Saturday, December 2, 2023

झिम्मा-२

"प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो", असं म्हणत सुरू झालेली मैत्रिणींच्या प्रवासाची गोष्ट त्याच्या पुढच्या भागामध्येही अर्थात झिम्मा-२ मध्ये सुरू राहते. एका मैत्रिणीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त या सर्वजणी पुन्हा एकदा एकत्र भेटतात आणि नव्याने प्रवास सुरू करतात. या वेळेच्या प्रवासात नव्या घटना, नवे प्रसंग, नवी ठिकाणे आणि काही नवी पात्रे देखील दिसून आलेली आहेत. प्रत्येकीचा स्वभाव वेगळा, आयुष्य वेगळे, अनुभव वेगळा आणि त्यातूनच खुमासदार विनोदांची फोडणी देखील तयार होते. अगदी नैसर्गिकरित्या विनोदी प्रसंग आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात. यातील प्रत्येकीच्या आयुष्याचा भाग आपण नकळतपणे बनून जातो. अर्थात विनोदी कथेला भावनिक स्पर्श देखील आहे पार्किंसन्स सारखा आजार असलेली एक आणि आईपण गमावलेली दुसरी तसेच आयुष्याची नवी वाट शोधणारी तिसरी मैत्रीण आपल्याला त्यांच्या भावविश्वामध्ये घेऊन जाते. निर्मिती सावंत यांनी पहिल्या भागाप्रमाणे याही भागात त्यांची भूमिका अप्रतिमरित्या सादर केलेली दिसते. किंबहुना या भागात त्या अधिक उठून दिसतात.
अनेक दिवसानंतर मोठ्या पडद्यावर एक उत्तम चित्रपट पाहायला मिळाला. अगदी पहिल्या भाग पहिला नसेल तरीदेखील दुसरा भाग पाहिला तितकीच मजा येईल, याची खात्री वाटते. चित्रपटाच्या पहिल्या प्रसंगापासून आपण त्यात गुंतून जातो. काही प्रसंग आपल्याशी जुळवण्याचा देखील प्रयत्न करतो. नकळत त्यांच्या विनोदात देखील सामील होतो. खरंतर हे दिग्दर्शकाचं मोठं यश मानता येईल.
एकंदरीत काय चित्रपट बघताना आम्हाला मज्जा म्हणजे मज्जा म्हणजे लईच मज्जा आली!

टीप: हा चित्रपट केवळ बायकांसाठी बनवलेला आहे, असे समजू नये!


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com