Saturday, July 27, 2024

एक मार्गदर्शन

एका तंत्र शिक्षण कार्यक्रमामध्ये माझे प्रशिक्षण सुरू होते. जवळपास महिनाभराचा कार्यक्रम होता. बहुतांश विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसत होते. त्यातीलच एक विद्यार्थी सकाळी बरोबर वेळेवर वर्गात पोहोचायचा, अतिशय तन्मयतेने सर्व तासिकांना हजेरी लावायचा आणि दिलेला अभ्यास देखील वेळेवर पूर्ण करायचा.
एक दिवस दुपारी जेवणाची मधली सुट्टी झाली. मी बाहेर निघत असतानाच त्याने मला थांबवले आणि बोलू लागला,
“नमस्कार सर, मी तुमचं फेसबुक प्रोफाईल बघितलं.”
त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलची उत्सुकता बघून मी देखील चमकलो. तो पुढे बोलू लागला,
“सर तुमच्या सगळ्या पोस्ट मराठी मधून असतात. खूप भारी वाटतं वाचायला. आपल्यातलंच कोणीतरी लिहिलेलं आहे असं वाटतं. इथं शिकवताना तुम्ही सर्वकाही इंग्रजीतून शिकवता. ते पण छान वाटतं आणि सर्वकाही समजतं. तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला आहात सर?”
त्याच्या या प्रश्नाने माझ्या चेहऱ्यावर आपोआपच स्मित उमटले. आणि मी त्याला उत्तर दिले.
“अर्थातच मराठी शाळेत. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि दहावीपर्यंत पूर्ण मराठी माध्यमातून शिकलेलो आहे.”
“मग तुम्ही इतकं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकता?”, त्याचा पुढचा प्रश्न.
“कसं आहे मित्रा… जर तुमचं तुमच्या मातृभाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर कोणतीही भाषा अतिशय सहजपणे शिकू शकता. माझंही असंच झालय. इंग्रजी शिकताना, बोलताना मी इतर कुठल्याही अन्य भाषेचा विचार केला नाही. किंवा पर्याय देखील शोधला नाही. बाहेरून आपल्या भागात आलेले लोक मराठी कसे बोलू शकतात? कारण त्यांनी जर मराठी ऐकली तरच हे शक्य आहे. तसेच मी देखील करतो. तुम्ही इंग्रजी ऐकली तरच तुम्ही ती बोलू शकता. आणि मातृभाषेतून शिकल्यामुळे मला कोणतीही गोष्ट अतिशय पटकन समजायला लागते. कदाचित याचमुळे मराठी इतकीच इंग्रजी देखील मला सहज जमत असावी.”
याशिवाय त्याला मार्गदर्शनपर इतर अनेक गोष्टी मी सांगितल्या. त्याला देखील त्या पटल्या. एक वेगळाच उत्साह त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढविण्यास माझी मदत झाली, याचे देखील मला समाधान लाभले. 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com