रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगाराची आणि त्याच्या मुलाची ही गोष्ट आहे.
कामाच्या ठिकाणी एका गृहप्रकल्पावर काम चालू असते. या ठिकाणी कामगार म्हणून
चित्रपटाच्या नायकाची नियुक्ती होते. अर्थात ज्या दिवशी काम त्या दिवशी
पैसा, असं काही त्याच्या आयुष्यात चालू होतं.
जवळच्याच गावामध्ये त्याचा
छोटसं घर असतं. अर्थात कामाच्या निमित्तानेच तो या ठिकाणी राहायला आलेला
असतो. त्याला एक लहान मुलगा देखील असतो. बालपण निरागस असतं, असं म्हणतात.
त्याला हा मुलगा तरी अपवाद कसा असेल? त्याच्या घराच्या समोरच एका बंगल्यावर
आणखी एक छोटा मुलगा लाकडी घोड्यावर खेळताना त्याला दिसतो. त्या मुलाला तो
घोडा खूप आवडतो. संध्याकाळी वडील घरी आल्यावर तो वडिलांकडे खेळण्यातल्या
त्या घोड्याची मागणी करतो. दररोजच्या जीवनात खाण्यासाठी संघर्ष करताना
त्याला मुलाच्या खेळण्यासाठी पैसे कसे परवडू शकतील? अर्थातच या कारणास्तव
मुलाला नकार देणे, त्याला भाग पडते. परंतु मुलगा काही पिच्छा सोडत नाही.
दररोज खेळण्यातल्या घोड्याची त्याच्याकडे मागणी करतो. आपल्या मुलाची एक
साधी इच्छा देखील आपण पूर्ण करू शकत नाही, याचे शल्य त्याला वाटू लागते. मग
त्यावर तो उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो.. गृहप्रकल्प बांधकामाच्या ठिकाणी
एक जण खेळण्यातील मोडलेला घोडा टाकून देताना त्याला दिसतो. त्या मोडलेल्या
घोड्याकडे बघून त्याला खूप आनंद होतो. त्या मोडलेल्या घोड्याला स्वतःच्या
कारागिरीने व्यवस्थित करून खेळण्याजोगा बनवतो. आणि मुलाला घोडा देऊन
आश्चर्याचा धक्का देतो. परंतु इथून खरी नाट्यमय घडामोडींना सुरुवात होते.
हा लाकडी घोडा आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. यात नायकाची भयंकर
दमछाक होते. ज्या घोड्यासाठी त्याने इतके प्रयत्न केले, तो त्याला
शेवटपर्यंत दमवतो.
चित्रपटाची कथा अतिशय सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे
दिग्दर्शकाने देखील ती चांगल्या पद्धतीने खुलविल्याची दिसते. एका अतिशय
वेगळ्या प्रयत्नात हा चित्रपट निश्चित बाजी मारतो. परंतु बऱ्याच जणांना
माहीत नसल्याने कदाचित अजूनही हा चित्रपट प्रेक्षकांपासून दूर असावा, असे
दिसते.
--- तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com