Wednesday, September 11, 2024

प्रोग्रामर्स डे अर्थात प्रोग्रामरचा दिवस

जगभरामध्ये मदर्स डे, फादर्स डे, सिस्टर डे प्रमाणे जवळपास सर्वच व्यावसायिकांचे डेज अर्थात दिवस साजरे केले जातात. अशाच प्रकारे संगणकीय प्रोग्रॅमर्सचा दिवस अर्थात प्रोग्रॅमर्स डे देखील साजरा होतो. यावर्षी प्रोग्रॅमर्स डे १२ सप्टेंबर रोजी आलेला आहे! मागच्या वर्षी हाच दिवस १३ सप्टेंबरला होता, हे विशेष.
अर्थात या दिवशी कोणाचीही पुण्यतिथी अथवा जयंती नाही किंवा या दिवशी प्रोग्रामरच्या आयुष्यातली कोणतेही घटना देखील घडलेली नाही.
सन २००२ मध्ये रशियातल्या पॅरलल टेक्नॉलॉजी या कंपनीतील व्हॅलेंटाईन बाल्ट आणि मायकेल चेरीयाकोव यांनी रशियन सरकारकडे १३ सप्टेंबर हा दिवस प्रोग्रॅमर्स डे साजरा केला जावा, अशी सर्वप्रथम विनंती केली. अर्थात यामागचे त्यांचे तर्कशास्त्र देखील निराळेच होते. १३ सप्टेंबर हा दिवस वर्षातला २५६वा दिवस आहे. तुम्हाला माहीत असेलच की संगणकीय मोजमापे नेहमी दोनच्या घातांक रूपामध्ये मोजली जातात. जसे २, ४, ८, १६, ३२, ६४ इत्यादी. २५६ ही दोनच्या घातांक रूपात असणारी आणि ३६५ पेक्षा कमी असणारी सर्वात मोठी संख्या आहे. म्हणून २५६ वा दिवस प्रोग्रॅमर्स डे म्हणून ओळखला जावा, अशी उभय प्रोग्रामर्सची मागणी होती. संगणकीय परिभाषेतील हेक्साडेसिमल नंबर सिस्टीमनुसार २५६ ही संख्या १०० अशी लिहिली जाते.
रशियाच्या दोनही प्रोग्रामर्सने आपल्या मागणीला पाठिंबा मिळावा म्हणून एक ऑनलाईन याचिका देखील दाखल केली होती. तिला जगभरातून बहुसंख्य प्रोग्रामरचा पाठिंबा मिळाला. शिवाय रशियाचे तत्कालीन अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी देखील यावर ऑनलाईन सही केली होती! अखेरीस सन २००९ मध्ये रशियाच्या दूरसंचार विभागाने या मागणीस मान्यता दिली आणि तेव्हापासून हा दिवस प्रोग्रॅमर्स डे म्हणून साजरा केला जाऊ लागला. हा दिवस दर चार वर्षांनी अर्थात लीप वर्षांमध्ये १२ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
विशेष म्हणजे चीनमध्ये देखील प्रोग्रॅमर्स डे साजरा होतो. परंतु त्यांचा प्रोग्रामर्स दिवस हा २४ ऑक्टोबर या दिवशी असतो. ऑक्टोबर हा दहावा महिना. म्हणून दिवस आणि महिना यांची जोड १०२४ अशी होते. ही संख्या देखील दोनच्या दहाव्या घातांकात आहे. अर्थात लीपवर्ष असले तरी देखील चीनचा हा प्रोग्रॅमर्स डे बदलत नाही!
रशियाच्या जवळील बहुतांश देशांमध्ये १२ किंवा १३ सप्टेंबर या दिवशी सुट्टी दिली जाते.... अर्थात प्रोग्रामर्सला! परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनियन प्रोग्रामर्सनी या दिवसावर बहिष्कार टाकला होता, जो आजही कायम आहे.

--- तुषार भ. कुटे 



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com