Sunday, December 3, 2023

स्क्विड गेम: फक्त थरार आणि थरार!

लहानपणी आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो. हे खेळ खेळण्याची मजाच काही और असते. असे खेळ आपल्याला मोठे झाल्यावर परत खेळण्याची संधी मिळाली तर? आणि त्यात जिंकल्यावर आपल्याला कितीतरी करोडो रुपये मिळणार असतील तर? खरंच काहीचे विचित्र असे प्रश्न आहेत. याच प्रश्नांवर व त्यांच्या उत्तरांवर कोरियन वेबसिरीज "स्क्विड गेम" आधारलेली आहे.
बऱ्याच दिवसांपासून या वेबसिरीज बद्दल समाज माध्यमांवरील विविध पोस्टमधून वाचले होते. त्यामुळे आपोआपच त्याबद्दलची उत्सुकता मनामध्ये तयार होत होती. एक दिवस सहजच म्हणून याचा पहिला भाग पाहायला सुरुवात केली. दक्षिण कोरियातल्या सिओन्गी हून या युवकाची ही कहाणी आहे. त्याच्या रक्तातच जुगार खेळणे आहे. म्हणूनच त्याच्याजवळ पैसे टिकत नाहीत आणि याच कारणास्तव त्याचा घटस्फोट देखील झालेला आहे. आपल्या दहा वर्षीय मुलीवर त्याचे खूप प्रेम आहे. परंतु ती तिच्या आईकडे राहत असल्याने त्याला तिचा दुरावा सहन करायला लागतो आहे. अशातच एक व्यक्ती त्याच्याशी लहानपणी खेळलेला एक खेळ खेळण्याचे आव्हान देते. त्यासाठी ती व्यक्ती त्याला पैसे देखील द्यायला तयार होते. तो खेळायला सुरुवात करतो. पण हरायला लागतो. त्यातून त्याची जिद्द आणखी उभारी घेते. आणि मग तो जिंकतो.  त्याला त्यातून पैसे देखील मिळतात. नंतर त्याला ऑफर मिळते की याहून अधिक पैसे हवे असल्यास आम्हाला संपर्क करा. तो त्याला दिलेल्या क्रमांकावर संपर्क करतो.  आणि अखेरीस त्याला खेळ खेळण्यासाठी त्याच्या शहरातून घेऊन जातात. त्याच्यासारख्या कर्जांनी पिडलेल्या अशा अनेक व्यक्ती त्याला एका जागी खेळ खेळण्यासाठी जमा झालेल्या दिसतात. या सर्वांनाच लहानपणी खेळलेले सहा वेगवेगळे खेळ खेळण्याची संधी मिळते. त्यातून जे खेळाडू जिंकतील त्यांना भली मोठी अर्थात करोडो रुपयांची रक्कम देण्यात येणार असते. सर्वजण अतिशय खुशीत असतात. ही स्पर्धा जिंकून नव्याने कर्जमुक्त आणि आनंदी जीवन जगण्याची ते स्वप्ने पाहू लागतात. पहिल्या फेरीमध्ये एकूण ४५६ स्पर्धक भाग घेतात. आणि अखेरीस पहिला खेळ सुरू होतो.
तसं पाहिलं तर हा खेळ अगदी साधाच. लहानपणी सर्वांनीच खेळलेला. यातून एक-एक खेळाडू बाद होणार असतो. आणि जे खेळाडू उरतील तेच पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार असतात. खेळ सुरू झाल्यानंतर पहिला खेळाडू बाद होतो. आणि या चित्रकथेचा पहिला थरार सुरू होतो. खेळाडू बाद होणे म्हणजे काय? हे जेव्हा समजते तेव्हा सर्वांचा थरकाप उडतो. अनेक जण माघार घ्यायला लागतात. परंतु ते देखील बाद होतात!
अशा पद्धतीने पुढील एकेक खेळ सरकू लागतात. खेळाडू बाद होत चालतात. खेळातील कोणतीच गोष्ट नियमबाह्य होत नाही. परंतु लहानपणी खेळले गेलेले हे खेळ खेळताना ज्या पद्धतीने खेळाडू बाद होत आहेत, ती मनाला हादरवून सोडणारी असते.  खरंतर या वेबसिरीजचा फक्त पहिलाच भाग मी पाहणार होतो. पण पहिला भाग पाहिल्यानंतर लगेचच दुसरा भाग पाहण्याची उत्सुकता मी अधिक ताणवू शकलो नाही. क्षणाक्षणाला वाढत जाणारा थरार, तणाव, भय आणि रहस्य याचमुळे यातील प्रत्येक दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. पहिला खेळ झाला आता पुढे काय? ही उत्सुकता काही संपत नाही. वेगवेगळ्या स्वभावाची, तर्हेची माणसे यामध्ये आपल्याला भेटतात. असह्यता, गांभीर्य, दुःख, भय, राग, चीड अशा विविध मानवी भावनांचा संगम आपल्याला या खेळांमध्ये पाहायला मिळतो. मनुष्य स्वभावाची विविध अंगे देखील अनुभवायला मिळतात. जीवनातील अंतिम सत्याचे दृश्यीकरण देखील यात दिसून येते. आणि अखेरीस एक खेळाडू अखेरचा खेळ अर्थात "स्क्विड गेम" जिंकतो.  पण ही वेबसिरीज इथे संपत नाही. तिथे शेवट होतो एका वेगळ्या रहस्य भेदाने. तो शेवट कदाचित अतिशय कमी लोक ओळखू शकतील, असा आहे.  म्हणूनच शेवटचा भाग अतिशय महत्त्वाचा वाटतो.
कोणतीही वेबसिरीज बघताना आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घोळत राहिले पाहिजे. अर्थात "स्क्विड गेम" मध्ये दिग्दर्शक पूर्णतः यशस्वी झाल्याचे दिसते. शेवटचा भाग पाहिल्यानंतर पुन्हा पहिला भाग पहावासा वाटतो, हे विशेष. विविध प्रकारच्या लोकांच्या कथा यात आपल्याला अनुभवायला मिळतात. आपल्या मुलीच्या प्रेमाला पारखा झालेला सिओन्गी हून, उच्चशिक्षित असूनही आपल्या आईला फसविणारा चो सांगवू, एक चांगले जीवन जगण्यासाठी उत्तर कोरिया सोडून दक्षिण कोरियामध्ये आपल्या भावासह आलेली आणि वडिलांना गमावलेली कांग सैब्योक, पैशासाठी अनेकांना फसविणारा जॅग द्योकसू, पाकिस्तानी विस्थापित कामगार अली अब्दुल अशा अनेकांच्या कथा पाहायला मिळतात. पैशांसाठी लोक काहीही करायला तयार होतील, याची देखील अनुभूती मिळते. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन देखील ही वेबसिरीज आपल्याला देते.
यातील सर्वच कलाकारांचे काम अतिशय उत्तम झालेले आहे. पार्श्वसंगीत हे प्रत्येक घटनेला, प्रसंगाला साजेसे असेच आहे. कथा अतिशय वेगळ्या धाटणीची असली तरी ती अजिबात कृत्रिम वाटत नाही. यातच लेखक आणि दिग्दर्शक यांचे यश सामावलेले आहे.  
२००८ मध्ये तयार झालेली कथा २०१९ मध्ये नेटफ्लिक्सद्वारे पूर्ण झाली. या काळात या कथेवर मोठ्या प्रमाणात संस्कार केले गेले असावेत, म्हणूनच त्यात दोष काढणे अतिशय अवघड दिसते. युट्युबवर या कथेचे विश्लेषण करणारे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते देखील मी पाहिले आणि खरोखर लेखक आणि दिग्दर्शक यांच्या कामाचे कौतुक करावेसे वाटले. थरारपट आणि भयकथा नियमितपणे अनुभविणाऱ्यांसाठी ही वेबसिरीज म्हणजे सर्वोत्तम खाद्य आहे, असेच म्हणावे लागेल.
(या वेबसिरीजचे आयएमडीबी रेटिंग ८.० आहे!)


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com