Wednesday, July 31, 2024

फोटोप्रेम मधील प्रियदर्शिनी

“महाराष्ट्राची हास्यजत्रा”मध्ये लोकप्रिय असणारी पुण्याची विनम्र अभिनेत्री म्हणजेच प्रियदर्शनी इंदलकर. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फुलराणी’ चित्रपटासाठी तिला २०२४ मध्ये प्रदार्पण करणाऱ्या सर्वोत्तम अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झाला होता. याशिवाय दैनिक सकाळचा नवीन चेहरा पुरस्कार देखील तिला याच वर्षी मिळाला. मध्यवर्ती भूमिका असणारा ‘फुलराणी’ हा तिचा पहिला चित्रपट असला तरी सन २०२१ मध्ये तिने एका मराठी चित्रपटांमध्ये अतिशय छोटी भूमिका पार पाडली होती. नीना कुलकर्णी अभिनित फोटोप्रेम या चित्रपटामध्ये एक ते दोन मिनिटांसाठी प्रियदर्शनी दिसून येते. नीना कुलकर्णी यांच्या तरुण वयातील भूमिकेत प्रियदर्शनी चित्रपटाच्या पडद्यावर वावरली आहे. कदाचित अतिशय कमी जणांना ही माहिती असावी. विशेष म्हणजे प्रियदर्शनीच्या विकिपीडिया पानावर देखील याविषयी कोणतीच माहिती लिहिलेली नाही. हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
चित्रपटातील एक ते दोन मिनिटांच्या भूमिकेमध्ये देखील ती लक्षात राहते हे विशेष!


Monday, July 29, 2024

बालभारतीचे शि. द. फडणीस

९० च्या दशकात बालभारतीने छापलेली गणिताची पुस्तके विविधरंगी व्यंगचित्रांनी आणि निरनिराळ्या रेखाटनांनी भरलेली असायची. ती चित्रे पाहण्यात व त्यातून शिकण्यात एक वेगळीच मजा असायची. इयत्ता बदलली की नवीन पुस्तक हातात पडायचे. मग आम्ही ते पुस्तक पूर्ण चाळून त्यातील चित्रे अनुभवायचो. यातून फार गंमत वाटायची. आणि प्रत्यक्ष जेव्हा गणित शिकायला सुरुवात होत असे तेव्हा या चित्रांमधून गणित हा विषय अधिक जवळचा वाटायचा. त्यावेळेसच या चित्रांवर शि. द. फडणीस यांचे नाव मी वाचले होते. आज या चित्रकाराला शंभरी पूर्ण झाली तेव्हा आम्ही अभ्यासलेल्या त्या पुस्तकांचा काळ पुन्हा एकदा नव्याने जागृत झाला!

“गणिताची अशी पुस्तके जर आम्हाला मिळाली असती तर आम्ही गणितज्ञ झालो असतो.” असं त्यावेळी जेष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांनी म्हटलं होतं. बालभारतीच्या पुस्तकांमध्ये विशेषतः गणित आणि विज्ञान या पुस्तकांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झाला. कदाचित त्या पिढीमध्ये तयार झालेल्या गणिताच्या गोडीला हीच चित्रे कारणीभूत असावीत. 

 





 


Sunday, July 28, 2024

तंत्रज्ञानाचा शाप

तंत्रज्ञान शाप की वरदान? अशा शीर्षकाचा निबंध बऱ्याच वेळा शाळेत असताना लिहिलेला आहे. त्यावेळी विचार करायचो की तंत्रज्ञानाचे नेमकी तोटे कोणते? खरंतर तंत्रज्ञान आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सहाय्य करत असतं. मानवी आयुष्य सुसह्य आणि सुकर करत असतं. याच कारणास्तव त्याच्या तोट्यांकडे आपण सहज डोळेझाक करतो. आणि याच दुर्लक्षाचे दुष्परिणाम नक्की काय होतील, हे आपल्या ध्यानात येत नाही. 


मागच्या अनेक वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचे असे अनेक तोटे आपल्याला अनुभवायला मिळाले. त्यातीलच ही एक बातमी. केवळ तंत्रज्ञानावरच विसंबून राहिल्यामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. बायोमेट्रिक पद्धतीने दरवाजांचे स्वयंचलन करणे, ही आजकाल बहुतांश ठिकाणची मुख्य प्रणाली आहे. परंतु समजा विद्युतप्रवाह खंडित झाला तर काय? या प्रश्नाचे उत्तर निर्माणकर्त्यांनी शोधले नसावे. आणि याच कारणास्तव आपल्याला दोन जीव गमवावे लागले. प्रत्येक गोष्टीचे जितके फायदे आहेत तितकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक तोटे देखील असतात. त्यावर आपण योग्य तो उपाय काढू शकतो. परंतु मानवी दुर्लक्षामुळे या उपायांकडे फारसे गांभीर्याने पहिले जात नाही. याची परिणीती मानवी हानीमध्ये होऊ शकते, हे दाखवणारी ही एक घटना. अजूनही कोणतेही तंत्रज्ञान बनवताना त्याच्या तोट्यांकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे, असे वाटते.

- तुषार भ. कुटे.

Saturday, July 27, 2024

एक मार्गदर्शन

एका तंत्र शिक्षण कार्यक्रमामध्ये माझे प्रशिक्षण सुरू होते. जवळपास महिनाभराचा कार्यक्रम होता. बहुतांश विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसत होते. त्यातीलच एक विद्यार्थी सकाळी बरोबर वेळेवर वर्गात पोहोचायचा, अतिशय तन्मयतेने सर्व तासिकांना हजेरी लावायचा आणि दिलेला अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करायचा.
एक दिवस दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली. मी बाहेर निघत असतानाच त्याने मला थांबवले आणि बोलू लागला,
“नमस्कार सर, मी तुमचं फेसबुक प्रोफाईल बघितलं.”
त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलची उत्सुकता बघून मी देखील चमकलो. तो पुढे बोलू लागला,
“सर तुमच्या सगळ्या पोस्ट मराठी मधून असतात. खूप भारी वाटतं वाचायला. आपल्यातलंच कोणीतरी लिहिलेलं आहे असं वाटतं. इथं शिकवताना तुम्ही सर्वकाही इंग्रजीतून शिकवता. ते पण छान वाटतं आणि सर्वकाही समजतं. तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात सर?”
त्याच्या या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित उमटले. आणि मी त्याला उत्तर दिले.
“अर्थातच मराठी शाळेत. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे.”
“मग तुम्ही इतकं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकता?”, त्याचा पुढचा प्रश्न.
“कसं आहे मित्रा… जर तुमचं तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर कोणतीही भाषा अतिशय सहजपणे शिकू शकता. माझंही असंच झालय. इंग्रजी शिकताना, बोलताना मी इतर कुठल्याही अन्य भाषेचा विचार केला नाही. किंवा पर्याय देखील शोधला नाही. बाहेरून आपल्या भागात आलेले लोक मराठी कसे बोलू शकतात? कारण त्यांनी जर मराठी ऐकली तरच हे शक्य आहे. तसेच मी देखील करतो. तुम्ही इंग्रजी ऐकली तरच तुम्ही ती बोलू शकता. आणि मातृभाषेतून शिकल्यामुळे मला कोणतीही गोष्ट अतिशय पटकन समजायला लागते. कदाचित याचमुळे मराठी इतकीच इंग्रजी देखील मला सहज जमत असावी.”
याशिवाय त्याला मार्गदर्शनपर इतर अनेक गोष्टी मी सांगितल्या. त्याला देखील त्या पटल्या. एक वेगळाच उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास माझी मदत झाली, याचे देखील मला समाधान लाभले. 

Friday, July 19, 2024

दोष

एका राष्ट्रीय शिक्षण संस्थेतून संस्थेतील प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच संपला होता आणि त्यांचे कंपन्यांसाठी प्लेसमेंट ड्राईव्ह सुरू होते. एक दिवस असाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एक विद्यार्थी मला संस्थेमध्ये भेटला. मी त्याला विचारले, 

“झाले का रे प्लेसमेंट?”

“नाही ना सर अजून.”

“अरे मी पण ऐकलंय की ८० टक्के मुलांचे प्लेसमेंट झालेले आहे.”

“सर ते सगळे साउथ आणि नॉर्थ इंडियन आहेत. तुम्हाला माहितीये ना त्यांची इंग्रजी किती भारी असते. म्हणून मिळाला त्यांना जॉब!”. मला त्याच्या या उत्तराचा राग आला. मी त्याला तात्काळ सुनावले.

“तू तर इंग्लिश मीडियमचा आहेस ना. मग काय प्रॉब्लेम झाला? आणि मुर्खा साउथ इंडियन लोकांचा कौतुक मला नको सांगू. जेव्हा इंग्रजी बोलायची वेळ येत होती तेव्हा तू हमरे-को तुमरे-को करत बोलत होता, हे पाहिलेय मी. त्या साउथ इंडियन लोकांसाठी त्यांची भाषा आणि इंग्रजी या दोनच भाषा महत्त्वाच्या. आणि नॉर्थ इंडियन साठी हिंदी आणि इंग्रजी या दोन. तुम्ही बसा हमरे-को तुमरे-कोला कवटाळून. आणि दोष इतरांना द्या.”


आजही जेव्हा इंग्रजी बोलायची वेळ येते तेव्हा मराठी मुले हमरे-को तुमरे-कोच्या भाषेला प्राधान्य देतात. आणि सरळ सरळ इंग्रजी बोलायचं टाळतात. खरंतर ही तिसरी भाषा आपल्यावर थोपवल्याने आपलं नुकसान तर झाले नाहीये ना, याचा विचार करण्याची वेळ आलीये. 


  • तुषार भ. कुटे.  


Thursday, July 18, 2024

लुझिंग लीना

जून-जुलै १९७३ चा काळ असेल. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक अलेक्झांडर सौचुक यांच्या सिग्नल आणि इमेज प्रोसेसिंगवर काम करणाऱ्या एका विद्यार्थ्याला आणि संगणक प्रयोगशाळा सहाय्यकाला त्यांच्या प्रयोगासाठी एक उत्तम इमेज अर्थात चित्र हवे होते. संगणकीय अल्गोरिदम इमेजेस वर अर्थात चित्रांवर व्यवस्थित चालतात की नाही हे पाहण्यासाठी त्यांना योग्य ते चित्र मिळत नव्हते. त्या काळात वापरण्यात आलेली ठेवणीतील चित्रे त्यांनी वापरून बघितली, परंतु त्यातून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय त्याच त्याच इमेजेस वापरून ते कंटाळले होते. त्यांना काहीशी वेगळी, डायनामिक, सुंदर अशी नवी कोरी इमेज हवी होती. या इमेजद्वारे ते आपल्या अल्गोरिथम नवीन शोधनिबंधामध्ये प्रकाशित करू इच्छित होते. आणि अचानक त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध ‘प्लेबॉय’ या नियतकालिकाच्या आतील पानांमध्ये मध्यभागी दोन पानांवर छापलेली एक इमेज दिसून आली. ती एका स्वीडिश मॉडेलची होती. तिचे नाव…  लीना फॉरसेन.

लीनाचे हे चित्र उभे आयताकृती आणि बऱ्यापैकी मोठे होते. परंतु त्यांनी या चित्राच्या चेहऱ्याकडचा चौरसाकृत भाग ५१२ * ५१२ अशा पिक्सल रिझोल्युशन मध्ये कापून घेतला आणि संगणकामध्ये RGB चॅनल्सचा वापर करून साठवून ठेवला. याच चित्राचा वापर करून त्यांनी आपले अल्गोरिथम शोधनिबंधामध्ये प्रकाशित केले. या शोधनिबंधाचा संदर्भ घेऊन पुढे हळूहळू  इमेज प्रोसेसिंगवर काम करणाऱ्या अन्य संशोधकांनी देखील या चित्राचा वापर करायला सुरुवात केली. अल्पावधीतच हे चित्र लोकप्रिय होऊ लागले. बहुतांश विद्यार्थी आणि संशोधक याच चित्राचा वापर करून इमेज प्रोसेसिंगचे अल्गोरिथम प्रकाशित करू लागले. याच विषयावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये देखील लिहिण्याच्या चित्राचा वापर होऊ लागला. प्रामुख्याने पुरुष संशोधकांचा वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात पहिल्यांदाच एका स्त्रीच्या चित्राचा इमेज प्रोसेसिंगच्या अल्गोरिथमसाठी वापर करण्यात आला होता. १९९५ मध्ये संगणकामध्ये सर्वाधिक वेळा वापरण्यात येणाऱ्या चित्रांमध्ये या चित्राचा पहिला क्रमांक लागला. जेव्हा ‘प्लेबॉय’ या नियतकालिकाला ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी कॉपीराईटचा दावा देखील दाखल केला. परंतु या चित्राची उपयुक्तता लक्षात आल्यानंतर कालांतराने नियतकालिकाने हा दावा मागे देखील घेतला होता. १९९१ मध्ये ऑप्टिकल इंजिनिअरिंगच्या सर्वोत्तम जर्नलच्या मुखपृष्ठावर देखील लीनाचे चित्र झळकले. तिथून या चित्राची लोकप्रियता अधिक वाढीस लागली. IEEE या प्रख्यात संस्थेच्या जर्नलमध्ये सर्वप्रथम १९९९ मध्ये तीन वेगवेगळ्या शोधनिबंधात लीना या चित्राचा वापर करण्यात आला होता. इथून पुढे IEEE च्या इमेज प्रोसेसिंग वरील बहुतांश शोधनिबंधामध्ये याच चित्राचा वापर होत गेला. विशेष म्हणजे या चित्राची लोकप्रियता वाढल्यानंतर लीना फॉरसेन या स्वीडिश मॉडेलला देखील दोन वेगवेगळ्या संशोधन कार्यक्रमांमध्ये आमंत्रित देखील करण्यात आलं होतं. शिवाय त्यातील एका कॉन्फरन्समध्ये तिने भाषण देखील दिलं! IEEE च्या इमेज प्रोसेसिंग जर्नलचे मुख्य संपादक डेव्हिड मुन्सन यांच्यामध्ये लीनाच्या या चित्रामध्ये इमेज प्रोसेसिंग मध्ये काम करणाऱ्या संशोधकांना हवी असलेली सर्व माहिती मिळून जाते. म्हणूनच ‘संगणक दृष्टी’च्या या विश्वात या चित्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. 

लीनाच्या चित्राच्या वापरावरून अनेक संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये वाद देखील झाले. शिवाय या चित्राला पर्याय शोधण्याचे देखील प्रयत्न झाले.. अर्थातच हा बदल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही दृष्टीतून योग्य असाच होता. सन २०१८ मध्ये नेचर नॅनोटेक्नॉलॉजी आणि ऑप्टिकल इंजीनियरिंग अशा दोन्ही जर्नलने जाहीर केले की इथून पुढे लीनाची इमेज ते वापरणार नाहीत. परंतु आजही लोकप्रियतेच्या बाबतीत या चित्राने गाठलेले विक्रम अन्य कोणतेही चित्र मोडू शकलेले नाही, हेही तितकेच सत्य आहे.

इमेज प्रोसेसिंगमध्ये वर्षानुवर्षे वापरण्यात येणाऱ्या अल्गोरिथममध्ये आजही ही इमेज तितक्याच प्रभावीपणे आपले निकाल दाखवते. सन २०१९ मध्ये ‘लुझिंग लीना’ नावाची एक डॉक्युमेंटरी देखील प्रकाशित झाली होती. त्यामध्ये म्हटले होते की ‘बऱ्याच वर्षांपूर्वीच मी मॉडेलिंग मधून निवृत्त झाले आहे, आता वेळ आहे तंत्रज्ञानातून देखील निवृत्त होण्याची!’ पण ही निवृत्ती अधिकृतपणे होण्यासाठी त्यांना पाच वर्षे जावी लागली.  

१ एप्रिल २०२४ मध्ये IEEE ने जाहीर केले की इथून पुढे कोणत्याही प्रकाशनामध्ये संशोधक लीनाची इमेज वापरू शकणार नाहीत. असे असले तरी इमेज प्रोसेसिंग क्षेत्रामध्ये लीनाने जी इमेज बनवली आहे, ती क्वचितच एखादी दुसरी इमेज स्वतः बनवू शकेल!

(लीनाचे मूळ छायाचित्र छायाचित्रकार ड्वाईट हूकर यांनी काढले आहे.)


  • तुषार भ. कुटे


(सोबतचे चित्र: लीना फॉरसेन तिच्या सुप्रसिद्ध छायाचित्रासह!)

 


 

Monday, July 1, 2024

द. आफ्रिकेचा पराभव

सामन्यातला शेवटचा चेंडू टाकला गेला आणि भारत विजयी झाला. याचबरोबर भारतीय आणि प्रतिस्पर्धी दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडूंच्या डोळ्यात देखील अश्रू होते परंतु त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातला घास हिरावून भारताने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. यावेळी पहिल्यांदाच प्रतिस्पर्धी संघाविषयी देखील भारतीयांना वाईट वाटून गेले. कारण यावेळेसचा प्रतिस्पर्धी पाकिस्तान किंवा बांगलादेश सारखा माजोरडा आणि शत्रुत्व राखणारा नव्हता किंवा इंग्लंड अथवा ऑस्ट्रेलियासारखा उन्मादी देखील नव्हता. क्रिकेटचा जेंटलमन्स गेम हे नाव सार्थ करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा संघ होता.
मागच्या कित्येक वर्षांपासून मोक्याच्या क्षणी मान टाकणारा अर्थात चोकर्स म्हणून या संघाची अपख्याती होती. यावर्षी त्यांना त्यांच्यावरील हा डाग पुसण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांना विजय पताका फडकवता आली नाही. यावरून या संघाचे तसेच त्यांच्या सांघिक कामगिरीचे महत्त्व कमी होत नाही. भारतीय संघाप्रमाणेच त्यांनी देखील पूर्ण विश्वचषकात शंभर टक्के यश मिळवले. पण अंतिम क्षणी विजेता आणि उपविजेत्यामध्ये काही इंचाचेच अंतर राहून गेले.
दक्षिण आफ्रिका देखील पूर्ण सामन्यामध्ये विजेत्यासारखा खेळला परंतु त्यांना विजयी होत आले नाही. याचे संवेदनशील क्रिकेट रसिकांना देखील वाईट वाटून गेले. कारण या भावना नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीयांच्या देखील होत्या. त्यामुळे आपण त्यांचे दुःख निश्चितच समजू शकतो. एक उत्तम प्रतिस्पर्धी म्हणून दक्षिण आफ्रिका संघाचा भारतीय क्रिकेट रसिकांना निश्चितच आदर आहे. क्रिकेट या खेळाला त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. विश्वचषकातील एका पराभवामुळे त्यांचे महत्त्व निश्चितच कमी होत नाही.
त्यांच्या आजवरच्या कामगिरीला मनापासून सलाम. त्यांच्या या पहिल्या अंतिम सामन्याच्या अनुभवातून बोध घेऊन ते पुढील विश्वचषकात याहीपेक्षा चांगली कामगिरी ते करतील, अशी आशा करूयात.