इयत्ता नववीमध्ये असताना माझी प्रोग्रामिंगची ओळख झाली. त्या काळात आम्हाला
“बेसिक” नावाची संगणकीय भाषा शिकवली जायची. आठवड्यातून एक ते दोन तास हा
वर्ग चालायचा. शिवाय या विषयाला गुण देखील नव्हते. आणि कदाचित याच
कारणास्तव त्यावेळी आम्ही त्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही.
परंतु
डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षी पहिल्यांदाच “सी
प्रोग्रामिंग लँग्वेज”ची ओळख झाली. संगणकाच्या इतिहासामध्ये लोकप्रिय
असणारी आणि आजही वापरात असणारी ही संगणकीय भाषा. २५-२६ वर्षांपूर्वी
संगणकीय भाषा शिकण्यासाठी उपलब्ध असणारी साधने अतिशय मर्यादित होती.
इंटरनेट अस्तित्वात होते परंतु सदैव उपलब्ध नव्हते. आणि शिवाय त्यावरील
माहिती देखील अपुरी होती आणि विस्तृत नव्हती. याच कारणास्तव संगणकीय
प्रोग्रामिंग शिकणे हे आव्हानात्मक होते. अर्थात सदैव केवळ पुस्तकांवरच आणि
त्यावरील त्यातील ज्ञानावरच विसंबून राहावे लागत असे. अशावेळी यशवंत
कानेटकर यांनी लिहिलेले “लेट अस सी” हे पुस्तक वाचण्यात आले. त्या काळात
देखील सी प्रोग्रामिंगवर आधारित असणारे हे सर्वात लोकप्रिय पुस्तक होते.
बऱ्याच जणांनी शिफारस केलेले हे पुस्तक मी वाचायला सुरुवात केली. खरं
सांगायचं तर माझ्या संगणकीय प्रोग्रामिंगची सुरुवातच या पुस्तकाने झाली.
फोटोमध्ये या पुस्तकाची तिसरी आवृत्ती आहे. अगदी हीच आवृत्ती सर्वप्रथम मी
वाचली होती. आणि याच पुस्तकातून माझ्या प्रोग्रामिंगचा श्रीगणेशा झाला.
संगणकीय भाषेमधील विविध संकल्पना याच पुस्तकातून मला समजायला लागल्या.
अर्थात यासाठी मला माझ्या मित्रांनी देखील बरीच मदत केली होती. परंतु या
पुस्तकाव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक प्रोग्रामिंग शिकण्यासाठी मी
त्याकाळी वापरले नाही. कानेटकर म्हणतील तोच अंतिम शब्द, असं काही त्या
काळात आम्ही समजत असू. अर्थात ते खरं देखील होतं. प्रोग्रामिंगच्या विविध
संकल्पना प्रात्यक्षिकांद्वारे मी या पुस्तकातूनच अनुभवल्या. आणि कदाचित
याच कारणास्तव प्रोग्रामिंगचा आमचा पाया अधिक भक्कम होत गेला. एका अर्थाने
माझ्यासाठी प्रोग्रामिंगची ही भगवद्गीताच होती, असे म्हणायला हरकत नाही. आज
या पुस्तकाची १९ वी आवृत्ती बाजारामध्ये आलेली आहे. पण माझ्यासाठी मी
वाचलेली आणि अनुभवलेली तिसरी आवृत्ती महत्त्वाची वाटते. आज पुन्हा हे
पुस्तक विकत घेतले. याच पुस्तकामध्ये माझ्या प्रोग्रामिंग इतिहासाच्या
भावना जखडलेल्या होत्या आणि आजही आहेत.
--- तुषार भ. कुटे
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com