मोदक
आवडत नाही असा मराठी माणूस क्वचितच सापडावा. महाराष्ट्रातल्या विविध
ठिकाणी विविध प्रकारचे मोदक खायला मिळतात. कोकणामध्ये मागच्या वेळेस गेलो
होतो, तेव्हा कोकणी पद्धतीचे मोदक खायला मिळाले. किंबहुना या मोदकांचा
आम्ही फडशा पाडला. ओल्या नारळात आणि साजूक तुपाचा वापर करून बनवलेले मोदक
म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. हे मोदक खाल्ले की दुसऱ्या कोणत्याही
गोड पदार्थाची चव लागत नाही.
Thursday, September 21, 2023
Tuesday, September 5, 2023
सुभेदार
प्रत्येक मराठी माणसाला तान्हाजीच्या कोंढाणा सर करण्याची गोष्ट माहित आहे. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजेच तान्हाजी मालुसरे होत. अशा या मराठी नायकाच्या पराक्रमाची गोष्ट दाखविणारा चित्रपट म्हणजे "सुभेदार" होय. जी गोष्ट आधीपासूनच सर्वांना माहीत आहे, तसेच जिच्यावर यापूर्वी तीन वर्षांपूर्वीच हिंदी चित्रपट देखील तयार झालेला आहे, ती गोष्ट नव्याने मांडणे खरंतर जोखमीचेच होते. पण दिग्दर्शक हाच चित्रपटाचा खरा नायक असतो हे सुभेदार या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले.
तान्हाजीच्या पराक्रमाची कथा सर्वांना माहीत आहेच पण ती प्रत्यक्ष मराठी पडद्यावर पाहणे, हा एक विलक्षण असा अनुभव होता. तीन वर्षांपूर्वी एका मराठी नावाच्या दिग्दर्शकाने 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली अतिशय काल्पनिक, अतिरंजीत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये 'अति' असणारा तान्हाजी नावाचा चित्रपट हिंदी भाषेमध्ये आणला होता. बहुतांश मराठी प्रेक्षकांना तो भावला नाही. पण बॉलीवूड स्टाईल या चित्रपटात ठासून भरलेली असल्याने भारतभरात त्याने बराचसा गल्ला जमवला होता. त्यामुळेच या दोन्ही चित्रपटांची तुलना होणे स्वाभाविक होते. एका इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमीच्या दृष्टीने बघितले तर सुभेदार हा कितीतरी वरचढ आणि अत्युत्कृष्ट चित्रपट आहे. मागील प्रत्येक चित्रपटागणिक दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांची प्रतिभा वृद्धिंगत होत असल्याचे दिसते. ते अधिक अनुभवी झाल्याचे देखील दिसतात. ऐतिहासिक चित्रपटातील बारकावे, वेशभूषा, प्रसंग, देहबोली आणि भाषा यांचा अचूक संगम या चित्रपटांमध्ये पाहता येतो. या सर्व आयामांचा विचार केल्यास हिंदी चित्रपटापेक्षा हा चित्रपट कितीतरी उजवा आहे, हे समजून येते.
शिवकाळातील मराठा मावळे हे चिकणेचुपडे नसून रांगडे गडी होते! त्यांची देहबोली शत्रूला हीव भरविणारी होती. त्यांच्या शरीराबरोबरच त्यांचे डोळे देखील तितकेच बोलत असत. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून शिवरायांविषयी आणि स्वराज्याविषयी निष्ठा दिसून येत होती. या सर्व गोष्टी सुभेदार चित्रपटामध्ये पाहायला मिळतात. शिवाय उत्तरेकडचा रजपूत उदयभान नक्की कसा होता, हे देखील या चित्रपटामध्ये उत्तमरीत्या दाखविलेले आहे. रजपुतांची देहबोली भाषा अचूकपणे दाखविल्याने आपल्यासमोर खराखुरे ऐतिहासिक प्रसंग उभे राहतात. इतिहास म्हटलं की वादविवाद आणि मतभेद हे आलेच. म्हणून काही गोष्टी काही लोकांना चुकीच्या वाटत असल्या तरी तान्हाजीच्या पराक्रमाचा हा इतिहास 'सुभेदार'मध्ये सखोलपणे मांडल्याचे जाणवते. शिवराज-अष्टक चित्रपटांतील सर्वच कलाकार पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात. आणि नेहमीप्रमाणेच आपल्या भूमिकेशी ते एकनिष्ठ असल्याचे देखील जाणवतात. यावेळी मृण्मयी देशपांडे बऱ्यापैकी छोट्या भूमिकेमध्ये आहे. पण ती भूमिका देखील तिने उत्तम वठवल्याचे दिसते. अजय पुरकर यांनी मागील चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे साकारले होते. सुभेदार मध्ये मात्र ते नव्याने तान्हाजी जगलेले आहेत. तान्हाजी मालुसरे असेच होते, ही प्रतिमा ते अगदी सहजपणे आपल्या मनात तयार करतात.
मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची उत्तम मांडणी करणारा हा चित्रपट एकदा तरी प्रत्यक्ष चित्रपटगृहामध्ये पहायलाच हवा असा आहे.
- तुषार भ. कुटे
Subscribe to:
Posts (Atom)