Sunday, September 29, 2024

सरी

चित्रपटाची सुरुवात होते एका रेल्वे ट्रॅकवर... एका निर्मनुष्य भागातून जाणाऱ्या त्या ट्रॅकवर एक २४-२५ वर्षांची युवती रेल्वेच्या दिशेने दुःखद चेहरा करून बघत आहे. तिच्या चेहऱ्यावर जखमांचे व्रण देखील दिसून येतात. ट्रेनच्या भोंग्याचा आवाज येतो. जसजशी ट्रेन जवळ यायला लागते तसतसे तिचे काळीज धडधडू लागते. परंतु, अखेरच्या क्षणी मृत्यूला कवेत घेण्याची तिची हिंमत होत नाही आणि ती ट्रॅकवरून बाहेर उडी मारते. पाठीमागे ट्रेन वेगाने धडधडत ट्रॅकवरून निघून जाते आणि मग सुरू होतो फ्लॅशबॅक.
ही तरुणी आहे, दिया... चेहऱ्याने निर्मळ, निष्पाप आणि स्वभावाने अबोल...
तंत्रज्ञान महाविद्यालयात शिकत असताना मास्टर्सला शिकणाऱ्या एका युवकावर तिचे प्रेम जडते. अगदी लव अॅट फर्स्ट साईट म्हणतात ना तसेच! प्रेमात पडण्याच्या वयात खरोखरच प्रेम जडल्याने ती त्या युवकाला फॉलो करायला लागते. सातत्याने त्याचाच विचार मनामध्ये घोळत राहतो. त्याच्याशी येनकेनप्रकारे जवळीक साधण्याचा ती प्रयत्न करते. पण तिला ते फारसे जमत नाही. अगदी त्याने पेन्सिलिद्वारे काढलेली चित्रे देखील महाविद्यालयाच्या फलकावरून काढून घरी घेऊन जाते. याच चित्रांमुळे तिला त्या युवकाशी अर्थात रोहितशी बोलण्याची संधी देखील मिळते. पण त्यांचे प्रकरण काही पुढे जात नाही. दिया मात्र रोहितसाठी कासावीस झालेली असते.
थोड्याच दिवसात तिला समजते की रोहितला कोरियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळालेली आहे आणि त्यामुळे त्याने कॉलेजदेखील सोडलेले आहे. इतके दिवस ती रोहितचा पाठलाग करत असते, त्याच्याशी तिच्या प्रेमाबद्दल कसं बोलू? या प्रश्नाचे उत्तर शोधत असते परंतु यातच रोहित निघून गेल्याची बातमी येते. अर्थात यामुळे तिचा भ्रमनिरास होतो. परंतु एक दिवस अचानक काही महिन्यानंतर तिला रोहित परत भेटतो... अगदी अनपेक्षितपणे.
इथे चित्रपटातला पहिला ट्विस्ट येतो. रोहित देखील तिला अनेक महिन्यांपासून फॉलो करत असतो. त्याची देखील तिच्याशी बोलण्याची हिंमत होत नाही. पण त्या दिवशी तो बोलतो. इथे चित्रपटातील सगळ्यात पहिला आनंदाचा प्रसंग तयार होतो! प्रेमकहानी चालू होते. दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही...  ईथवर परिस्थिती आलेली असते. परंतु चित्रपटातील पुढचा ट्विस्ट म्हणजे एके रात्री बाईकवर जात असताना दोघांचाही भीषण अपघात होतो आणि होत्याचे नव्हते होते. दिया भयंकर मानसिक धक्क्यामध्ये जाते. कदाचित यातून ती पुन्हा कधीही सावरू शकणार नसते. तिच्या आई-वडिलांकडून बरेच प्रयत्न होतात. परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. शेवटी ते तिचे शहर बदलायचे ठरवतात. नव्या शहरात आल्यानंतर दियाची एका नव्या मित्राबरोबर अनोख्या पद्धतीने ओळख होते. हा मित्र म्हणजे आदी. तो तिला बोलत करतो. तिच्याशी मैत्री करतो आणि यातूनच त्यांच्या मैत्रीचे नाते प्रेम भावनेमध्ये रूपांतरीत होते. ही भावना दोघेही बोलून दाखवत नाहीत. त्यांच्या अबोल नात्याला कोणत्याही शब्दांची गरज पडत नाही. दिया पुन्हा प्रेमात पडते. परंतु चित्रपटातील ट्विस्ट काही थांबत नाहीत. जीवनाचे वळण पुन्हा एकदा वेगळ्या वाटेला तिला घेऊन जाते. मानवी जीवन हे किती अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकले आहे, याची प्रचिती दियाच्या एकंदर आयुष्याकडे पाहिले तर येते. यापुढील कथा ही खूप वेगळ्या वळणाची आहे. परंतु चित्रपटाचा शेवट एका शोकांतिकेने होतो. त्याची सुरुवात जिथे झाली असते त्याच ठिकाणी शेवट देखील होतो!
एखाद्याचे जीवन इतक्या वेगवेगळ्या वळणानंतर निराळ्याच गंतव्यस्थानी येऊन पोहोचते, याची गोष्ट दियाच्या या कथेमध्ये दिसून येते.
चित्रपट सुरू झाला तेव्हाच याची सिनेमॅटोग्राफी कोणत्यातरी दक्षिण भारतीय माणसाने केली असावी, असा संशय आला आणि तो खराच ठरला. चित्रपट संपल्यानंतर जेव्हा त्याची माहिती काढली तेव्हा समजले की हा चित्रपट कन्नडमधील के. एस. अशोक दिग्दर्शित 'दिया' या चित्रपटाचा अधिकृत मराठी रिमेक आहे. शिवाय याच चित्रपटाची हिंदी आवृत्ती 'डियर दिया' आणि तेलुगु आवृत्ती 'डियर मेघा' या नावाने प्रदर्शित झाली होती. कन्नड भाषेमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दिग्दर्शकाने स्वतःच हा चित्रपट चार भाषांमध्ये तयार केला! कथा तशी छान आहे. परंतु त्याचा शेवट एक शोकांतिका असल्याने तो एक दुःखद प्रेमपट असल्याचे दिसते.
चारही चित्रपटांपैकी मराठीमध्ये जीने दियाची भूमिका केली आहे त्या रितिका श्रोत्री हीचीच भूमिका सर्वात प्रभावी वाटली. विशेष म्हणजे 'आदी'च्या भूमिकेमध्ये कन्नड अभिनेता पृथ्वी अंबर याने कन्नड, हिंदी आणि मराठी अशा तीनही चित्रपटांमध्ये काम केले आहे! तसेच त्याच्या आईच्या भूमिकेमध्ये मृणाल कुलकर्णी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये आहेत. तीनही चित्रपट प्रत्येक दृश्यनदृश्य समान असल्याचे दिसतात.
एकंदरीत गोषवारा पाहिला तर रितिका दियाच्या भूमिकेमध्ये अतिशय फिट बसल्याचे दिसते. तिचा एकंदरीत अभिनय सुंदर झालेला आहे. एखाद्या मुलीला आपल्या आयुष्यात दोन-दोन हुशार आणि समंजस जोडीदार कसे मिळू शकतात? असा प्रश्न देखील पडू शकतो. आदी आणि त्याच्या आईचे जे नाते दाखवले आहे, तसे नाते सापडणे आज विरळाच! त्या नात्यास आदर्श नाते म्हणता येईल. शिवाय रोहित आणि आदी देखील एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतात. एक प्रकारे हा प्रेम त्रिकोण आहे असे म्हणता येईल. पण या त्रिकोणाच्या तीनही बाजू आपल्याला तीन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून देखील समजावून घेता येतील.
रोमँटिक चित्रपट पाहणाऱ्यांना हा चित्रपट निश्चितच १००% आवडेल. कदाचित त्याच्या शेवटवर ते नाराज देखील असतील. 'संमोहिनी' हे गाणे अतिशय छान आहे. वारंवार ऐकावे असेच!
"लाईफ इज फुल ऑफ सरप्राईजेस अँड मिरॅकल्स" या टॅगलाईनवर चित्रपटाची निर्मिती केली गेली होती. एकंदर चित्रपट पाहता ही टॅगलाईन सार्थ ठरते. काही गोष्टी अविश्वासनीय वाटल्या तरी जीवनातील अप्रत्याशीत घटना तो दाखवून जातो. काही चित्रपट आपल्या मनाचा ठाव घेतात, अशाच पठडीतील हा देखील आहे.
चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपट समीक्षकांनी यास फारसे चांगले गुण दिले नव्हते. यामागचे कारण समजले नाही. युट्युबवर कोणीतरी अनाधिकृतपणे हा चित्रपट अपलोड केलेला आहे. त्यावरील ९०% पेक्षा अधिक लोकांनी सकारात्मक कमेंट्स केलेल्या दिसतात. म्हणजेच लोकांना हा चित्रपट आवडलेला आहे. आयएमडीबीवर देखील चित्रपटाचे रेटिंग कमी आहे. म्हणून कदाचित बहुतांश प्रेक्षक पाहत नसावेत. परंतु माझ्या दृष्टीने हा चित्रपट चांगलाच आहे.
नियमित चित्रपट बघणाऱ्यांना हा निश्चित आवडेल. तुमच्यापैकी कोणी बघितला असेल तर नक्की सांगा. बघितला नसेल तर नक्की बघा आणि प्रतिक्रिया देखील कळवा चित्रपटाच्या नायिकेच्या अर्थात दियाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटते? याचे उत्तर ऐकायला निश्चित आवडेल.

--- तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com