Monday, December 30, 2024

केरीदा केरीदा

सई ताम्हणकर आणि अमेय वाघ अभिनेता गर्लफ्रेंड या मराठी चित्रपट मध्ये मराठी आणि स्पॅनिश यांचं मिश्रण केलेलं एक गाणं ऐकायला मिळतं. ‘केरीदा केरीदा केरीदा केरीदा मी तुझा नोविओ तू माझी नोविआ’...असे या गाण्याचे बोल.

स्पॅनिश आणि मराठी भाषेच्या सुरेख संगम ताल लय आणि सुरांमध्ये शब्दबद्ध केल्याचा दिसतो. याचे संगीत देखील छान आहे आणि दोन्ही भाषेतील शब्दांची सरमिसळ उत्तमरीत्या गुंफल्याची दिसते. असे प्रयोग संगीतामध्ये व्हायलाच हवे यातून नाविन्य निर्मिती होते. जसराज जोशी आणि शाल्मली खोलगडे यांच्या आवाजातील क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेले हे गीत युट्युबवर उपलब्ध आहे ऐकायला विसरू नका. 


https://www.youtube.com/watch?v=Ysg0vVEyHHM

 


 

 

 


Tuesday, December 24, 2024

एक तारा आणि रंगकर्मी

गावाकडून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहून शहराकडे आलेला एक तरुण आहे. त्याच्या अंगी कला गुण आहे. तो जोपासण्यातच त्याचे आयुष्य चाललेले आहे. आजूबाजूच्या लोकांना त्याच्या कलागुणांची कदर असते तर काहींना नसतेही.
परंतु एक दिवस तो शहरामध्ये येतो. शहरातल्या लोकांना त्याच्या कलागुणांची कदर असते. कलाक्षेत्रात प्रवेश करताना त्याचा संघर्ष सुरू होतो. परंतु आत्मविश्वासाने एकेक पायरी टाकत तो आपल्या कलाक्षेत्रामध्ये उच्च शिखर पादाक्रांत करतो. मिळालेले यश प्रत्येकालाच टिकवता येत नाही. असंच काहीसं त्याच्या बाबतीत होतं. यशाची धुंदी त्याच्यावर चढते आणि याच कारणास्तव तो दारूच्या धुंदीतही राहू लागतो. व्यभिचार सुरु होतो... आणि त्यात तो वाहवत जातो. हळूहळू त्याला आपल्या लोकांचाही विसर पडू लागतो. आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांना देखील तो विसरू लागतो आणि एक दिवस अचानक आपल्या बेशिस्त स्वभावामुळे त्याची अपयशाकडे वाटचाल चालू होते. परंतु त्यातूनही तो सुधारत नाही. मी म्हणजे सर्वस्व, मी या जगामध्ये काहीही करू शकतो, अशा विचारांनी बेभान झालेला तो अचानक जमिनीवर येतो. परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते!
यश मिळवण्यासाठी अखंड मेहनत गरजेची आहे, परंतु ते टिकवण्यासाठी जीवनात शिस्त आणि संयम देखील गरजेचं असतो. अशी शिकवण देणारे हे दोन्ही चित्रपट! दोन्हींचा आशय सारखा आहे, कथा मात्र वेगळी! एक गायक तर दुसरा रंगकर्मी! दोघांचाही शून्यापासून सुरू झालेल्या प्रवास या चित्रपटांमध्ये पाहता येतो.
खरं तर ही एक शिकवण आहे, त्या प्रत्येकासाठी ज्यांना यशाच्या शिखरावर पोहोचायचे आहे आणि ते यश शेवटपर्यंत टिकवून देखील दाखवायचं आहे. हवं तर त्यांना आपण बोधकथा असं देखील म्हणू शकतो.



 

Sunday, December 22, 2024

पुस्तक महोत्सवात ज्ञानेश्वरी

पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आज प्रचंड गर्दी झाली होती. आमच्या स्टॉलमध्ये वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा ठेवलेली होती. तरी देखील अनेकांना चालता येत नव्हते. आमच्यावरील बिलिंगचा भार देखील वाढलेला होता. अशावेळी ज्ञानेश्वरीने एका बिलबुकाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि पटापट एका बाजूने ती बिले करू लागली. पुस्तकांची नावे लिहून, त्यांची किंमत लिहून त्यावरील सवलतीसह किती किंमत आहे, हे ती पटापट बिलांवर लिहित होती आणि अंतिम बिल बनवून देत होती. तिचा आम्हाला बराच हातभार लागला. पुस्तके विकत घेतल्यानंतर बिल करण्यासाठी येणारे वाचक तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. इतकी लहान मुलगी पटापट बिले लिहून त्यांना देत असताना दिसली. अनेकांनी तिचे तोंड भरून कौतुक देखील केले. काहींनी फोटो काढले. अनेकांनी तर त्यांच्यासोबत आलेल्या मुलांना दाखवले देखील की, बघ ती मुलगी कसं काम करत आहे!
इतकी लहान मुलगी पटापट मराठीमध्ये कसं लिहू शकते? विशेष म्हणजे तिचे आकडेदेखील मराठीमध्ये होते, याचे देखील खूप आश्चर्य वाटलं. ती मराठी माध्यमामध्ये शिकत आहे, हे ऐकल्यावर काहींचे डोळे विस्फारले होते. पुस्तकांच्या जगात वावरताना दिवसभर तिची आम्हाला हातभार लावण्यासाठी चाललेली चाललेली लगबग अखेरीस रात्री महोत्सव बंद होईपर्यंत चालूच होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची यावर्षीची पुस्तकांची खरेदीही खूप मोठी झाली!

--- तुषार भ. कुटे 



पुणे पुस्तक महोत्सवातील परकीय पाहुणे

आज पुणे पुस्तक महोत्सवामध्ये या दोन परदेशी व्यक्तींनी लक्ष वेधून घेतले. ते जवळपास सर्व स्टॉलवर फिरत होते. इथली गर्दी बघून त्यांचे व्हिडिओ देखील काढत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आश्चर्याचे भाव दिसून आले. महोत्सवामध्ये पुस्तके पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून ते आश्चर्यचकित झाले असावेत. पुस्तकांनी भरलेल्या मोठमोठ्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या लोकांचे त्यांनी नकळत फोटो देखील काढले. एकंदरीत पुणेकरांच्या वाचनप्रेमाने ते भारावून गेले होते. भारतीयांविषयी तसेच इथल्या वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या मनात निश्चितच सकारात्मक भावना निर्माण झाली असावी, हे मात्र निश्चित.


 

Friday, December 6, 2024

नागणिका - शुभांगी भडभडे

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मराठी प्रदेशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन साम्राज्य होय. जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहन राज्यांनी महाराष्ट्राची राज्यव्यवस्था चालवली. एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्र घडवलादेखील! पुरातन किल्ले, लेणी, वास्तु अशा विविध पुराव्यांद्वारे सातवाहनांचा इतिहास इतिहासकारांनी महाराष्ट्रासमोर आणला. परंतु आजही बहुतांश सातवाहन राजांचा इतिहास हा अज्ञातच आहे.
जुन्नरजवळचा नाणेघाट हा सातवाहन राजवटीमध्येच बांधला गेला. शिवाय सुमारे दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेले शिलालेख आजही इथे वाचायला मिळतात. याच शिलालेखांमधून सातवाहनांच्या दुसऱ्या पिढीतील राणी नागणिका हिची ओळख इतिहासकारांनी महाराष्ट्राला करून दिली. येथील शिलालेखांद्वारे सातवाहनांच्या राज्यपद्धतीविषयी बरीचशी माहिती प्राप्त झाली. परंतु ती अजूनही नगण्य प्रकारातीलच आहे. दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांची पत्नी म्हणजे नागणिका होय. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना भारतीय समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान नव्हते तर दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्टच निराळी. अशा काळामध्ये एका स्त्री राज्यकर्तीने सातवाहनांच्या मराठी देशाचा कारभार चालवला होता, ही निश्चितच अत्यंत अभिमानाची आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. या शकनिका असणाऱ्या नागणिका राणीची काराकीर्द निश्चितच भूषणावह राहिली असणार, यात शंका नाही. हाच धागा पकडून शुभांगी भडभडे यांनी नागणिका राणीच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी लिहिलेली आहे!
कादंबरीची सुरुवात होते दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांच्या राज्यकारभारापासून. सातवाहनांच्या एकंदरीत राज्य रचनेची माहिती आपल्याला विविध घटनांद्वारे होते. सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर उदयास आलेल्या सातवाहन साम्राज्याचा उद्देश, ध्येय आणि प्रगती दिसायला लागते. श्रीसातकर्णी यांचा व्यापारविषयक, लष्करविषयक धर्मविषयक दृष्टिकोन आपल्याला समजून येतो. खरंतर सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश बौद्ध लेणी स्थापन करण्यात आली होती. यामागील त्यांचे उद्दिष्ट देखील विविध संवादांद्वारे वाचायला मिळते. वैदिक धर्माचा अवलंब करत असले तरी बौद्ध आणि जैन धर्माविषयी सातवाहनांचा दृष्टिकोन लक्षात येतो. खरंतर बहुतांश ठिकाणी वैदिक धर्मातील त्रुटींवर मात करण्यासाठी सातवाहन काय करत होते, हे देखील समजते. जवळपास निम्म्यापर्यंत कादंबरी श्रीसातकर्णी यांच्या राजवटीवरच आधारलेली दिसून येते. कालांतराने सातकर्णी राजांचा मृत्यू होतो. दोघेही युवराज वेदिश्री आणि शक्तिश्री हे अल्पवयीन असतात आणि याच कारणास्तव सर्वात ज्येष्ठ राणी नागणिका सर्व कारभार हाती घेते. राज्याची घडी बसवायला सुरुवात करते. एका कुशल आणि सुसंस्कृत राज्यकर्तीप्रमाणे राज्यकारभार हाकायला लागते. श्रीमुख सातवाहन आणि श्रीसातकर्णी यांचा सहवास लाभला असल्याने नागणिकाला त्यांचा राज्याविषयक दृष्टिकोन आणि धोरणे पक्की माहीत असतात. त्यांचा अवलंब करत नागणिका सातवाहन राज्य सांभाळू लागते. यामध्ये तिला धाकट्या राणीचे, धाकट्या युवराजांचे तसेच अपरांत देशाच्या राजाचे बंड देखील झेलावे लागते. परंतु त्यातून ती सहीसलामत योग्य मार्ग काढून राज्यकारभार सुरळीत कसा होईल, याकडेच लक्ष देते.
सातवाहनांचा व्यापार मोठ्या प्रमाणात कल्याण व सोपारा या बंदरांद्वारे ग्रीक राजसत्तांशी होत होता. याकरिता सुलभ व्यापारी मार्ग बनवावा म्हणून ती स्वतः पुढाकार घेऊन जुन्नरजवळच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये घाट बनवायला सुरुवात करते. हाच नाणेघाट होय. कादंबरीच्या उत्तरार्धामध्ये नाणेघाटाचे बांधकाम सुरू असताना बऱ्याचदा विविध घटनांचा उल्लेख येतो आणि येत राहतो. अखेरीस शेवटच्या प्रकरणामध्ये हा व्यापारी मार्ग तयार होतो. नागणिकाराणी आणि तिचे इतर मंत्री घाट बघण्यासाठी जुन्नरला जातात. तो अतिशय उत्तम तयार झालेला असतो. त्याकरता तिने शिलालेख देखील लिहून घेतलेले असतात. ते वाचून ती समाधानी होते. सह्याद्रीच्या सौंदर्याकडे बघत बघतच कादंबरी समाप्त होते.
सातवाहन साम्राज्यावर आधारित असणारी कदाचित ही मराठीतील एकमेव कादंबरी असावी. जवळपास ८०% भाग हा संवादांनी व्यापलेला आहे. त्यातून तत्कालीन विविध व्यक्तिमत्त्वांचे दर्शन लेखिका आपल्याला करून देतात. तसं पाहिलं तर कादंबरीमध्ये फारशा नाट्यमय घटना नाहीत. केवळ नागणिका राणीची ओळख करून देणे, हाच एकमेव उद्देश असावा असे दिसते. ज्यांना सातवाहन राजांविषयी बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना घटना पात्रे आणि ठिकाणी व्यवस्थित उमजतील. त्यामुळे कादंबरी वाचण्याआधी सातवाहन राजांविषयी माहिती करून घेणे फायद्याचे ठरेल.
एका अर्थाने ही माहितीपूर्ण कादंबरी आहे. श्रीमुख सातवाहन, श्रीसातकर्णी, राजकुमार वेदीश्री आणि शक्तीश्री, महारथी त्रणकायीर ही पात्रे वगळता इतर सर्व पात्रे काल्पनिक आहेत. अर्थात इतिहासामध्ये त्यांच्या नावाविषयी कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. परंतु कथेची गरज असल्याने लेखिकेने त्यांचा अंतर्भाव कादंबरीमध्ये केला असावा. एकंदरीत भाषा सुंदर आणि ऐतिहासिक प्रकारातील आहे. ज्यामध्ये अन्य भाषांमधून आलेले कोणतेही शब्द वापरलेले नाहीत, हे विशेष. सर्व शहरांची नावे तसेच भागांची नावे जसे अपरांत, अश्मक, दंडकारण्य इत्यादी (जुन्नर वगळता) सातवाहनकालीन आहेत. म्हणूनच आपण कथेमध्ये गुंतून राहतो. एका ठिकाणी वैदिकधर्म ऐवजी हिंदू हा उल्लेख केलेला आहे. बाकी कादंबरी उत्तमच.
नाणेघाटातल्या एका शिलालेखावरून राणी नागणिकाची प्रतिमा कशी असेल, हे लेखिकेने उत्तमरीत्या या कादंबरीद्वारे वठवलेले आहे. व्यापारी मार्गाची आवश्यकता, बौद्ध विहारांची उपयुक्तता, कार्षापण या नाण्याचा विनीयोग अशा विविध मुद्द्यांवर उत्तम विवेचन लेखिकेने या कादंबरीद्वारे केल्याचे दिसते. एकंदरीत सातवाहनांविषयी कादंबरीद्वारे जाणून घेणाऱ्या वाचकांना हा एक उत्तम स्त्रोत ठरेल, यात शंका नाही.


 

Thursday, November 28, 2024

टाटा नेक्सॉन - बुकिंगचा दिवस

विविध शोरूममधून कोटेशन आम्ही मागवली होती. त्यामुळे एकंदरीत किमतीचा अंदाज आला होता. आज इलेक्ट्रिक कारची किंमत जवळपास पेट्रोल कार इतकीच झाली होती. अखेरीस पंचजन्य ऑटोमोबाईल्सच्या भोसरीच्या शोरूममधून आम्हाला सर्वात कमी किंमत मिळाली. आणि लगोलग आम्ही या शोरूममध्ये दाखल झालो. इथे आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. बाहेर लावलेली मॉडेल कार देखील बघितली. सध्या इलेक्ट्रिकमध्ये असणाऱ्या पंच, अल्ट्रोज, टिगोर या गाड्या देखील इथे लावलेल्या होत्या. शिवाय नुकतीच आलेली ‘कर्व’ देखील होती.

आज आम्ही बुकिंग करण्याच्या दृष्टीनेच आलो होतो. आमच्या सोबत माझे सासरे अर्थात रश्मीचे वडील आप्पादेखील होते. आम्ही शोरूमच्या व्यवस्थापक व्यवस्थापकांबरोबर सविस्तर चर्चा केली. आणि अखेरीस बुकिंग अमाऊंट भरून गाडीची निश्चिती झाली. काहीतरी वेगळे करणार होतो. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक कार विकत घेणार होतो. अर्थात आमच्या घरामध्ये इतर कोणीही अजून इलेक्ट्रिक गाडी विकत घेतलेली नाही. त्यामुळे काहीशी धाकधूक होतीच. पण त्यापेक्षा आत्मविश्वास अधिक होता. म्हणूनच आजचा दिवस आमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस ठरला.

 



मलाला

पाकिस्तानमध्ये जेव्हा एखादी स्त्री मला स्वातंत्र्य हवं आहे असं म्हणते तेव्हा लोकांना वाटतं की, तिला आपल्या वडिलांची, भावाची किंवा नव-याची आज्ञा पाळावयाची नाही; पण तिला स्वातंत्र्य हवं आहे…. याचा अर्थ असा होत नाही. याचा अर्थ असा होतो की, तिला तिचे निर्णय स्वतः घ्यायचे आहेत, तिला मुक्तपणे शाळेला जायचं आहे, मुक्तपणे काम करायचं आहे. पवित्र कुराणामध्ये असं कुठंही लिहिलं नाही की, स्त्रीनं पुरुषांवर अवलंबून राहायला हवं. प्रत्येक स्त्रीनं पुरुषाचं ऐकायला हवं. हे शब्द देखील स्वर्गातून आलेले नाहीत. हे विचार आहेत सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या मलाला युसुफझाई हीचे.
“मलाला: सामान्यामधल्या असामान्यत्वाची कहाणी” या ऋतुजा बापट-काणे लिखित पुस्तकातून मलालाच्या व्यक्तिमत्त्वाची, संघर्षाची आणि विचारांची ओळख होते. पाकिस्तानमधील स्वात नदीचे खोरे म्हणजे नैसर्गिक सौंदर्याची खाणच. या प्रदेशावर जवळच्याच अफगाणिस्तानमध्ये प्रभाव असणाऱ्या तालिबान्यांचे राज्य होतं किंबहुना आजही असेल. तालिबानी प्रशासन म्हणजे काय, हे आज सर्वांनाच समजुन आलेले आहे. इस्लामच्या नावाखाली यांचे हक्क हिरावून घेणे हेच तालिबानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सुशिक्षित लोकांची वस्ती असणाऱ्या पाकिस्तान मधील स्वात या शांत आणि सुखी प्रदेशावर तालिबानची वक्रदृष्टी पडली. आणि इथूनच हळूहळू वातावरण बदलायला सुरुवात झाली. पाकिस्तानी प्रशासनाच्या अंतर्गत हा प्रदेश असला तरी येथे तालिबांचे कायदे चालतात. म्हणूनच इस्लामच्या नावाखाली स्त्रीशिक्षणाला येथे पूर्ण बंदी घातली गेली. परंतु आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते असणाऱ्या झिउद्दीन युसूफझाई मात्र डगमगले नाहीत. त्यांनी शिक्षणाचा वसा कायम चालू ठेवला. त्यांच्याच संस्कारात वाढलेली त्यांची मुलगी मलाला. वडिलांप्रमाणेच विचार आणि व्यक्तिमत्व असणारी ही मुलगी देखील शिक्षणासाठी शाळेत जाऊ लागली. वारंवार धमक्या देऊनही मुलींच्या शिक्षणामध्ये काही फरक पडला नाही. आणि अचानक अनेक एकेदिवशी तालिबानकडून शाळेच्या बसवर जीवघेणा हल्ला झाला. यातून मलाला थोडक्यात बचावली. तिला उपचारासाठी इंग्लंडमधील बरमिंगहॅम येथे देण्यात आले. आणि येथून पुढेच खरी मलालाची संघर्ष कहाणी जगापुढे यायला सुरुवात झाली. तिचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले. शिक्षणाविषयीची तिच्या कार्याची दखल जग घ्यायला लागले. यानंतर शिक्षण क्षेत्रातील तिला बरेचसे पुरस्कार देखील प्राप्त झाले. परंतु त्यावेळी पाकिस्तानमधील परिस्थिती वेगळी होती. तालिबानने तिला इस्लाम विरोधी ठरवले होतेच तर बहुतांश पाकिस्तानी जनता देखील मलालाला पाश्चिमात्य देशांची बाहुली आणि इस्लामची विरोधकच मानत होते. किंबहुना आजही ती परिस्थिती बदलली नसावी. एकंदरीत तिचे विचार पाहता खूपच कमी वयात तिच्या अंगी प्रगल्भता जाणवत होती. भवतालची परिस्थिती आणि वडिलांचे संस्कार यातूनच ती तावून-सुलाखून निघालेली असावी. ती उपचारार्थ इंग्लंडमध्ये असताना देखील तालिबानने तिला दोन वेळा पत्र पाठवून मायदेशी परतण्याचे आवाहन देखील केले होते. परंतु शिक्षणापासून दूर राहून आणि बंधनात अडकवून घेण्याचे तिला मान्य नव्हते. म्हणून आजही ती आपल्या मायदेशाबाहेर राहून शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य करत आहे.
दहा वर्षांपूर्वी बालमजुरी विरोधात काम करणाऱ्या  भारताच्या कैलास सत्यार्थी यांच्यासह शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजही मलाला फाउंडेशनच्या सहाय्याने शिक्षण क्षेत्रामध्ये मलालाचे कार्य चालूच आहे.
ऋतुजा बापट-काणे यांच्या या पुस्तकातून सहज सोप्या आणि काळानुरूप लिहिलेल्या घटनांद्वारे मलालाच्या संघर्षाची एकंदरीत ओळख होते. आधुनिक पिढीतील युवकांना विशेषत: युवतींना प्रेरणा देणारी ही गोष्ट आहे.

--- तुषार भ. कुटे 



Sunday, November 24, 2024

अमृतफळे- जीए कुलकर्णी

त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, त्याचप्रमाणे तुमच्याही पूर्ण होवोत. आभाळातून तीन फळे पडली. एक फळ हे कहाणी सांगणाऱ्याला, दुसरे फळ ती ऐकणाऱ्याला आणि तिसरे फळ तिचा मान ठेवणाऱ्याला. असं सांगून जीए आपल्या परीकथा पूर्ण करतात.

यापूर्वी जी.ए. कुलकर्णी यांचं ‘ओंजळधारा’ हे अशाच पठडीतलं परिकथांचे पुस्तक वाचनात आलं होतं. अर्थात या पुस्तकातून जीए मला पहिल्यांदा समजले. लहानपणी अशा कथा वाचत व ऐकत असू. पण या पुस्तकातून त्या आपल्याला पुन्हा एकदा वाचायला मिळतात. ‘अमृतफळे’ या पुस्तकातील बहुतांश कथा ‘अँपल ऑफ इममॉर्टलिटी’ या लिओ सुमेलियन यांनी लिहिलेल्या पुस्तकातील अनुवादित कथा आहेत. 

आटपाट नगर होतं! तिथे एक राजा राहत होता. त्याला एक राजपुत्र किंवा राजकन्या होती. काही राजांना अनेक राजपुत्र वा अनेक राजकन्या होत्या. असं सांगून या कथा पुढे सरकतात. प्राचीन राजांच्या राज्यातून भटकंती करत जादूचे करिष्मे दाखवत शेवटाकडे नेतात. अर्थात शेवट गोड असतो. राजकुमाराने राजकन्येला प्राप्त केले असते किंवा अमृतफळे मिळवलेली असतात. अशा धाटणीच्या कथा या पुस्तकांमध्ये वाचता येतात. त्यांचा वेग प्रचंड आहे. प्रत्येक घटना, प्रसंग वेगाने सरकत शेवटाकडे जातो. यातून बरीच अद्भुत पात्रे आपल्याला भेटतात. अर्थात केवळ मनुष्यच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे पशु-पक्षी देखील आपल्याला भेटून जातात. परिकथा आली म्हणजे पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव त्या कथेचा भाग असतो. हे या पुस्तकातून आपल्याला समजते. प्रत्येक कथा ही आपल्या स्वप्नाचा भाग देखील असू शकते. वाचक राजकुमार किंवा राजकन्येच्या जागी स्वतःला ठेवून पुस्तक वाचू शकतो. म्हणजेच परिकथा वाचण्यासाठी लहान होण्याची आवश्यकता नाही! आजही या पुस्तकाद्वारे आपण त्या विश्वात रममान होण्याचा निश्चित प्रयत्न करू शकतो.

Tuesday, November 19, 2024

टाटा नेक्सॉन ईव्ही - सुरुवात

२५ ऑक्टोबर २०१७. आमच्या ज्ञानेश्वरीचा पहिला वाढदिवस. आणि त्याच दिवशी पहिल्यांदा आम्ही आमची पहिली चारचाकी गाडी घरी आणली. मारुती वॅगनार. किंमत पाच लाखापेक्षा अधिक होती. परंतु त्याकाळी गाडी घेण्याची गरज होती म्हणून कसे व्हायचे पैसे जमा करून आणि कर्ज काढून गाडी विकत घेतली. गाडी घेतली त्यावेळेस मला ती चालवता देखील येत नव्हती. परंतु नंतर हळूहळू चालवायला लागलो. आणि मग गाडीनेच बऱ्याच ठिकाणी फिरायला लागलो. कालांतराने उत्पन्न वाढले, गाडीचे कर्ज देखील मिटवले आणि गाडीवर बऱ्यापैकी हात बसलेला होता. आज सात वर्षांनी आम्ही ठरवले की आता नवीन गाडी घ्यायची. सुरक्षितता हा आमचा प्राधान्य क्रम होता. म्हणून टाटाचीच गाडी घ्यायची असे ठरवले होते. रश्मीला टाटाची नेक्सन आवडली होती. माझा देखील काही वेगळ मत नव्हतं. त्यामुळे यावर्षी गाडी घ्यायचीच म्हणून आम्ही पक्कं ठरवलं.
मागच्या दोन वर्षापासून टाटा मोटर्सने त्यांच्या पंच, टीगोर, अल्ट्रोज सारख्या गाड्या सीएनजीमध्ये आणल्या होत्या. आणि ते लवकरच नेक्सॉनसुद्धा सीएनजीमध्ये आणणार होते. आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली होती. त्यानुसार टाटा नेक्सॉन सीएनजी लवकरच येईल, असे आम्हाला वाटले होते. आणि त्यासाठीच आम्ही बरेच महिने थांबून होतो. ज्ञानेश्वरीच्या यंदाच्या वाढदिवसाला गाडी घ्यायची होती. दोन महिने बाकी होते तरी देखील नेक्सॉन सीएनजी अजूनही लॉन्च होईल की नाही याची कोणालाच माहिती नव्हती. त्या दृष्टीने चौकशी करण्यासाठी आम्ही टाटा मोटर्स पिंपरी मधील शोरूमला जायचे ठरवले.
शोरूम ला गेल्यानंतर समजले की अजून नेक्सॉन गाडी सीएनजीमध्ये यायला बराच काळ अवकाश आहे. किमान सहा महिने तरी आधी एखादी गाडी येते तेव्हा शोरूमला माहित होत असते. म्हणजे अजून सहा महिने तरी आम्हाला गाडी मिळणार नाही, असे समजले. त्यातच त्यांनी इलेक्ट्रिक कारचा पर्याय सुचवला. शोरूममधील कस्टमर केअर एक्झिक्युटीव्हने आम्हाला कार दाखवली देखील. तिची विविध वैशिष्ट्ये देखील सांगितली. शिवाय काही महिन्यांपूर्वीच या कारची किंमत जवळपास साडेतीन ते चार लाखांनी कमी झालेली होती.पहिल्यांदा पाहिल्यानंतर आम्हाला एकंदरीत गाडी आवडली. विशेष म्हणजे गाडी ऑटोमॅटिक होती. आरामदायक होती. त्यामुळे पहिल्याच वेळेस ही गाडी आम्हाला भावली. घरी आल्यावर आमचे इलेक्ट्रिक कारबद्दल संशोधन सुरू झाले. काय तोटे, काय फायदे? याचाही विचार विनिमय झाला. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स आहेत, याचे देखील आम्ही सर्वेक्षण केले. एकंदरीत इंधनावर किती खर्च येईल? याचाही अंदाज आला. भविष्यामध्ये आता केवळ इलेक्ट्रिक कार चालतील, हे आम्हाला माहीत होते. शिवाय ही गाडी १००% पर्यावरणपूरक अशी आहे. अर्थात त्याच्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक घेण्याचे ठरवले.
प्रश्न होता कोणत्या शोरूम मधून घ्यायची? गावी गेल्यावर अगदी नारायणगाव आणि मंचर मधील टाटा शोरूममध्ये देखील चौकशी केली. परंतु तिथे कार पाहण्याकरता उपलब्ध नव्हत्या. मग पिंपरी, काळेवाडी, चाकण अशा विविध शोरूम मधून कोटेशन्स मागवले. रश्मीच्या चाकणच्या दाजींची विविध शोरूममध्ये ओळख होती. त्यांच्याच ओळखीने भोसरीच्या टाटा शोरूम मधून आम्हाला सर्वात कमी किंमत मिळाली. आणि अखेरीस येथूनच गाडी घेण्याचे ठरले.

महाराष्ट्र आणि मराठे - सेतूमाधवराव पगडी

महाराष्ट्राच्या इतिहासाचे विविध कालखंड आहेत. त्यातील मध्ययुगीन कालखंडामध्ये बहुतांश घडामोडी घडल्या ज्यामुळे महाराष्ट्र घडत गेला. ‘मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास असा लिहिला तर’ या पहिल्याच प्रकरणांमध्ये इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा दृष्टिकोन लक्षात येतो. ‘महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा संक्षिप्तवेध’ असे उपशीर्षक असणाऱ्या ‘महाराष्ट्र आणि मराठे’ या सेतूमाधवराव पगडी लिखित पुस्तकामध्ये आपल्या इतिहासातील अनेक अज्ञात ऐतिहासिक पैलू आपल्याला वाचायला मिळतात.
शिवाजी महाराजांपूर्वी ज्या सत्ताधीशांचे राज्य महाराष्ट्रावर होते त्यांच्याविषयी काही लेख या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहेत. जसे इसामीचे फारसी महाकाव्य, चौदाव्या शतकातील महाराष्ट्र, बहमनी सुलतानांची कोकण मोहीम, अहमदनगरच्या निजामशाहीतील हिंदू सरदार, मोगल कालीन महाराष्ट्राचा आर्थिक आलेख, महंमद बंगश  या लेखांमध्ये आपल्याला सदर माहिती वाचायला मिळते. तसेच खानदेश मराठ्यांच्या ताब्यात कसा आला? मराठ्यांनी लाहोरवर आक्रमण करून त्याचा ताबा कसा मिळवला? निजामाने पुणे का जाळले? मराठी आणि निजाम यांचे परस्पर संबंध कसे होते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे सेतूमाधवराव पगडी या पुस्तकातून देतात. निजाम अलीची कारकीर्द, लक्ष्मीनारायण शफिक औरंगाबादी याचा ग्रंथ मासिरे आसफी याविषयी देखील एक प्रकरण या पुस्तकांमध्ये समाविष्ट आहे. तसेच पानिपतच्या युद्धाशी संबंधित दोन लेख आपल्याला वाचता येतात. यातील पहिल्या लेखामध्ये अहमदशाह अब्दालीला पानिपतचे आमंत्रण देणारा धर्मशास्त्रज्ञ शहावली उल्ला याची राजकीय पत्रे अभ्यासली आहेत तर दुसऱ्या एका लेखात पानिपतावर परचक्राला पायबंध यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर प्रकाश टाकण्याचे कार्य पगडी यांनी केले आहे.
एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासातील अज्ञात पैलू शोधण्याचे आणि वाचकांना त्याचे ज्ञान प्राप्त करून देण्याचे काम पगडी या पुस्तकाद्वारे करतात. 



Monday, November 18, 2024

लिंक्स

हा आहे "लिंक्स"... डीप रोबोटिक्सने आव्हानात्मक भूप्रदेशांना सहजतेने सामोरे जाण्यासाठी डिझाइन केलेला चारचाकी रोबोट!

या चतुर्भुज रोबोट्सचा वापर करून पूर्णत: स्वायत्तपणे सबस्टेशन तपासणी साध्य करणारी पहिली चीनी कंपनी म्हणून 'डीप रोबोटिक्स' नावारूपाला आली.

पॉवर प्लॅंट, फॅक्टरी फ्लोअर्स, बोगद्याची तपासणी तसेच विविध बचाव कार्यांसाठी या रोबोट्सचा वापर केला जाऊ शकतो.

#ArtificialIntelligence #Robotics

---
संदर्भ: इंस्टाग्राम-सर्किट्रोबॉटिक्स


 

Friday, November 15, 2024

जुन्नर इनस्क्रीप्शन्स - शोभना गोखले

जुन्नर म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आठवतो. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर जुन्नर शहर वसलेले आहे. अष्टविनायकांपैकी ओझर आणि लेण्याद्री ही दोन स्थाने देखील याच परिसरात आहेत. आधुनिक जुन्नरची ही ओळख सर्वज्ञात असली तरी या शहराची प्राचीन काळापासून असलेली ओळख ही या परिसरातील बौद्ध लेण्यांमुळे होते.

भारतामध्ये सर्वात अधिक मानवनिर्मित लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लेणी ही जुन्नर परिसरामध्ये आहेत. सातवाहनांच्या काळात दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी वसलेले हे शहर. तत्कालीन राज व्यवस्थेत राजधानी ही प्रतिष्ठान अर्थात पैठण येथे असली तरी जुन्नर हे व्यापाराच्या दृष्टीने सर्वात मोठे ठाणे होते. कल्याण आणि सोपारा बंदरांमध्ये समुद्रामार्गे आलेला माल जुन्नरमध्ये सह्याद्रीच्या कड्यांवर कोरलेल्या नाणेघाटातून सर्वप्रथम यायचा. तत्कालीन महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी बाजारपेठ होती, त्याला जीर्णनगर असेही म्हटले जायचे. सातवाहनांच्या राज्याची भरभराट होत असताना जुन्नर शहर मोठे होत होते. कोकण आणि देशाला जोडणारा जुन्नर हा एक दुवा होता. याच्या अनेक पाऊलखुणा आजही जुन्नर शहरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसून येतात. सातवाहन राजे हे बौद्ध विचारधारेचे आश्रयदाते होते. नाणेघाटामार्गे जुन्नर आणि इतर परिसरामध्ये येणाऱ्या बौद्ध भिक्खूंसाठी आजूबाजूच्या डोंगरांमध्ये अनेक लेण्या खोदण्यात आल्या होत्या. याच लेण्या आज जुन्नरचे प्राचीन वैभव बनून स्थितप्रज्ञपणे उभ्या आहेत. सुमारे २०० लेण्या या परिसरामध्ये पाहता येतात. त्यांचे प्रामुख्याने सहा गट आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या तीन दिशांना असणारा शिवनेरी गट, मानमोडी डोंगराच्या तीन बाजूंना असणारा भीमाशंकर गट, अंबा-अंबिका गट आणि भूतलेणी गट, लेण्याद्री डोंगरातील लेण्याद्री आणि सुलेमान गट, पिंपळेश्वर डोंगरातील तुळजा गट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाणेघाट लेण्या. जुन्नरच्या या प्राचीन वैभवांमध्ये बौद्ध लेण्यांची सर्व शिल्पे, वास्तुकला पाहता येतात. शिवाय या सर्व लेणी समूहांमध्ये तत्कालीन प्राकृत भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख देखील पाहता येतात. प्राचीन वास्तुकला अभ्यासकांसाठी तसेच बौद्धधर्म उपासकांसाठी जुन्नर म्हणजे एक आदर्श ठाणे आहे. मराठी आणि प्राकृत या दोन्ही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचे पुरावे याच परिसरातील नाणेघाट लेण्यांनी दिले. आज २००० वर्षांनंतर देखील या लेण्या महाराष्ट्राचं वैभव टिकवून आहेत.

अनेक संशोधकांनी जुन्नर परिसरातील शिलालेखांवर अभ्यास केला. याच अभ्यासकांपैकी एक म्हणजे शोभना गोखले होत. त्यांनी लिहिलेल्या जुन्नर इनस्क्रीप्शन्स या पुस्तकामध्ये प्राचीन जुन्नरचे विस्तृत वर्णन केलेले आहेत. तसेच इथल्या लेण्यांमधील असणारे सर्व शिलालेख सविस्तरपणे या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. शिवाय त्यांचा अर्थ देखील समजावून सांगितलेला आहे. १९ व्या शतकामध्ये सर्वप्रथम पश्चिम घाटातील लेणी व शिलालेखांवर अभ्यास झाला. याचा संदर्भ गोखले यांनी या पुस्तकांमध्ये दिलेला दिसून येतो. 

केवळ जुन्नरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासावर सखोल प्रकाशझोत टाकणारे असे हे पुस्तक आहे. प्राचीन नाणेशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या शोभना गोखले लिखित हे पुस्तक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रकाशित केलेले आहे.



Thursday, November 14, 2024

बहु असोत सुंदर

महाराष्ट्राचा इतिहास विस्तृत आणि सखोल पद्धतीने लिहायला घेतला तर शेकडो खंडही अपुरे पडतील इतका मोठा आहे. सेतूमाधवराव पगडी यांच्यासारख्या जेष्ठ इतिहासकाराने आपल्या इतिहासातील अशी असंख्य अपरिचित पाने पुस्तक रूपाने लिहिलेली आहेत. त्यातीलच हे एक पुस्तक ‘बहु असोत सुंदर’.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जवळपास नामशेष व्हायला आलेल्या अनेक किल्ल्यांचा आणि गावांचा इतिहास या पुस्तकांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, उदगीर, नळदुर्ग, गाळणा, परांडा, कंधार, चंद्रपूर अशा विविध ठिकाणचा अपरिचित अज्ञात इतिहास पगडींनी लेखमालिकेद्वारे या पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. कदाचित स्थानिक जनतेला देखील याची फारशी माहिती नसावी. औरंगजेब काळात खानदेश नक्की कसा होता, याचे विस्तृत विवेचन एका लेखामध्ये पगडी करतात. तसेच दोन लेखांमध्ये छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर देखील त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. पावनखिंडीच्या लढाईमध्ये प्रसिद्ध झालेला विशाळगड कसा होता, तसेच त्याचे औरंगजेबाचे असलेले नाते एका लेखामध्ये पगडी स्पष्ट करतात.
याशिवाय शिवरायांच्या चतुराईने धन्य ती वस्ती, जन्मस्थानातील शिवलीलामृत, शिवरूपाचे एक आगळे दर्शन, छत्रपतींचे जीवन कार्य आणि विचारधन, उर्दूचे पहिले कोशकार शिवाजी महाराज, रथचक्र उद्धरीले या लेखांमधून शिवकाळातील विविध प्रसंगांचा परिचय वाचकांना होतो. एका लेखामध्ये औरंगजेबा नंतरचा महाराष्ट्र कसा होता, याचे वर्णन पगडी करतात. शिवाय वऱ्हाड आणि खडकीच्या लढाईचे वर्णन देखील त्यांनी उत्तमरीत्या या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. अशा विविध ऐतिहासिक घटनांनी समृद्ध असा हा ग्रंथ कोणत्याही इतिहासप्रेमी वाचकाने वाचावा असाच आहे. 



Wednesday, November 13, 2024

इंटरनेट काळातील अपडेशन

एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माझं व्याख्यान सुरू होतं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी श्रोते होते. व्याख्यानादरम्यान मी एक प्रश्न विचारला. जेफ्री हिंटन तुम्हाला माहित आहेत का? मी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले तर खरोखर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह तयार झालेले दिसले. हे एआय सारख्या अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असूनही जेफ्री हिंटन हे नाव त्यांनी ऐकलेले नव्हते, हीच गोष्ट माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का देणारी ठरली.

विज्ञान शाखेमध्ये संशोधकांसाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार होय. यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘गॉडफादर ऑफ एआय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेफ्री हिंटन यांना मिळाला आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कच्या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या डीप लर्निंग या तंत्राचा पाया असणाऱ्या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमध्ये अद्ययावत संशोधन करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच यावर्षीचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यापूर्वीही संगणकशास्त्रातील नोबेल म्हणून ओळखला जाणारा ट्युरींग पुरस्कार देखील त्यांना सन २०१८ मध्ये मिळाला होता. त्यावेळी हिंटन हे गुगल ब्रेन प्रकल्पावर काम करत होते. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाची गती, प्रगती, विकास पाहता त्यामध्ये त्यांना धोकेच अधिक दिसू लागले. या कारणास्तव मागील वर्षी त्यांनी गुगलला रामराम करून एआयविषयी जनजागृती करण्यास सुरुवात केली. एकंदरीत सर अल्फ्रेड नोबेल यांचा तंत्रज्ञानाविषयीचा जो दृष्टिकोन होता त्याचेच प्रतिबिंब जेफ्री हिंटन यांच्यात देखील दिसून येते.

अशा महान संगणकतज्ञाची माहिती कृत्रिम बुद्धिमत्ता अभियांत्रिकी शिकणाऱ्या मुलांना नसावी, याचे खूपच आश्चर्य वाटून गेले. असे म्हणतात की, इंटरनेटमुळे जग जवळ आलेले आहे. क्षणाक्षणाची माहिती आणि अपडेट्स आपल्याला या माध्यमाद्वारे वेगाने मिळत असतात. जगातील सर्व प्रकारच्या माहितीचा साठा आणि स्त्रोत म्हणून इंटरनेटकडे बघता येते. यातून आपण कोणतीही गोष्ट शिकू शकतो. जगात काय चालले आहे, याची इत्यंभूत माहिती मिळवू शकतो. शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारेच तयार केले गेलेल्या चॅट-जीपीटी सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून सहज आणि सुलभतेने माहिती तयार देखील करू शकतो. असे असले तरी या सर्व साधनांचा वापर आपण योग्य दिशेने करत आहोत का? हाही प्रश्न  मला त्यादिवशी पडला. 

 


खरंतर इंटरनेट या माध्यमातून द्वारे पायरेटेड चित्रपट, संगीत, व्हिडिओज सहज उपलब्ध होत गेले. ऑनलाइन गेमिंगची सुरुवात झाली. अगणित गेम्स तयार झाले. हळूहळू ऑनलाईन गॅम्बलिंगचा देखील उदय झाला. सोशल मीडिया सारख्या माध्यमांद्वारे आपण जगात कुठेही संवाद साधू लागलो. आभासी जगाद्वारे जवळपास प्रत्येक व्यक्तीशी जोडले जाऊ लागलो. ही इंटरनेट या माध्यमाची दुसरी बाजू. ज्यामध्ये बहुतांश तरुणाई गुरफटलेली दिसते. अगदी अभियांत्रिकीचे विद्यार्थी जरी असले तरी इंटरनेटचा ते माहिती मिळवण्यासाठी किंवा अपडेटेड राहण्यासाठी कितपत वापर करतात, हाही मोठा प्रश्नच आहे. आज विविध संकेतस्थळावर इतक्या मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा आहे की कोणतेही कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या पदवीची आवश्यकता नाही. तरीदेखील इंटरनेटचा असा विधायक वापर तरुणाईकडून होताना दिसत नाही. बहुतांश लोकांना फक्त सध्या कुठली फॅशन चालू आहे? कोणता चित्रपट येणार आहे? इंस्टाग्राम वरील साठी कोणते गाणे ट्रेडिंग आहे? अशाच प्रकारच्या गोष्टींमध्ये जास्त रुची असते. आज इंटरनेट वापरणारी बहुतांश लोकसंख्या अशाच प्रकारची दिसून येईल. 

खरंतर इंटरनेटचा विधायक वापर करण्यासाठी नव्या पिढीला जागरूक करणे आणि प्रोत्साहित करणे देखील अतिशय महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर सातत्याने कमेंट करत बसणं, युट्युब शॉट्स, इंस्टाग्राम रिल्स यात स्वतःचा वेळ वाया घालवणे हे तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे दुष्परिणाम आहेत. आणि याबाबत युवा पिढीमध्ये जागृती निर्माण करण्याचा विडा कुणीतरी उचलायलाच हवा. 


— तुषार भ. कुटे


Tuesday, November 12, 2024

गोग्रामचा चितार

विज्ञान कादंबऱ्यांमध्ये विविध प्रकारचे विषय हाताळले जातात. परग्रहवासी हाही त्यातलाच एक विषय. आजवर बऱ्याच विज्ञान कथांमधून आपल्याला परग्रहवासी भेटलेले आहेत. बहुतांश वेळा अशा कथांमधून परग्रहवासीयांचा आणि पृथ्वीवासीयांचा संघर्ष पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतो. परग्रहावरील लोक आपल्या ग्रहावरील लोकांना त्रास देतात किंवा त्यांच्याकडे आपल्यापेक्षा मोठी अद्भुत शक्ती असते, ज्याच्या जोरावर ते आपल्यावर राज्य करू पाहतात. अशा कल्पनारम्य विज्ञान कादंबऱ्या आजवर वाचलेल्या होत्या.

परंतु कल्पना करा की पृथ्वीच्या जवळच्याच एका ग्रहावरील जीवसृष्टी आपल्यापेक्षा अधिक प्रगत झालेली आहे. त्यांना हेही माहित आहे की, आपल्या शेजारी जीवसृष्टी असलेला आणखी एक ग्रह नांदतो आहे. परंतु ते आपल्यावर आक्रमण करत नाहीत. आपल्याला जाणून घेतात. आपण आपल्या ग्रहाची काय अवस्था करून ठेवलेली आहे? याचे सखोल ज्ञान त्यांना असते. पृथ्वीवरील मनुष्यप्राणी नक्की पृथ्वीचा कसा सांभाळ की विनाश करतो आहे, याची देखील त्यांना इत्यंभूत माहिती आहे. एकंदरीत काय मनुष्य प्राण्याचा स्वभाव त्यांना पुरता कळलेला आहे. प्रगतीच्या मार्गावर असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते या विश्वामध्ये कोणताही विनाश करू शकतात, याची कल्पना त्यांना देखील आलेली आहे. म्हणजेच एका अर्थाने पृथ्वीवरच्या मनुष्य प्राण्याची प्रवृत्ती त्यांना खरोखरीच कळलेली आहे. उद्या पृथ्वीवासी आपल्यावर निश्चितच आक्रमण करून आपला ग्रह ताब्यात घेतील, याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच भविष्यात दिसणाऱ्या धोक्यावर उपाय म्हणून हे परग्रहवासी सूर्यमालेच्या बाहेरील ग्रह शोधायला लागतात. त्यांच्याकडील अद्ययावत तंत्रज्ञानाने इंटरस्टेलर स्पेसमध्ये त्यांचा शोध सुरू होतो. आणि अशातच त्यांचा संपर्क पृथ्वीवरील एका मानवाशी होतो….. ही कथा आहे नारायण धारप लिखित ‘गोग्रामचा चितार’ या कादंबरीची.

नारायण धारप हे नाव प्रामुख्याने भयकथांशी जोडलेले आहे. परंतु त्यांनी बऱ्याच विज्ञानकथा, कादंबऱ्या देखील लिहिलेल्या आहेत, याची माहिती कमी जणांना असेल. धारपांच्या विज्ञान कथा मालिकेतीलच ही कादंबरी ‘गोग्रॅमचा चितार’. पृथ्वीवरील विजय आणि मंगळावरील गोग्रॅम हे या कथेचे नायक. अचानकपणे एके दिवशी हा मंगळग्रहवासी पृथ्वीवासीयाला भेटतो आणि वेगवेगळ्या घटना घडत जातात. ज्या आपल्याला कथेशी शेवटपर्यंत बांधून ठेवतात. एका चित्रपटाप्रमाणे या कादंबरीचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात गोग्रॅमचे आगमन तर मध्यंतरानंतर उत्तरार्धात गोग्रॅमचे पुनरागमन आपल्याला वाचायला मिळते. खरी गोष्ट मध्यंतरानंतरच वेग घेते. त्यामुळे वाचताना संयम देखील बाळगायला लागतो. मागच्या शतकामध्ये धारपांनी लिहिलेल्या या कादंबरीमध्ये बऱ्याच सुंदर अशा कल्पना विज्ञानरुपी विस्तृतपणे मांडलेल्या दिसून येतात. बुध, शुक्र, मंगळ, शनी, गुरु अशा विविध ग्रहांची वर्णने देखील यामध्ये आहेत. हे ग्रह नक्की कसे आहेत? याची माहिती देखील आपल्याला होते. त्याकाळी त्यांनी लिहून ठेवलं होतं की, आणखी काही वर्षानंतर पृथ्वीवासीय मंगळावर स्वारी करतील. आणि तेच आज आपण अनुभवत आहोत.

खरंतर विज्ञानकथेच्या रूपाने ही एक बोधकथारूप कादंबरी आहे. त्यातून वरती सांगितल्याप्रमाणे मानवी स्वभावाचे दर्शन मंगळग्रहवासी आपल्याला करून देतात. 


— तुषार भ. कुटे

 


 


Thursday, November 7, 2024

सोहळा

न्यायालयाच्या वरात पन्नाशी गाठलेला चित्रपटाचा नायक गिरीश आणि त्याचे वकील यांच्यामध्ये संवाद सुरू आहे.
“जन्माची मिरवली पारखी दुःखाचा सोहळा केला. प्रेम मरतं तेव्हा त्याचं पिशाच्च होतं आणि ते मानगुटीवर बसतं प्रेमवीरांच्या. रस्ते बदलतात, माणसे बदलतात, लांब जातात पण पिशाच्च मात्र पाठ नाही सोडत!” 
“प्रेम बदलत नाही वकील साहेब, त्याचा फॉर्म बदलतो … सुटलो आम्ही यातून… दोषारोपांच्या फेऱ्यातून मोकळे झालो. कदाचित मोकळं होण्याकरताच ही भेट झाली..... सॉरी म्हणता आलं पाहिजे. आम्ही दोघांनी ते केलं. एकमेकांना सॉरी म्हटलं. पण वेळ चुकली. वेळेवर सॉरी म्हटलं पाहिजे…  लाईफ इज अ लर्निंग प्रोसेस वकील साहेब.
ओठातून फुटले नाही, शब्दांचा सोहळा केला. वेदनेतही लखलखत्या इश्काचा सोहळा केला.”
एकंदरीत चित्रपटाचा सारांश या संवादातून आपल्याला ध्यानात येतो. 
चित्रपट सुरू होतो तो भर पावसामध्ये आपल्या बायकोच्या घराचा पत्ता शोधणाऱ्या गिरीश पासून. त्याची बायको विद्या, शहरामध्ये राहत असते.  गिरीशने आणि तिने लग्नाच्या वेळेस गावाकडे एक जमीन घेतलेली असते. ती आपल्या नावावर व्हावी याकरता तो विद्याची स्वाक्षरी घेण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु विद्या त्याला नकार देते.  पण सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ती तयार होते व न्यायालयीन कामकाजाकरीता गिरीश बरोबर गावाकडे येते. येथून दोघांचाही भूतकाळ हळूहळू पडद्यावर दिसायला लागतो. दोघांचाही प्रेमविवाह झालेला असतो. परंतु त्यांच्यातील गैरसमजामुळे विवाहसंबंधांमध्ये दुरावा निर्माण व्हायला लागतो. पडद्यावर भूतकाळात घडलेल्या घटना दिसतात आणि हळूहळू एकेका प्रश्नाचे उत्तर मिळायला लागते. नात्यांमधील होणाऱ्या बदलांवर हा चित्रपट प्रामुख्याने प्रकाशझोत टाकतो. काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात जर त्या झाल्या नाही तर जीवनाची दिशाच बदलून जाते. हा सर्व घटनाक्रम दिग्दर्शकाने या चित्रपटाद्वारे पडद्यावर उत्तमरीत्या चित्रित केलेला आहे. तो आपल्याला भावनावश करून टाकतो. 
गजेंद्र अहिरे यांच्यासारख्या अनुभवी दिग्दर्शकाचा हा चित्रपट सर्वच आघाड्यांवर अगदी संगीतासह अतिशय उत्तम झालेला आहे. शिवाय सचिन पिळगावकर यांना गंभीर भूमिकेमध्ये पाहायला छान वाटते. शिल्पा तुळसकर, विक्रम गोखले आणि मोहन जोशी यांची कामे देखील सरस झाल्याचे दिसते. मराठी चित्रपटांचा गाभा असलेली आशयघनता या चित्रपटांमध्ये ठासून भरलेली आहे. 

--- तुषार भ. कुटे



Wednesday, November 6, 2024

मी आणि माझा बाप - व्यंकटेश माडगूळकर

पौर्वात्य साहित्य बऱ्याच मराठी लेखकांनी आपल्या भाषेमध्ये भाषांतरित केलेले आहे. आज-काल मूळ साहित्यापेक्षा भाषांतरित झालेली ललित पुस्तके मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये आलेली दिसतात. अर्थात मूळ पुस्तकाचा लोकप्रियता एन्कॅश करण्यासाठी ही पुस्तके तयार होत असावीत. ज्येष्ठ लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी ‘द लाफ्टर विथ माय फादर’ या कार्लो बुलोसान यांनी लिहिलेल्या कथासंग्रहाचा ‘मी आणि माझा बाप’ हा अनुवाद केलेला आहे.
कार्लो बुलोसान या फिलिपीनी लेखकाचा परिचय मराठी वाचकांना करून देण्यासाठी माडगूळकरांनी हा घाट घातल्याचा दिसतो. भारतामध्ये बाप आणि मुलाचे एक वेगळे नाते असते. मोकळीकता किंवा खट्याळता या नात्यांमध्ये अतिशय क्वचितच दिसून येते. त्याचे प्रमाण नगण्य म्हटले तरी चालेल. परंतु या पुस्तकातून विनोदी पद्धतीने लेखकाने बाप आणि मुलाचे नाते शब्दबद्ध केल्याचे दिसते. यातल्या कथा विनोदी आहेत. वेगवेगळ्या घटनांतून विनोदनिर्मिती करतात आणि आपल्याला हसवतात. विशेष म्हणजे माडगूळकरांनी कथेतील सर्व पात्रे आपल्या भाषेतीलच वापरलेली आहेत. त्यामुळे ती आपल्याशी अधिक जवळीक साधतात. या घटना आपल्याच प्रदेशात घडलेल्या आहेत, असं देखील वाटून जातं. कथांमधील गावरान विनोद, बेरकीपणा, खट्याळपणा आपलासा वाटतो. आणि केवळ एका बैठकीत म्हणजेच दीड ते दोन तासातच तुम्ही हे पुस्तक सहजपणे वाचवून संपवू शकता.

--- तुषार भ. कुटे


 

राजवाडे अँड सन्स

काही वर्षांपूर्वीच राजवाडे अँड सन्स या चित्रपटाबद्दल ऐकलं आणि वाचलं होतं. अखेरीस तो पाहण्याचा योग आला. अतिशय नावाजलेले कलाकार तसेच उत्तम दिग्दर्शक यामुळे कोणताही मराठी रसिक हा चित्रपट पाहिल्याशिवाय सोडणार नाही.
राजवाडे म्हणजे पुणे शहरातील बडे प्रस्थ अर्थात मोठे व्यावसायिक. त्यांच्या घरातील सर्वच जण अगदी जावई आणि नातवांपर्यंत सर्वच कौटुंबिक व्यवसायामध्ये कार्यरत असतात. नवीन पिढी मात्र त्यांचा मार्ग शोधत असते. त्यांना पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या व्यवसायामध्ये काडीचाही रस नसतो. परंतु घरातील सर्वात ज्येष्ठ असणाऱ्या आजोबांपुढे बोलण्याची कुणाची हिंमत नसते. काहींना तर स्वतःचे वेगळे घर देखील हवे असते. परंतु राजवाड्यांनी एकत्रित एकाच घरात राहावे, असा आजोबांचा आदेश असतो. तिसरी पिढी एका अर्थाने बंडाच्या पवित्र्यात असते. परंतु हिंमत कोणाचीच होत नाही. अचानक एक दिवस एका नव्या पात्राची एन्ट्री होते आणि इथून पुढे गोष्टी बदलायला लागतात.
एकाच कुटुंबामध्ये राहणाऱ्या चार वेगवेगळ्या कुटुंबांची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. कथा उत्तमच आणि त्याची मांडणी देखील तितकीच प्रभावी. वेगवेगळ्या पिढ्यांचे विचार दिग्दर्शकाने छान पद्धतीने मांडलेले आहेत. अनेक जण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांशी त्यांचा मेळ घालू शकतात.

--- तुषार भ. कुटे 



Monday, November 4, 2024

कार्तिकनची प्रतिज्ञा

मागील दशकभरामध्ये पुरातन काळातील घटनांची सांगड घालून आधुनिक काळातील घटनांसोबत मिलाफ दाखविलेल्या काही मराठी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. आजही बहुतांश नवोदित मराठी लेखक अशा अद्भुतरम्य रहस्यमय कादंबऱ्या लिहीत आहेत. त्यातीलच ही एक संकल्प अभ्यंकर लिखित 'कार्तिकनची प्रतिज्ञा'.
ही गोष्ट सहा हजार वर्षांपूर्वीची आहे. नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेल्या कार्तिकनचा अद्ययावत शिक्षण घेण्यासाठीचा प्रवास तक्षशिलाच्या दिशेने सुरू होतो. तत्पूर्वी त्याच्या गावावर राक्षसांनी हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये त्याचे सर्वच नातेवाईक मृत्युमुखी पडलेले आहेत. अशा परिस्थितीत कार्तिकन राक्षसांना संपविण्याची प्रतिज्ञा करतो आणि इथून पुढे या कथेची खरी वाटचाल सुरू होते. मजल दरमजल करीत तो तक्षशिला नगरीमध्ये पोहोचतो. तिथे त्याची ओळख या शिक्षणनगरीतील अनेक आचार्यांशी होते. त्यांचे संवाद अतिशय सुंदररित्या लेखकाने लिहिलेले आहेत. जणूकाही ही गोष्ट आपल्यासमोरच घडते आहे असा भास होतो.
कादंबरीची कथा घडत असताना समांतरपणे आधुनिक काळातील एक घटना देखील घडताना दाखवलेली आहे. ज्यामध्ये दोन गिर्यारोहक राज आणि राजलक्ष्मी हे हिमालयातील एका पर्वतावर आपल्या अन्य सवंगड्यांसह गिर्यारोहणाला जात असतात. यात देखील एक रहस्य दडलेले असते. त्याचा भेद या पुस्तकामध्ये अजूनही पूर्णपणे केलेला नाही. कदाचित पुढच्या भागांमध्ये तो होऊ शकेल. परंतु एकंदरीत कथेची मांडणी पाहता लेखकाने पुढच्या भागातील कथेसाठी उत्सुकता वाढवली आहे, हे मात्र निश्चित.


 

Sunday, November 3, 2024

पैसा पैसा

ना कोणी दुष्ट येथे
ना दोष ना कुणाचा
चालतो जीवनी हा
खेळ हा प्राक्तनाचा
चूक एकास वाटे
योग्य वाटे कुणाला
विष कोणास वाटे
औषधी ते दुचाला

सहज मिळू शकतं ना कुणाला काही
सतत लढत भिडूंनी नशीब तो पाही
हे युद्ध असे जगण्याचे
अन प्रेमाच्या नात्यांचे
मग अक्षम्य होईल असे ते
अवघडही वाट असे
हसरे पाऊल एखादे
वेळ कधी सांगून नाही कोणाला
समजून घे ना
तू धरशी एक मनी
असेल ते दुसरे काही
सत्याच्या अन असत्याच्या पलीकडले
समजून घेना
खेळ हा सारा नियतीचा… कळसुत्री जगण्याचा

ना कोणी दुष्ट येथे
ना दोष ना कुणाचा
चालतो जीवनी हा
खेळ हा प्राक्तनाचा


चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगामध्ये चित्रपटातील सर्व पात्रे अवतरतात आणि गाण्यांची हे बोल आपल्याला एकंदरीत चित्रपटाच्या सार देखील सांगून जातात. हा चित्रपट आहे सण 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'पैसा पैसा'.

एका मुलाखतीच्या निमित्ताने मुंबईचा राजीव नागपूरला येतो. आणि एका विचित्र प्रसंगांमध्ये अडकतो. एक रिक्षावाला त्याचे अपहरण करून त्याच्याकडे केवळ दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करतो. अर्थात त्यावेळी राजीव कडे इतके पैसे नसतात. तू लगेचच आपल्या प्रेयसीला फोन करून पैशांची मागणी करतो. ती यामध्ये काडीचाही रस दाखवत नाही. आणि आपला फोन बंद करून टाकते. आणि अखेरीस राजीव आपल्या सर्वात जवळच्या मित्राला अर्थात अजयला फोन लावतो आणि नागपुरामध्ये घडलेली सर्व माहिती देतो. अजय मात्र आपल्या संसाराला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. पण तरीदेखील तो संकटात सापडलेल्या आपल्या मित्राच्या हाकेला धावून जातो.. बँक बंद होण्याच्या आधी त्याला दहा हजार रुपये आपल्या मित्राच्या खात्यामध्ये जमा करायचे असतात. इकडे नागपूर मध्ये अपहरण करता राजीवला एका अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवतो आणि सातत्याने लवकरात लवकर पैशाची सोय करण्यासाठी सांगत असतो. अजयच्या स्वतःच्या खात्यात मात्र फारसे पैसे नसतात. परंतु मित्राला पेज प्रसंगातून सोडवण्यासाठी तो लगोलग कामाला लागतो. त्याच्या नातेवाईकांच्या मित्रांच्या आणि अन्य ओळखीच्या लोकांना तो भेटतो. अगदी काही हजारांमध्ये पैशांची जुळवा जुळवा होते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या व्यक्ती पैसा म्हटलं की कशा पद्धतीने टाळाटाळ करू शकतात याची प्रचिती अजयला येते.. मित्राला काही करून सोडवायचेच असा निर्धार करत तो दारोदार हिंडत असतो. कसेबसे करून पैशांची जुळवाजुळव होते. परंतु हे पैसे राजीवला भेटतात का? हे चित्रपटात पाहणे सोयीस्कर ठरेल.

हा चित्रपट एक इमोशनल थ्रिलर या प्रकारातला आहे. दिग्दर्शकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाची संबंधित व्यवहारांना केंद्रस्थानी ठेवून ही उत्तम कथा रचल्याचे दिसते. आणि ती छानपैकी फुलवली देखील आहे. प्रत्येक प्रसंगांमध्ये आपण गुंतून राहतो. यात अजय, राजीव सह अपहरण कर्त्याची देखील एक वेगळी गोष्ट आहे. ती मात्र मनाला चटका लावून जाते. योग्य काय अयोग्य काय? या प्रश्नाचे उत्तर देखील आपण शोधू लागतो. चित्रपटांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, पण कथेचा जो गाभा आहे तो मात्र मनाला भावतो. किमान एकदा तरी हा चित्रपट पहावा असाच आहे. 


ओटीटी:  अमेझॉन प्राईम आणि युट्युब


--- तुषार भ. कुटे


 

Monday, October 28, 2024

२१ व्या शतकासाठी २१ धडे - युवाल नोआ हरारी

मागच्या प्रत्येक शतकानुरूप माणसाने प्रगतीची द्वारे खुली केलेली आहेत. आपले जीवन सहज आणि सुकर होण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब केलेला आहे. तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे. त्याचा उपयोग आणि दुरुपयोग देखील केलेला आहे. परंतु आत्ताच्या अर्थात एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य प्रगतीसाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा? या प्रश्नाचे उत्तर युवाल नोआ हरारी या पुस्तकातून देतात.

हरारी यांचे इतिहासावर टिप्पणी करणारे ‘सेपियन्स’ तर भविष्याचा वेध घेणारे ‘होमो डेअस’ हे पुस्तक यापूर्वी वाचले होते. परंतु २१व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक वर्तमानाचा आणि त्यातून भविष्याकडे जाण्याचा वेध घेणारे आहे. 

मानवी जीवनशैली सातत्याने बदलत चाललेली आहे. अर्थात यामध्ये पर्यावरण अथवा वातावरणाचा फारसा प्रभाव नाही. मानवच मानवी शैलीवर प्रामुख्याने प्रभाव टाकताना दिसतो. याच कारणास्तव होणारे सामाजिक बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. तरच मनुष्य म्हणून आपण या पृथ्वीवर टिकून राहू शकतो. असं म्हणतात की बदल ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी कधीही बदलत नाही! २१ व्या शतकामध्ये आपण कोणत्या गोष्टी निश्चितपणे ध्यानात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून मनुष्यप्राणी निदान हे शतक तरी तग धरून शकेल. याचा सारासार विचार हरारी यांनी या पुस्तकातून केल्याचा दिसतो.

पुस्तकाचे प्रामुख्याने पाच भाग आहेत. यातील पहिल्या भागात तंत्रज्ञानाचे आव्हान, दुसऱ्यामध्ये राजकीय आव्हान तिसऱ्यामध्ये आशा-निराशा, चौथ्या मध्ये सत्य आणि पाचव्यामध्ये लवचिकता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्याचा दिसतो. तंत्रज्ञानाचे आव्हान हे पहिल्याच भागामध्ये घेतल्याने त्याचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच मानवी जीवनशैली आणि सामाजिक रचना सातत्याने बदलत आहेत. या शतकात तिचा वेग वाढल्याचे दिसते. हरारी यांनी इतिहासातून बोध घेऊन पुढील वाटचालीतील धोके अतिशय सुयोग्य पद्धतीने नमूद केल्याचे दिसते. अर्थात ललित लेखन नसले तरी ही एक बोधकथा आहे. तंत्रज्ञान माणसाला रसातळाला कसे नेऊ शकते? हे आपल्याला समजते. परंतु याबरोबरच राष्ट्रवाद, धर्मांधता आणि स्थलांतर या गोष्टींवर देखील हरारी प्रकाश टाकतात. राष्ट्रे निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवृत्ती वाढत गेल्या. धर्माने मानवी जीवनात कट्टरता आणली. आणि स्थलांतरांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. अर्थात या गोष्टी पुढे बदलत जाणार आहेत. त्या दृष्टीने सावध पावले कशी टाकावीत, याचे उत्तर देखील हरारी देतात.

दहशतवाद, युद्ध यावर त्यांनी परखड मते मांडलेली आहेत. दोन्हीही हिंसक गोष्टी तंत्रज्ञानाच्या तालावर जगात वेगाने पसरताना दिसतात. मानवी प्रगतीतील तो सर्वात मोठा अडथळा आहे. त्याच्या इतिहासातून बोध घेऊन आपल्याला कोणती पावले टाकता येतील, याचे उत्तरही देखील या पुस्तकातून मिळते.

पुस्तकाच्या चौथ्या भागात अर्थात ‘सत्य’मध्ये हरारी यांनी अज्ञान, न्याय, सत्योत्तर काळ आणि विज्ञानकथा या विषयांवर आपल्याशी चर्चा केल्याचे दिसते. मागच्या शेकडो वर्षांपासून यामध्ये सातत्याने बदल झालेला आहे. मागच्या शतकातील ज्ञान, न्याय, विज्ञान हे पूर्ण वेगळं होतं आणि एकविसाव्या शतकामध्ये ते अजून निराळे आहे. हा बदल कसा स्वीकारावा, याची चर्चा हरारी या पुस्तकामध्ये करतात.

अंतिम भागामध्ये अर्थात ‘लवचिकता’ या प्रभागात शिक्षण, आयुष्याचा अर्थ आणि ध्यानधारणा या तीन गोष्टींवर हरारी विश्लेषण करतात. जीवनाचा एक  मुख्य भाग म्हणून याकडे पाहता येईल. ज्याची प्रत्येक मनुष्यप्राण्याला नितांत आवश्यकता आहे. तात्विकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने जमवून घ्यायला हव्यात अशा विविध प्रश्नांची उत्तरे हरारी या पुस्तकातून देतात. 

याही पुस्तकामध्ये असे अनेक विचार आहेत ते सुविचार म्हणून लिहून ठेवता येतील. परंतु पुस्तक वाचण्याच्या प्रवाहामध्ये त्याची परिणामकारकता अधिक जाणवते, हेही तितकेच खरे.



Thursday, October 24, 2024

रेवन रॉय - समर

मराठीमध्ये आजवर अनेक विज्ञानकथालेखकांनी वेगवेगळे प्रयोग केले. यातूनच विज्ञानातील विविध संकल्पना मराठी वाचकांना समजायला लागल्या. परंतु पॅरलल युनिव्हर्स अर्थात समांतर विश्व ही संकल्पना पहिल्यांदाच समर लिखित रेवन रॉय या कादंबरीतून मराठीमध्ये दिसून आली.
आपल्या विश्वाच्या समांतर देखील असेच आणखी एक विश्व आहे, ज्यात आपल्यासारखीच माणसे राहतात. बहुतांश वेळा ती आपल्याला स्वप्नातून देखील भेटतात, ही संकल्पना म्हणजे पॅरलल युनिव्हर्स होय. अर्थात याला पूर्ण वैज्ञानिक आधार नाही, परंतु सायन्स फिक्शनचा विचार केला तर यातून पाश्चिमात्य लेखकांनी बरंच लेखन केलेले आहे. तसं पाहिलं तर संकल्पना समजायला अवघडच. म्हणून कथा रूपात  आणण्यासाठी लेखकाचे लेखनकौशल्य देखील पणाला लागते. हे शिवधनुष्य उचलून लेखकाने रेवन रॉय या कादंबरीद्वारे चांगला प्रयत्न केला आहे.
रेवन रॉय नावाच्या निराशावादी मानसशास्त्रज्ञाची ही गोष्ट. त्याच्यासोबत त्याचे आणखी सात सहकारी आहेत. आपल्या विश्वाला संपवण्यासाठी तो सर्वदूर असलेले चैतन्य संपवायला सुरुवात करतो. यातूनच समांतर विश्वातील दुसरा रेवन रॉय देखील समोर येतो. अशी पार्श्वभूमी असणारी ही कथा. अनेकदा ती किचकट वाटते. शिवाय एक घटना आपल्या विश्वात तर दुसरी समांतर विश्वामध्ये घडते, तेव्हा वाचक काहीसा गोंधळून जातो. अर्थात यामध्ये वाचकाची एकाग्रता असणे अधिक महत्त्वाचे वाटते. कथेची मांडणी आणि वेग चांगला आहे. अर्थात तो अधिक उत्तम असू शकला असता. परंतु यानिमित्ताने का होईना समांतर विश्वाची गोष्ट मराठी वाचकांना समजेल, अशी आशा वाटते.


 

Wednesday, October 23, 2024

खेळ मांडला

मराठीमध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून शोकपटांची परंपरा आहे. अर्थात अशा चित्रपटांना प्रेक्षकवर्ग देखील चांगला लाभलेला दिसतो. “खेळ मांडला” हा चित्रपट देखील अशाच प्रकारचा.
बाहुल्यांचा खेळ करणारा दासू आपल्या वडिलांसह पोट भरण्यासाठी शहरामध्ये येतो. परंतु शहरात आल्यानंतर देखील त्याचा संघर्ष चालूच असतो. एके दिवशी अचानक अपघातामध्ये त्याचे वडील स्वर्गवासी होतात. अशातच त्या शहरामध्ये दंगल पेटते. त्याच दंगलीमध्ये त्याला एक तान्हे बाळ सापडते. तो त्या बाळाच्या माता पितांच्या शोधार्थ भटकत राहतो. परंतु त्याला त्याचे माता-पिता काही सापडत नाहीत. म्हणून तो त्या बाळाचा अर्थात छोट्या मुलीचा स्वतःच सांभाळ करायला लागतो. परंतु कालांतराने त्याला समजते की, ती मुलगी अंध आणि बहिरी देखील आहे आणि याच कारणास्तव तिला काही बोलता देखील येणार नाही. अशा मुलीचा सांभाळ करणे म्हणजे महाकठीण काम. परंतु हे शिवधनुष्य तो पेलतो. तिचे नामकरण ‘बाहुली’ असे करतो. आणि त्याच्या अन्य निर्जीव बाहूल्याप्रमाणे हिला देखील आपल्या खेळात सामील करून घेतो. हळूहळू ही सजीव बाहूली देखील निर्जीव बाहूल्याप्रमाणे खेळ खेळायला लागते. परंतु नियती मात्र त्याच्याशी वेगळाच खेळ खेळत असते. ही मुलगी नक्की कोणाची? तीला तीचे आई-वडील परत मिळतात का? आणि मिळाले तरी ती दासूला सोडते का? या प्रश्नांचे उत्तर हा चित्रपट उत्तरार्धात देतो.
सारांश सांगायचा तर शोकपटांच्या मालिकेतला हा दुःखातिवेग दर्शवणारा चित्रपट आहे. असे चित्रपट नियमित बघणाऱ्यांना तो आवडेलच. मंगेश देसाईने दासूच्या भूमिकेमध्ये आपले प्राण ओतल्याचे दिसते. परंतु केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहणाऱ्यांसाठी या चित्रपटात विशेष वाटणार नाही, हे नक्की.

--- तुषार भ. कुटे


 

झांबळ

‘घनदाट माणसांचं भाव विश्व उलगडणार्‍या कथा’ अशी टॅगलाईन असणारा “झांबळ” हे पुस्तक वाचायला सुरुवात केली.. पहिली कथा संपली आणि तिने मनात घर केले. मग काय लगेचच बाकीच्याही कथा वाचून काढल्या.

असं बऱ्याचदा होतं की कोणत्याही कथासंग्रहातील एखादी कथा वाचली की पुढच्याही कथा वाचाव्याशा वाटतात. खरंतर ही लेखकाच्या लेखनाची किमया आहे. आपल्या शब्दांनी तो वाचकाला खिळवून ठेवतो, प्रसंगांमध्ये गुंतवून ठेवतो. कथेतील प्रत्येक प्रसंग, घटना आपल्यासमोर उभी राहते. जणू काही ती आपल्यासमोरच किंवा आपल्या भोवतालीच घडत आहे, असं जाणवत राहतं. या पुस्तकाच्या बाबतीतही माझं असंच काहीतरी झालं.

या कथासंग्रहातील कथांना पूर्णतया ग्रामीण पार्श्वभूमी आहे. त्यातील प्रसंग गावच्या मातीत घडलेले आहेत. यात निरनिराळ्या प्रकारची माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्या मानसिक भावभावनांचे दर्शन होते. गावाकडील मातीत जन्मलेल्या, रुजलेल्या आणि रुळलेल्या कोणालाही या कथा सहज भावतील. किंबहुना त्यातील अनेक प्रसंग त्यांनी अनुभवलेले देखील असतील. याच कारणास्तव त्या आपल्याला अधिक जवळच्या वाटतात. आपल्या भोवतालच्या अनेकविध माणसांचा आपण त्यांच्याशी संबंध जुळवू शकतो. बहुतांश कथा आपल्या काळजालाच हात घालतात. एकंदरीत लेखकाची लेखनशैली ही अतिशय उच्च दर्जाची जाणवते. यापूर्वी मला केवळ आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर आणि वि. वा. शिरवाडकर यांच्याच कथांमध्ये अशी शैली अनुभवता आली होती. समीर गायकवाड यांची शैली देखील याच पठडीतील आहे. कोणत्याही प्रसंगांचे किंवा व्यक्तीचे वर्णन करताना अतिशय सुयोग्य आणि चपखल शब्द ते वापरतात. जेणेकरून तो मनुष्य आपल्या डोळ्यासमोरच उभा राहतो. एकदा त्याची प्रतिमा तयार झाली की प्रसंग देखील आपल्या मनात तयार व्हायला लागतात.

यातील प्रत्येक कथेची एक कादंबरी होण्यासारखी आहे. अर्थात यात वेगाने घडणाऱ्या घटना आहेत, प्रसंग आहेत आणि आपल्याला मिळणारा बोध देखील आहे! एकाच पुस्तकामध्ये २२ कादंबऱ्या वाचण्याचा योग आपल्याला अनुभवता येतो! ‘हायवे’ ही कथा भयकथा या प्रकारात मोडू शकते. अन्य सर्व सामाजिक आणि ग्रामीण कथा आहेत. 

कथा संपते तेव्हा मनाला काहीशी हुरहुर देखील ती लावून जाते. यातच लेखकाच्या लेखणीचे आणि लेखनशैलीचे खरे यश आहे.



Tuesday, October 22, 2024

अतुल कहाते यांची मुलाखत

मराठी भाषेतून तंत्रज्ञान विषयावर लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक नाव म्हणजे अतुल कहाते होय. त्यांनी जवळपास ७६ पुस्तके लिहिलेली आहेत. अशा बहुआयामी लेखकाची मुलाखत घेण्याचे काम बुकविश्वच्या टीमने माझ्यावर सोपवले होते. खरंतर हा माझा पहिलाच प्रयत्न होता. अर्थात यामुळे मनावर दडपण तर होतेच. परंतु, कहाते सरांची मागच्या दोन वर्षांपासून माझी ओळख होती. आमच्यामध्ये सातत्याने विचारांची देवाणघेवाण व्हायची. याच कारणास्तव मुलाखतीमध्ये मी त्यांच्याशी सहजपणे संवाद साधू शकलो. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सरांचे बहुमोल ज्ञान वाचकांना आणि श्रोत्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो, याचा आनंद आहे. 

AI चा इतिहास, त्याची प्रगती, त्याचा आवाका, त्याचे उपयोग, आव्हानं, संधी या सगळ्यांवर भाष्यं करुन लोकांना AI ची ओळख करुन अतुल कहाते यांनी या मुलाखतीतून करून दिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधल्या एक्स्पर्ट सिस्टिम्स, रोबॉटिक्स, नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग, मशीन आणि डीप लर्निंग अशा अनेक तंत्रज्ञानाचा इतिहास, मूलतत्व, उपयोग आणि भविष्यवेध !  तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर-संबंध, यंत्रमानवांनी भारलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांचा वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध कहाते सरांनी या मुलाखतीतून घेतला आहे. 


नक्की ऐका आणि बुकविश्वला सबस्क्राईब करा: https://youtu.be/uRUVSi14Ysg


#interview #atulkahate #artificialintelligence #marathi #technology #machinelearning #bookvishwa

 


 


Saturday, October 19, 2024

बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या डॉ. मारिया मॉन्टेसरी

मानवी प्रगतीसाठी अत्यावश्यक असलेल्या मूलभूत घटक म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाने माणूस शहाणा बनतो, प्रगल्भ होतो. म्हणून सुयोग्य शिक्षण घेणे हा मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या इतिहासामध्ये आजवर अनेक शिक्षणातज्ञांनी शिकवण्यासाठी नवनवीन पद्धती विकसित केल्या. वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे बालशिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप नवनवे बदल होत गेले, नवीन विचार आत्मसात होत गेले आणि त्यातूनच मानवी प्रगतीची द्वारे उघडत गेली. अशाच शिक्षण पद्धतीच्या विकासामध्ये अर्ध्वयू असणारे नाव म्हणजे ‘मारिया मॉन्टेसरी’ होय.
आजकाल सर्वत्र माजलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या स्तोमामध्ये मॉन्टेसरी पद्धतीच्या शाळा देखील वाढलेल्या दिसतात. याच मॉन्टेसरी पद्धतीच्या प्रणेत्या म्हणजे डॉ. मारिया मॉन्टेसरी होय. मागच्या शतकामध्ये त्यांनी शिक्षणाच्या एका नव्या पद्धतीचा पाया रचला. माणसाच्या शिक्षणाची सुरुवात जिथून होते त्या बालशिक्षणात नव्या संकल्पनांचा अंतर्भाव मॉन्टेसरी यांनी केला. याच मारीया मॉन्टेसरी यांची गोष्ट सांगणारे हे पुस्तक ‘बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या डॉ. मारिया मॉन्टेसरी’.
भारताप्रमाणेच युरोपातीलही बहुतांश देशांमध्ये शतकभरापूर्वी शिक्षणाची आणि विशेषत: महिला शिक्षणाची परिस्थिती फारशी बरी नव्हती. एक विशिष्ट साचेबद्ध शिक्षण मुलांना दिले जायचे. यात मुलांच्या आवडीचा त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यास प्राथमिकता नव्हती. परंतु मॉन्टेसरी यांनी आपल्या अनुभवातून शिक्षणाचा नवा विचार रुजवला. शिकणे म्हणजे काय हे मारिया मॉन्टेसरी यांना व्यवस्थित समजले होते.  जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असते तेव्हा आपल्या मेंदूचा, क्रियांचा सुयोग्य वापर केला गेला पाहिजे.  याच दृष्टिकोनातून त्यांनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धत विकसित केली.
मॉन्टेसरी या मूळच्या इटली मधल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अनुभवातून नवी साधने निर्माण केली. आणि यातूनच बालशिक्षण देण्यासाठी नवी पद्धती नावारूपास आणली. हळूहळू तिची उपयुक्तता लक्षात आल्याने इटलीबाहेर देखील तिचा प्रसार व्हायला लागला. संपूर्ण युरोपातून मॉन्टेसरी यांची मागणी वाढली. आणि लवकरच अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा शिरकाव झाला. बहुतांश शाळांनी या पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली. मॉन्टेसरी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना त्या स्वतः प्रशिक्षित करत असत. म्हणूनच त्यांचे जगभरात बहुतांश देशांमध्ये दौरे देखील झाले. विशेष म्हणजे भारताला देखील त्यांचा नऊ-दहा वर्षांचा सहवास लाभलेला आहे. या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. कोल्हापुरात त्यांनी मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू केली होती जी आजतागायत चालू आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांचे तीन वेळात नोबेल साठी नामांकन देखील झाले होते. त्यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा हा गौरवच मानायला हवा.
आज भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये चाललेला खेळखंडोबा पाहता शिक्षण हे शिक्षण न राहता फक्त आणि फक्त पैसा कमविण्याचे मोठे साधन बनलेले आहे. आपण खरोखर शिक्षणापासून दूर जात आहोत. केवळ मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी शिक्षण घेतले जाते. अर्थात बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हाच असतो. परंतु प्रयोग, ज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाचा पाया ज्या मॉन्टेसरींनी रचला त्या अजूनही अनेकांना समजलेल्या नाहीत. कदाचित या पुस्तकाचा त्यांना उपयोग होऊ शकेल.

--- तुषार भ. कुटे.