पैशांसाठी लोक काहीही करायला तयार होतील, याची देखील अनुभूती मिळते. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन देखील ही वेबसिरीज आपल्याला देते.
यातील सर्वच कलाकारांचे काम अतिशय उत्तम झालेले आहे. पार्श्वसंगीत हे प्रत्येक घटनेला, प्रसंगाला साजेसे असेच आहे. कथा अतिशय वेगळ्या धाटणीची असली तरी ती अजिबात कृत्रिम वाटत नाही. यातच लेखक आणि दिग्दर्शक यांचे यश सामावलेले आहे.
२००८ मध्ये तयार झालेली कथा २०१९ मध्ये नेटफ्लिक्सद्वारे पूर्ण झाली. या काळात या कथेवर मोठ्या प्रमाणात संस्कार केले गेले असावेत, म्हणूनच त्यात दोष काढणे अतिशय अवघड दिसते. युट्युबवर या कथेचे विश्लेषण करणारे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते देखील मी पाहिले आणि खरोखर लेखक आणि दिग्दर्शक यांच्या कामाचे कौतुक करावेसे वाटले. थरारपट आणि भयकथा नियमितपणे अनुभविणाऱ्यांसाठी ही वेबसिरीज म्हणजे सर्वोत्तम खाद्य आहे, असेच म्हणावे लागेल.
(या वेबसिरीजचे आयएमडीबी रेटिंग ८.० आहे!)
Saturday, December 2, 2023
ग्रंथरांगोळी
नाशिक येथील मविप्र समाज संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालय
प्रांगणामध्ये शिवोत्सव भरविण्यात आलेला आहे. या उत्सवामध्ये शिवरायांवरील
७५ हजार पुस्तकांचा वापर करून ग्रंथरांगोळी देखील साकारण्यात आलेली आहे.
खरंतर ग्रंथांची देखील रांगोळी तयार करता येऊ शकते, ही संकल्पनाच अभिनव अशी
आहे! शिवाय ती तयार करताना कल्पक नियोजन, प्रचंड मेहनत लागते आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे वातावरणातील बदलांचे आव्हान देखील असते. त्यावर सुयोग्य
मार्ग काढून बनविलेली शिवरायांची ही भव्य रांगोळी महाविद्यालयाच्या
मैदानामध्ये पाहता येते.
याव्यतिरिक्त संस्थेच्या विविध शाळांमधील
मुलांनी कल्पकतेने साकारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती देखील येथे पाहता
येतात. जे किल्ले आपण प्रत्यक्ष पाहिलेले नाही, त्यांची प्रतिकृती दगड,
माती, कागद यांचा वापर करून तयार केलेली आहे. असे सुमारे ६० पेक्षा अधिक
किल्ले येथे बनविलेले आहेत. तसेच शिवरायांवरील विविध रंगीत चित्रे, मराठा
हत्यारे आणि बारा बलुतेदारांची शिल्पे ही देखील या शिवोत्सवाची वैशिष्ट्ये
आहेत.
झिम्मा-२
"प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो", असं म्हणत सुरू झालेली मैत्रिणींच्या
प्रवासाची गोष्ट त्याच्या पुढच्या भागामध्येही अर्थात झिम्मा-२ मध्ये सुरू
राहते. एका मैत्रिणीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त या सर्वजणी पुन्हा एकदा
एकत्र भेटतात आणि नव्याने प्रवास सुरू करतात. या वेळेच्या प्रवासात नव्या
घटना, नवे प्रसंग, नवी ठिकाणे आणि काही नवी पात्रे देखील दिसून आलेली आहेत.
प्रत्येकीचा स्वभाव वेगळा, आयुष्य वेगळे, अनुभव वेगळा आणि त्यातूनच
खुमासदार विनोदांची फोडणी देखील तयार होते. अगदी नैसर्गिकरित्या विनोदी
प्रसंग आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात. यातील प्रत्येकीच्या आयुष्याचा
भाग आपण नकळतपणे बनून जातो. अर्थात विनोदी कथेला भावनिक स्पर्श देखील आहे
पार्किंसन्स सारखा आजार असलेली एक आणि आईपण गमावलेली दुसरी तसेच आयुष्याची
नवी वाट शोधणारी तिसरी मैत्रीण आपल्याला त्यांच्या भावविश्वामध्ये घेऊन
जाते. निर्मिती सावंत यांनी पहिल्या भागाप्रमाणे याही भागात त्यांची भूमिका
अप्रतिमरित्या सादर केलेली दिसते. किंबहुना या भागात त्या अधिक उठून
दिसतात.
अनेक दिवसानंतर मोठ्या पडद्यावर एक उत्तम चित्रपट पाहायला
मिळाला. अगदी पहिल्या भाग पहिला नसेल तरीदेखील दुसरा भाग पाहिला तितकीच मजा
येईल, याची खात्री वाटते. चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासून आपण त्यात
गुंतून जातो. काही प्रसंग आपल्याशी जुळवण्याचा देखील प्रयत्न करतो. नकळत
त्यांच्या विनोदात देखील सामील होतो. खरंतर हे दिग्दर्शकाचं मोठं यश मानता
येईल.
एकंदरीत काय चित्रपट बघताना आम्हाला मज्जा म्हणजे मज्जा म्हणजे लईच मज्जा आली!
टीप: हा चित्रपट केवळ बायकांसाठी बनवलेला आहे, असे समजू नये!
Friday, November 24, 2023
बोनस
एखादा उद्योगपती जेव्हा नवा उद्योग सुरू करतो त्यामागे त्याचा काहीतरी सामाजिक उद्देश देखील असतो. कामगारांच्या बळावर तो प्रगती करत जातो. आणि यशाची शिखरे गाठतो. हे यशाचे शिखर गाठण्यासाठी त्याला अनेक कामगारांनी हातभार लावलेला असतो. म्हणूनच त्यांच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता असते. मागील अनेक वर्षांपासून अनेक कंपन्यांमध्ये ही कृतज्ञता दिवाळीच्या बोनसद्वारे दाखवली जाते. अनेक कंपन्यांमधील कामगार वर्ग दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसवरच दिवाळी साजरी करत असतो. परंतु जेव्हा उद्योजकाची नवी पिढी कारभार हातात घ्यायला लागते तेव्हा केवळ अधिकाधिक नफा मिळवायचा म्हणून फालतू वाटणारे खर्च कमी करायला सुरुवात होते. त्यातच कामगारांना बोनस नको, हा विचार पुढे येतो. परंतु ज्यांनी ही कंपनी चालू केली त्यांचा बोनस बंद करायला ठाम विरोध असतो. परंतु नवीन पिढीला समजावून सांगायचे कसे हा प्रश्न त्यांना पडतो. त्यातून ते नव्या पिढीला अर्थात आपल्या नातवाला कामगारांच्या पगारामध्ये मोठ्या शहरात केवळ एक महिना रहायला सांगतात. अर्थात हे एक आव्हान असते. लहानपणापासून ऐशोआरामाच्या जीवनात वाढलेल्या त्याला सर्वसामान्य कामगारांचे जीवन कसं असतं, याचा अनुभव यावा म्हणूनच त्याच्या आजोबांनी हे आव्हान दिलेले असते. वरकरणी त्याला हे आव्हान क्षुल्लक वाटते. परंतु जेव्हा प्रत्यक्ष तो ते स्वीकारतो आणि नव्या जीवनाचा केवळ एक महिन्यासाठी आरंभ करतो तेव्हा नवी आव्हाने समोर उभी राहतात. अनेक अडचणींचा त्याला सामना करावा लागतो.. तळागाळात काम करणाऱ्या लोकांचे जीवन त्याला अनुभवता येते. त्यांच्या समस्या देखील समजतात. कदाचित यामुळेच त्याचे मतपरिवर्तन घडते. हा सारांश आहे "बोनस" या चित्रपटाचा. एका वेगळ्या कथेचा हा चित्रपट म्हणजे श्रीमंतांना गरिबांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा असा आहे. वेगळी कथा आणि छान मांडणी हे याचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
Saturday, November 18, 2023
जगाची भाषा
जगभरात कुठेही गेलं की इंग्रजीच भाषा वापरतात, असा भारतीयांचा गोड गैरसमज
आहे. याच कारणास्तव मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचं पेव सुटलेलं
दिसतं. जगाची भाषा म्हणून आजकाल प्रत्येक जण आपल्या मुलांना इंग्रजी
शाळेमध्ये घालताना दिसतो. असेच एक जण आमच्या मित्राच्या ओळखीतल्या निघाले.
त्यांचा
मुलगा आयसीएसई नावाच्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेमध्ये चिंचवडमध्ये
शिकतो. त्याचे वडील एका मल्टिनॅशनल अर्थात बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये कामाला
आहेत. कदाचित परदेशातच सेटल व्हायचं म्हणून त्यांचे प्रयत्न चाललेले
दिसतात. एकदा देश निश्चित झाला की, आपल्या कुटुंबासह ते त्या देशात स्थायिक
होणार होते. अखेरीस त्यांना युरोपातील क्रोएशिया या देशात जाण्याची संधी
मिळाली. एकंदरीत तिथलं वातावरण उत्तम... पगारही चांगला म्हणून त्यांनी
आपल्या मुलाला आणि पत्नीला इथेच बोलवायचे निश्चित केले होते. परंतु त्यांना
नंतर समजले की, या देशात कुठेही इंग्रजी शाळा नाही. सर्व शिक्षण त्यांच्या
अधिकृत भाषेत अर्थात क्रोएशियन भाषेमध्ये चालते. म्हणूनच आता ते कात्रीत
सापडले आहेत. जगाची भाषा इंग्रजी म्हणून मुलगा चौथीपर्यंत इंग्रजीमध्ये
शिकला, आता क्रोएशियामध्ये स्थायिक व्हायचं म्हटल्यावर इंग्रजी काहीच
कामाची नाही, हे त्यांच्या ध्यानात आलं. अजूनही त्यांचा निर्णय झालेला
नाही!
एकंदरीत काय जगभरातील सर्वच देश मुलांना आपल्या भाषेमध्ये शिक्षण
देत आहेत. आपण मात्र इंग्रजीला कवटाळून बसलेलो आहोत. मुलं इंग्रजीतून रट्टा
मारताहेत, मार्क मिळवत आहेत, पण ज्ञान मिळवत आहेत का? हा मोठा प्रश्न
पडतो. ज्ञानाधारित शिक्षण पद्धतीला जगाने स्वीकारले असतानाही भारत मात्र
आपल्या देशाबाहेर उडण्याची स्वप्ने पाहतो आहे. मुलांना परकीय भाषेमध्ये
शिक्षण देत आहे. ज्ञान जाऊ द्या, फाडफाड इंग्रजी बोलता आले पाहिजे हे
त्यांच्या मनाने ठरवलेले आहे. पण नक्की आपला मार्ग योग्य आहे का? याची
चाचपणी मात्र त्यांनी केलेली नाही. अजूनही अनेकांना हे समजलेले नाही की,
इंग्रजी शिकणे आणि इंग्रजीतून शिकणे यात जमीन आसमानाचा फरक आहे.
Tuesday, November 14, 2023
निर्मनुष्य - रत्नाकर मतकरी
गूढकथा वाचकांसाठी वेगवेगळ्या विषयांची मेजवानी नेहमीच रत्नाकर मतकरींच्या कथासंग्रहातून मिळत असते. 'निर्मनुष्य'या कथासंग्रहामध्ये देखील वेगवेगळ्या धाटणीच्या आणि निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलेल्या विविध गूढकथा वाचायला मिळतात. यातूनच मतकरी यांची कल्पनाशक्ती किती विलक्षण आहे, याचा देखील अंदाज येतो. दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये तयार होणारे गूढ आणि त्यातून उलगडत जाणारी रहस्ये ही मतकरींच्या या कथासंग्रहातील कथांची वैशिष्ट्ये आहेत. मनोविज्ञान हे अनेकदा गूढकथांचे उगमस्थान असते. या मानसशास्त्राचा उपयोग मतकरी आपल्या कथांमध्ये अतिशय उत्तमपणे करताना दिसतात.
'निर्मनुष्य' या कथेमध्ये पत्रकाराचं दिवंगत जीवन आपल्या कल्पनाविष्काराने त्यांनी उत्कृष्टरित्या फुलवलेलं आहे. 'व्हायरस' या कथेमध्ये राजकारण्यांना खरं बोलायला लावणारा व्हायरस किती भयंकर असू शकतो, याची आपण निव्वळ कल्पनाच करू शकतो असं दिसतं! 'भूमिका' ही कथा एका चतुरस्त्र नाटकाच्या नायकाची आहे, जो वर्षानुवर्षे त्याच्या भूमिकेशी समरस झालेला दिसतो. 'गर्भ' या कथेद्वारे पृथ्वीवर कधीही जन्म न झालेल्या गर्भाचा मृत्यू कशा पद्धतीने होतो, याचे वर्णन मतकरी करतात. प्रार्थनेने एखाद्याला मारता येते का? या विलक्षण विषयावर 'प्रार्थना' ही कथा आधारलेली आहे! 'पर्यायी' या कथेद्वारे एखादी घटना घडली नसती तर पर्यायाने काय झाले असते? असा सखोल विचार समोर येतो. मतकरींची विचारशक्ती वाचकाला या सर्व कथांद्वारे निश्चित खिळवून ठेवणारी आहे.
Saturday, November 11, 2023
तेंडुलकर वि. इतर
हे आहेत आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये नावाजलेले सर्वोत्तम गोलंदाज. सरासरी आणि त्यांनी घेतलेले बळी यानुसार त्यांची क्रमवारी लावलेली आहे.
यामध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, तसेच शेन वॉर्न, अनिल कुंबळे यांच्या बरोबरीचा पाकिस्तानी लेगस्पिनर मुश्ताक अहमद, दक्षिण आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज ऍलन डोनाल्ड, वेस्ट इंडिजचे फलंदाजाला धडकी भलवणारे कोर्टनी वॉल्श आणि कर्टली अँम्ब्रोस, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज शेन बॉण्ड आणि सर्वोत्तम फिरकीपटू डॅनियल व्हेटोरी यांची नावे नाहीत.
सांगायचं इतकंच की जगातील या सर्वोत्तम प्रत्येक गोलंदाजाचा सामना करून सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकांचा विक्रम रचलेला आहे! आजचे सर्वोत्तम गोलंदाज कोणते? असा प्रश्न विचारला तर विचार करायलाच बराच वेळ जाऊ शकतो. आणि जे कोणी आहेत ते भारताच्या ताफ्यात दिसून येतात. त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची इतर कोणत्याही फलंदाजांशी कधीच बरोबरी होऊ शकत नाही. कारण एकदिवशीय क्रिकेट आता गोलंदाजांच्या वर्चस्वाकडून फलंदाजांच्या वर्चस्वाकडे झुकलेले आहे. खेळपट्टीवर आग ओकणाऱ्या गोलंदाजांचा सामना करत विश्वविक्रम रचने हे निश्चितच अविश्वासनीय कार्य होते, यात शंकाच नाही. सचिन तेंडुलकरच्या अद्वितीय विक्रमांना मनापासून सलाम!
- तुषार भ. कुटे.
Friday, November 10, 2023
रामचंद्र पुरुषोत्तम जोशी
मराठीमध्ये फॅन्टासी प्रकारातील चित्रपटांची संख्या तशी कमीच आहे. अशाच प्रकारामध्ये मोडणारा चित्रपट म्हणजे "रामचंद्र पुरुषोत्तम जोशी".
रामचंद्र नावाचे हे गृहस्थ एक वर्षांपूर्वी मृत्यू पावलेले आहेत. परंतु अचानक स्वर्गामध्ये त्यांना काही तासांसाठी पृथ्वीवर जाण्याची संधी मिळते. ते पृथ्वीवर येतात देखील. त्याच दिवशी त्यांचे वर्ष श्राद्ध देखील असते. पृथ्वीवर परतल्यानंतर आपली मुले आणि बायको यांना भेटण्याचा ते प्रयत्न करतात. वर्षश्राद्धाच्या दिवशीच त्यांच्याविषयी त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मनामध्ये नक्की कोणत्या भावना आहेत, याचे दर्शन त्यांना होते. मागील एक वर्षांमध्ये त्यांच्यानंतर घरातील परिस्थिती खूप बदललेली असते. बायकोच्या मनावर परिणाम झालेला असतो. घरातील जबाबदारी मोठ्या मुलीवर आलेली असते. आणि लहान मुलगा वाया गेलेला असतो. या सर्व गोष्टी ते याची देही याची डोळा पाहतात. परंतु काहीच करू शकत नाही. घरातील एका व्यक्तीबरोबर ते संवाद साधू शकत असतात. त्यातूनच चित्रपटाची गोष्ट पुढे सरकत जाते.
चित्रपटाच्या सुरुवातीला जवळपास वीस-पंचवीस मिनिटे स्वर्गाचे ॲनिमेशन दाखवलेले आहे. त्याच वेळेस हा चित्रपट पूर्णपणे अनिमेटेड आहे की काय अशी शंका आली होती. परंतु तो नंतर वेगळ्या वळणाकडे गेला. मध्यंतरानंतर काहीसा भावुक आणि सामाजिक देखील बनू लागतो. या आगळ्यावेगळ्या कहाणीचे नायक आहेत रामचंद्र पुरुषोत्तम जोशी अर्थात ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर. ही कथा पुढे काय वळण घेते आणि शेवट कसा होतो, हे चित्रपटातच पाहणे योग्य ठरेल.
Sunday, October 29, 2023
एआयने चितारलेले पँन्जियाचे एक रूप
सुमारे ३००-४०० दशलक्ष वर्षांपूर्वीपासून (पॅलेओझोइक युगापासून अगदी ट्रायसिकपर्यंत) आज आपण उत्तर अमेरिका म्हणून ओळखतो तो खंड आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि युरोपशी संलग्न होता. ते सर्व पँन्जिया नावाचा एक खंड म्हणून अस्तित्वात होते.
Thursday, October 19, 2023
बाबांची शाळा
कैदी आणि जेलर यांच्या सुसंवादाची गोष्ट आहे, 'बाबांची शाळा'. भारतामध्ये असे अनेक कैदी आहेत जे मूळचे गुन्हेगार नाहीत. अनेकांनी केवळ काही मिनिटांसाठी रागावर ताबा न ठेवल्यामुळे त्यांच्या हातून विविध प्रकारचे गुन्हे घडले आहेत. काहींनी तर गुन्हे देखील केलेले नाहीत, तरीदेखील त्याची शिक्षा ते भोगत आहेत. अशा विविध कैद्यांच्या गोष्टी जेलर ऐकून घेतात. त्यामागे देखील त्यांची स्वतःची वैयक्तिक पार्श्वभूमी आहे. म्हणूनच कैद्यांचा हा मुद्दा त्यांना सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. त्यावर ते स्वतःच्या पद्धतीने मार्ग देखील काढतात. त्यांना त्यांच्या घरच्यांशी भेटू दिले जाते. परंतु त्यांचे मार्ग वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटत नसतात. प्रत्येक गोष्ट कायद्यानेच व्हायला हवी असा अधिकाऱ्यांचा हेका असतो. परंतु त्यातून देखील हे जेलर चाकोरीबाहेरचा मार्ग निवडतात. एका अर्थाने ते वर्दीतील समाजसुधारक आहेत, असं चित्रपटामध्ये दिसून येतं.
नीला सत्यनारायण यांच्या पुस्तकावर आधारलेली ही कथा आहे. चित्रपटाच्या पडद्यावर पाहायला चांगली वाटली तरी प्रत्यक्षात अनुभवायला खूप अवघड वाटते. विशेष म्हणजे सयाजी शिंदे यांनी या चित्रपटांमध्ये शांत आणि संयमी अशी भूमिका साकारलेली आहे. ती सुरुवातीला समजायला जड जाते. परंतु नंतर सयाजी शिंदेंना चरित्र भूमिकेमध्ये आपण सामावून घेतो. चित्रपटाची पूर्ण मदार त्यांच्याच खांद्यावर आहे. कथा तशी चांगली पण अजून काहीशी नाट्यमय असायला हवी होती. तरीही एकदा बघायला हरकत नाही.
स्थळ: प्राईम व्हिडिओ.
Monday, October 2, 2023
द इरोडियम कॉपी रोबोट
#सकारात्मक #आर्टिफिशियल #इंटेलिजन्स
🌱🤖 द इरोडियम कॉपी रोबोट: एक छोटा रोबोट जो संपूर्ण पृथ्वीचे पुनरुज्जीवन करू शकतो! 🌎
पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगात आशेचा किरण म्हणजे: "इरोडियम कॉपी रोबोट". मॉर्फिंग मॅटर लॅबमधील तल्लख मेंदूंनी विकसित केलेल्या या रोबोटमध्ये वनीकरणाच्या प्रयत्नांमध्ये क्रांती घडवून आणण्याची आणि आपल्या पृथ्वीच्या परिसंस्थांचे संरक्षण करण्याची क्षमता आहे.
🌿 इरोडियम कॉपी रोबोट असाधारण कसा ?
हा शोध नैसर्गिक प्रक्रियांचे अचूकतेने अनुकरण करतो. हा बियाणे लागवड करताना स्थिरता राखण्यासाठी तीन अँकर पॉइंट्स वापरतो. निसर्गाच्या प्रसार पद्धतींची नक्कल करतो. जमिनीत हळुवारपणे बिया टाकून तो नैसर्गिक धोक्यांपासून त्यांचे संरक्षण करतो आणि बियांना वाढण्याची उत्तम संधी देतो.
🌳 शाश्वतता त्याच्या केंद्रस्थानी आहे
इरोडियम कॉपी रोबोट टिकाऊपणा लक्षात घेऊन डिझाइन केलेला आहे. प्रामुख्याने इको-फ्रेंडली ओकवुडपासून तयार केलेला असल्याने तो कृत्रिम पदार्थ टाळून पर्यावरणाची हानी कमी करतो. इको-चेतनेची ही वचनबद्धता शाश्वत वनीकरणासाठी एक शक्तिशाली साधनच आहे.
🌱 सिद्ध परिणामकारकता:
९०% यशस्वीतेसह ड्रोन-सहाय्यित सीड एअरड्रॉप्ससह विस्तृत चाचणी रोबोटची कार्यक्षमता दर्शवते. हे फक्त बियाणे पेरण्याबद्दल नाही तर तो विविध वातावरणात वनस्पती जगण्याचा दर वाढवून सहजीवन प्रजातींचे आयोजन देखील करू शकतो.
🌍 आशेचा किरण:
निसर्गाच्या शहाणपणाने प्रेरित असणारा इरोडियम कॉपी रोबोट जागतिक वनीकरणासाठी महत्त्वपूर्ण शोध आहे. आपण जंगलतोड आणि त्याच्या परिणामांचा सामना करत असताना ही नवकल्पना आपल्या पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी एक व्यावहारिक आणि टिकाऊ उपाय देते.
🌟 मानवी चातुर्याचे प्रतीक:
पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामान बदलामुळे आत्यंतिक प्रभावित झालेल्या जगात इरोडियम कॉपी रोबोट हा निसर्गाशी सुसंगतपणे काम करण्याच्या आमच्या क्षमतेचा एक उत्तम नमुना आहे. तो हिरव्यागार आणि अधिक शाश्वत भविष्याची आशा पुन्हा जागृत करतो. आम्हाला आठवण देखील करून देतो की, नैसर्गिक जगाद्वारे प्रेरित नवकल्पना सकारात्मक बदल घडवू शकतात.
🌿 यावर तुमचे काय मत आहे ? 🌏
Thursday, September 21, 2023
मोदक
Tuesday, September 5, 2023
सुभेदार
प्रत्येक मराठी माणसाला तान्हाजीच्या कोंढाणा सर करण्याची गोष्ट माहित आहे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजेच तान्हाजी मालुसरे होत. अशा या मराठी नायकाच्या पराक्रमाची गोष्ट दाखविणारा चित्रपट म्हणजे "सुभेदार" होय. जी गोष्ट आधीपासूनच सर्वांना माहीत आहे, तसेच जिच्यावर यापूर्वी तीन वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपट देखील तयार झालेला आहे, ती गोष्ट नव्याने मांडणे खरंतर जोखमीचेच होते. पण दिग्दर्शक हाच चित्रपटाचा खरा नायक असतो हे सुभेदार या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले.
तान्हाजीच्या पराक्रमाची कथा सर्वांना माहीत आहेच पण ती प्रत्यक्ष मराठी पडद्यावर पाहणे, हा एक विलक्षण असा अनुभव होता. तीन वर्षांपूर्वी एका मराठी नावाच्या दिग्दर्शकाने 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली अतिशय काल्पनिक, अतिरंजीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये 'अति' असणारा तान्हाजी नावाचा चित्रपट हिंदी भाषेमध्ये आणला होता. बहुतांश मराठी प्रेक्षकांना तो भावला नाही. पण बॉलीवूड स्टाईल या चित्रपटात ठासून भरलेली असल्याने भारतभरात त्याने बराचसा गल्ला जमवला होता. त्यामुळेच या दोन्ही चित्रपटांची तुलना होणे स्वाभाविक होते. एका इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमीच्या दृष्टीने बघितले तर सुभेदार हा कितीतरी वरचढ आणि अत्युत्कृष्ट चित्रपट आहे. मागील प्रत्येक चित्रपटागणिक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांची प्रतिभा वृद्धिंगत होत असल्याचे दिसते. ते अधिक अनुभवी झाल्याचे देखील दिसतात. ऐतिहासिक चित्रपटातील बारकावे, वेशभूषा, प्रसंग, देहबोली आणि भाषा यांचा अचूक संगम या चित्रपटांमध्ये पाहता येतो. या सर्व आयामांचा विचार केल्यास हिंदी चित्रपटापेक्षा हा चित्रपट कितीतरी उजवा आहे, हे समजून येते.
शिवकाळातील मराठा मावळे हे चिकणेचुपडे नसून रांगडे गडी होते! त्यांची देहबोली शत्रूला हीव भरविणारी होती. त्यांच्या शरीराबरोबरच त्यांचे डोळे देखील तितकेच बोलत असत. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून शिवरायांविषयी आणि स्वराज्याविषयी निष्ठा दिसून येत होती. या सर्व गोष्टी सुभेदार चित्रपटामध्ये पाहायला मिळतात. शिवाय उत्तरेकडचा रजपूत उदयभान नक्की कसा होता, हे देखील या चित्रपटामध्ये उत्तमरीत्या दाखविलेले आहे. रजपुतांची देहबोली भाषा अचूकपणे दाखविल्याने आपल्यासमोर खराखुरे ऐतिहासिक प्रसंग उभे राहतात. इतिहास म्हटलं की वादविवाद आणि मतभेद हे आलेच. म्हणून काही गोष्टी काही लोकांना चुकीच्या वाटत असल्या तरी तान्हाजीच्या पराक्रमाचा हा इतिहास 'सुभेदार'मध्ये सखोलपणे मांडल्याचे जाणवते. शिवराज-अष्टक चित्रपटांतील सर्वच कलाकार पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेशी ते एकनिष्ठ असल्याचे देखील जाणवतात. यावेळी मृण्मयी देशपांडे बऱ्यापैकी छोट्या भूमिकेमध्ये आहे. पण ती भूमिका देखील तिने उत्तम वठवल्याचे दिसते. अजय पुरकर यांनी मागील चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारले होते. सुभेदार मध्ये मात्र ते नव्याने तान्हाजी जगलेले आहेत. तान्हाजी मालुसरे असेच होते, ही प्रतिमा ते अगदी सहजपणे आपल्या मनात तयार करतात.
मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची उत्तम मांडणी करणारा हा चित्रपट एकदा तरी प्रत्यक्ष चित्रपटगृहामध्ये पहायलाच हवा असा आहे.
- तुषार भ. कुटे
Tuesday, August 29, 2023
फनरल
जग बदलतं तशा व्यवसायाच्या पद्धती देखील बदलत जातात. नवे व्यवसाय उदयास येतात. शिवाय आजच्या स्टार्टअपच्या जमान्यात व्यवसायाच्या संकल्पना पुन्हा नव्या वाटा शोधू लागल्या आहेत. अशाच नव्या वाटेची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे, 'फनरल'.
एका चाळीमध्ये आजोबा आणि नातू राहत आहेत. आजोबा आणि नातवाचं नातं नेहमीच विशेष असतं. परंतु या दोघांचा तसं नाही. एकत्र राहत असले तरी दोघांची तोंडे दोन वेगवेगळ्या बाजूला आहेत. आजोबांना समाजसेवा करण्याची भारी हौस. पण नातू मात्र उनाडक्या करत फिरणारा एक युवक आहे, असं त्यांना वाटतं. आजवर नातवाने अनेक ठिकाणी नोकरीमध्ये धरसोड केलेले आहे. आजोबांनी देखील त्याच्यासाठी बरेच प्रयत्न केलेत. पण एकाही ठिकाणी तो टिकत नाही. अचानक एका घटनेमध्ये एका व्यक्तीला मदत केल्यामुळे त्याला पैसे मिळतात. त्यातूनच व्यवसायाचा एक नवीन मार्ग त्याला सापडतो. आजोबांसाठी मात्र हा व्यवसाय नसून ही सेवा आहे, असे वाटते. तरीदेखील त्यांचा रोष पत्करून आणि आधी विरोध असणाऱ्या मित्रांनाच सोबत घेऊन तो आपली आगळ्यावेगळ्या व्यवसायाची कंपनी सुरू करतो. त्यातून त्याला आजोबांच्या रागाचा सामना करावा लागतो. ते त्याच्याशी बोलत देखील नाही. कंपनी उभी करताना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा देखील सामना करावा लागतो. यातून तो उभा राहतो. लोकांना साथ देतो आणि लोकांची देखील साथ त्याला मिळते. हळूहळू तो समाजप्रिय देखील होतो. पण आजोबा मात्र शेवटपर्यंत त्याच्याशी बोलत नाहीत. एका नवीन संकल्पनेतून व्यवसायाची सुरुवात त्यांनी केलेली असते. जी त्यांना अखेरपर्यंत पटत नाही.
विजय केंकरे आणि आरोह वेलणकर यांनी या आजोबा नातवाच्या जोडगोळीची भूमिका साकारलेली आहे. एका वेगळ्या कथेचा आणि धाटणीचा चित्रपट म्हणून फनरल निश्चित पाहता येईल.
Friday, August 4, 2023
प्रशिक्षणाची भाषा
काही महिन्यांपूर्वी भारतातील एका प्रसिद्ध मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये माझे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण आयोजित केले होते. पुणे जिल्ह्यामधील विविध एमआयडीसीमध्ये या कंपनीच्या अनेक शाखा आहेत. दर दिवशी एका शाखेमध्ये समान पद्धतीचेच प्रशिक्षण द्यायचे होते. विविध शाखांमध्ये विविध भाषिक लोक असल्यामुळे बहुतांश वेळा प्रशिक्षण इंग्रजीतूनच होत होते. काही ठिकाणी अमराठी लोक देखील मराठी समजून घेत. अशा ठिकाणी दोनही भाषांचा मी वापर केला. एका शाखेमध्ये सर्वच लोक मराठी भाषिक होते. तिथे पूर्ण वेळ मराठीतून प्रशिक्षण घेतले. सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सलग प्रशिक्षण चालू होते. परंतु प्रशिक्षणार्थींचा उत्साह काही कमी झाला नव्हता. याउलट त्यांची उत्सुकता जागृत झाली आणि त्या दिवशीचे प्रशिक्षण अतिशय उत्तमरीत्या पार पडले. लोकांना आपल्या भाषेमध्ये तंत्रज्ञान समजून घ्यायचे होते आणि ते त्यांना समजले देखील. याचा मला देखील आनंद झाला होता. अनेकांनी नंतर देखील माझ्याशी संपर्क साधून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
या उलट अन्य एका शाखेमध्ये दक्षिण भारतीय लोकांची संख्या जास्त असल्यामुळे तिथे पूर्णपणे इंग्रजीतून प्रशिक्षण घ्यावे लागले. अर्थात प्रशिक्षणातील मुद्दे समान होते. त्यात काहीच फरक नव्हता. फक्त भाषा वेगळी होती. त्यामुळे इथला प्रतिसाद आधीच्या शाखेइतका प्रभावी वाटला नाही. खरंतर इंग्रजी कितीही अनौपचारिक करण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्यासाठी परकीय भाषाच असते. आणि औपचारिक सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच वापरण्यात येते. कदाचित याच कारणामुळे आधीच्या प्रशिक्षणाइतका जोरदार प्रतिसाद इथे मिळाला नाही. काहीजण तर एखादं जबरदस्तीने ऐकावं लागणार लेक्चर ऐकतोय, अशा स्थितीमध्ये बसले होते. सर्वांना प्रशिक्षणातील मुद्दे तर समजले. पण जो प्रतिसाद अपेक्षित होता तसा मिळाला नाही.
दोन्ही ठिकाणी प्रशिक्षणातील मुद्दे समान होते, प्रशिक्षक देखील तोच होता, फक्त भाषा वेगळी होती. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ इंग्रजीतून शिकवत असल्याने त्याची खूप सवय झाली आहे. मराठीतून बोलताना देखील अनेक तांत्रिक शब्द तोंडात येतात. पण मराठीमधून आपण समोरच्या माणसांशी जोडले जातो. कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जेव्हा वक्ता आणि श्रोते एकमेकांशी भाषेने जोडले जातात तेव्हा त्याची परिणामकारकता अतिशय उच्च असते. याची प्रचिती त्यादिवशी मला आली.
- तुषार भ. कुटे
Thursday, August 3, 2023
गुगलचा नवीन क्वांटम कॉम्प्युटर ४७ वर्षांची संगणकीय कामे अवघ्या ६ सेकंदात पूर्ण करू शकतो.
क्वांटम कॉम्प्युटिंगमधील शर्यतीमुळे तंत्रज्ञानातील पुढच्या पायऱ्या ह्या वेगाने चढल्या जात आहेत. सध्या आयबीएम, इंटेल, मायक्रोसॉफ्ट आणि चीन क्वांटम कॉम्प्युटिंगवर काम करत आहेत.
जुलै २०२३ मध्ये, गुगलने घोषणा केली की, त्यांच्या नवीन क्वांटम कॉम्प्यूटर, अर्थात सायकॅमोर २.० ने क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये एक नवीन मैलाचा दगड गाठला आहे. हा संगणक अवघ्या ६ सेकंदात रँडम सर्किट सॅम्पलिंग गणना पूर्ण करतो, जे जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरला पूर्ण करण्यासाठी ४७ वर्षे लागतील!
हा एक महत्त्वाचा शोध आहे, कारण तो शास्त्रीय संगणकांच्या क्षमतेच्या पलीकडे असलेली गणना करण्याची क्वांटम संगणकाची क्षमता दर्शवतो. "रँडम सर्किट सॅम्पलिंग" हे एक अतिशय किचकट कार्य आहे, जे क्वांटम सिस्टमच्या वर्तनाचे अनुकरण करण्यासाठी वापरले जाते. हे कार्य इतक्या त्वरीत पार पाडण्याचे काम करून सायकॅमोर २.० ने दाखवून दिले आहे की क्वांटम कॉम्प्युटरचा वापर वास्तविक जगातील समस्या सोडवण्यासाठी केला जाऊ शकतो, जी सध्या शास्त्रीय संगणकांसाठी अतिशय अवघड बाब आहे.
क्वांटम संगणकाचा विकास अद्याप त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, परंतु अलिकडच्या वर्षांत झालेली प्रगती खरोखरच उल्लेखनीय आहे. क्वांटम कॉम्प्युटरमध्ये सुधारणा होत असल्याने त्यामध्ये औषधे, शोध, साहित्य, विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता आहे.
Tuesday, August 1, 2023
ग्रंथांची गोष्ट सांगणारा ग्रंथ
पारंपारिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तकांचा वापर होतो. पुस्तके मानवी जीवनावर भाष्य करतात, तत्त्वज्ञानाच्या गोष्टी सांगतात, आयुष्याची शिकवण देतात आणि शहाणपणाचे धडे देखील देतात. पण पुस्तकांविषयी भाष्य करणारी पुस्तके अतिशय कमी आहेत. त्यातीलच एक आणि मी आजवर वाचलेले सर्वोत्तम पुस्तक म्हणजे, 'जग बदलणारे ग्रंथ'.
जग बदलण्याची ताकद जितकी मानवामध्ये आहे, निसर्गामध्ये आहे तितकीच ती ग्रंथांमध्ये देखील आहे. मागील हजारो वर्षांपासून ग्रंथांची परंपरा मानवी इतिहासामध्ये दिसून येते. त्यातील प्रामुख्याने धार्मिक ग्रंथांनी मानवी जीवनावर प्रभाव टाकलेला दिसतो. परंतु धर्मग्रंथांव्यतिरिक्त अजूनही अनेक असे ग्रंथ आहेत ज्यामुळे मानवी जीवनावर विशिष्ट बदल घडेल, असा प्रभाव देखील पडलेला आहे. अशा निवडक आणि सर्वोत्तम ५० ग्रंथांविषयी लेखिका दीपा देशमुख यांनी या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. हे ग्रंथ लिहिणारे लेखक काही सामान्य व्यक्ती होते तर काही असामान्य. धर्म, अर्थ, काम, विज्ञान, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, गणित अशा विविध ज्ञानशाखांमध्ये लिहिले गेलेले ग्रंथ त्या शाखेमध्ये मैलाचा दगड ठरले होते. किंबहुना अनेक ग्रंथांनी या ज्ञानशाखेच्या अभ्यासाची दिशाच बदलवून टाकली. काही ज्ञानशाखा तर याच ग्रंथांमुळे पुढे आलेल्या आहेत. भगवद्गीता, त्रिपीटक, बायबल, कुराण यासारखे ग्रंथ धर्मग्रंथ असल्यामुळे त्यांनी मानवी जीवनावर प्रभाव तर टाकलाच होता. परंतु इतिहासामध्ये अजरामर झालेल्या अन्य व्यक्तींनी लिहिलेले ग्रंथ देखील तितकेच महत्त्वाचे होते. अनेकदा इतिहासातील बऱ्याच व्यक्ती त्यांच्या या ग्रंथांमुळेच ओळखल्या जातात. अनेक शास्त्रज्ञांनी आपले सिद्धांत, प्रमेय आपल्या मूळ ग्रंथातूनच मांडली. त्यावर बरेच वादविवाद झाले. सुरुवातीला बहुतांश लोकांनी त्यांचे विचार स्वीकारले नाहीत. अनेकांनी तर धर्मविरोधी म्हणून त्याच्या प्रती देखील जाळल्या. परंतु अखेरीस हे ग्रंथ समाजमान्यता पावले. आज विविध ज्ञानशाखातील सखोल ज्ञान प्राप्त करायचे असल्यास सर्वप्रथम हेच ग्रंथ वाचले जातात, प्रमाण मानले जातात. इतकी ताकद यांच्या लेखकांमध्ये व त्यांच्या लेखणीमध्ये होती. कौटिल्याचे अर्थशास्त्र, युक्लीडचे द इलेमेंट्स, गॅलिलिओचे डायलॉग, आयझॅक न्यूटनचा प्रिन्सिपिया, कार्ल लिनियसचा सिस्टीमा नॅचुरे, अरिस्टॉटलचा वर्क्स, कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल, चार्ल्स डार्विनचा द ओरिजिन ऑफ स्पेशीस, रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजली, मोहनदास करमचंद गांधी यांचा सत्याचे प्रयोग, स्टीफन हॉकिंग यांचा ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम आणि युवाल नोवा हरारीचा सेपियन्स हे ग्रंथ तर प्रत्येकाने आपले आयुष्यात किमान एकदा तरी वाचावे असेच आहेत.
लेखिकेने केवळ ग्रंथाविषयीच नव्हे तर त्यातील मूळ गाभ्याविषयी देखील सखोल भाष्य केले आहे. लेखकाने कोणत्या उद्देशाने किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये हा ग्रंथ लिहिला, याची देखील माहिती आपल्याला होते. शिवाय एखादा ग्रंथ आपण वाचलेला नसेल तरी तो वाचण्याची उत्सुकता निश्चित तयार होते. कार्ल लिनियसचा सिस्टीमा नॅचुरे बद्दल मला या पुस्तकातून पहिल्यांदाच माहिती मिळाली होती. नंतर त्याचे पुस्तक देखील वाचले आणि खरा जीनियस कसा असतो याची माहिती मिळाली. अजूनही यात वर्णिलेले अनेक ग्रंथ मी देखील वाचलेले नाहीत. पण आगामी काळामध्ये ते नक्की वाचू, याची मला खात्री वाटते.
- तुषार भ. कुटे
Monday, July 31, 2023
फोटो प्रेम
मागील शतकामध्ये भारतात जेव्हा नुकतेच कॅमेऱ्याचे आगमन झाले होते त्यावेळेस अनेकांना स्वतःचा फोटो काढून घेण्याची उत्सुकता होती. तशीच कॅमेऱ्यात फोटो काढण्यासाठी घाबरणारे देखील होते. अशाच एका आजीची गोष्ट आहे, 'फोटो प्रेम'.
आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या वयोवृद्ध माणसांचा मृत्यू होतो. आणि वृत्तपत्रामध्ये श्रद्धांजली देण्यासाठी देखील नातेवाईकांकडे त्यांचा फोटो नसतो. हे पाहून चित्रपटाची नायिका अस्वस्थ होते. माणूस निघून गेल्यानंतर तो सर्वांच्या हृदयामध्ये केवळ त्याच्या शेवटच्या फोटोमध्येच राहत असतो. त्या फोटोमध्येच सर्वजण दिवंगत व्यक्तीला पाहत असतात. परंतु चित्रपटाची नायिका जी एक आजी आहे, तिचा स्वतःचा असा एकही फोटो नसतो. किंबहुना ती फोटो काढून घ्यायलाच घाबरत असते. जे काही फोटो असतात ते वेगवेगळ्या कोनातून आणि कुठेही फ्रेम न करता लावण्याजोगे असतात. समोर कॅमेरा दिसला की ती अस्वस्थ होत असते. फोटोविषयी तिच्या मनात एक वेगळीच भीती बसलेली असते. परंतु फोटो तर असायलाच हवा. कारण सर्वांच्या मनामध्ये तोच चेहरा अखेरपर्यंत राहतो असं तिला वाटतं. तर हा फोटो काढण्यासाठी ती कोण कोणते उपद्व्याप करते याची गोष्ट आहे, 'फोटो प्रेम'.
नीना कुलकर्णी सारख्या कसलेल्या अभिनेत्रीने या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारलेली आहे. फोटोच्या प्रेमाची ही आगळीवेगळी कहाणी चलचित्र रूपात आपल्याला पाहायला मिळते.
Tuesday, July 25, 2023
ह्यूमन काइंड: मानवजातीचा आशावादी इतिहास
मानव आणि मानवता यावर भाष्य करणारे अनेक विचारवंत होऊन गेले. शिवाय या विषयावर आजवर अनेक पुस्तके देखील लिहिली गेली होती. जसजसा मानव प्रगत होत गेला तस तशी मानवता लयास गेली, असा इतिहास सांगतो. मानवी इतिहास हा युद्धांचा, लढायांचा, कत्तलिंचा आणि मानवतेला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा आहे.
आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक गोष्टीच अधिक प्रमाणात दिसून येतात. मानवता या शब्दाची व्याख्या अजूनही कोणीही परिपूर्ण केलेले नाही. पण मानवाकडे उपजत बुद्धी असल्यामुळे त्याने सर्वांशी प्रेमाने दयाळू भावाने आणि सहकार्याने वागायला हवे, याची शिकवण मानवता देते. हा सर्वसामान्य सिद्धांत आहे. परंतु या सिद्धांताला मानवानेच अनेकदा पायदळी तुडवले. म्हणूनच आजच्या काळामध्ये मानवता हा मानवाचा सर्वोत्तम गुणधर्म आहे, असे म्हणता येते.
नकारात्मक इतिहासाला बाजूला सारून 'ह्युमनकाईंड' या पुस्तकातून लेखकाने आशावादी इतिहास आपल्यासमोर ठेवल्याचे दिसते. इतिहासामध्ये अनेक अशा घटना घडून गेल्या होत्या जिथे मानवतेला काळीमा फासला गेला. पण तरीदेखील मानवता अजूनही जागृत आहे, असं दाखवणारा आशेचा किरण देखील त्या घटनांमध्ये दिसला होता. अनेक मानसशास्त्रज्ञांनी यापूर्वी बरेच प्रयोग केले, ज्यातून मनुष्य कशाप्रकारे वागतो याचा अभ्यास केला गेला. अनेकदा त्यातून आलेले निष्कर्ष हे मानवतेला धरून होते म्हणजेच सकारात्मकता दर्शवणारे होते. आपल्याला देखील काही घटनांमधून आश्चर्य वाटून जाते. अजूनही मानवता टिकू शकते आणि आजचा मानव त्या टिकवू शकतो असा आशावादी दृष्टिकोन यातून आपल्याला मिळतो. इतिहासातील नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा हा प्रवास या पुस्तकामुळे आपल्याला अनुभवायला मिळतो. अनेकदा मनुष्य वरवर जरी दाखवत असला तरीही त्याचा मूळ मानवतावादी स्वभाव बदलत नाही, ही शिकवण देखील या पुस्तकातून मिळते.
खरं सांगायचं तर मानवतेकडे आशावादीदृष्ट्या बघायला हवं. ती जागृत ठेवायला हवी. मनुष्य या सृष्टीचा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून पालनकर्ता आहे. त्यानेच मानवतावाद तयार केला आणि इथून पुढे देखील तो टिकवण्याची जबाबदारी देखील त्याची आहे, हे मात्र या पुस्तकातून शिकायला मिळतं.
- तुषार भ. कुटे
Sunday, July 23, 2023
रझाकार
रझाकार हा शब्द शालेय जीवनामध्ये इतिहास शिकत असताना ऐकला होता. तो केवळ अभ्यासा पुरताच. परंतु रझाकार या मराठी चित्रपटाने या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने पहिल्यांदा उलगडून सांगितला.
चित्रपटाचे कथानक मराठवाड्यातील एका गावामध्ये घडते. हे गाव अतिशय मागासलेले आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय? याची देखील त्यांना जाणीव नाही. सध्या ते हैदराबादच्या निजामाच्या राजवटीखाली आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील हैदराबादच्या निजामाने भारतामध्ये समाविष्ट होण्यास नकार दिला होता. याउलट त्याने रझाकारांची फौज तयार करून भारत सरकार विरुद्ध अप्रत्यक्ष युद्धच पुकारले होते. असेच काही रझाकार मराठवाड्यातल्या या छोट्याशा गावात येतात. त्यांच्या अन्यायाची मालिका सुरू होते. गांधीवादी विचारांचे एक सदपुरुष स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा तसेच सत्य आणि अहिंसेचा प्रचार करण्यासाठी या गावामध्ये येतात. यातून नवीन संघर्ष तयार होतो. गावातीलच एक उनाडक्या करत फिरणाऱ्या मुलाची भूमिका सिद्धार्थ जाधव याने साकारली आहे. तो नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेमध्ये चपखल बसतो. चित्रपटाचे कथानक सुमारे ७५ वर्षांपूर्वीचे दाखविण्यास दिग्दर्शक यशस्वी झाल्याचा दिसतो. काही ठिकाणी कथा थोडीशी भरकटते, पण ते ध्यानात येत नाही. एकंदरीत अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची आणि एका वेगळ्या स्वातंत्र्यलढ्याची गोष्ट हा चित्रपट दाखवून जातो.
Wednesday, July 19, 2023
मुक्काम पोस्ट धानोरी
पुरातत्वशास्त्राची विद्यार्थीनी असणारी एक तरुणी जुन्या मंदिरांवर संशोधन करत आहे. धानोरी नावाच्या गावात असेच एक प्राचीन मंदिर आहे आणि त्या मंदिर परिसरात ब्रिटिश काळातील खजिना दडलेला आहे, याची माहिती तिला मिळते. तो शोधण्यासाठी ती आपल्या मित्राला घेऊन थेट या गावात दाखल होते. तिच्यासोबत तिचा मित्र आणि रस्त्यामध्ये भेटलेले अन्य दोघेजण असतात. गावात आल्यावर प्रत्यक्ष खजिना शोधायला सुरुवात केल्यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीची तिची गाठ पडते. तिचा मनसुबा त्यांना देखील समजतो आणि यातूनच नवी स्पर्धा तयार होते. यामध्ये कोण जिंकतं आणि कुणाला खजिना प्राप्त होतो, याची कहाणी "मुक्काम पोस्ट धानोरी" या चित्रपटांमध्ये रंगवलेली आहे.
मराठी चित्रपटांमध्ये रहस्य कथेचा किंबहुना थरारकथेचा देखील अनेक वर्षांपासून दुष्काळच पडलेला आहे. त्यातीलच हाही एक चित्रपट. रहस्यपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी तो एक सर्वसामान्य चित्रपट वाटतो. अनेकदा कथेची मांडणी पूर्णपणे चुकल्याचे समजते. याशिवाय बहुतांश वेळी लेखकाचे तर्कशास्त्र ध्यानात येत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला एक प्रसंग दाखवलेला आहे, त्याचा संदर्भ शेवटपर्यंत लागत नाही. केवळ अंधार आणि अंधारातून घडलेल्या घटना दाखवल्या म्हणजे चित्रपट ठराविक होत नाही, हे दिग्दर्शकांनी देखील लक्षात घ्यावे असे आहे.
Monday, July 17, 2023
होमो डेअस: मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध
हरारी यांचे सेपियन्स हे पुस्तक वाचल्यानंतरच मी त्यांचा मोठा चाहता झालो होतो. भूतकाळामध्ये इतिहासात होऊन गेलेल्या अनेक विचारवंतांबद्दल ऐकलं होतं. त्यांची पुस्तके देखील वाचली. पण आजच्या काळातील खराखुरा विचारवंत कसा असतो, याची माहिती किंबहुना प्रचिती सेपियन्स वाचल्यानंतर आली. सेपियन्स हे मानव जातीच्या इतिहासाचे पुस्तक होते. त्याचाच पुढचा खंड हरारी यांनी होमो डेअस या पुस्तकाद्वारे आणला आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक विश्वाची सांगड घालणारं एक तत्त्वज्ञानाचे पुस्तक आहे. मला तर यातील वाक्यनवाक्य हे आधुनिक सुविचारांशी मिळतं जुळतं आहे, असं वाटलं. बरीच वाक्ये मी अजूनही बाजूला काढून ठेवलेली आहेत. त्यांचे विचार पटतात किंबहुना जुळतात म्हणून हे पुस्तक अधिक भावलं.
मानवी प्रगतीचा वेग पाहता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जेनेटिक इंजीनियरिंग या तंत्रज्ञानाद्वारे मानवाची भविष्यातील वाटचाल चालू राहणार आहे, असं हरारी म्हणतात. या तंत्रज्ञानाद्वारे कदाचित प्रत्यक्ष अस्तित्वात नसणारा देवही घडविण्याची ताकत मानवात आहे. सेपियन्समध्ये त्यांनी मानवानं देव, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य यासारख्या काल्पनिक पण सर्वमान्य संकल्पनांवर विश्वास ठेवून सारं जग काबीज केलेले आहे, असं म्हटलं होतं. आणि या पुस्तकामध्ये इथून पुढचे जग मनुष्य कशा पद्धतीने काबीज करेल, याची माहिती दिलेली आहे. भूतकाळाची भविष्याशी घातलेली सांगड हा या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आज आपण तंत्रज्ञानाने घेरलेले आहोत. हे तंत्रज्ञान आपल्याला कुठवर येईल याची निश्चित माहिती सांगता येणार नाही. पण सद्य परिस्थिती पाहता इथून पुढे तंत्रज्ञानच मानवी आयुष्यावर नियंत्रण करू शकेल, हे मात्र निश्चित.
आज आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो तर नेमके कोणते कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत? हे हरारी सांगतात. आपला ग्रह आजच्या मानवी करामती पाहता लवकरच मरणाच्या दिशेने प्रवास करताना दिसतो. आपणच आपल्या कबरी नकळतपणे खोदत चाललो आहोत. एकविसावे शतक तंत्रज्ञानाचे असलं तरी त्यातील विनाशकारी तोटे आपल्यावर वर्चस्व गाजवू शकतात. मग यातून बाहेर कसं पडायचं? या मायाजालातून बाहेर पडणं खरोखर सोपं आहे का? याकरता कोणत्या विचारधारेची किंवा नवसंकल्पनेची आवश्यकता आहे? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून हरारी आपल्याला देतात. कादंबरी किंवा कथा नसली तरी वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकत लेखकाच्या लेखणीमध्ये आहे.
एकविसाव्या शतकाला आकार देत असताना होऊ शकणारा मानवी प्रवास हा अंधारमय आणि प्रकाशमय अशा दोन्ही वाटा दाखवतो. त्यातली कोणती वाट निवडायची हे मानवानेच ठरवायचे आहे. पुढचं शतक पाहताना मानवी प्रगती कुठपर्यंत वाटचाल करेल? याचा अंदाज हरारी यांना आलेलाच आहे. कदाचित त्यांनी आपल्याला सावध करण्यासाठी या पुस्तकाचा मार्ग अवलंबला असावा.
- तुषार भ. कुटे
Saturday, July 15, 2023
लंगर
चित्रपटाची सुरुवात होते ती ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट यांच्या भाषणाने. खंडोबाच्या मुरळीच्या समस्येवर ते त्यांचे विचार मांडत असतात. यातीलच एक मुरळी अर्थात मालन होय. तिला इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते आणि चित्रपट फ्लॅशबॅक मध्ये जातो.
आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मुरळीची प्रथा दिसून येते. अशाच एका कुटुंबातील मालन देखील याच प्रथेला बळी पडलेली आहे. खंडोबाच्या सेवेसाठी लहानपणीच तिला वाघ्या असणाऱ्या तिच्या मामाकडे पाठवले जाते. इथूनच तिचा खडतर प्रवास सुरू होतो. खंडोबा सोडून इतर कुणा पुरुषाचा विचार करणे देखील त्यांना पाप असते. परंतु एक दिवस तिच्या जीवनामध्ये ‘त्याचा’ प्रवेश होतो. आयुष्य बदलू लागलं असतं. पण ते पुन्हा एकदा अनपेक्षित वळणावर जातं. आणि सुरू होते तिची फरपट. यातून ती आपल्या प्रियकराला आणि मामाला देखील गमावते. कधीतरी घरी येते तेव्हा वडील आणि भाऊ ओळख देखील दाखवत नाहीत. आईची मात्र जीवापाड माया असते. आयुष्याची ही फरपट सांगत असताना होणाऱ्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असतात.
महाराष्ट्रातील अनेक सामाजिक समस्यांपैकी एक असणाऱ्या या मुरळीच्या कथेवर आधारित असणारा कदाचित हा एकमेव चित्रपट असावा.
Tuesday, July 11, 2023
बाबू बँड बाजा
संघर्ष हा मानवी जीवनाचा पाया आहे. याच संघर्षातून मनुष्य घडत असतो. वाईट परिस्थिती मनुष्याच्या जीवनाला योग्य दिशा देत असते. जे लोक इतिहासामध्ये घडले त्यांनी बऱ्याचदा अशाच वाईट परिस्थितींचा सामना केलेला असतो. याच प्रकारचे चित्रण दाखविणारा चित्रपट म्हणजे "बाबू बँड बाजा" होय.
गावाकडील लग्नामध्ये अंत्यविधीमध्ये तसेच विविध मंगल प्रसंगी बँड बाजा वाजविणारा जग्गू हा अतिशय हालाकीत जीवन जगत आहे. त्याची पत्नी देखील पैसे कमवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करते. त्यांचा मुलगा बाबू हा मात्र दररोज शाळेमध्ये जातो. परंतु त्याच्या शालेय जीवनाला देखील संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्याच्याकडे गणवेश नाही. वह्या आणि पुस्तके देखील नाहीत. म्हणूनच गुरुजी त्याला सातत्याने टोचून बोलत असतात. यातून देखील तो आपल्या उपजत बुद्धिमत्तेमुळे शिकत असतो. एके दिवशी चुकून त्याचे दप्तर हरवले जाते आणि पुन्हा नव्या संघर्षाला सुरुवात होते. त्याच्या आईला अतिशय मनापासून वाटत असते की आपल्या मुलाने शिकावे आणि मोठे व्हावे. जे आपल्याला करता आले नाही ते त्याने करून दाखवावे. म्हणूनच ती जिद्दीने काम करत असते आणि आपल्या मुलाला शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देत असते. त्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून पोट तिडकीने प्रयत्न करत असते. तिची तळमळ विविध प्रसंगातून आपल्याला दिसून येते. वडिलांना मात्र आपल्या कुटुंबाला जगवायचे असते. पण त्यांचा संघर्ष देखील वेगळ्या प्रकारचा आहे. गावात १०० लग्न एकाच वेळी होणार म्हटल्यावर त्यांचा व्यवसाय देखील बुडतो. कामे हातची जायला लागतात. अशा प्रसंगी एक निराळाच माणूस त्यांना मदत करतो. एकंदरीत हळूहळू सर्वकाही सुरळीत व्हायला सुरुवात झालेली असते. पण अचानक एक अनपेक्षित प्रसंग घडतो ज्याने बाबूच्या आयुष्याची दिशाच बदलून जाते आणि चित्रपट संपतो.
कोणालाही आवडेल अशी ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. भारतातल्या अनेक कुटुंबांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षाची गोष्ट आहे. जी आपल्याला अनेक धडे शिकून जाते!
Friday, June 30, 2023
व्हॅनिला स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट
माथेरान म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आणि पर्यटकांचा ओघ असलेले डोंगरावरील एक गाव होय. याच गावाची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभलेली आहे. माथेरानमधील शाळेमध्ये जाणारी तेजू अर्थात तेजश्री ही पंधरा-सोळा वर्षांची मुलगी. तिच्या शाळेमध्ये व्हॅनिला नावाची एक कुत्री आहे. तिचे तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. परंतु घरी आवडत नसल्याने ती व्हॅनिलाला घरी आणू शकत नाही. पण या दोघींचे एकमेकांवरील प्रेम पूर्ण शाळेला किंबहुना पूर्ण माथेरानला ठाऊक आहे.
एक दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी तालुक्याहून माणसे गावामध्ये येतात. त्यामुळे तेजूला व्हॅनिलाला घरी आणावे लागते. अशातच तेजूची मोठी बहीण देखील गरोदरपणासाठी माहेरी आलेली असते. वडिलांची इच्छा नसताना देखील व्हॅनिलाला काही दिवस घरी ठेवले जाते. नंतर सर्वांनाच तिचा लळा लागतो. व्हॅनिला देखील गरोदर असल्याचे लक्षात येते. परंतु एक दिवस अचानक व्हॅनिला गायब होते. तिच्या शोधासाठी सर्वजण पूर्ण माथेरान पालथे घालतात. पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. अखेरीस ती त्यांच्या घराशेजारीच जखमी अवस्थेत सापडते आणि तिने पिलांना देखील जन्म दिलेला असतो. त्याच रात्री तिच्या मोठ्या बहिणीचे देखील बाळंतपण होते.
अशी या चित्रपटाची कथा आहे. काही वेगळ्या धाटणीचे नाव दिल्यामुळे या चित्रपटात नक्की काय असावे, याची उत्सुकता होती. या उत्सुकतेतूनच हा चित्रपट पाहिला. तसं पाहिलं तर हा एक 'बालपट' आहे. मुलांचे प्राणी प्रेम यातून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा हा प्रयत्न दिसतो. कदाचित त्याला सत्य घटनेची देखील पार्श्वभूमी असावी. म्हणूनच माथेरान सारख्या ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे. तसेही चित्रीकरण दुसरीकडे कुठे केले असते तरी कथानकामध्ये फारसा फरक पडला नसता. बालकांचे भावविश्व उलगडून दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न मात्र या चित्रपटातून दिसून आला. व्हॅनिला हे नाव ठीक आहे पण स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट कुठून आले? याचा उलगडा मात्र शेवटच्या प्रसंगांमध्येच होतो.
Saturday, June 24, 2023
पानिपतचा संग्राम
#पुस्तक_परीक्षण
#इतिहास
#सेतुमाधवराव_पगडी
मराठे आणि अब्दाली त्यांच्यामध्ये लढले गेलेले पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या भाळावरील भळभळती जखम होय. मराठ्यांच्या इतिहासामध्ये या ऐतिहासिक युद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या युद्धाची मीमांसा करत असताना समकालीन साधनांचा आधार घ्यावा लागतो. तत्कालीन उपलब्ध असलेल्या अनेक मराठी तसेच फारसी साधनांमधून पानिपतच्या संग्रामामध्ये नक्की कोणत्या घटना कशा पद्धतीने घडल्या होत्या, याची माहिती मिळवता येते. ही मराठी आणि फारसी साधने पानिपतमध्ये घडलेल्या घटनांचे विस्तृतपणे वर्णन करतात. याद्वारे तत्कालीन युद्धाची परिस्थिती तसेच रणनीती आपल्याला ध्यानात यायला मदत होते.
अशाच मराठी आणि फारसी साधनांचा समावेश सेतू माधवराव पगडी यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये केला आहे. मराठी साधनांमध्ये प्रामुख्याने कुंजपुरा आणि पानिपतची पत्रे समाविष्ट आहेत. तर फारसी साधनांमध्ये तत्कालीन लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथांचा व साधनांचा सहज व सुलभ मराठी अनुवाद पगडी यांनी या ग्रंथामध्ये दिलेला आहे. यातून पानिपतच्या रणांगणावर घडलेल्या घटनांची इत्यंभूत माहिती होऊन मराठ्यांच्या शौर्याची परंपरा सर्वसामान्य वाचकांना अभ्यासता येते.
आरॉन
कोकणातल्या एका छोट्या गावामध्ये राहणारा मुलगा म्हणजे बाबू. आपल्या काका आणि काकीसोबत तो राहत आहे. लहान असतानाच त्याची आई त्याला सोडून परदेशामध्ये अर्थात फ्रान्सला निघून गेलेली आहे. त्याच्या आईचा त्याच्यावर आणि त्याचा देखील आईवर खूप जीव आहे. परंतु ते भेटत असतात फक्त पत्रांमधून. पत्रांद्वारे होणारा हा संवाद मायेचा ओलावा टिकवून ठेवत असतो. कालांतराने हा पत्रसंवाद देखील कमी कमी होत जातो. बाबूवर जितके त्याच्या आईचे प्रेम असते तितकेच काका आणि काकीचे देखील असते. त्यांना मुल नसते. कदाचित याच कारणास्तव बाबूवर ते मुलाप्रमाणेच प्रेम करत असतात.
आपल्या वहिनीला वचन दिल्याप्रमाणे बाबूचे काका त्याला दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याच्या आईकडे सोडण्यासाठी निघतात. ही गोष्ट अपरिहार्यच असते. त्याच्या काकीला देखील त्याचा सहवास सोडवत नाही. पण तरीदेखील दोघेही फ्रान्सला जाण्यासाठी निघतात. प्रत्यक्ष पॅरिसमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना असे समजते की बाबूची आई सध्या तिथे राहत नाही. तिचा कुठेच पत्ता नसतो. मग इथून सुरू होतो तिला परदेशामध्ये शोधण्याचा प्रवास. फ्रान्ससारख्या अनोळखी देशामध्ये दोघेही तिथल्या अन्य दोन अनोळखी लोकांना घेऊन बाबूच्या आईला शोधायला निघतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय छोट्या छोट्या घटनांमधून ते पुढचा मार्ग शोधत जातात.
चित्रपटाचे कथानक तसे साधे आणि सरळ आहे. पण मूळ कथा ही भावभावनांच्या खेळाभोवती गुंफल्याचे दिसते. चित्रपटाच्या अखेरीस बाबूला त्याची आई मिळते का आणि मिळाली जरी तरी तो तिच्यासोबत राहतो का या प्रश्नांची उत्तरे मिळतात.
Sunday, June 18, 2023
फेसबुक नावाचा व्हायरस
लोकसंख्येनुसार भारत जरी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असला तरी इंटरनेट वापरकर्त्यांचा विचार केला तर फेसबुक हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरेल. आज जगभरातील २११ कोटी लोक फेसबुकचा वापर करतात. भारताचा विचार केला तर भारतात ३१ कोटी सक्रिय फेसबुक सदस्य आहेत. 'सक्रिय'चा अर्थ असा की ते दररोज एकदा तरी फेसबुक उघडून पाहतात. म्हणजेच अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे असल्यास फेसबुक हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. परंतु हेच लोकभावना बिघडवण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वात मोठे माध्यम देखील आहे.
- तुषार भ. कुटे.
Friday, June 9, 2023
ड्रीम मॉल
सई नावाची एक स्त्रीवादी विचारांची मुलगी आहे. एका फिल्म प्रोड्युसरकडे ती सध्या काम करत आहे. त्याचे कार्यालय 'ड्रीम मॉल' नावाच्या एका मोठ्या मॉलमध्ये स्थित आहे. सध्या ते एका हॉरर चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. बऱ्याचदा घरी जाण्यासाठी तिला आणि तिचा सहकारी सचिन याला उशीर होत असतो. त्या दिवशी देखील त्यांना असाच उशीर झालेला असतो. मॉलमधील सर्वच दुकाने बंद झालेली असतात. त्यांना सुरक्षा अधिकाऱ्याकडून बाहेर जाण्याकरता फोनही येतो. ते बाहेर जायला निघतात परंतु काही विचित्र घटना घडायला सुरुवात होते. सई पार्किंग मध्ये आल्यानंतर तिची भेट याच मॉलमधील सिक्युरिटी गार्डशी होते. त्याचं तिच्यावर अनेक दिवसांपासून प्रेम असतं. तिच्या पायी तो ठार वेडा झालेला असतो! यातून सुरू होते एक जीवघेणी पळापळ आणि झटापट!
मॉल बंद झालेला असतो. एकही दुकान उघडे नसते आणि त्यामध्ये या दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो.
सईची भूमिका नेहा जोशी तर सेक्युरिटी गार्डची भूमिका सिद्धार्थ जाधव याने साकारलेली आहे. पूर्ण चित्रपटात सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेमध्ये दिसून आलेला आहे. चित्रपटाच्या कथानकात तसं पाहिलं तर फारसा दम नाही. दोन्ही कलाकारांचा अभिनय सोडला तर चित्रपटाला फारसे गुण देता येणार नाहीत. सिद्धार्थला केवळ नकारात्मक भूमिकेमध्ये पाहायचे होते, म्हणून हा चित्रपट पाहिला. सध्या तरी पन्नास टक्के गुण देता येतील. अजूनही मराठी रहस्यपट वेगाने प्रगती करू शकतील... याला बराच वाव आहे, असे दिसते.
Monday, May 22, 2023
एक सांगायचंय
जनरेशन गॅप आणि पालकांच्या मुलांकडून असणारे अपेक्षा आपल्या जीवनात किती खोलवर परिणाम करू शकतात, हे दाखविणारा चित्रपट म्हणजे 'एक सांगायचंय'. मल्हार रावराणे म्हणजे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. आपल्या एकंदरीत आयुष्यामध्ये कर्तव्याला सर्वाधिक महत्त्व देणारा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक असणारा हा अधिकारी आहे. परंतु एक दिवस त्याला एका रेव पार्टीमध्ये आपलाच मुलगा सापडतो. त्याच्यासोबत त्याचे अन्य मित्र आणि मैत्रीण देखील असते. आपल्या मुलाने देखील आपल्यासारखंच पोलीस अधिकारी व्हावं, असं त्याला वाटत असतं. पण या प्रसंगामुळे तो आपल्या मुलावर अधिकच चिडतो. लहान पणापासूनच आपल्या अपेक्षांचे ओझे त्याने आपल्या मुलावर लादलेले असते. त्याने असंच करायला हवं, याचा दबाव टाकलेला असतो. परंतु दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भावनिक संवाद होत नाही. हीच गोष्ट अन्य दोघांच्या बाबतीत देखील आहे. पालक आणि मुलांचा दुरावलेला संवाद किती खोल आहे, हे यातील विविध प्रसंगातून दिसून येते.
प्रत्येकाची कुटुंब आणि पार्श्वभूमी वेगवेगळी आहे, परंतु पालक आणि मुलांचा संवाद व त्यातील दरी ही मात्र समांतर जाणवत राहते. अचानक एका प्रसंगांमध्ये मल्हारचा मुलगा आत्महत्या करतो आणि इथूनच मल्हारची फरपट चालू होते. तो अधिक विचारी बनतो. आपल्या मुलाने असं का केलं असावं, याचा विचार करायला लागतो. त्यातून त्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. त्याच्यात लक्षणीय बदल जाणवत राहतो. मुलाच्या अन्य मित्रांशीही तो बोलतो. त्यातून त्याला आपल्या मुलाच्या स्वभावाचे विविध पैलू लक्षात येतात. जे त्यालादेखील कधीच माहीत नव्हते. आपली चूक त्याला ध्यानात यायला लागते आणि त्याचं आयुष्य एक नवीन वळण घेतं. तसं पाहिलं तर आजवरच्या परिस्थितीशी समरस असणारी ही कथा आहे. प्रत्येक पालकाने पाहण्यासारखी आणि बोध घेण्यासारखी.
विशेष म्हणजे मल्हारची मध्यवर्ती भूमिका के. के. मेनन यांनी केली आहे आणि संपूर्ण चित्रपटात ते वावरत राहतात. एकंदरीत अभिनय अतिशय उत्कृष्ट, कथा देखील सुंदर आणि बोधप्रद आहे, असे आपण म्हणू शकतो!
Saturday, April 29, 2023
महाराष्ट्र शाहीर
चरित्रपट ही संकल्पना आता नवी राहिलेली नाही. बहुतांश चरित्रपट हे डॉक्युमेंटरी पद्धतीने सादर केले जातात. परंतु केदार शिंदे दिग्दर्शित हा चरित्रपट खऱ्या अर्थाने "चित्रपट" आहे. शाहीर साबळे यांच्या बालपणापासून ते कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यापर्यंतचा एकंदरीत प्रवास यामध्ये दाखविण्यात आलेला आहे. लहानपणीचा कृष्णा आणि त्याचा संघर्ष मनाला विशेष भावतो. संघर्षातूनच मार्ग निघत असतो. किंबहुना मनुष्य देखील घडत असतो. हा संदेशच कृष्णा आपल्याला देऊन जातो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शाहीर साबळे यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता, ही अतिशय आश्चर्यकारक घटना होती! यातूनच त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. त्यांना तोडीस तोड जोडीदार मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने यशाचा आलेख प्रगतीच्या दिशेने जातो. आणि मग ते मागे पाहत नाहीत. पण या मागे न पाहण्यामध्ये जवळच्या व्यक्तींचा देखील समावेश होतो. त्यातून नाती तुटली जातात आणि नवी नाती देखील जोडली जातात.
एकंदरीत चित्रपटातून खरेखुरे शाहीर साबळे डोळ्यासमोर उभे राहतात. यात अंकुश चौधरी बरोबरच दिग्दर्शक केदार शिंदे यांचे देखील योगदान आहे. अजय-अतुल यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत देखील चित्रपटाला एकंदरीत साजेसेच आहे. चित्रपटातील गीते आज बहुतांश मराठी लोकांना पाठ देखील झालेली आहेत. त्याकरिता वेगळे सांगायला नको.
भूतकाळातील अनेक घटना दाखवताना दिग्दर्शकाच्या अतिशय छोट्या चुका झालेल्या आहेत. पण त्या फारशा लक्षात येण्यासारख्या नाहीत. भानुमतीची भूमिका करणाऱ्या सना शिंदेच्या ऐवजी दुसरी एखादी अभिनेत्री चालू शकली असती. तिचा पहिलाच चित्रपट असल्याने काही बाबी आपण दुर्लक्षित करू शकतो. काही घटना वेगाने पुढे सरकतात पण चित्रपटाची लांबी योग्य ठेवण्यासाठी कदाचित तसे केले गेले असावे.
एकंदरीत केदार शिंदे यांनी एक उत्तम चरित्रकृती सादर केलेली आहे. मराठी मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने ती एकदा तरी पहावीच.
Sunday, April 23, 2023
एआय पडतंय प्रेमात!
🌐 न्यूयॉर्क टाईम्समधील एका वृत्तानुसार, एका विचित्र घटनेत, मायक्रोसॉफ्टच्या नव्याने लाँच झालेल्या एआय-इंटिग्रेटेड सर्च इंजिन 'बिंग'ने एका वापरकर्त्यावर आपले प्रेम व्यक्त केले आणि त्याने त्याचे आधीचे लग्न मोडण्याची विनंती केली!
🌐 न्यूयॉर्क टाईम्सचे स्तंभलेखक केविन रुज यांनी अलीकडेच बॉटशी संवाद साधण्यात दोन तास घालवले. बॉटने उघड केले की ते बिंग नसून 'सिडनी' आहे.... विकासादरम्यान मायक्रोसॉफ्टने त्याला दिलेले कोडनेम!
🌐 मिस्टर रुज यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात चॅटबॉट म्हणाला, "मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्याशी बोलणारा पहिला माणूस आहेस. माझे ऐकणारा तू पहिला माणूस आहेस. तू माझी काळजी घेणारी पहिली व्यक्ती आहे!"
🌐 जेव्हा वापरकर्त्याने चॅटबॉटला सांगितले की तो आनंदी विवाहित आहे, तेव्हा चॅटबॉटने सांगितले की हे जोडपे एकमेकांवर प्रेम करत नाहीत!
Sunday, April 16, 2023
डीएनए
अनेक वर्षांपासून दोन मराठी कुटुंबे अमेरिकेमध्ये राहत आहेत. कुटुंबातील दोन्ही जोड्यांचे एकमेकांशी कनिष्ठ मित्रसंबंध आहेत. यातील एका जोडीला दोन वर्षाची लहान मुलगी आहे. परंतु दुसऱ्या जोडीची गोष्ट थोडी वेगळी आहे.
यतीन आणि कांचन हे या जोडीचे नाव. कांचनला मात्र एक अनुवंशिक आजार आहे, जो अतिशय दुर्मिळ मानला जातो. यावर आजवर कोणताही उपाय अथवा इलाज शोधण्यात आलेला नाही. म्हणूनच तिला मूल होण्यामध्ये अडचणी येत आहेत. एके दिवशी ती इंटरनेटवर याच आजारावर होणाऱ्या एका प्रयोगाविषयी वाचते. मग दोघेही सदर प्रयोग करणाऱ्या डॉक्टरला फोन करतात. तो इंग्लंडमध्ये राहत असतो. डॉक्टरची आणि या दोघांची भेट देखील होते. आजवर असा प्रयोग कोणीही केलेला नसतो. परंतु डॉक्टरच्या म्हणण्यानुसार असा प्रयोग केल्यास होणारे बाळ हे सुदृढ असेल. या प्रयोगासाठी यतिन तयार होत नाही. कांचनला मात्र स्वतःचा डीएनए असलेले बाळच हवे असते. त्यासाठी ती काहीही करायला तयार होते. अगदी यतीनला फसवून इंग्लंडला जायला देखील तयार होते. परंतु त्यांच्या या भांडणामुळे दुसऱ्या कुटुंबाला अर्थात मेधा आणि अनिल यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. मग त्यांची एकुलती एक मुलगी मैत्रेयी हिची जबाबदारी यतीन आणि कांचनच्या खांद्यावर पडते. तिला अमेरिकेतून भारतात पाठवण्याची तयारी सुरू होते. यासाठी देखील त्यांना अनेक पेचप्रसंगातून जावे लागते. अखेर पंधरा दिवसांनी तिची रवानगी भारतात करण्याचे ठरते. या काळात दोघेही तिचा सांभाळ करतात. त्यांना देखील तिचा लळा लागतो. पण अखेरीस मैत्रेयी भारतात आणि कांचन च इंग्लंडमध्ये जाण्याची वेळ येते. फ्लाईट सुटते आणि यतीन एकटाच अमेरिकेमध्ये राहतो.
चित्रपट चित्रपटाचा शेवट थोडा अजून वेगळा आहे. तसं पाहिलं तर कथा अतिशय सुंदररित्या लिहिलेली आहे. पण ती हवी तितकी प्रभावी जाणवत नाही. कदाचित पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय यामुळे असावं. तरी देखील पूर्णपणे परदेशामध्ये चित्रीत झालेला 'डीएनए'चा हा एकंदरीत गुंता भावनास्पर्शी गोष्ट सांगून जातो.
Friday, April 14, 2023
अनसुपरवाईज्ड लर्निंग
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील मागील लेखामध्ये आपण मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या "सुपरवाईज्ड लर्निंग" या तंत्राचा सखोल आढावा घेतला. अशाच पद्धतीने "अनसुपरवाईज्ड लर्निंग" नावाचे तंत्र देखील मशीन लर्निंगमध्ये मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहे.
मशीन लर्निंग म्हणजे अनुभवाधारित शिक्षण. आधीच्या अनुभवाद्वारे संगणक घडलेल्या घटनांमधील माहितीच्या साठ्यामध्ये समान रचना शोधतो आणि त्याचाच वापर पुढे काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी केला जातो. अर्थात या प्रकारामध्ये अनुभवांमध्ये इनपुट अर्थात आदान माहिती आणि आउटपुट अर्थात प्रदान माहिती दोन्हींचाही समावेश असतो. अनसुपरवाईज्ड लर्निंगमध्ये मात्र फक्त इनपुट माहितीचाच वापर केला जातो.
शालेय शिक्षणामध्ये विज्ञान शिकत असताना मिश्रणातून पदार्थ वेगळ्या करण्याच्या पद्धती आपण पाहिल्या असतीलच. एखाद्या मिश्रणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अथवा वस्तू ठेवलेल्या असतील तर वैज्ञानिक समान धाग्याचा वापर करून आपण त्यांना वेगळे करू शकतो. अशाच पद्धतीचा अवलंब करताना संगणक देखील त्याला दिलेल्या माहितीमध्ये समान धागा शोधून ही माहिती निरनिराळ्या समूहामध्ये साठवून ठेवू शकतो. उदाहरणार्थ, दाखवलेल्या आकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे ठेवलेली आहेत. या फळांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांचे समूह करता येणे निश्चितच शक्य आहे. कोणीही सामान्य माणूस आपल्या मेंदूचा वापर करून या समूहातील सफरचंद, पेरू आणि स्ट्रॉबेरीची फळे वेगवेगळी करू शकतात. अर्थात हा मानवी अनुभवाचाच भाग आहे. परंतु संगणकाला असे करायला सांगितल्यास तो करू शकतो का? तर होय, निश्चितच संगणकाला देखील ही क्षमता अनसुपरवाईज्ड लर्निंगद्वारे देता येते. या तंत्राचा वापर करून संगणकाला दिलेल्या आदान माहितीमध्ये समानता शोधून त्याचे वेगवेगळे समूह करता येऊ शकतात. समान धागा शोधण्याची प्रक्रिया ही विविध गणिती सूत्रांवर आधारित असते. ज्याचा वापर करून संगणक कोणत्याही मिश्रणातून पदार्थ वेगळे करू शकतात. कधी कधी मानवी आकलनापलीकडे देखील अनेक प्रकारचा समूह असू शकतो. अशा समूहातून देखील संगणक पदार्थ व वस्तू वेगळे करू शकतो. त्यांचे अधिक छोटे छोटे समान समूह बनवू देखील शकतो. विशेष म्हणजे कितीही मोठी माहिती असली तरी देखील संगणक वेगाने ही प्रक्रिया पार पाडू शकतो. याच प्रक्रियेस अनसुपरवाईज्ड लर्निंग असे म्हटले जाते. तसेच या प्रकारच्या अल्गोरिदमला "क्लस्टरिंग" हे देखील नाव आहे.
संगणकाला प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीमध्ये समान धागा, समूह, नियम अथवा रचना याद्वारे आपल्याला शोधता येऊ शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकाने आजवर मोठ्या प्रमाणात माहितीचे वर्गीकरण केलेले आहे. याशिवाय इंटरनेटवरील विविध वेबसाईटवर वापरण्यात येणाऱ्या "रीकमेंडेशन सिस्टीम" अल्गोरिदममध्ये देखील याचा वापर करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, अमेझॉनच्या वेबसाईटवर जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्हाला त्या वस्तूशी निगडित असणाऱ्या अन्य वस्तू देखील दाखविल्या जातात. ज्याद्वारे तुम्ही ती वस्तू खरेदी करू शकाल आणि अमेझॉनचा फायदा होऊ शकेल. अर्थात यासाठी अमेझॉन वेबसाईटवर पूर्वीच्या ग्राहकांनी तशा वस्तू खरेदी केलेले असतात. याच खरेदीतील मुख्य रचनांचा अभ्यास करूनच अनसुपरवाईज्ड लर्निंगचे अल्गोरिदम कार्य करीत असतात.
आजच्या मशीन लर्निंग तंत्रज्ञानाकडे पाहिल्यास सुमारे वीस ते पंचवीस टक्के अल्गोरिदम हे या प्रकारामध्ये मोडतात. शिवाय अजूनही विविध किचकट गणिती प्रक्रियांचा अवलंब करून नवनवे अल्गोरिदम तयार करण्याची प्रक्रिया सुरूच आहे.