२७ नोव्हेंबर २०२२… एका वर्षापूर्वी बजाज एलियान्झ पुणे हाफ-मॅरेथॉनचे
आयोजन बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलापासून करण्यात आले होते. मी
प्रत्यक्ष पाहिलेली ही पहिलीच मॅरेथॉन होती.
सकाळी सातच्या दरम्यान
आम्ही बालेवाडीच्या चौकात पोहोचलो. गाड्या पुढे नेण्यासाठी बंदी असल्यामुळे
बालेवाडी पीएमटी डेपोच्या समोरच एका ठिकाणी गाडी पार्क केली. मॅरेथॉन
संपायला बराच वेळ होता. म्हणून तिथेच बसून राहिलो. परंतु गाड्यांची गर्दी
वाढत गेल्याने पार्किंगमधून गाडी काढता येईल की नाही अशी शंका आल्याने मी
स्वतःच गाडी बाहेर काढून बायपासच्या पुढच्या चौकातून महाळुंगेच्या दिशेने
निघालो. एका ठिकाणी गाडी पार्क करायला जागा मिळाली. तिथे गाडी लावून
बालेवाडीच्या मुख्य चौकाकडे चालत आलो.
एव्हाना प्रत्यक्ष मॅरेथॉन चालू
झालेली होती. खरंतर पाच किमी, दहा किलोमीटर आणि २१ किलोमीटरच्या मॅरेथॉन
केव्हाच सुरू झाल्या होत्या आणि संपल्या देखील होत्या. आता फक्त तीन
किलोमीटरची अर्थात हौशी लोकांची मॅरेथॉन चालू होती. बायपासपाशी असलेल्या
बालेवाडीच्या त्या चौकामध्ये मॅरेथॉनसाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून विशेष
रस्ता तयार केला होता. त्याच्या पलीकडून शेकडो लोक या मॅरेथॉनमध्ये धावताना
दिसले. कित्येक जण तर केवळ चालतच होते! आयोजकांनी दिलेले शर्ट घालून मस्त
मौजमजा करत फिरत चालले होते. अनेक जण कदाचित वर्षातून एकदाच अशा कुठल्यातरी
इव्हेंटमध्ये भाग घेऊन आपली ‘हेल्थ’विषयी असणारी काळजी दाखवत ‘स्टेटस
मेंटेन’ करत असावेत, असे दिसले. शरीरात कदाचित मधुमेह, रक्तदाब, शर्करा
सारखे आजार असणारे देखील यामध्ये असावेत, असं एकंदरीत त्यांच्या रूपावरून
दिसून आलं. मॅरेथॉन अशी असते होय? असा प्रश्न मला पडला. हौशी लोकांना तीन
किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करायला कदाचित पाहून ते एक तास तरी लागला असावा.
मी मात्र शरीराने त्यांच्या मनाने बऱ्यापैकी किरकोळ होतो. जवळपास एक तास मी
त्या गर्दीचे निरीक्षण करत होतो. मनात विचार आला की, आपणही अशा
मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतो का? अर्ध-मॅरेथॉन असल्यामुळे सर्वाधिक अंतर २१
किलोमीटरचे होते. मी इतरांच्या तुलनेत मला बऱ्यापैकी फिट समजत होतो!
म्हणूनच याच मॅरेथॉन मध्ये पुढच्या वर्षी २१ किलोमीटर मध्ये भाग घेऊन ती
पूर्ण करून दाखवायची, असा चंग बांधला
आजवर सकाळी उठल्यानंतर मी फक्त
मॉर्निंग वॉक अर्थात केवळ चालण्यासाठीच जात होतो. अनेकदा हे अंतर चार ते
पाच किलोमीटरचे असायचे. चालणं हाही हा एक व्यायाम असला तरी तो केवळ वृद्ध
लोकांसाठीच पूरक असा आहे. खरंतर युवकांनी धावणे आणि सायकलिंग करायला हवी
असे म्हटले जाते.
मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी आता तयारी करायची होती.
म्हणून मी दुसऱ्याच दिवसापासून पहिल्यांदाच सकाळी धावायला सुरुवात केली.
सुमारे १०० मीटर अंतर गेल्यावर मला बऱ्यापैकी धाप लागली होती. मी हळूहळू
चालू लागलो. छातीतली धडधड वाढत होती. कालांतराने ती कमी झाली. पुन्हा
पळायला लागलो… परत तीच परिस्थिती! एका किलोमीटर नंतर मला ध्यानात आले की
माझी पळण्याची क्षमता बऱ्यापैकी कमी झालेली आहे! त्यामुळे पहिल्याच दिवशी
मी मॅरेथॉन मधील अर्ध-मॅरेथॉन चे २१ किमीचे अंतर पूर्ण करू शकेल की नाही
याची मला शंका यायला लागली. तरीही दररोज थोडं थोडं धावणं चालू ठेवलं. १००
मीटर वरून थोड्याच दिवसांमध्ये मी सलग एक किलोमीटर धावायला लागलो! कधी कधी
पाय देखील दुखायचे, पण त्याकडे दुर्लक्ष करत माझा हा नित्यनियम चालू होता.
या कारणामुळे दिवसभर मला ताजतवानं देखील वाटायला लागलं. एक दिवस निश्चयाने
जोपर्यंत पूर्ण दम लागत नाही तोपर्यंत पळत राहायचं ठरवलं. जवळपास तीन
किलोमीटरची सलग धाव मी पूर्ण केली! त्या दिवशी एक महत्त्वाचा मैलाचा दगड
पार केलाय की काय, याची अनुभूती मला आली. आनंदाने मी ही गोष्ट घरी देखील
सांगितली होती. माझा हुरूप वाढायला लागला. हळूहळू मी दमनं विसरायला लागलो…
पाय मात्र नियमितपणे दुखायचे. कधीकधी पाय दुखायला लागल्यामुळेच धावायचे
थांबत होतो. काही दिवस तर कंबर आणि कधी पोट देखील दुखायचे. अशावेळी
धावण्याचा वेग कमी करायचो. पण धावणे थांबवले नाही. सोशल मीडियावरील एका
पोस्टमध्ये एका व्हर्चुअल मॅरेथॉन विषयी वाचले. त्यात सहभाग देखील घेतला.
त्यावेळी स्ट्राव्हा नावाच्या अँड्रॉइड एप्लीकेशन बद्दल समजले. आणि दररोजचे
धावणे रेकॉर्ड करण्यासाठी या अँड्रॉइड एप्लीकेशनचा वापर करायला लागलो.
त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला. रोजची प्रगती कशी होत होती, याचा अंदाज यायला
लागला. दर दिवशी नवे ध्येय समोर ठेवायला लागलो. एव्हाना दररोजचे पाच
किलोमीटर धावणे ठरलेले होते. दररोजचा मार्ग देखील निश्चित होता. एकदा मनाशी
ठरवलं की, आज इतके किलोमीटर पळायचे आहे की आपोआपच जोश वाटायला लागायचा.
त्याच उर्जेने मी दररोज धावत होतो. गुगल फिट एप्लीकेशनमध्ये देखील सर्व
काही व्यवस्थित नोंदवले जात होते. एकेकाळी दिवसभरात केवळ ४० हार्ट पॉइंट्स
मिळवणारा मी दररोज शंभरी गाठायला लागलो! याच कारणास्तव वजन देखील कमी झाले
होते. शरीरातील स्थूलपणा जाऊन शरीर मध्यम पातळीवर स्थिर होऊ पाहत होते.
अशात भूक देखील वाढली होती. एका अर्थाने व्यायामाचे किंबहुना पळण्याचे
व्यसन लागायला लागले होते. अशातच आमच्या सौभाग्यवतींनी मला सायकल भेट दिली.
त्यामुळे सकाळच्या माझ्या या उद्योगामध्ये आणखी एका उद्योगाची भर पडली.
जेव्हा जेव्हा पाण्यामुळे पाय दुखायचे त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सायकल
घेऊन फिरायला बाहेर पडत असू. आजूबाजूच्या बऱ्याच ठिकाणी तीस ते पन्नास
किलोमीटरचे फेरफटके मी या काळात मारले. यात अतिशय क्वचित असा खंड पडत होता.
एक दिवस मी सलग दहा किलोमीटरची धाव पूर्ण केली! पाय बऱ्यापैकी दुखत होते
पण मैलाचा आणखी एक दगड पूर्ण केल्याचे समाधान मात्र मिळाले. तोपर्यंत चार
ते पाच महिने झाले होते. जसजसे नवनवे मैलाचे दगड पूर्ण होत होते तसतसे
ध्येय जवळ येत असल्याची जाणीव होत होती. स्ट्रावामध्ये निरनिराळी ध्येय
समोर ठेवत होतो. आणि पूर्ण देखील करत होतो. ध्येयपूर्तीचा तो आनंदच निराळा
होता. एव्हाना मला माझ्या शारीरिक क्षमतेचा अंदाज यायला लागला होता.
पुन्हा काही महिन्यांमध्ये मी पंधरा किलोमीटरची धाव देखील पूर्ण केली!
त्यामुळे आत्मविश्वासाने पुढची पायरी गाठली होती. यावेळी मी लवकरच २१
किलोमीटरची धाव पूर्ण करेल याची खात्री वाटायला लागली. सप्टेंबर २०२३
पर्यंत तीन वेळा १५ किलोमीटरची धाव पूर्ण केली. आणि प्रत्येक वेळी आधीच्या
पेक्षा कमी वेळ गाठली होती. दरम्यान सायकलिंगचा प्रवास चालूच होता.
सकाळच्या धावण्याच्या आणि सायकलिंगच्या स्वतःसोबत चाललेल्या स्पर्धेमुळे एक
निराळीच ऊर्जा शरीरामध्ये तयार झाली होती. ऑक्टोबरमध्ये आजवरची सर्वात
लांबची धाव अर्थात १७ किलोमीटरची धाव पूर्ण केली. पाय मात्र दुखत होते.
त्यावर उपाय म्हणून डॉक्टरच्या सल्ल्याने विटामिन बी१२ च्या गोळ्या सुरू
केल्या. शाकाहारी लोकांमध्ये या जीवनसत्वाची कमतरता असल्याने पाय दुखतात,
असे त्यांनी सांगितले. माझ्या या सर्व कार्यक्रमात मी बाहेरून शरीरात
घेतलेले हे एकमेव ‘सप्लीमेंट’ होय. या पूर्ण प्रवासात मी एकाही प्रत्यक्ष
मॅरेथॉन अथवा सायक्लोथॉनमध्ये सहभाग घेतला नाही. ध्येय होते यावर्षीच्याच
पुणे हाफ-मॅरेथॉनमध्ये धावण्याचे. एका वर्षात स्वतःला ह्याच मॅरेथॉनसाठी
तयार करण्याचे होते. पण काही कारणास्तव मला यामध्ये सहभागच घेता आला नाही.
पण खात्री मात्र होती की मी २१ किलोमीटर नक्की पूर्ण करू शकलो असतो.
शंभर
मीटर वरून २१ किलोमीटरपर्यंतचा धावण्याचा हा प्रवास दहा महिन्यांमध्ये
झाला. ऊर्जेंची एक अद्वितीय अनुभूती २०२३ या वर्षांने मला दिली. एक अनोखी
वाट जोपासायची संधी देखील याच वर्षात मिळाली. कदाचित पुढील वर्षी नव
काहीतरी करता येईल, म्हणून हा प्रवास झाला असावा!
- तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com