Friday, September 13, 2024

प्रवास

चित्रपटाची सुरुवात होते एका आणीबाणीच्या प्रसंगाने. आजोबांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागतं. घरामध्ये आजोबा आजी हे दोघंच. आजीला काय करावे ते सुचत नाही. पण तरी देखील ती धीराने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामध्ये आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि ते वाचतात.
या प्रसंगातून आजोबा मात्र एक मोठा धडा घेतात. आयुष्याची इतकी वर्षे घालवली, पण आता आजवर काय कमावलं? याचा ते विचार करतात. त्याचे उत्तर त्यांना नकारात्मक येतं. आयुष्याचा सार काय ते समजत नाही. आपण आजवर किती माणसे कमावली, जी आपल्याला योग्य वेळी मदतीला येतील? आपण गेल्यावर आपली आठवण किती लोक काढतील? या विचाराने ते अस्वस्थ होतात. आयुष्याची अखेरची काही वर्षे केवळ औषधाच्या गोळ्यांच्या भरवशावर घालवत असतात. आयुष्यातील नाकर्तेपन त्यांना ठळकपणे जाणवायला लागते. यावर ते त्यांच्या पद्धतीने उपाय शोधून काढतात. विशेष म्हणजे दर आठवड्याला त्यांना डायलिसिस करावे लागत असते. तरीदेखील लोकसेवेचा वसा हाती घेऊन ते जीवनाची पुढची वर्षे काढायला सज्ज होतात. आपण जेव्हा जाऊ तेव्हा चार लोक तरी आपल्याला खांदा द्यायला येतील का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळते.
एका वेगळ्या विषयाला हात घालणारा हा चित्रपट म्हणजे 'प्रवास'. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी या आजी-आजोबांची भूमिका केली आहे. केवळ त्यांच्याच नव्हे तर अन्यही काही प्रसंगातून जीवन जगण्याची गुपिते आपल्याला समजतात. दोघांचा कसदार अभिनय आणि दमदार कथा आपल्याला शेवटपर्यंत खेळवून ठेवते. केवळ एकच नाही तर त्याहीपेक्षा अधिक वेळा हा चित्रपट आपण पाहू शकतो.


 

Wednesday, September 11, 2024

प्रोग्रामर्स डे अर्थात प्रोग्रामरचा दिवस

जगभरामध्ये मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर डे प्रमाणे जवळपास सर्वच व्यावसायिकांचे डेज अर्थात दिवस साजरे केले जातात. अशाच प्रकारे संगणकीय प्रोग्रॅमर्सचा दिवस अर्थात प्रोग्रॅमर्स डे देखील साजरा होतो. यावर्षी प्रोग्रॅमर्स डे १२ सप्टेंबर रोजी आलेला आहे! मागच्या वर्षी हाच दिवस १३ सप्टेंबरला होता, हे विशेष.
अर्थात या दिवशी कोणाचीही पुण्यतिथी अथवा जयंती नाही किंवा या दिवशी प्रोग्रामरच्या आयुष्यातली कोणतेही घटना देखील घडलेली नाही.
सन २००२ मध्ये रशियातल्या पॅरलल टेक्नॉलॉजी या कंपनीतील व्हॅलेंटाईन बाल्ट आणि मायकेल चेरीयाकोव यांनी रशियन सरकारकडे १३ सप्टेंबर हा दिवस प्रोग्रॅमर्स डे साजरा केला जावा, अशी सर्वप्रथम विनंती केली. अर्थात यामागचे त्यांचे तर्कशास्त्र देखील निराळेच होते. १३ सप्टेंबर हा दिवस वर्षातला २५६वा दिवस आहे. तुम्हाला माहीत असेलच की संगणकीय मोजमापे नेहमी दोनच्या घातांक रूपामध्ये मोजली जातात. जसे २, ४, ८, १६, ३२, ६४ इत्यादी. २५६ ही दोनच्या घातांक रूपात असणारी आणि ३६५ पेक्षा कमी असणारी सर्वात मोठी संख्या आहे. म्हणून २५६ वा दिवस प्रोग्रॅमर्स डे म्हणून ओळखला जावा, अशी उभय प्रोग्रामर्सची मागणी होती. संगणकीय परिभाषेतील हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमनुसार २५६ ही संख्या १०० अशी लिहिली जाते.
रशियाच्या दोनही प्रोग्रामर्सने आपल्या मागणीला पाठिंबा मिळावा म्हणून एक ऑनलाईन याचिका देखील दाखल केली होती. तिला जगभरातून बहुसंख्य प्रोग्रामरचा पाठिंबा मिळाला. शिवाय रशियाचे तत्कालीन अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी देखील यावर ऑनलाईन सही केली होती! अखेरीस सन २००९ मध्ये रशियाच्या दूरसंचार विभागाने या मागणीस मान्यता दिली आणि तेव्हापासून हा दिवस प्रोग्रॅमर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस दर चार वर्षांनी अर्थात लीप वर्षांमध्ये १२ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
विशेष म्हणजे चीनमध्ये देखील प्रोग्रॅमर्स डे साजरा होतो. परंतु त्यांचा प्रोग्रामर्स दिवस हा २४ ऑक्टोबर या दिवशी असतो. ऑक्टोबर हा दहावा महिना. म्हणून दिवस आणि महिना यांची जोड १०२४ अशी होते. ही संख्या देखील दोनच्या दहाव्या घातांकात आहे. अर्थात लीपवर्ष असले तरी देखील चीनचा हा प्रोग्रॅमर्स डे बदलत नाही!
रशियाच्या जवळील बहुतांश देशांमध्ये १२ किंवा १३ सप्टेंबर या दिवशी सुट्टी दिली जाते.... अर्थात प्रोग्रामर्सला! परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनियन प्रोग्रामर्सनी या दिवसावर बहिष्कार टाकला होता, जो आजही कायम आहे.

--- तुषार भ. कुटे 



डॉट कॉम मॉम

कोकणातल्या एका छोट्या गावांमध्ये एक आजी आजोबा राहत आहेत. त्यांचा मुलगा अनेक वर्षांपासून अमेरिकेमध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक आहे. एक दिवस तो आपल्या आईला अमेरिकेमध्ये राहण्यासाठी बोलावतो. भारतीय आणि अमेरिकन संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. पेहराव, आचार विचार आणि जीवन पद्धती अतिशय भिन्न आहेत. याच कारणास्तव या भारतीय आजीला अमेरिकेमध्ये मनस्ताप सहन करावा लागतो. प्रत्येक गोष्ट ती भारतीय नजरेतून करायला जाते. आणि त्यातूनच विविध समस्या तयार होतात. याच कारणास्तव सुनेचे सहकार्य देखील तिला लागत नाही. अतिशय खिन्न मनाने ती पुन्हा भारतामध्ये येते.
तिच्या शेजारी राहणारी एक मुलगी देखील अमेरिकेमध्येच राहत असते. तिला जेव्हा आपल्या या मावशीची गोष्ट समजते तेव्हा विषय व्यवस्थित समजावून घेऊन ती मार्गदर्शन करते. आणि यातूनच अमेरिकन जीवनपद्धतीत मिसळू शकणारी डॉट कॉम मॉम तयार होते. ती पुन्हा अमेरिकेला जाते आणि तिथल्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करते. त्यात यशस्वी देखील होते. अशा यशस्वी आजीची कहाणी डॉट कॉम मॉम या चित्रपटांमध्ये दाखवलेली आहे.
काहीशी सत्य परिस्थितीशी जुळणारी आणि बऱ्याच घरांमध्ये अनुभवता येणारी ही गोष्ट आहे. दोन वेगवेगळ्या जीवन पद्धती जुळवून घेताना कशा अडचणी येऊ शकतात हे चित्रपटांमध्ये पाहता येते. सर्वच गोष्टी प्रभावी झालेल्या आहेत असे नाही पण कथेनुरूप वाहत जाणारा चित्रपट म्हणूनतो निश्चितच पाहता येईल.



Friday, September 6, 2024

माधुरी

ही कथा आहे त्या दोघींची. दोघींची म्हणजे आईची आणि मुलीची. मुलीने तिच्या तारुण्यात पदार्पण केले आहे. परंतु आई देखील तिच्याच वयाची आहे. अर्थात शरीराने नाही तर मनाने.
मागच्या काही वर्षांपासून मानसिक धक्का बसल्यामुळे आईला भूतकाळातील मागील वीस वर्षे आठवतच नाही. तिला अजूनही असं वाटते की ती केवळ अठरा वीस वर्षांची आहे. आणि मुलगी देखील तिच्याच वयाची. अशा आईला संभाळणे म्हणजे महाकठीण काम. पण तरीदेखील ती तिच्या पद्धतीने आईला सांभाळत आहे आणि अनेक संकटांना तोंड देखील देत आहे.तिची आई एकेकाळी अशी नव्हती. ती महाविद्यालयातील एक नामांकित प्राध्यापिका होती. पण आज परिस्थिती वेगळी आहे. तिला समजून घेणारा तिचा एक विद्यार्थी देखील तिच्यासोबत सातत्याने असतो. तो देखील हुशार आहे.
एक दिवस एक माणूस उपचार तज्ञ त्यांच्या आयुष्यात येतो. तो त्याच्या पद्धतीने सदर केस हाताळण्याचा प्रयत्न करतो.. यातून मुलीला आपली आई समजत जाते. कधी कधी तिचं वागणं बोलणं देखील पटतं. आई कशी होती आणि आज ती अशी का झाली? याचा देखील तिला उलगडा होत जातो. एका अर्थाने ती आपल्या आईला समजून घ्यायला लागते. त्यांच्यामध्ये एक नवं नातं तयार होतं. हे नातं तयार होतानाचे प्रसंग दिग्दर्शकाने छान रंगविलेले आहेत. ते कुठेच कंटाळवाणे वाटत नाही. एका वेगळ्या नात्याची गोष्ट हा चित्रपट सांगून जातो.
आईची अर्थात माधुरीची मध्यवर्ती भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेली आहे. बहुरंगी भूमिका करण्यात त्यांचा हातखंडा आहेच. आणि तो या चित्रपटात देखील दिसून येतो.