Sunday, May 19, 2024

स्टॅटिस्टिक्स

स्टॅटिस्टिक्स अर्थात सांख्यिकी म्हणजेच संख्याशास्त्राचा अभ्यासक्रमामध्ये शालेय जीवनात अथवा महाविद्यालयीन जीवनामध्ये माझा कधीही संबंध आला नाही. जवळपास १० ते १२ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मशीन लर्निंग शिकायला आणि शिकवायला सुरुवात केली तेव्हा संख्याशास्त्राची खऱ्या अर्थाने मला स्वतःला गरज भासू लागली. स्टॅटिस्टिक्स हे केवळ नावच ऐकले होते आणि असेही ऐकून होतो की ती गणिताचीच एक शाखा आहे. आज दशकभरामध्ये या विषयातील सर्व संकल्पना नक्की काय आहेत? त्यांचा व्यवहारिक जीवनामध्ये काय उपयोग होतो? याची व्यवस्थित माहिती झाली आहे
कदाचित डेटा सायन्स या विषयाला हात घातल्यामुळे संख्याशास्त्र कोळून प्यायची सवय झालेली आहे. डेटा सायन्स मुळेच संख्याशास्त्राचीही मला ओळख झाली. गणिताचाच एक भाग वाटत असला तरी व्यवहारिक पद्धतीने संख्यांचा उपयोग कशा पद्धतीने होतो हे संख्याशास्त्र आपल्याला सांगते. इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या साधनांचा वापर करून, इंग्रजी पुस्तके वाचून तसेच विविध लेखकांनी लिहिलेले ब्लॉग वाचून मी संख्याशास्त्र शिकत गेलो आणि याच कारणास्तव डेटा सायन्स अधिक उत्तमरीत्या समजायला लागले. गणित तसं पाहिलं तर अवघड नाही परंतु त्याचा व्यवहारीक उपयोग लक्षात आला तरच ते ध्यानात राहते हे समजले. गणितापेक्षा संख्याशास्त्र अधिक सुलभ आहे. या विषयावर आधारित माझ्या पाहण्यात तरी एकही मराठी पुस्तक उपलब्ध नव्हते.
अच्युत गोडबोले आणि डॉ. अमिता धर्माधिकारी यांनी लिहिलेले “स्टॅटिस्टिक्स” हे पुस्तक जेव्हा हाती लागले तेव्हा लगेचच भराभरा ते वाचून काढले. एका अर्थाने ही माझ्यासाठी उजळणीच होती. मला या संकल्पना नव्याने माझ्या भाषेतून वाचायला मिळाल्या. केवळ एवढेच नाही तर संख्याशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना आणखी व्यवस्थित समजल्या. जसे एवरेज आणि मीन मधील फरक, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशनचा उपयोग.
प्रोबॅबिलिटीचा आणि संख्याशास्त्राचा लोकसंख्याशास्त्र आणि विमा विज्ञानामध्ये असणारे उपयोग, याशिवाय भारतीय संख्या शास्त्रज्ञांची माहिती आणि विशेष म्हणजे या विषयातील कोडी, दिशाभूल आणि गमतीजमती या गोष्टी मला नव्याने या पुस्तकाद्वारे समजल्या. तसं पाहिलं तर कोणताही तांत्रिक विषय मराठीतून मांडणं अतिशय अवघड आहे. अर्थात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तरीदेखील लेखक द्वयीनी संख्याशास्त्राचा सखोल ऊहापोह आणि अभ्यास या पुस्तकाद्वारे केल्याचे दिसते. काही संकल्पना नवशिक्यांना समजण्यासाठी अवघड आहेत. अर्थात त्यांचा व्यवहारिक उपयोग दर्शवून दिल्यास त्या आणखी व्यवस्थित समजू शकतील असे वाटते. प्रोबॅबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन ही संकल्पना अजूनही अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना फारशी लवकर समजत नाही. तसेच त्याचे व्यवहारिक उपयोग देखील ध्यानात येत नाहीत. खरंतर प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स साठी हे अतिशय उपयुक्त तत्व आहे. त्याची मांडणी आणखीन व्यवस्थितपणे व्हायला हवी असं वाटून जातं. बाकी डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स ते इनफरन्शियल स्टॅटिस्टिक्स ची इत्यंभूत माहिती आपल्याला या पुस्तकाद्वारे वाचायला मिळते. शिवाय बहुतांश संकल्पनांचा इतिहास देखील लेखकांनी यामध्ये दिला असल्याने ती अधिक रंजक वाटते. संख्याशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी हे पुस्तक म्हणजे एक उत्तम संदर्भ ग्रंथ होईल असेच आहे.
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे यातील दिलेली उदाहरणे. या उदाहरणाद्वारे संख्याशास्त्राचा व्यवहारिक उपयोग कसा करता येतो, किंबहुना अनेक प्रश्नांची उकल संख्याशास्त्राद्वारेच कशी करता येते याची माहिती वाचकांना होते. अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा भरणा दिसून आला. त्यातील  बऱ्याचशा शब्दांना उत्तम मराठी प्रतिशब्द आहेत. त्यांचा वापर करता आला असता. जसे सिस्टीम= प्रणाली, रूल= नियम, मेथड= पद्धती, एक्सपेरिमेंट= प्रयोग, प्रोबॅबिलिटी= संभाव्यता, सिलेक्शन= निवड, मार्क्स= गुण, एवरेज= सरासरी, रेट=दर, रॉ=कच्चा/अपरिपक्व, नंबर=क्रमांक, फॉर्म्युला= सूत्र, डायमेन्शन= मिती, अनालिसिस=विश्लेषण, टेक्निक= तंत्र, टेस्ट= चाचणी, थियरम= प्रमेय, टेबल= तक्ता/सारणी, इंजीनियरिंग= अभियांत्रिकी, प्रॉडक्ट= उत्पादन, ड्रॉईंग=आकृत्या इत्यादी.
लोकसंख्याशास्त्र, जीवनसारणी आणि विमाविज्ञानाविषयीचे  प्रकरण आणि गोळाबेरीज नावाचे प्रकरण हे प्रत्येक संख्याशास्त्रज्ञाला माहित असावे असेच आहे. एकंदरीत आज सर्वाधिक नोकरीच्या संधी ज्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत त्या डेटा सायन्सला शिकण्यापूर्वी संख्याशास्त्राचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करेल. 

- तुषार भ. कुटे



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com