ठाण्यातल्या उच्चभ्रू रहिवासी भागामध्ये राहणारे त्रिकोणी कुटुंब. यातील राजा आणि राणी अर्थात नवरा आणि बायको दोघेही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉबला आहेत. आणि त्यांची मुलगी शाळेमध्ये शिकतेय. अर्थात याच कारणास्तव त्यांच्या घरी घरकाम करण्यासाठी कामवाली बाई आहे.
त्यांचा दिवस सुरू होतो सकाळी सात वाजल्यापासून. घरातली सर्वच कामे कामवाली बाई अर्थात आशाताई अगदी तन्मयतेने करतेय. दिवसातील बारा तास वेळ ती या घरात घालवते. अर्थात घराची सर्वच जबाबदारी तीच्याकडेच आहे. बहुतांश वेळा ती कामाला उशिरा पोहोचते. त्यामुळेच एक दिवस वैतागून राणी आशाताईला कामावरून काढून टाकते. आणि दुसरी बाई शोधायला लागते. पण तिला हवी तशी बाई मिळत नाही. मग पुन्हा आशाताईला कामावर बोलावले जाते. परत काही दिवसांनी एका घटनेमुळे तिला काम सोडावे लागते. यानंतर मात्र राणीची फारच पंचाईत व्हायला लागते. आशाताई आपल्यासाठी काय काय करू शकतात, किंबहुना काय करतायेत? याची जाणीव तिला व्हायला लागते. यातूनच राणी आणि आशाताई यांच्यातील भावनिक बंध समोर येतो आणि कथा संपते.
ही गोष्ट साधी सरळ वाटली तरी आज शहरात राहणाऱ्या अनेक मध्यम तसेच उच्चमध्यमवर्गीय घरातील जवळपास अर्ध्याअधिक कुटुंबांची तरी आहे. घर सांभाळण्यासाठी घरातील ‘त्या’ दोघांव्यतिरिक्त आणखी कोणीतरी असायला हवे हे अधोरेखित करणारी ही कहाणी आहे.
मराठीमध्ये आजवर आई-वडील, आई-मुलगा, वडील-मुलगी, बहीण-भाऊ सारख्या जवळपास प्रत्येक नात्यावर भाष्य करणारे अनेक चित्रपट होऊन गेले. परंतु घरमालकिन आणि कामवाली बाई यांच्यातील बंध दाखवणारा कदाचित हा पहिलाच चित्रपट असावा. ही गोष्ट दिग्दर्शकाने विनोदी ढंगाने सादर केलेली आहे. परंतु शेवटाकडे जाता जाता ती भावनिक वाट पादाक्रांत करते. खरंतर हीच कथेची मुख्य गरज होती. ज्यामुळेच चित्रपट पूर्णत्वास जातो. घरातील एकूण वातावरण, दोघांच्याही ऑफिसमधील वातावरण, आजूबाजूची परिस्थिती आणि घडणाऱ्या घटना या शहरातील प्रत्येकाला आपल्याशा किंबहुना आपल्या अवतीभवतीच घडणाऱ्या आहेत, असं वाटतं. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्यांच्या भूमिकेशी समरस झाल्याचं देखील दिसतं. म्हणून ही गोष्ट मनाला भावते.
या चित्रपटांमध्ये दोन ‘घुमा’ आहेत. यातील पहिली घुमा अर्थात राणीची भूमिका मुक्ता बर्वेने छान साकारलेली आहे. तर दुसरी घुमा जिला आपण या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र म्हणू तिची अर्थात आशाताईची भूमिका नम्रता संभेरावने अतिशय उत्कृष्टपणे साकारलेली दिसते. कदाचित ही भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी, हेही दिसून येतं. तिच्यासारखी चतुरस्त्र अभिनेत्री कोणतीही भूमिका अतिशय उत्तमपणे निभावू शकते. पूर्ण चित्रपटामध्ये सर्वप्रथम तिचीच भूमिका खरोखर लक्षात राहते. ‘वाळवी’ या परेश मोकाशी यांच्या आधीच्या चित्रपटामध्ये देखील अतिशय छोट्या भूमिकेमध्ये नम्रताने आपली छाप पाडली होती. कदाचित याचमुळे तिला या चित्रपटामध्ये मोठी भूमिका मिळाली असावी. तिने या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून लाखो मराठी प्रेक्षकांना नम्रता ज्ञात आहेच. पण या चित्रपटातून तिने तिच्यातील कसलेली अभिनेत्री मराठी प्रेक्षकांना पुन:श्च दिसून येते.
एकंदरीत चित्रपट एकदाच नाही तर पुन्हा-पुन्हा पहावा असाच आहे. परेश मोकाशी यांचा चित्रपट म्हणजे मराठी प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. हा चित्रपट देखील त्याला अपवाद नाही.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com