Tuesday, November 14, 2023

निर्मनुष्य - रत्नाकर मतकरी

गूढकथा वाचकांसाठी वेगवेगळ्या विषयांची मेजवानी नेहमीच रत्नाकर मतकरींच्या कथासंग्रहातून मिळत असते. 'निर्मनुष्य'या कथासंग्रहामध्ये देखील वेगवेगळ्या धाटणीच्या आणि निरनिराळ्या विषयांवर भाष्य केलेल्या विविध गूढकथा वाचायला मिळतात. यातूनच मतकरी यांची कल्पनाशक्ती किती विलक्षण आहे, याचा देखील अंदाज येतो. दैनंदिन जीवनातील घटनांमध्ये तयार होणारे गूढ आणि त्यातून उलगडत जाणारी रहस्ये ही मतकरींच्या या कथासंग्रहातील कथांची वैशिष्ट्ये आहेत. मनोविज्ञान हे अनेकदा गूढकथांचे उगमस्थान असते. या मानसशास्त्राचा उपयोग मतकरी आपल्या कथांमध्ये अतिशय उत्तमपणे करताना दिसतात.
'निर्मनुष्य' या कथेमध्ये पत्रकाराचं दिवंगत जीवन आपल्या कल्पनाविष्काराने त्यांनी उत्कृष्टरित्या फुलवलेलं आहे. 'व्हायरस' या कथेमध्ये राजकारण्यांना खरं बोलायला लावणारा व्हायरस किती भयंकर असू शकतो, याची आपण निव्वळ कल्पनाच करू शकतो असं दिसतं! 'भूमिका' ही कथा एका चतुरस्त्र नाटकाच्या नायकाची आहे, जो वर्षानुवर्षे त्याच्या भूमिकेशी समरस झालेला दिसतो. 'गर्भ' या कथेद्वारे पृथ्वीवर कधीही जन्म न झालेल्या गर्भाचा मृत्यू कशा पद्धतीने होतो, याचे वर्णन मतकरी करतात. प्रार्थनेने एखाद्याला मारता येते का? या विलक्षण विषयावर 'प्रार्थना' ही कथा आधारलेली आहे! 'पर्यायी' या कथेद्वारे एखादी घटना घडली नसती तर पर्यायाने काय झाले असते? असा सखोल विचार समोर येतो. मतकरींची विचारशक्ती वाचकाला या सर्व कथांद्वारे निश्चित खिळवून ठेवणारी आहे.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com