Tuesday, September 24, 2024

एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी

जीवनामध्ये योग्य निर्णय घेणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण तो एक निर्णय जीवनाला कोणत्याही प्रकारे कलाटणी देऊ शकतो. कदाचित पुढील सर्व आयुष्य त्या निर्णयावरच अवलंबून असू शकते. अशाच त्या एका निर्णयाची गोष्ट या चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आलेली आहे.
मुक्ता आणि ईशान हे एक सुखी जोडपं. मुक्ता ही करिअरला प्राधान्य देणारी स्त्री आहे. आणि त्यासाठी तिच्या आई-वडिलांचा देखील तिला खंबीर पाठिंबा आहे. परंतु ती आई व्हायला तयार नसते. कारण त्यामुळे तिचं करिअर थांबू शकतं, अशी भीती तिला वाटत असते. याच कारणास्तव पुढे जाऊन दोघांचाही घटस्फोट होतो. ईशान दुसरे लग्न करतो. पण त्याच्या दुसऱ्या बायकोला वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मूल होणार नसते. दुसरीकडे मुक्ताच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडते आणि ती पूर्णपणे एकटी पडते. तो एकाकीपणा तिला खाऊ लागतो. म्हणूनच ती मानसिक दृष्ट्या देखील कमकुवत होते. एक डॉक्टर म्हणून तिची क्षमता देखील कमी व्हायला लागते. एकेकाळी मूल होऊ न देण्याचा निर्णय आणि आज तयार झालेली पूर्ण विरुद्ध परिस्थिती यातून ती एक वेगळाच मार्ग काढते. यात भावनिक मानसिक गुंतागुंत तयार होते. यातून पुढे नक्की कसा मार्ग निघतो हे चित्रपटात पाहता येईल.
सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. दोघांनीही आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिल्याचे दिसते. शिवाय भावभावनांच्या आणि नात्यातील गुंतागुंतीचा हा खेळ दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com