Friday, September 13, 2024

प्रवास

चित्रपटाची सुरुवात होते एका आणीबाणीच्या प्रसंगाने. आजोबांच्या छातीमध्ये अचानक दुखू लागतं. घरामध्ये आजोबा आजी हे दोघंच. आजीला काय करावे ते सुचत नाही. पण तरी देखील ती धीराने मुसळधार कोसळणाऱ्या पावसामध्ये आजोबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आणि ते वाचतात.
या प्रसंगातून आजोबा मात्र एक मोठा धडा घेतात. आयुष्याची इतकी वर्षे घालवली, पण आता आजवर काय कमावलं? याचा ते विचार करतात. त्याचे उत्तर त्यांना नकारात्मक येतं. आयुष्याचा सार काय ते समजत नाही. आपण आजवर किती माणसे कमावली, जी आपल्याला योग्य वेळी मदतीला येतील? आपण गेल्यावर आपली आठवण किती लोक काढतील? या विचाराने ते अस्वस्थ होतात. आयुष्याची अखेरची काही वर्षे केवळ औषधाच्या गोळ्यांच्या भरवशावर घालवत असतात. आयुष्यातील नाकर्तेपन त्यांना ठळकपणे जाणवायला लागते. यावर ते त्यांच्या पद्धतीने उपाय शोधून काढतात. विशेष म्हणजे दर आठवड्याला त्यांना डायलिसिस करावे लागत असते. तरीदेखील लोकसेवेचा वसा हाती घेऊन ते जीवनाची पुढची वर्षे काढायला सज्ज होतात. आपण जेव्हा जाऊ तेव्हा चार लोक तरी आपल्याला खांदा द्यायला येतील का? या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळते.
एका वेगळ्या विषयाला हात घालणारा हा चित्रपट म्हणजे 'प्रवास'. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी या आजी-आजोबांची भूमिका केली आहे. केवळ त्यांच्याच नव्हे तर अन्यही काही प्रसंगातून जीवन जगण्याची गुपिते आपल्याला समजतात. दोघांचा कसदार अभिनय आणि दमदार कथा आपल्याला शेवटपर्यंत खेळवून ठेवते. केवळ एकच नाही तर त्याहीपेक्षा अधिक वेळा हा चित्रपट आपण पाहू शकतो.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com