आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा गूढतेच्या दृष्टिकोनातून विचार केला की गुढकथा तयार होते. रत्नाकर मतकरी यांच्या कथेमध्ये गुढकथेचा हा सारासार विचार अतिशय प्रकर्षाने समोर येतो. निरनिराळे विषय घेऊन त्यातील घटनांमध्ये रहस्यमयता तयार करण्याची शैली केवळ मतकरींच्या लेखनामध्ये आहे, असे दिसते. “गहिरे पाणी” हा कथासंग्रह देखील रत्नाकर मतकरींच्या या शैलीची वाट जोपासणारा दिसतो. सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी अल्फा मराठी या पहिल्या खाजगी मराठी वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या “गहिरे पाणी” या चित्रमालिकेच्या कथांचा हा संग्रह होय. यातून लेखकाच्या कल्पनाशक्तीचा अद्वितीय अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक कथा एका वेगळ्या विषयाशी जोडलेली आहे. ती वाचायला सुरुवात केल्यानंतर शेवट केल्याशिवाय थांबवत नाही. मतकरींच्या कथांचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणता येईल. जवळपास प्रत्येक कथा ‘वाचनीय’ या प्रकारामध्ये मोडते. विशेष म्हणजे या कथांची चित्रमालिका देखील युट्युबवर उपलब्ध आहे. अशा सर्व कथांचा या संग्रहामध्ये समावेश नाही. परंतु या कथा वाचताना त्यातील चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभे राहते. काही कथा मतकरींच्या अन्य कथासंग्रहामध्ये देखील आहेत. तरीदेखील त्या वाचताना पुन्हा नव्याने काहीतरी वाचण्याचा आनंद देऊन जातात.
#BookReview #Book2024 #RatnakarMatkari