विसावं शतक सुरू होऊन ४० वर्ष झाली होती. जग एका विनाशकारी महायुद्धामध्ये
गुंतलेलं होतं. हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनी सर्वच दोस्त
राष्ट्रांवर वरचढ होत चाललेली होती. तत्कालीन जर्मनीकडे अद्वितीय
राष्ट्रवादाबरोबरच सर्वोत्तम तंत्रज्ञ, शास्त्रात्रे तसेच सर्वाधिक सैन्य
देखील होतं. यामुळेच नाझी जर्मनी एक एक करत युरोपातील अनेक देश पादाक्रांत
करीत चाललेले होते. एकेकाळी निम्म्या जगावर राज्य करणारा इंग्लंड देखील
जर्मनीपुढे हातबल झाला होता. सतत सहा महिने लंडनवर जर्मनीकडून बॉम्ब वर्षाव
होत होते. भविष्यात लंडन शहर टिकेल की नाही, याची देखील शाश्वती ब्रिटिश
नागरिकांना नव्हती. या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान
विन्स्टन चर्चिल यांनी तातडीने एक गुप्त बैठक बोलावली. ज्यामध्ये अनेक
तंत्रज्ञांचा देखील सहभाग होता.
जर्मन सैन्य युद्धभूमीवर एकमेकांशी जलद
संवाद साधण्यासाठी एनिग्मा कोडचा वापर करीत असत. हा एनिग्मा कोड त्या
काळातील अतिशय सुरक्षित असा कोड होता. जो तत्कालीन कोणत्याही यंत्राला
तोडणे जवळपास अशक्यच होते. ब्रिटिश सैन्यांना हे एनिग्मा कोड मिळत होते
परंतु त्यामध्ये नक्की काय आहे, हे त्यांना समजतच नव्हते. अर्थात हा कोड
क्रॅक करणे व जर्मन सैन्यांमध्ये काय संवाद चालू आहे, हे समजून घेणे
ब्रिटिशांना अशक्यप्राय होऊन बसलं होतं. चर्चिल यांनी एनिग्मा कोड क्रॅक
करण्याचे आव्हान आपल्या देशातील तंत्रज्ञान समोर ठेवले व या अतिगुप्त
कार्याकरिता एका चमूची स्थापना केली. या चमूमध्ये समावेश होता तो तत्कालीन
इंग्लंडमधील सर्वात बुद्धिमान गणित तज्ञाचा अर्थात ॲलन ट्युरिंग याचा.
जर्मन
सैन्याचा एनिग्मा कोड क्रॅक करण्याचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर लगेचच
ट्युरिंगच्या मेंदूची गणितीय समीकरणे वेगाने हळू लागली. दिवस-रात्र याच
प्रकल्पावर तंत्रज्ञांचा चमू कार्य करीत होता. अनेकांना अजूनही ही
अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. परंतु ॲलन ट्युरिंगचा मेंदू मात्र वेगळ्या
विचाराने प्रेरित झालेला होता. त्याला खात्री होती की आपण यातून नक्कीच
काहीतरी मार्ग काढू. एकीकडे जर्मन वरचढ होत चालले होते तर दुसरीकडे
प्रकल्पावर काम करणाऱ्या तंत्रज्ञांवरील दबाव देखील वाढत होता आणि
ट्युरिंगने अखेरीस एनिग्मा कोड क्रॅक करणारे मशीन तयार केले. या मशीनद्वारे
काही तासांमध्ये एनिग्मा क्रॅक करता येऊ शकत होता. हे मशीन म्हणजे
ट्युरींग मशीन होय!
ट्युरिंग मशीनचा वापर करून ब्रिटिश सैन्याने जर्मन
सैन्यांचे एनिग्मा कोड भराभर क्रॅक केले व त्यांना युद्धभूमीवरील सर्व
माहिती वेगाने मिळू लागली. हळूहळू मित्रराष्ट्र वरचढ होऊ लागले आणि
जर्मनीची तिची पिछेहाट झाली. लवकरच दुसरे महायुद्ध संपले आणि त्याचे परिणाम
देखील सर्व जगाला समजले.
मित्र राष्ट्रांनी दुसरे महायुद्ध
जिंकण्यामागे ॲलन ट्युरिंग याने बनवलेल्या ट्युरींग मशीनचा सर्वात मोठा
वाटा होता. आज आपण हे मशीन लंडनमधील 'चार्ज बॅबेज म्युझियम'मध्ये बघू शकतो.
आजही संगणक अभियांत्रिकीच्या मुलांना ट्युरींग मशीन त्यांच्या
अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते. यावरूनच या अद्भुत मशीनचे व त्यामागील
तर्कशास्त्राचे महत्व प्रतीत होते. चार्ज बॅबेज यांना जरी संगणकाचा जनक
म्हणत असले तरी ॲलन ट्युरिंग याला आधुनिक संगणकाचा जनक म्हटले जाते.
ट्युरिंग हा एक गणितज्ञ असला तरी तो संगणक विश्वामध्ये संगणकतज्ञ म्हणूनच
जरामर आहे.
आज अस्तित्वात असलेल्या किंबहुना वेगाने विकसित होणाऱ्या
'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा खराखुरा पाया
ट्युरिंग मशीनद्वारे रचला होता. ट्युरिंगला एवढी खात्री होती की एखादी
गोष्ट जर मनुष्य करत असेल तर ती गणिती प्रक्रियेद्वारे संगणक निश्चितच करू
शकतो! हा क्रांतिकारी विचार होता. अर्थात संगणकाला बुद्धिमत्ता प्रदान
करायची असल्यास याच प्रक्रियेची गरज आहे, हे ट्युरिंगला त्याच काळात समजले
होते. खरंतर या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेचा उगम देखील
झाला नव्हता. परंतु ट्युरींग याने संगणकाला मानवी बुद्धिमत्ता प्रदान
करण्याची दिशा मात्र जगाला दाखवून दिली.
आज आर्टिफिशियल
इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली सर्व उत्पादने ही ॲलन ट्युरिंग याच्या गणितीय
तत्त्वज्ञानावरच आधारित आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संकल्पनेचा उगम
विसाव्या शतकातील उत्तरार्धात १९५६ मध्ये झाला. डार्थमाऊथ येथे झालेल्या
एका कॉन्फरन्समध्ये जॉन मॅकार्थी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स संकल्पनेला
जन्म दिला. परंतु ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे
संगणक त्या काळामध्ये उपलब्ध नव्हते. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास
अतिशय कमी वेगाने सुरू झाला. आज मात्र त्याने भयंकर वेग धारण केल्याचे
दिसते.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासात अप्रत्यक्ष हातभार लावणारे
आणखी दोन विद्वान म्हणजे वॉरेन मॅक्लक आणि वॉल्टर पिट्स होय. जगभरात
अस्तित्वात असणाऱ्या सर्व सजीवांपैकी मानव हा सर्वात बुद्धिमान सजीव आहे.
म्हणूनच तो या जगावर राज्य करतो. याचाच अर्थ मानवाचा मेंदू देखील तितकाच
ताकदवान असला पाहिजे. म्हणून त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यामध्ये
न्यूरॉन नावाचा छोटा घटक असतो. हे मॅक्लक आणि पिट्स यांनी पहिल्यांदा १९४३
मध्ये शोधून काढले. याच संकल्पनेचा अर्थात न्यूरॉनचा वापर करून पहिला
संगणकीय न्यूरॉन ज्याला पर्सेप्ट्रोन म्हटले जाते. त्याचा शोध फ्रॅंक
रोझेनब्लॅट यांनी १९५७ मध्ये लावला. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून
आर्टिफिशियल न्यूरॉनद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित व्हायला लागली. याचा
श्री गणेशा रोझेनब्लॅट यांनीच केला होता!
मशीन लर्निंग नावाचे आधुनिक
तंत्रज्ञान आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला वेगाने विकसित करण्यासाठी हातभार
लावीत आहे. आज ही संकल्पना नाविन्यपूर्ण वाटत असली तरी तिचा शोध १९५९ मध्ये
आर्थर सॅम्युअल नावाच्या संगणक तज्ञाने लावला होता. जगामध्ये ज्या काही
घटना घडतात त्या सर्वांमागे काही ना काहीतरी पॅटर्न दडलेला असतो. तो शोधून
त्याद्वारे संगणकाला बुद्धिमत्ता प्रदान केली जाते, यालाच मशीन लर्निंग
म्हटले जाते. खरंतर ही संकल्पना देखील ॲलन ट्युरिंगच्या गणितीय
तत्त्वज्ञानाशी मिळती जुळती अशीच आहे.
आज संगणकाकडे मोठ्या प्रमाणात
माहितीचा साठा आहे. अति प्रचंड वेगाने काम करणारे मायक्रोप्रोसेसर तयार
झालेले आहेत. शिवाय या सर्वांसाठी लागणारी प्राथमिक संगणकीय मेमरी देखील
वेगाने कार्य करू लागलेली आहे. म्हणूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स या
तंत्रज्ञानाला वेग प्राप्त झाला आहे. आज अनेक जण या क्षेत्रात विकसित करत
असले तरी त्याचा पाया रोझेनब्लॅट, ट्युरिंग, मॅकार्थी आणि सॅम्युअल्स
सारख्या तज्ञांनी कित्येक वर्षांपूर्वी भरला होता, हे जास्त महत्त्वाचे.
Ⓒ Ⓐ तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com