काळ अर्थात टाईम म्हणजे विज्ञानाला अजूनही सखोलपणे न समजलेली गोष्ट.
आम्हाला वेळ कळते, असं म्हणणारी माणसं देखील काळाबद्दल अनेक प्रश्नांची
उत्तरे देऊ शकत नाहीत. याच काळावर आधारित लेखक बाळ फोंडके यांनी लिहिलेले
आणि नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले हे पुस्तक, “काळाच्या संदर्भात”.
बाळ
फोंडके म्हणतात, काळाला सुरुवात व शेवटही नाही याची जाणीव होते तेव्हा तो
गूढ, अतिवास्तववादी रूप धारण करतो. तो शाश्वत आहे. तो उलट्या दिशेने
प्रवाहित होऊ शकणार नाही, यासाठी गणितशास्त्त्राप्रमाणे जरी काही कारण नसलं
तरी त्याचा प्रवाह एकाच दिशेने भूतकाळातून भविष्याकडे आहे. ही विवेक
शून्यता कमी होती म्हणून की काय अल्बर्ट आईन्स्टाईनने अधिकृतपणे जाहीर केलं
की काळ ही अशी चौथी मिती आहे. ज्यात विश्वाचं अस्तित्व आहे जी स्थळापासून
विभक्त होऊ शकत नाही. शिवाय काळ स्वायत्त नसतो, पण तो निरीक्षकाच्या संदर्भ
चौकटीवर अवलंबून असतो.
विश्वामध्ये बिग बँगपासून काळाची सुरुवात झाली
असं म्हणतात. याच कारणास्तव जीवसृष्टी एका सुसूत्रतेमध्ये बांधलेली दिसते.
आपण आपल्यापुरता लोकल टाईमचा विचार करतो. परंतु टाईम ही संज्ञा
विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय सखोल अभ्यास करण्यासारखी आहे. माणसाने आपल्या
सोयीसाठी कालगणना तयार केली. परंतु ती तयार करत असताना त्याला अनेक
अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय अनेक गणित मांडावी लागली. त्यातील
अचूकता टिकून राहावी म्हणून बऱ्याच उपाययोजनाही करावे लागल्या. यामुळे
काळामध्ये अनेक अगम्य वैशिष्ट्ये तयार झालेली दिसतात. या सर्वांचा आढावा
बाळ फोंडके यांनी या पुस्तकातून घेतलेला आहे. काल विभाजन कसे केले जाते?
लीप वर्ष, लीप सेकंद म्हणजे काय? सेकंद, दिवस, रात्र नक्की काय असतात? अधिक
महिना म्हणजे काय? दशमान वेळ, आठवडा, दिनदर्शिका, घड्याळ, सूर्यतबकड्या,
पाणघड्याळ यांचा काळाशी नक्की काय संदर्भ आहे? काळाच्या विषयी आईन्स्टाईन
तसेच स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञांचे नक्की काय म्हणणे होते?
क्वार्टझ घड्याळ, आण्विक घड्याळ नक्की कशी बनवली जातात? चौथी मिती आणि
गुरुत्वाकर्षण यांचा काय संबंध आहे? भूत आणि भविष्य सापेक्ष आहेत का?
कालबाण, जीवाश्म, रेडिओकार्बन, कालक्षेत्र यांचा नक्की अर्थ काय? जेट लॅग
काय असतो? सहस्त्रक म्हणजे नक्की काय? अशा ५० हून अधिक प्रश्नांची उत्तरे
या पुस्तकाद्वारे आपल्याला मिळतात. त्यामुळेच काळाचा एकंदरीत विस्तृत आवाका
ध्यानात यायला देखील मदत होते. काही गोष्टी आपल्या कल्पनेच्या पलीकडील
आहेत. परंतु त्या सुटसुटीतपणे लेखकाने या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत.
विशेष म्हणजे त्या सर्व गोष्टी रूप आहेत. विक्रम आणि वेताळ यांच्या गोष्टी
आपल्याला माहीतच आहेत. याच विक्रम-वेताळाच्या प्रश्नोत्तरांच्या गोष्टींशी
सांगड घालून लेखकाने हे पुस्तक लिहिलेले आहे. वेताळ प्रश्न विचारतो आणि
विक्रम त्याची ससंदर्भ आणि शास्त्रीय उत्तरे देतो. अशा प्रकारची या
पुस्तकाची रचना आहे. हे गोष्टी रूप विज्ञान ऐकताना आपली उत्सुकता टिकून
राहते आणि वाचायला देखील आनंद मिळतो.
मूळ इंग्रजीत असणारे हे पुस्तक सुहासिनी अग्निहोत्री यांनी मराठीमध्ये भाषांतरित केलेले आहे.
Friday, April 19, 2024
काळाच्या संदर्भात
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com